बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Saturday 22 October 2011

आकाशकंदील

हा माझा साधा-सोप्पा आकाशकंदिल ... स्मित
फॉल मधे पडलेली झाडांची रंगीत पाने, आणि पांढरा ट्रेस पेपर.
MB.jpg

Thursday 20 October 2011

अनुभूती रंगांची

[June 2010]

हिरवट रंगाभोवती छोटासा पिवळसर पटटा, त्याला तपकिरी रंगाची किनार. मधे लाल चुटुक, त्यावर जांभळे टिपके, आणि वरच्या बाजुला हिरवा गार.

हे वर्णन माझ्या एखाद्या रंगीबेरंगी ओढणीचे किंवा साडीचे नसुन माझ्या घरी कुंडीत वाढलेल्या एका अननसाचे आहे.

आवडत्या फळांपैकी एक असलेला अननस आमच्या भागातही मिळत असल्याने दिसतो कसा, लागतो कसा हे जरी माहीती असले तरी, पैदास त्या भागात होत नसल्याने, त्याचे 'झाड' कसे असते, तो येतो कसा, एकुण प्रक्रिया काय असते, हे बघण्याचा कधीच योग आला नव्हता, किंवा तशी उत्सुकता पण कधी वाटली नाही.
कोकणातुन येताना एका मित्राने माझ्यासाठी अननस आणला आणि योगायोगाने त्याच्या आसपासच वाचण्यात आले होते की अननसाचा शेंडा परत मातीत रोवला तर, छान फुटतो. अजुन एक योगायोग असा की, त्याच दिवशी मी घरी नसताना, घरात असलेल्या २ व्यक्तींपैकी एकाने माझा माठ फोडला.

तोडलेला अननसाचा देठ मी फुटलेल्या माठात कचरा + माती भरुन रोउन दिला. गोल माठात हिरवा देठ 'शो' साठी चांगला दिसेल, इतकीच अपेक्षा. पुढच्या प्रवासात मात्र रोजची सकाळ माझ्यासाठी एक सुंदर रंगीबेरंगी आश्चर्य घेउन येत होती. अत्यंत देखणी अशी ही प्रक्रिया शब्दात सांगणे खरच अवघड आहे.
[फोटो मी माझ्या सेल फोन कॅमेर्‍याने काढले आहेत, त्यामुळे जे दिसले, ते तसेच्या तसे तुमच्या पर्यंत पोहोचेलच असे नाही, पण एक प्रयत्न :)]

छोटासा शेंडा रुजला, आणि मोठ्या-मोठ्या नविन पानांनी छान बहरला.
1.JPG
पण तरीसुध्दा याला एखादे फळ / फुल येईल असे माझ्या ध्यानी-मनी पण आले नाही. अचानक एके दिवशी सकाळच्या टेहळणीच्या वेळी दिसले की एक लाल लुसलुशीत असे फुलासारखे काही झाडाच्या मध्यभागात दिसते आहे. अननसाला फुल येते ?, या आधी कधीच ऐकले नव्हते, अनेकांना विचारले, फळवाल्याला सुध्दा, पण कोणीच निट उत्तर देउ शकले नाही.
2.JPG
दोन दिवसांनी फुल थोडे वर सरकले, आणि खाली एक दांडा दिसु लागला.
3.JPG
फुल थोडसं मोठ झाल्यावर, पाकळ्या एकदम दाट आणि जाड झाल्या. तेंव्हा या फुलाचेच फळ होणार, म्हणजे हे फुल नसुन फळाची पहीली अवस्था आहे हे लक्षात आले.
4.JPG
5.JPG
आठच दिवसात छान गोलाकार आला. आणि तो लालचुटुक गोळा अत्यंत देखणा दिसु लागला.
6.JPG
या लाल गोळ्या भोवतीची लांब-लांब पाने पण मस्त लालबुंद, आणि टोकाकडे हिरवी अशी होती.
7.JPG
अजुन ८ दिवसांनी, मधला भाग थोडा हिरवट दिसायला लागला. मधे हिरवा, त्या भोवती लाल, पुन्हा त्या भोवती हिरवा. इतके देखणे दिसत होते ते फुल / फळ.
8.JPG
आणि अचानक या रंगांमधे भर पडली अजुन एका रंगाची. जांभळ्या रंगाचा एक टिपका लाल पाकळ्यांमधे दिसायला लागला.
9.JPG
दुसर्‍या दिवशी अजुन काही टिपके दिसले.
10.JPG
आणि आदल्या दिवसाच्या टिपक्याचे आज फुल उमलले होते.
11.JPG
12.JPG
13.JPG
14.JPG
15.JPG
अननसाला जे खवले असतात, निट बघितले तर लक्षात येते की त्या खवल्यांना छोटेसे काटेरी टोक असते. ते टोक म्हणजेच हे जांभळे फुल. प्रत्येक खवल्यात असे एक जांभळे फुल येत होते.
16.JPG
जांभळी फुले सुकुन, खवले स्पष्ट दिसायला लागले.
17.JPG
आणि अननसाने आता मस्त आकार घेतला.
18.JPG
हळुहळु तो मोठा होऊ लागला.
19.JPG
20.JPG
21.JPG
22.JPG
अननसा बरोबरच तुराही मोठा झाला, पण जुनी पाने आणि नविन तुरा, दोघांच्या रंगात खुपच फरक होता.
23.JPG
आणि हा मोठा झालेला अननस.
24.JPG
अनेकांनी म्हंटले आहे की एखादी वेल वाढताना बघणे हे आपल्या लहान मुलाला वाढताना बघण्याइतकेच आनंददायी असते. पण मी म्हणेन की असे एखाद्या अननसाला वाढताना बघणेही तसेच काहीसे मन भरुन आनंद देणारे असते.

Wednesday 19 October 2011

वाढदिवस स्मृतीतला

[March 2010]


माझ्या लहानपणी वाढदिवस साजरा करणे म्हणजे, आईने घरी माझ्या आवडीचा पदार्थ करणे [पाकातले चिऱोटे स्मित ], मला नविन फ्रॉक शिवणे. आणि त्यानिमीत्ताने, 'आवश्यक' असलेली एखादी वस्तु गिफ्ट म्हणुन आणणे. माझ्या वर्गातल्या ज्या एखाद्या मैत्रिणीच्या लक्षात असेल ती संध्याकाळी घरी येत असे, मग आई काहीतरी मस्त खायला करायची, एवढेच.

आमच्या घरीच नाही तर आम्ही जिथे रहात होतो त्या कॉलनीतही वेगळी काही पध्दत नव्हती. आमची १४ घरांची कॉलनी होती. कोजागिरी, दिवाळी, गणपती, नवरात्र अश्या अनेक निमीत्तांनी आम्ही सगळे एकत्र असायचो. कुणाचे लग्न ठरले म्हणुन केळवण असो, अश्वीनी चे औक्षण असो किंवा तुळशीचे लग्न, सगळे एकत्र खुप मजा करायचो. आजच्या सारखे gettogether साठी निमीत्त शोधावे लागत नसे. कदाचीत म्हणुनही वाढदिवस हा फक्त कुटुंबा पुरता मर्यादित असेल.

पुढे शेजारचे आंबेकर पुण्याला स्थाईक झाले, त्यांनी त्यांचे घर एका बँकेला भाड्याने दिले. आणि पोटे कुटुंब तिथे रहायला आले. त्यांची राणी माझ्याच वयाची होती त्यामुळे आमची लगेचच गट्टी झाली. एकुणच घरोब्याचे संबंध प्रस्थापीत झाले. पोटे काका-काकू त्यांच्या तिनही मुलांचे वाढदिवस मोठ्याप्रमाणात साजरे करायचे. पण जे मी कधिच विसरणार नाही ते म्हणजे, त्यांच्या घरी त्यांनी साजरे केलेले माझे वाढदिवस.

माझ्या वाढदिवशी संध्याकाळी ते आठवणीने माझ्यासाठी केक आणायचे, मला आवडते म्हणुन जिलेबी आणायचे, माझ्यासाठी गिफ्ट पण आणायचे. वाढदिवसाला आम्ही कोण - कोण असायचो तर मी, राणी, काका, काकु, आणि माझ्या आणि राणीच्या बहिण्-भावंडांपैकी जे कोणी त्यावेळी हजर असेल ते. काकुंनी केलेला खाउ, केक, जिलेबी खाउन आणि मिळालेले गिफ्ट घेउन मी मजेत घरी जायचे. ७ किंवा ८ वर्षाची असेल त्यावेळी. त्यामुळे ते काही वेगळे करत आहेत हे काही लक्षात आले नाही, पण आज जेंव्हा शेजारच्या लहान मुलांची नावे पण मला माहीती नसतात तेंव्हा त्यांचा वेगळे पणा जाणवतो.

जसे-जसे मोठी होत गेले तसे तसे माझे सगळे वाढदिवस परिक्षेच्या सावलीत झाकोळुन गेले, कारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात येणारा माझा वाढदिवस स्मित. नेमकेच, प्रयोग परिक्षा, तोंडी परिक्षा, assignment submition ई. पैकी काही ना काही दुसर्‍या दिवशी असायचेच.

कॉलेज चे शेवटचे वर्ष होते, ३ वर्ष एका वर्गात असुनही माझी एकाही मुलाशी मैत्री अशी झाली नव्हती. तसेही मला लहान पणा पासुनच एखादी पक्की मैत्रिण सोडली तर फार मैत्रिणी पण नसायच्या, ज्या कोणी होत्या त्या सगळ्या, त्यांनी माझ्याशी मैत्री केली म्हणुन स्मित. तर आमचे कॉलेज हे एक दिव्यच होते, शिक्षक शिकवण्यासाठी असतात हेच मुळी तिथे कुणाला मान्य नव्हते. मी पुणे विद्यापिठातुन बरिच खटपट करुन अभ्यासक्रम, जुन्या प्रश्ण्पत्रिका वगैरे मिळवुन बर्‍याच नोट्स तयार केल्या होत्या. मधल्या वेळात वाचण्यासाठी मी त्या घेउन जात असे. मुलांना त्याची कुणकुण लागली, आणि त्यांनी मला त्या मागितल्या, मी पण दिल्या, पण तो कॉलेज चा शेवटचा दिवस होता. मी श्रीरामपुर ला रहात होते, कॉलेज लोणी ला होते, मुले तिथेच हॉस्टेल ला रहाणारी होती. मग असे ठरले की, सोमवारी मी येउन त्या घेउन जायच्या, त्याच्या आत त्यांनी त्या कॉपी करायच्या. अभ्यासाचा वेळ घालवुन त्यांच्यासाठी मी इतक्या लांब यायला तयार झाले म्हणुन त्यांना खुपच आनंद झाला. ठरल्याप्रमाणे, मी आणि माझी मैत्रींण, रोहिणी, लोणीला गेलो. मुले [चक्क] वेळेवर आली, आणि सगळ्या नोट्स ही परत केल्या. माझा जिव भांड्यात पडला. आम्ही परत निघालो तर मुळ लोणीचा असलेला एक मुलगा म्हणाला माझा आज वाढदिवस आहे, आणि मी आपल्य वर्गातल्या सगळ्यांना माझ्या घरी बोलावले आहे तर तुम्ही पण या. गेलो आम्ही. त्याने केक वगैरे कापला, आम्ही सगळ्यांनी त्याला भेटकार्ड दिली, मग काही खाल्ले - पिल्ले. निघायच्या आधी सहजच, त्याला मिळालेली सगळी कार्ड आम्ही बघत होतो. एक कार्ड बघायचे - पुढच्याला द्यायचे. असे करता करता अचानक एक कार्ड आले, ज्यावर Dear Arati लिहीलेले होते, मी २ वेळा वाचले आणि माझ्या चेहर्‍यावर आश्चर्य मिश्रीत हसु पसरले. वर बघितले तर सगळे माझ्याकडे बघुन हसत होते. मग एका मागे एक सगळ्यांनी मला कार्ड दिली आणि मी थँकु - थँकु म्हणे पर्यंत एक डेकोरेट केलेला टिपॉय समोर आला, त्यावर मेणबत्त्या लावलेला केक होता. आणि मेणबत्या फुंकुंन बिंकुन मी तो केक कापावा हा सगळ्यांचा आग्रह होता. कारण त्याच दिवशी माझाही वाढदिवस होता.

पण त्यांना हे समजले कसे ?, तर कॉलेजच्या निवडणुकांसाठी गॅरेंटर म्हणुन सही करण्याचे काम कायमच माझ्या कडे असे, अगदी ११ वी पासुन. तेंव्हा कधितरी माझे आयकार्ड मी कुणालातरी दिले होते, आणि त्यावर या मुलांनी तारिख बघितली होती.

मी अजुनही संकोचाने, मी नाही कापणार केक असे वगैरे म्हणत होते. पण शेवटी फुंकल्या मेणबत्त्या आणि कापला केक. अजुनही आठवले की तसेच आश्चर्य मिश्रीत हसु माझ्या चेहर्‍यावर पसरते.

काही कामानिमीत्ताने आई पुण्याला आली होती, आणि मी ज्या होस्टेल मधे रहात होते त्याच कॉलनित रहाणार्‍या माझ्या एका मावशी कडे उतरली होती. दुसर्‍या दिवशी माझा वाढदिवस होता म्हणुन तिने तिचा मुक्काम एक दिवसाने वाढवला. सकाळी आवरुन तयार झाले तर माझ्या २ रुम मैत्रिणींनी केक समोर ठेवला, मग काय केक कापला एकमेकींना भरवला, गिफ्ट घेतले आणि मावशी कडे गेले, तर या दोघींनी मिळुन पुरण पोळी चा बेत केलेला. सक्काळी - सक्काळी गरम पोळी खाउन, जेवायला घरी येण्याचे कबुल करुन ऑफिस ला गेले, तर परत एकदा समोर केक, माझ्या टिम मित्र-मैत्रीणींनी समोर ठेवला. परत एकदा केक कापला, सटर फटर खाउ खाल्ला. कामाला लागलो. ४ वाजता माझ्यासाठी ऑफिस च्या पत्त्यावर एक पर्सल आले, अजुन एक केक, मोठ्या बहिणीने पाठवला होता. reception मधे जाउन घेतल्यामुळे आता इतर department मधे पण कळाले, मग परत एकदा सगळ्यांच्या साक्षीने केक कापणे. घरी आले तर धाकट्या बहीणीचे पार्सल माझी वाट बघत होते, परत एकदा मावशिच्या घरी केक कापण्याच सोहळा. एक दिवसात चार केक, पुरण पोळी, आणि बर्‍याच भेटवस्तु, विषेश म्हणजे माझ्या छोट्याच्या भाच्याने मला पाठवलेला छोटासा गुलाबी रंगाचा सॉफ्ट-सॉफ्ट 'हत्ती', [त्या त्या वयात त्याला जे आवडेल ते गिफ्ट तो मला पाठवतो ]. हे सगळे तिसर्‍या वर्षी वगैरे स्वाभाविक आहे, पण ३० व्या वर्षी ?!! अशाप्रकारे माझा ३० वा वाढदिवस कायमच माझ्या लक्षात राहिला.


स्मित

भोसलेनगर ला रहायला आले तेंव्हा एक बबिता नावच्या मावशी माझ्याकडे कामाला यायच्या. घरी जरी मी एकटी असले तरी माझ्या वाढदिवसाला सक्काळीच उठुन मी गोड-धोड करते स्मित. तसेच त्या दिवशी करत होते. बबिता मावशी पलिकडेच भांडी घासत होत्या. इतक्यात माझ्या मामेभावाचा फोन आला. काय ग घाईत आहेस का ? या त्याच्या प्रश्णावर, "अरे हो, आज माझा हॅप्पी बड्डे आहे, चिरोटे करते आहे", असे मी उत्तर दिले आणि पुढे त्याच्याशी गप्पा मारता मारता चिरोटे तळत राहीले. फोन संपल्यावर बबिता मावशींनी हात धुतले आणि म्हणाल्या ताई मी जरा खाली जाउन येते. मी ठीक आहे म्हणाले आणि माझे काम पुढे करत राहीले. १० मिनिटांनी बबिता मावशी समोरच्या दुकानातुन माझ्यासाठी केक घेउन आल्या होत्या. लगेचच त्यांनी मला तो कापायला लावला, त्यांच्या हाताने मला एक घास दिला. नकळत खाली वाकुन मी त्यांना नमस्कार केला तर त्यांच्या डोळ्यात पाणिच आले. एवढा केक वगैरे कशाला आणायचा हो मावशी, असे मी त्यांना रागावत होते, तर काल सांगायचे नाही का हो ताई असे त्या मला रागवत होत्या.

२ वर्षां पुर्वीची गोष्ट, आमचा भाऊ माझ्या बरोबर रहात होता. आमचा हा भाउ म्हणजे एकदम टिपीकल भावांसारखे वागतो. उदा. बहिण तिच्या तान्ह्या बाळा सहित माहेरी आली होती, एक दिवस संध्याकाळी त्याला म्हणाली माझ्या साठी कच्ची दाबेली आण ना, हो आणतो म्हणुन हा गेला. रात्री तिचे जेवण वगैरे होउन ती झोपायच्या तयारीत असताना हा आला. तिने विचारले काय रे आणलिस का कच्ची दाबेली. तर याचे उत्तर, अग इतक्या उशिरा कशाला आणायची म्हणुन नाहीच आणली आणि मी तिकडेच खाउन आलो. इकडे ती चिडलेली तर तर हा खो-खो हसत बाळाशी खेळण्यात दंग. स्मित भाऊबिजेला पण आम्ही सगळ्याजणी त्याला जवळ जवळ दम देउनच भाऊबिज वसुल करतो. त्यामुळे कुणाचे वाढदिवस वगैरे लक्षात ठेवणे तर केवळ अशक्यच.


त्यादिवशी माझा वाढदिवस होता, मार्च एंड ची धावपळ असल्याने मी सकाळी लवकरच ऑफीस ला गेले, आणि रात्री थकुन घरी आले. बघते तर रोज ११ नंतर घरी येणारा हा माझा भाउ चक्क माझ्या आधी घरात. मी फ्रेश होउन बाहेर आले तर, अरे वा, माझा आवडता केक आणि गम्मत म्हणजे त्यावर एक बाहुलिच्या आकाराची मेणबत्ती, जी मी अजुनही सांभाळुन ठेवली आहे.

माझ्या वाढदिवसाची आठवण बहिणींपैकी कोणीतरी त्याला करुन दिली असणार हे नक्की पण पुढचे त्याला कसे सुचले माहीती नाही.  तुच काप केक असे मी त्याला म्हणाले, पण त्याने मलाच कापायला लावला, आणि मी केक कापल्यावर एकट्यानेच बड्डे गित पण म्हंटले. यावर संपुर्ण कुटुंबात कोणीही विश्वास ठेवणार नाही याची मला पुर्ण कल्पना आहे. या घटनेची साक्षीदार मी एकटी असले तरी ही सत्य आहे.

कितीही मोठे झालो तरी, आपला वाढदिवस हा आपल्यासाठी एक 'पेशल' दिवस असतो. आणि कोणी कबुल करो अथवा न करो, त्या महिन्याच्या एक तारखे पासुनच तो मनात रेंगाळत ही असतो. यावर्षी तारखे बरोबरच या आठवणीही मनात रेंगाळत होत्या.

अस नेहमीच कस होत गं ...

[Jan - 2010]

काल संध्याकाळीच तासभर गप्पा मारल्या असताना आज पुन्हा सकाळीच स्वातीचा फोन बघुन मी थोडेसे आच्शर्यानेच 'हॅलो' म्हणाले. माझ्या हॅलो ला तिचा प्रतिसाद च मुळी आला तो, 'अस नेहमीच कस होत ग ?', आणि माझे उत्तर होते 'मलाही काही कळत नाही', बास, पुढची ५ मी. ना मी काही बोलु शकले नाही तिने काही ऐकले. ती फक्त खो - खो - खो हसत राहीली.

लहान पणी एकदा, शेजारचे बिर्‍हाड बदलुन गेले होते आणि दुसरे येण्या आधि त्यांच्या अंगणात सगळे गवत वाढले होते. कधितरी लपंडाव / शिवणापाणी खेळण्याच्या निमीत्ताने त्या अंगणात जाणे झाले, आणि तिथे शेजारी - शेजारीच दोन लिंबाची रोपे उतरलेली दिसली. त्यानंतरच्या रविवारी मी आणि माझी मोठी बहिण असे आम्ही दोघींनी जाउन ती आणली आणि आमच्या बागेत लावली. तुझे आधि मोठे होते की माझे अशी पैज लावल्याचे पण आठवते. माझ्या रोपाभोवती मी आधि विटांचे कुंपण मग एक लोखंडी ड्रम अशी सतत वेगवेगळी सुरक्षा कवचं चढवल्याने अर्थातच माझे रोप टिकले - वाढले आणि तिचे त्याच उंचीचे राहुन पुढे कधितरी मरुन गेले.

पण माझे रोप नुसतेच वाढले. काही केल्या त्याला लिंब येईनात. कंटाळुन एके वर्षी वडिलांनी आपण आता हे झाड तोडुन टाकुया असे सुचवले. पण मी आपले, नको तोडायला ची भुणभुण चालु ठेवल्याने ते वाचले. आणि आच्शर्य म्हणजे पुढच्या वर्षी त्याला भरपुर फुल आली आणि छोटी-छोटी लिब देखिल आली. पण लिंब जरा जास्तच मोठी होऊ लागली. मग मात्र मी थोडी खट्टु झाले, कारण ती लिंब नसुन ईडलिंब असणार याची मला खात्री पटली.

थोडेसे पिवळे झालेले एक लिंबु मी तोडले, नखाने त्याच एक टवका उडवला आणि सवईने फळाचा वास घेतला, लगेच लक्षात आले की हे ईडलिंबु नसुन ही मोसंबी आहे. खुप आनंद झाला. कारण त्याआधी कधिच आमच्या कडे एकही मोसंबीचे झाड नव्हते. बर जात ही एकदम उत्तम निघाली, पातळ सालीची, रसदार आणि चविला अत्यंत गोड अशी ती मोसंबी अचानकच , अपेक्षा नसताना आपल्या बागेत बघुन मजाच वाटली.

त्यानंतर आमच्या घरी हा एक कायमचा चेष्टेचा विषय होऊन बसला, लिंबाचे म्हणुन लावलेल्या, फळाची भरपुर वाट बघायला लावलेल्या झाडाला शेवटी बहर आला तो मोसंबिचा.

*

या वर्षी नोहेंबर च्या सुरुवातीला कचरा साठवलेल्या एका कुंडीत थोडी माती टाकुन दोन गुलाबाच्या काड्या लावल्या. त्या काही फुटल्या नाही, पण रोज पाणी घालत असल्याने, कुंडीत वेगळीच कसली रोपे उतरलेली दिसत होती. थोडी मोठी झाल्यावर पानांच्या आकारवरुन ती दुधी भोपळ्याची असल्याचे लक्षात आले. पाने तशी थोडी लहान वाटत होती पण कुंडीत निट पोसली नसतील असा विचार केला. बराच आठवायचा प्रयत्न करुनही आठवेना, मी भोपळ्याच्या बिया कधी टाकल्या ते. रिलायन्स मधुन आणलेला भोपळा किडका निघाल्याचे आठवत होते, पण तो तर कोवळा होता.

वेल फुटभरच वाढला असेल नसेल तर कळ्या आल्या, फुले उमलली आणि भोपळे धरले सुद्धा. पहीला भोपळा मोठा झाला, पण ठराविक लांबी नंतर त्याची लांबी वाढेचना. तो जागच्या जागीच गोल - गोल होऊ लागला. तो लाल भोपळा [डांगर] तर नक्कीच नव्हता. थोड्याच दिवसांत मस्त हिरवागार असा तो भोपळा अचानक सुकु लागला आणि त्याच्या रंग ही बदलु लागला पहिले फळ आहे सुकले असेल म्हणुन मी दुर्लक्ष केले. मधले ८ दिवस कामवाली बाईच झाडांना पाणि घालत होती. त्यामुळे माझी - भोपळ्याची कहीच गाठ-भेट नव्हती. रविवारी सुट्टी म्हणुन निवांत झाडांना पाणि घालत होते. आणि लक्षात आले की भोपळा पुर्ण सुकला आहे. बिचारा म्हणुन प्रेमाने जरा हात फिरवला तर तो हातातच आला. आणि पुन्हा एकदा सवईने मी त्याचा वास घेतला. मस्त गोड वास होता त्याचा. त्या क्षणी लक्षात आले की हा भोपळा नसुन हे खरबुज आहे.

आता मात्र आनंद खरच गगनात मावत नव्हता. भलत्या सिझन मधे, कुंडित भोपळा-भोपळा म्हणुन सांभाळलेल्या वेलाला चक्क खरबुज आले होते. लगेच वडिलांना फोन करुन खुष खबर दिली.
आणि हिच बातमी स्वाती पर्यंत पोहोचल्यामुळे तिने मला फोन केला होता, 'अस नेहमीच कस होत ग ?'.

*

खरबुज कमी बियांचे आणि अतिशय गोड होते. अजुन बरिच आली आहेत मोठे होण्याची वाट बघते आहे.
DSC02443.JPG

 

Tuesday 18 October 2011

' पान '

ऑफिस च्या खिडकी बाहेर पिंपळाचे मोठ्ठे झाड होते. रोज दुपारी जेवण झाल्यावर खिडकीतून बाहेर बघत बसले कि, पिंपळाची पानं पडताना दिसायची. पिंपळाचे पानं कधीच झाडावरून 'टपकन' खाली पडत नाही. ते फांदीपासून विलग झाले कि हवेत किमान २-३ गिरक्या घेउन मगच जमिनीवर टेकते. मला तो छंदच जडला होता, सुटलेले पानं कुठे जाऊन पडते ते बघण्याच्या. असेच कधीतरी बघता बघता हि कविता सुचली.


रोजच बघतो पक्षी नवे
उंच उडणारे थवेच थवे
मनात असते नभी झेपावे
घेउन भरारी, मजेत गावे

त्याच फांद्या, तीच पाने
तेच तेच ते नकोच जिणे
तोडून सारे पाश जावे 
रोज नव्या वल्लरी विसावे

आज अचानक काय हे घडले
वाऱ्याने मज अलगद खुडले
मधेच आली झुळूक हलकी
मीही घेतली खुशीत गिरकी

श्वास रोखला, मिटले डोळे
क्षणात भेटणार आभाळ निळे
अलगद शय्येवर विसावलो
मायेच्या स्पर्शाने सुखावलो

नव्हते अंबर, निळाई हि नव्हती
माझेच पूर्वज अवति-भवती 
न सांगताच सत्य उमजले
शेवट हा तर आयुष्य संपले.

-  आरती.

आप्त


[माझ्यमते ही कथा आहे, वाचकांना ते ललित वाटु शकते स्मित ]

घशाला पडलेली कोरड जाणवतच मला जाग आली आणि हिवाळा पुर्णपणे संपल्याचे जाणवले. उठुन ग्लासभर थंड पाणी प्यावे असे वाटले खरे पण तसे न करता सरळ वॉश बेसिन कडे गेले. ब्रश तोंडात सरकवला आणि सवईनेच पेपर शोधायला निघाले. अचानकच माझे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांना पण पाणी हवे आहे असे मला वाटले.

गेल्या काही दिवसांपासुन चांगलेच उन पडायला लागले होते. सकाळी ऑफीस ला जाताना सुध्दा जाणवत होते. जरी बाहेर पडत नव्हते तरी तापमानातला हा बदल त्यांनाही जाणवला असणे स्वाभाविक होते. पण ते काही सकाळी - सकाळी पाणी मागणार नाहीत आणि दिलेले पाणी कमी पडले म्हणून तक्रार सुध्दा नक्कीच करणार नाहीत. हे जाणवले खरे पण ताबडतोब उठुन त्यांना पाणी द्यावे असे काही वाटले नाही. थोडेसे दुर्लक्ष करुन मी तशीच वर्तमानपत्र चाळत सोफ्यात रेलले.

तसेही आजकाल मला त्यांच्याकडे फारसे लक्ष देणे होतच नसे. खास त्यांच्यासाठी काही करण्याचा कंटाळा येई. त्यांना इथे, या घरी, हौसेने आणि मी माझ्या इच्छेनेच आणले होते. पण आता ती हौस काही उरली नव्हती, किंवा संपली होती. त्याचाच पुरावा म्हणजे 'मागच्या आठवडाभरात आपण त्यांच्याकडे फिरकलेलोही नाही' याची जाणीव झाली. 'ऑफिस मधे काम वाढल्याने रिकामा वेळच मिळत नाही, माझा पण नाईलाज आहे' अशी स्वताचीच समजुन करुन घेत मनावरचा ताण थोडा सैल केला. आणि पुढच्या कामाला लागले खरी पण डोळ्यासमोरुन जुन्या आठवणी सरकु लागल्या.

माझ्या वडिलांपासुन त्यांचा आमच्या घराशी ऋणानुबंध. आम्ही लहानाचे मोठे झालो ते यांच्या सहवासात च. त्यामुळे त्यांचे असणे फारसे वेगळे असे कधी जाणवलेच नाही. माझ्या वडिलांचे त्यांच्याशी अत्यंत प्रेमाचे नाते होते, त्यांच्याबद्दल आपुलकी होती, माया होती. त्यांचे सगळं ते अगदी निगुतीने करत. कामाच्य व्यस्ततेमुळे कित्येकदा त्यांच्यासाठी वेळ काढणे माझ्यावडिलांना शक्य होत नसे. पण आम्हा भावंडांना मात्र सक्त ताकीद असे. त्यांच हव-नको बघणे, त्यांची स्वच्छ्ता सांभाळणे. आम्ही भावंडही वडिलांची आज्ञा म्हणुन करत असु. पण पुढे-पुढे मला त्यांचा लळा लागला. जशी-जशी मोठी होत गेले, तसे तसे ते मला अधिक समजु लागले, आवडु लागले. त्यांच्याबरोबर वेळ घालवणे हा मला एक छंदच जडला. दिवसभरातला थोडा तरी वेळ मी त्यांच्या सहवासात घालवत असे.

पुढे नोकरीच्या निमीत्ताने पुण्यात आले. मी स्वताच दुसर्‍यांच्या घरी रहात असल्याने 'ते' माझ्याबरोबर असण्याचा प्रश्णच नव्हता. पण स्वत:च्या हक्काच्या घरात रहायला आल्याबरोबर मी आंनदाने आणि उत्साहाने त्यांना घरी घेउन आले. आणि लहानपणी करत असे अगदी तशीच त्यांची सेवा करु लागले.
पुर्वी प्रमाणेच दिवसातला थोडा तरी वेळ त्यांच्या सहवासात घालवु लागले. पहिले वर्ष अगदी आनंदात गेले. पुढे मी नोकरी बदलली, कामाचा पसारा वाढु लागला आणि त्यांचे हवे-नको 'रोजच' बघणे मला जमेनासे झाले. पण तरीही वेळात वेळ काढुन मी त्यांची काळजी घेत होते.

पुढे उन्हाळा आला. तो मात्र खुपच त्रासदायक गेला. ते अगदिच केविलवाणे दिसू लागले. जरी मला काळजी वाटत होती तरी फार काही मी करु शकत नव्हते कारण तापमानच विक्रमी होते. आणि त्यांना ते सहन होत नव्हते. उन्हाळा त्यांना जास्तित जास्त सुसह्य होईल असे प्रयत्न माझ्या परीने मी करत होते. पण शेवटी उन्हाळा संपुन आभाळ भरुन आले आणि पावसाच्या सरी यायला लागल्या तेंव्हाच त्यांची तगमग हळु-हळु कमी झाली. माझी काळजी मिटली आणि मी माझ्या कामात बुडाले.

दिवाळीत जोडुन सुट्टी होती म्हणुन चार दिवस 'कान्हा' ला जायचा बेत केला. त्यांना एकटे ठेउन जावे लागणार होते पण दुसरा काही मार्ग ही दिसत नव्हता. त्यांचे हवे-नको बघुन निघाले खरी, पण मनात थोडी रुख्-रुख घेउनच.

एक नवाच अनुभव मनात साठवुन, संपुर्ण ताजेतवाने होउन घरी परत आले तेंव्हा खुप आनंदात होते. सामानाची थोडी आवरा-आवर करुन त्यांच्याकडे डोकावले. आणि त्यांची अवस्था बघुन तशीच मागे वळाले. निस्तेज झालेले त्यांचे रुप अगदी बघवत नव्हते. ते अगदिच गळुन गेले होते. कितीही वाईट वाटले तरी त्यांची काळजी घेणे भाग होते. थोडी अधिकच घ्यावी लागणार होती. थोडे दिवस मी तसे केलेही. त्यांच्यात थोडासा फरक दिसु लागला, पण पुर्वीसारखे नाही. आता त्यांना 'अशा' अवस्थेत बघण्याची माझ्या नजरेलाही सवय झाली. फारसे वाईटही वाटेनासे झाले.

त्यानंतरच हळुहळु त्यांच्यासाठी काहिही करणे मला कंटाळवाणे वाटु लागले. तसा मी रोजचा व्यवहार सांभाळत होते. पण पुर्वीसारखे प्रेमाने नाही तर कर्तव्य म्हणुन. कदाचित हा बदल त्यांनाही जाणवला असेल आणि म्हणुनही त्यांच्यात फारशी सुधारणा होत नसेल. या विचाराबरोबर परत एकदा अपराधी पणाची जाणिव मनात भरुन गेली. आणि ........
अर्धि लाटलेली पोळी तशिच टाकुन मी बाथरुम कडे धाव घेतली. धो-धो नळ सोडुन मिनीटात बादली भरली आणि गॅलरीत पोहोचले. बघते तर काय - लिलीला कळी आलेली, गुलाबाला फुल, सिताफळाला पालवी आणि मोसंबी तर फुटभर उंच झालेली.

क्षणभर त्यांच्याकडे, माझ्या झाडांकडे, बघताना मला एखाद्या तवस्वी, निर्लेप मनाच्या सेवाभावी महात्म्याचा भास झाला. मी त्यांच्यावर नखशिखांत पाण्याचा वर्षाव केला आणि तहानलेल्या माझ्या झाडांनी त्यांचा आनंद मातीच्या सुगंधाबरोबर माझ्यापर्यंत पोहोचवला, माझ्यावर अजिबात न रागवता !!

- आरती

Monday 17 October 2011

'दुरावा'

[ २००५ साली लिहिलेली एक कविता. ]

काय झाले तुज मना, काही तरी बोलना
शब्द पांगले सारे कि कोमेजल्या भावना ||१||

पापण्या या कोरड्या, ओलावा कुठे दिसेना
मना रिते झाले कि शुष्क साऱ्या संवेदना ||२||

अंतरी दाटे क्षोभ, आसवांनी मालवेना
रुतले बाण असे कि भळभळल्या वेदना  ||३||

गुंतलो एकमेकात, आज काही आठवेना
स्नेह, ओलावा, माया कि फसव्या होत्या वल्गना ||४||

एकटी मी या जगी, सल आता मला छळेना
रमवले मीच मजला कि दुरावा नात्यात जाणवेना ||५||

- आरती.

मुलखा वेगळी माणसं

९७ साली नगरला मराठी साहित्य संमेलनाला जायचा योग आला. संमेलनाचे अध्यक्ष होते, ना. सं. इनामदार. संमेलन नगर कॉलेजच्या परिसरात आयोजीत केले असल्याने आणि ना. सं ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध असल्याने, अध्यक्षांची ओळख करून देण्याची जबाबदारी नगर कॉलेजच्याच एका इतिहासाच्या प्राध्यापकांवर सोपवण्यात आली होती.

ना. सं इनामदारांच्या कादंबर्‍ञा वाचून मी कसे उत्तम इतिहास शिकवतो, मला कशी वाचनाची आवड आहे, माझ्या तासाला विद्यार्थी कसे आवडीने बसतात, मी कसे रंगवून रंगवून इतिहास शिकवतो, त्यामुळे मुलांना तो अभ्यास न वाटता त्यांच्या मनात इतिहासाची गोडी निर्माण करण्यात मी कसा अत्यंत यशस्वी झालो आहे, आणि त्यामुळे मी कसा एक आदर्श प्राध्यापक आहे. इ. इ. इ. ओळख संपली. माइक आला कार्यक्रमाचे सूत्र संचालक श्री. सुधीर गाडगीळ यांच्या हातात, आत्ताच प्राध्यापक महोदयांनी ना. सं. इनामदारांच्या "थोडक्यात" ओळखी बरोबरच स्वतःची "सविस्तर" ओळख करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानून पुढच्या कार्यक्रमा कडे वळतो. मांडवात एकच हशा. सूत्रसंचलन इतके रंगतदार असु शकते हे त्यादिवशी पहिल्यांदाच समजले. गाडगीळांचा हा हजरजबाबी पणा मला इतका भावला की त्यानंतर कुठेही "गाडगीळ" आणि "लाइव्ह" म्हटले की जायचेच असे सुरू झाले. त्या आधी गाडगीळ भेटले होते ते कधी साप्ताहिकांमधून मुलाखतकार या रूपात तर कधी वर्तमानपत्रातील "मुद्रा" सारख्या सदरात.

बरेच दिवसांपासून ऐकत होते गाडगीळ स्वतःचा असा एक २ अडीच तासाचा कार्यक्रम करतात. बघण्याचा योग अर्थातच येत नव्हता. पण एखादा दिवस असतोच एकदम मस्त, सक्काळी-सक्काळी गॅलरीत २ साळुंक्या, पेपर मध्ये जाहिरात - गाडगीळांचा कार्यक्रम, तोही यशवंतरावला म्हणजे ऑफिस पासून जवळच, आणि मोफत स्मित, प्रश्न फक्त एकच होता कार्यक्रमाची वेळ होती संध्याकाळी ५. ३० अरेरे ऑफिस ला गेल्या-गेल्या तडक साहेबांचे केबिन गाठले, कुठलीही आगाऊ सूचना न देता, आणि प्रश्न टाकला मला आज संध्याकाळी थोडे लवकर जाता येईल का, कामात अत्यंत व्यस्त असलेल्या साहेबांच्या तोंडून बाहेर पडले, 'हो', आणि मी आल्या पावली मागे वळाले.


२२ जानेवारी, बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवा अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाचे नाव आहे "मुलखा वेगळी माणसं". गाडगीळ कार्यक्रमाची सुरुवात करतात ती पुणेकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून. पु. ल., आचार्य अत्रे अशा महान लेखक - वक्त्यांना, वाचत -ऐकत लहानाचे मोठे झालेले गाडगीळ त्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात ते एक-एक मजेदार किस्सा सांगून. [अन्यथा सदाशिव पेठी "गाडगीळ" नावाचा B.Com झालेला मुलगा हा बँकेत क्लार्क शिवाय दुसरे काही होणेच शक्य नाही - इति सुधीर गाडगीळ]  'बालगंधर्व' रंगमंदिराचा उद्घाटन सोहळा पु. लं च्या हस्ते होणार होता, त्यावेळेसच्या भाषणात पु. ल म्हणाले, "बाहेर पुरुषी आवेशातली स्त्री, आणि आत स्त्री वेषातला पुरुष, असे ठिकाण रंगभुमी ला मिळाले हे भाग्यच". [संदर्भ, बालगंधर्व च्या बाहेर असलेला राणी लक्ष्मीबाईं चा अश्वारुढ पुतळा, आणि आत असलेले बालगंधर्वांचे स्त्री वेषातले तैलचित्र] या सगळ्या गोष्टी आपणही नेहमीच बघतो, पण हा विरोधाभास नेमक्या शब्दात टिपण्यासाठी पु. ल. च हवे.

असेच एकदा अत्रे प्रमुख पाहुणे असलेल्या सभेत, बॅ. गाडगीळ त्यांची ओळख करून देताना म्हणाले, माणूस तसा हुशार आहे, अफाट वाचन आहे, उत्तम वक्ता आहे, पण वागण्यात आणि बोलण्यात थोडी अतिशयोक्ती आहे. नंतर अत्रे बोलायला उभे राहिले. भाषणाची सुरुवात त्यांनी केली, " बॅ. गाडगीळ, आपल्या काकासाहेब गाडगीळांचे सुपुत्र" एक पॉझ घेतला आणि बॅ. साहेबांकडे बघून प्रश्न केला, "यात काही अतिशयोक्ती तर नाही ना? "

हे सगळे किस्से सुधीर गाडगीळांच्या तोंडून ऐकणे ही एक पर्वणीच आहे. पूर्णवेळ आपण खो-खो हसत तरी असतो किंवा आश्चर्यचकित तरी होत असतो. गाडगीळ म्हणतात, "तुम्ही हे जे खदखदता आहात तसे मी पूर्णं आयुष्यभर खदखदतो आहे अशा अनेक महान व्यक्तिंच्या सहवासात. आणि त्यामुळेच ताजेतवाने होण्यासाठी मला इतर कुठल्याही बाह्य गोष्टींची आवश्यकता कधिच वाटली नाही. " अगदी खरे आहे. आपणही संपूर्ण ताजेतवाने असतो कार्यक्रम बघून बाहेर पडताना.

आज पर्यंत भेटलेल्या १००% प्रोफेशनल व्यक्ती म्हणून गाडगीळ उल्लेख करतात, माधुरी दीक्षित आणि अमिताभ बच्चन यांचा. तर अत्यंत स्वच्छ मनाच्या म्हणून उल्लेख येतो आशा भोसले यांचा. १००% प्रामाणिक 'बोले तैसा चाले' अशी प्रतिमा असलेले अर्थातच 'बाळासाहेब ठाकरे', गाडगीळांचे लाडके व्यक्तिमत्त्व. बाळासाहेबां बरोबरची पहिली भेट गाडगीळ थोडक्यात अशी सांगतात, दूरदर्शन साठी मुलाखत देणार का म्हणून विचारायला मातोश्री वर गेलो. सुरक्षेचे सगळे सोपस्कार पार पाडून बाळासाहेबांसमोर पोहोचलो.
 नमस्कार करून प्रश्न विचारला,
'साहेब तुमची मुलाखत हवी आहे, दूरदर्शन वर येणार का'. 
[एक हात वर करून] ते मुलाखतीच वगैरे सोडा हो, एखादा मस्त विनोद सांगा.

बाळासाहेबांना विनोद खूप आवडतात असे ऐकले होते, मग म्हटले आलीच आहे संधी तर त्यांच्या वरचाच एक सांगावा.

एक माणूस बस स्टॉप वर उभा असतो. घाई - घाई ने दुसरा येतो आणि त्याच्या शेजारी उभा राहतो. पहिला दुसऱ्याला विचारतो,
-तुझी बाळासाहेब ठाकऱ्यांशी ओळख आहे का?
-नाही
-तुझी मनोहर जोशी शी ओळख आहे का?
-नाही
-तुझी शिवसेना विभाग प्रमुखाशी ओळख आहे का?
-नाही
-तुझी शिवसेना शहर अध्यक्षांशी ओळख आहे का?
-नाही
-तुझी एखाद्या शिवसैनिकाशी ओळख आहे का?
-नाही बुवा.
-मग जरा माझ्या पायावरचा पाय काढ.

बाळासाहेब हसले आणि म्हणाले, तुम्ही पत्रकार लोकं नेहमी आम्हालाच टार्गेट करता. सत्ताधारी पक्षाला कसे सोडता. ठीक आहे अजून एक सांगतो, असे म्हणून त्यावेळी दिल्लीत लोकप्रिय असलेला एक विनोद सांगितला.

नरसिंहरावांचे सरकार असताना विरोधी पक्षाकडून प्रश्न विचारला गेला, "२+२ किती". अर्थातच २ महिने काहीच उत्तर आले नाही. पुन्हा एकदा विचारणा झाल्यावर नरसिंहराव अर्जुनसिंग ना विचारतात, 'ये २+२ कितना होता है' उत्तर येते "वैसे तो चार होता है, फिर भी हमारे प्रदेश जाना पडेगा, लोगों से बात करनी पडेगी. फिर देखते है लोगों का क्या केहना है. फिर आप तक पहुचा देंगे. " मग नरसिंहरावांनी शरद पवारांना विचारले, पवार साहेब २+२ किती, त्यावर पवारांचा धोरणी प्रश्न "द्यायचे आहेत की घ्यायचे"

आवडला विनोद बाळासाहेबांना, पण म्हणाले, बघा इथे पण तुम्ही आम्हाला कमी लेखले, आम्ही काय सांगू नसतो शकलो का २+२ किती. आमचा उल्लेखच टाळला तुम्ही. आमचे मनोहर जोशी, मास्तर माणूस, त्यांच्यावर तरी विश्वास दाखवायला हरकत नव्हती.
आणि अचानक माझ्या तोंडून बाहेर पडले, "पण उत्तर तर तुम्हीच दिले असते ना".

एकदम खूश झाले बाळासाहेब या उत्तरावर आणि माझ्यावर. त्यादिवसा पासून सुरक्षेचे सगळे नियम बाजूला ठेवून 'मातोश्री' वर माझा वावर नियमित झाला.

अशा अनेक हलक्या फुलक्या विनोदांची पेरणी असलेला हा कार्यक्रम जसा-जसा पुढे जातो तसा-तसा रंगतच जातो.

लकडी पुला समोरच 'गरवारे' पुलाचा शुभारंभाचा कार्यक्रम होता. बरीच मान्यवर मंडळी जमली होती. त्याचवेळी डेक्कन वर काही खरेदी साठी आलेल्या पु. लं चे लक्ष त्या गर्दी कडे गेले. जवळ येऊन त्यांनी चौकशी केली. जमलेल्यांपैकी एकाने माहिती पुरवली
-पुलाला गरवारेंचे नाव द्यायचे आहे, त्याचा कार्यक्रम आहे.
-पु. ल म्हणाले, का रे बाबा जिवंतपणीच का द्यायचे नाव.
-मेल्यानंतर त्यांची आठवण राहावी म्हणून.
-पु. ल म्हणाले पण या पुला मुळे सगळे सायकल आणि हातगाडीवाले लोकं गरवारेंपेक्षा त्यांच्या आईचीच आठवण जास्त काढतील.
-कसे काय बुवा
या प्रश्नावर पु. ल. नि जोर लावून पायडल मारण्याची ऍक्शन केली आणि म्हणाले 'च्यामारी त्या गरवारेच्या आईच्या'. या पुलाला मोठ्ठा चढ आहे, त्या पार्श्वभूमी वर ही प्रतिक्रिया.

"पंडित भीमसेन जोशी" म्हटले की, सवाई गंधर्व, अभंगवाणी, रागदारी यातले काही ना काही तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येणार. पण "ऑटोमोबाईल" म्हटले तर कसे वाटेल. गाडगीळ सांगतात, पंडीतजींना गाड्यांची खूप आवड होती. गाडी भरगाव सोडण्यात जसा त्यांच्या हातखंडा होता तसाच गाडी दुरुस्त करण्यात ही ते गाण्या इतकेच तज्ज्ञ होते. गाडीच्या इंजिन सहित प्रत्येक पार्ट ची माहिती पंडीतजींना असायची. बिघडलेली गाडी, काय केले तर दुरुस्त होईल आणि किती वेळात होईल, ही माहिती गॅरेज वाल्याला ते अगदी बिनचुक सांगत असत. एकदा नगरला कार्यक्रमाला जायचे होते, पंडीतजींनी नुकतीच नवीन मर्सिडिज घेतली होती. गाडगीळ त्यांच्या घरी पोहोचताच त्यांनी मर्सिडिज काढली आणी म्हणाले 'बसा'. गाडी अर्थातच पंडितजी चालवत होते. सवयीने त्यांनी ती फुल स्पीड मध्ये सोडली होती. तासाभरात ते कोरेगावभिमा ला पोहोचले. समोर नदीवरचा पुल होता. पलीकडून एक ट्रक येताना दिसत होता. पुल तसा अरुंदच होता. पण पंडितजी काही वेग कमी करायला तयार नव्हते. गाडगीळ जीव मुठीत धरून गाडीत बसले होते आणि ट्रक अगदी गाडीच्या शेजारून गेला पण धक्का न लागता. गाडगीळांनी न राहवून 'हुश्श' केले. त्यावर पंडितजी म्हणाले, घाबरू नका गाडगीळ, लुगडं फाटेल पण मांडीला खरचटणार नाही.
जशी पंडितजीच्या अनोळखी पैलूची ओळख नेहमीच मनात रेंगाळते तशीच या अनोळखी रूपाची आठवणही कायम मनात रहाते.

अजून बरेच आहे जे तुमच्या बरोबर 'शेअर' करायला आवडले असते पण तुमची कार्यक्रमाची रंगत कमी होईल अशी भीती वाटते. तर मंडळी एकदा तरी जरुर बघा माहिती, किस्से, विनोद, व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडवून दाखवणारा हा सदाबहार कार्यक्रम.

आयुष्यात मला एकाच व्यक्तीची असूया वाटली / वाटते, ती व्यक्ती म्हणजे "सुधीर गाडगीळ". केव्हढा अफाट लोकसंग्रह. किती नानाविध अनुभव. महान म्हणता येईल अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा सहवास, त्यांचा विश्वास, माया, त्यांचे आयुष्य जवळून बघण्याची संधी लाभलेले हे व्यक्तिमत्त्व मला नेहमीच 'मुलखा वेगळे' वाटते.

[ श्री. सुधीर गाडगीळ, हा कार्यक्रम खाजगी स्वरूपात पण करतात. त्यांचा फोन नं माझ्याकडे आहे, कुणाला हवा असल्यास नक्की सांगा. ]

Sunday 16 October 2011

मुलाखत - अतुल पेठे

[ २००६ साली प्रायोगिक रंगभूमी वरचे यशस्वी दिग्दर्शक श्री. अतुल पेठे यांची 'मायबोली' च्या 'संवाद' या सदरासाठी मी घेतलेली मुलाखत.   ]

प्रायोगिक रंगभूमी वरचे यशस्वी दिग्दर्शक. विषयातले नाविन्य, मांडणीतले वैविध्य ही त्यांची खासियत. नभोनाटक, माहितीपट, प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाटकं, या सारख्या विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे आगळे वेगळे दिग्दर्शक.
'वेटींग फ़ॉर गोदो', 'शीतयुध्द सदानंद', 'ऐसपैस सोयीने बैस', 'प्रेमाची गोष्ट', 'आनंदओवरी', 'उजळल्या दिशा', 'सूर्य पाहिलेला माणूस', 'चौक', 'गोळायुग' ही त्यांची आत्तापर्यंत आलेली काही नाटके.

atulpethe001.jpg

१.व्यावसायिक रंगभूमीकडे न वळता प्रायोगिक रंगभूमी निवडण्याचा निर्णय कसा घेतला ?
- एकतर व्यावसायिक रंगभूमीकडे वळणे किंवा न वळणे हा प्रश्न माझ्याबाबत त्यावेळेसही नव्हता आणि आजही नाही. हा काही केलेला एक मोठा त्याग आहे अशातलाही भाग अजिबात नाही. मला काय आवडतं, मला काय येतं, माझ्या मनाला काय पटतं आणि मला कशात आनंद वाटतो हेच निकष माझ्याबाबत पहिल्यापासून राहीलेले आहेत. हे करत असताना मी आयुष्याची दिशा वगैरे पहिल्यापसून ठरवली होती असे ही अजिबात नाही. खरोखर ज्या गोष्टीतून आपल्याला काम करण्यातला आनंद मिळतो, आपली मानसिक आणि बौध्दीक समृध्दी वाढते, अशा गोष्टी मला पहिल्या पासूनच आवडत होत्या. या का आवडत होत्या याच कारण अगदी छोट आहे - आपण जे काल होतो, आपण जे मगाशी होतो ते आपण आत्ता असत नाही. जीवन हे प्रवाही असत आणि त्या प्रवाहाबरोबर आपण आपलं जगणं समृध्द करत जायला हवं. ही इतकीच बारीक माझी असलेली त्यातली अपेक्षा होती.
रंगभूमी हे जिवंत माध्यम आहे. नाटकासारख जिवंत माध्यम जिथे असतं, आणि जिथे जीवंत माणसं जीवंत माणसांशी संवाद साधत असतात, आता उघड आहे जीवंत माणस ऍकाच कालखंडात जगत असतात. त्यामुळे त्या त्या काळातल्या माणसांबरोबर त्या त्या काळातले प्रश्न आदान प्रदान करणं, आपले विचार, आपल्याला काय वाटत हे लोकांसमोर मांडणं हा एक महत्वाचा त्यातला भाग असतो. आणि त्याच्यातच खरा खूप महत्वाचा आनंद असतो. कुठलाही झालेला प्रयोग हा परत कधी होत नाही. प्रयोग नेहमी नविनच होत असतो म्हणून नाटकाला ' प्रयोग ' म्हंटलेल आहे. प्रत्येक वेळी त्याच्यात तुम्हाला काहीतरी नवीन गवसत. आता ' गवसत ' हेच जर तत्व मान्य केल तर ते गवसण्यासाठी आपल्या फुटपट्ट्या काय असाव्यात, आपण त्याला कुठल्या प्रकारच्या मोजपट्ट्या लावतो हा केवळ आपला व्यक्तिगत मुद्दा येतो. त्यामुळे व्यावसायिक रंगभूमी वाईट आहे किंवा त्यापासून उत्पन्न मिळवणारे लोक वाईट आहेत असा माझा पहिल्यापासून कधी भाव नव्हता आणि आजही तो नाही.मला जे नाटक करावसं वाटतं, करायला आवडतं त्याला लोकं प्रायोगिक म्हणतात. व्यावसायिक रंगभूमिवर अनेक लोकांचा हेतू चांगल नाटक करण हा असतोच की पण त्याच्या मधे एक दुसरं ही लक्ष असतं - पैसे मिळतात की नाही ? ते नाटक चालत की नाही ? ते लोकांना रुजतं की नाही ? . प्रायोगिक रंगभूमी मधे मात्र याच्या अगदी उलट परिस्थिती असते. इथे मला काय आवडतं, मला काय वाटतं, माझ्या आजच्या सामाजिक धारणा काय आहेत, माझ्या संवेदना काय आहेत, मला समाजकारण - राजकारणा विषयी काय वाटत, आज माणूस म्हणुन जगत असताना माझे अत्यंत कळीचे, अत्यंत टोकाचे प्रश्न काय आहेत की ज्यामुळे मला अगदी कोंडीत पकडल्या सारखे वाटते, हे महत्वाचे असते.
अभिव्यक्त कशातनंही होणं याला मी ' माध्यम ' म्हणतो. माझ्यासाठी नाटक हे प्रभावी माध्यम आहे.
प्रायोगिक नाटक करताना माझं नाटक, मी, as an actor, as a director, as a writer प्रोफेशनल असण आवश्यक आहेच की. प्रोफेशनल म्हणजे - त्या माध्यमा वरची माझी जी हुकूमत आहे, माझं जे त्यातलं कौशल्य आहे त्यात व्यावसायिक सफाई हवीच. शरीराच्या हालचाली, आवाजाची पट्टी, स्वरांवरची हुकमत ही जशी एका अर्थाने technical ताकद असेल तशीच वैचारीक ताकद पण असावी लागते. त्यासाठी अभ्यास आणि प्रशिक्षण असण खूप जरुरी आहे.
प्रायोगिक तत्वावर आधारित जे काही करायचे आहे ते अत्यंत ' प्रोफेशनल ' पध्दतीने मांडता यावं अशी मात्र इच्छा नेहमीच राहिलेली आहे.

२. अभिव्यक्त होण्यासाठी नाटक हेच क्षेत्र माध्यम म्हणुन निवडावेसे का वाटले ?
- माझ्यासाठी नाटक हे अपघाताने माझ्या आयुष्यात आले.मी आधी म्हंटल्या प्रमाणे मी अगदी लहानपणा पासून नाटकात काम करत होतो असे नक्कीच नाही. पण मी नाटक पहिल्यापासून बघत होतो. एकतर पुण्या - मुंबई मध्ये नाटकाचं वातावरणच exposure मिळण्याच्या द्रूष्टीने इतर कुठल्याही गावांपेक्षा जास्त आहे. जवळ जवळ रोज इथे वेग - वेगळ्या प्रकारची नाटक होत असतात, स्पर्धा आयोजित केल्या जातात. या सगळ्याला सामोरं जात असताना मी 'Theatre Academy' ची नाटकं बघितली, सतिश आळेकरांची नाटकं बघितली, वेगवेगळ्या लोकांची असंख्य नाटक बघितली. त्या काळामधली 'बेगम बर्वे', 'घाशीराम कोतवाल', 'महानिर्वाण' यासारखी नाटक प्रचंड आवडली. आणि मग मला अस जाणवलं की नाटकांशी आपली अगदी सहज नाळ जुळते, अशा प्रकारचं नाटक आपण करायला पाहीजे.
' हे माझ्यासाठी आहे ' असा एक क्षणभर आपल्याला शोध लागतो. तसा मी नाटकातला आहे अस मला जाणवल आणि माझी नाटक या माध्यमाशी जवळीक आली. ही सहज घडणारी प्रक्रिया आहे. त्याच्या साठी उठाबशा काढाव्या लागतात अस मला वाटत नाही. आपल्याला प्रत्येकाला कशातुन तरी आपल्या अस्तित्वाची ओळख पटावी लागते. माझ्या अस्तित्वाचा शोध मला माझ्या नाटकातुन गवसतो. पण याचा अर्थ मी आयुष्याभर हेच करेन असे नक्कीच नाही. एकाच दिशेने वाटचाल करुन अढळ धृवपदावर जाउन बसायचे आहे अशी माझी तेंव्हाही मनिषा नव्हती आणि आजही नाही.मी कदाचित लिखाणाकडे वळेन, कदाचित कविता करेन. मला कशामधे आनंद वाटतो हाच पहिल्यापासून शेवटपर्यंत निकष आहे आणि त्या निकषावरच माझं पुढचं सगळ काम होत राहील.

३. 'वेटींग फ़ॉर गोदो', 'शीतयुध्द सदानंद', 'ऐसपैस सोयीने बैस', 'प्रेमाची गोष्ट', 'आनंदओवरी', 'उजळल्या दिशा', 'सूर्य पाहिलेला माणूस', 'चौक', 'गोळायुग' - या प्रवासाकडे वळुन बघितले तर विषयातले वैविध्य जाणवते. हे जाणिवपूर्वक केले की तशी संधी मिळत गेली ?

- ही सगळी नाटक एकमेकांपासून वेगळी नक्कीच आहेत. परंतु मी आधी म्हंटल्याप्रमाणे माझ्या जगण्यातले जे प्रश्न आहेत, मला जाणवणारी माझी तगमग, माझं एकाकीपण आणि माझ्या समकाळातल्या घटनांचा अर्थ मी काय लावतो, त्याच interpretation काय करतो. ते माझ्या या सगळ्या नाटकांमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तो आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाला की अयशस्वी हा विचार मी करु शकत नाही किंबहुना मी तो करत नाही. पण कुठलही नाटक घेतल तरी माझ्यासाठी ते नाटक माझ्या जगण्याशी काहीतरी नाळ जोडणार होत. माझे जे प्रश्न होते ते मी त्या नाटकांद्वारे तपासायचा प्रयत्न करत होतो आणि पर्यायाने अंतिमत : मी स्वत : समृध्द व्हायचा प्रयत्न करत होतो. नाटकामधे अजून एक गम्मत अशी असते की प्रेक्षकांशिवाय ते नाटक पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे कदाचित ही सगळी नाटक बघून माझ्याबरोबर माझ्या प्रेक्षकांचीही अशा प्रकारची वाढ झाली असण्याची शक्यता आहे. जर आपण स्वत : ला जबाबदार नागरिक, जबाबदार कलावंत म्हणून घेणार असु तर आपल्या आजुबाजुच्या आसमंतात काय घडत आहे याची जाणीव तुम्हाला आहे की नाही आणि त्याचे अर्थ तूम्हाला लावता येतात की नाही हा खरा आव्हानाचा भाग असतो. आणि ते आव्हान मी माझ्या नाटकांद्वारे पेलण्याचा प्रयत्न केला आहे.

४. एखाद्या नाटकाची CD बघताना, रंगभूमी सारखा परिणाम साधला जात नाही. असे असताना यशस्वी नाटकाचे प्रयोग ठराविक कालावधीनंतर बंद करुन त्याची CD बाजारात आणण्याचा निर्णय घेणे तसे अवघडच. हे कसे शक्य झाले आणि त्यामागे कोणता विचार होता. ?
- त्या त्या नाटकाचा एक शोध असतो. त्या त्या नाटकाचा म्हणून एक प्रवास असतो. आणि तो संपला की आपण थांबावं. एक टप्पा असा येतो की इथुन पुढे त्या नाटकाचा प्रयोग आशय दृष्ट्या मला काही देउ शकत नाही. त्यावेळी प्रामाणिक पणे थांबावस वाटलं. हा एक भाग. आणि अजून थोडं पुढे जाउन सांगायचे तर बर्‍याच अंशी माझी नाटकं ही प्रेक्षकांवर चाललेली नाटकं नव्हेत. या नाटकांचे अनेकदा प्रेक्षकवर्ग तयार करणं, प्रेक्षकाची मानसिकता तयार करणं, त्यांचा दृष्टीकोन तयार करणं हे समांतर पातळीवर मला करत जावं लागतं. माझी नाटकं बघितली तर ही थोडी 'अनगड' नाटकं आहेत. त्याच्यात प्रयोगशिलता आहे ती दोन पातळ्यांवर. एक आशयाच्या पातळीवर आहे आणि दुसरी रुपबंधाच्या (form) पातळीवर. ही धडपड करत असताना हमखास तिथे यशाची काही गणित मांडली नव्हती. त्यामुळे बरीचशी त्यातली नाटकं ही लौकीकार्थाने 'चाललेली' नाटकं नव्हेत तर मी ती चालवलेली नाटकं आहेत. मी ठिकठिकाणी माझी नाटकं घेउन गेलो आहे, लोकांपुढे गेलो आहे, लोकांना त्याबद्दल सांगितले आहे, त्यावर चर्चा घडवल्या आहेत, चर्चा केल्या आहेत. हे सगळे अत्यंत पोटतीडकीने केले आहे. कारण शेवटी काय असतं की माणूस म्हणून जगत असताना आपल्याला संवाद साधायची फार गरज असते. जसं आपल्याला काय वाटतं हे ओरडून सांगावसं वाटत तसच कोणीतरी ऐकावं ही सुध्दा गरज असतेच, असं मला वाटतं.
तरीही नाटक कधी बंद करायचं यातला महत्वाचा भाग म्हणजे त्याच्याशी संबंधित अर्थकारण. ते मी किती ताणू शकतो हे पण एका पातळीवर अत्यंत महत्वाचं असतं. आणि त्या point ला मी थांबतो. सगळ्याच नाटकांविषयी प्रेम असते, कृतज्ञता असते, लोभ असतो पण त्यांच्या खांद्यावरच नवीन नाटकाचा प्रवास असतो त्यामुळे थांबावं लागतं. आणि ते नाही केलं तर पुढच्या गोष्टीला भिडताच येत नाही.
दस्ताऐवजीकरण (Archival / Documentation) करण्याच कारणं अस की, आपल्याकडे मराठी नाटकांची दुर्‍दैवी अवस्था अशी आहे की आपण एका बाजूने 'मराठी नाटक' एकदम सम्रुध्द नाटक म्हणून म्हणतो,खर्‍याअर्थाने मराठी लोकांनी जे काही जगाला द्यायच असेल तर त्यातला एक महत्वाचा घटक म्हणजे 'नाटक'. आणि इतकी सणसणीत परंपरा असताना आपल्याकडे मात्र त्याचा योग्य प्रकारे संग्रह नाही. त्याच परिशिलन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री नाही, जी पुढच्या पिढीला अत्यंत आवश्याक असलेली गोष्ट आहे. त्यासाठी आजची जी electronic माध्यमं आहेत ती वापरुन हे सगळ जतन करणं आवश्यक आहे.या भावनेने ती नाटक दस्ताऐवजीकरण केलेली आहेत. त्याच्यातुन आपल्याच पायवाटा तपासायच्या असतील तर ते ही शक्य होते. त्यावेळेस काय केलं गेलं आहे, आज काय करता येउ शकतं, याचा नेमकेपणाने शोध घेता येतो. तो दंतकथा आणि पुस्तकातील रमणीय कथा यांच्यावर विसंबून रहात नाही. आणि अभ्यास करणार्‍या माणसासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे.

५. ' आनंद ओवरी ' या पुस्तकाचे नाट्य रुपांतर करण्याची कल्पना कशी सुचली ? प्रयोग एकपात्री करण्याचे काही खास कारण होते का ?
- ' आनंद ओवरी ' किंवा माझं कुठलही नाटक ठरलं आणि केलं असं होत नाही. ते अनेक वर्षे मनात रुंजी घालत असतं. ते मीच माझ्या मनात अनेकवेळा तपासून घेतो, की हे नाटक मला का करायचं आहे त्याच्यामधे असा काय आशय आहे की जो अभिव्यक्त करण्यासाठी
माझं मन तडफडते आहे. ' आनंद ओवरी ' च्या बाबतीत असं झाल की गेले १६ - १७ वर्षे वेगवेगळ्याप्रकारे ती कादंबरी मला छळत होती.
तुकारामांच्या विषयी जे जे संशोधन झालेलं आहे ते प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचं आहे. तुकाराम आणि तुकारामांचे वाङमय या बद्दलचे विविध दृष्टीकोन गेल्याकाही काळामधे आपल्यासमोर आले. आणि या सगळ्याचा प्रभाव पडून मी 'आनंद ओवरी' कडे वळालो.
त्याच्यामधे काही मोठ्या प्रमाणावर बदलही केले. एक तर ही कादंबरी तुकारामांच्या संदर्भातली आहे पण तुकारामावरची नव्हे.
आणि 'तुकाराम' म्हणजे मी सहिष्णुतेचं प्रतिक मानतो. आजच्या काळातली जी सहीष्णुता हरवली आहे ती तुकारामाच्या रुपाने बघायचा प्रयत्न मी करत होतो.
' आनंद ओवरी ' मधे एकतर मी कादंबरीचीच भाषा बोलायची अस ठरवलेलं होत. त्याच नाटक केलेलं नाही. कादंबरीला भिडत असताना बरेच प्रकार असू शकतात. उदा. दळवींनी 'बॅरीस्टर' नाटक लिहील.त्या प्रकारचं हे नाटक नाही. एकाअर्थाने हे कादंबरीच एकपात्री अभिवाचन आहे आणि या अभिवाचनाचं अभिनयामधे रुपांतर करुन ते जिवंत करायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेही एकतर इतर पात्र आणण्याचा प्रश्नच नव्हता.आणि इतर पात्र ही कान्होबाच्या मनात आहेत. ती तशीच असणं आणि प्रेक्षकांच्या मनात ती जिवंत होणं याला माझ्या लेखी
फार महत्वाच स्थान होत. कान्होबाचा तो व्यक्तीगत झगडा आहे, त्याचं काही आयुष्याविषयी म्हणणं आहे. त्याचा संवाद म्हणजे 'आपुलाच आपुणाशी ' चाललेला वाद आहे, परमेश्वराशी केलेलं त्याच ते भांडण आहे. त्याच ते एकट्याच असणं, एकटेपणाने बोलत
रहाणं, स्वत : शीच तुकारामाचा अर्थ शोधत रहाणं तसचं ठेवावं अस मला वाटलं.

६. प्रायोगिक रंगभूमी सारखेच मराठी सिनेमामधे काही नविन प्रयोग करावेसे नाही वाटले का ?
- मुळात काय आहे की आपण नाटक केलं की आता आपण सिनेमा करायला लायक आहोत असा माझा भ्रम नाही, जो अनेक लोकांचा असतो.
नाटक करण्याच्या नंतरची पायरी सिनेमा आहे आणि सिनेमा करण्याच्या आधीची पायरी नाटक आहे असे अजिबात नाही. ही दोन्ही क्षेत्र, दोन्ही माध्यम अत्यंत वेगळी आहेत, भिन्न आहेत हे आधी समजून घेतले पाहिजे.दोन्हींच असं एक स्वतंत्र स्थान आहे. स्वतंत्र अवकाश आहे. जे पेलणं अत्यंत अवघड असत.
सिनेमा करायचा विचार मनात खूप वेळा येतो. परंतु सिनेमासाठी आवश्यक असणार्‍या ज्या मानसिकता आहेत त्या माझ्याजवळ
नाहीत. त्यामधे एकतर आर्थिकता हा इतका महत्वाचा भाग येतो की सगळ्याच तांत्रिक गोष्टी त्यावर अवलंबून असतात. त्या अर्थाने नाटक हे करायला सोपे आहे. दुसरे असे की आजचा जो मराठी सिनेमा आहे तो मला कुठल्याही अर्थाने प्रामाणिकपणे पटत नाही. माझ्या मनातला जो सिनेमा आहे तो असा नाही. इतरांना जो सिनेमा दिसतो तो मला दिसत नाही.आणि मला जो सिनेमा दिसतो तो आर्थिकदृष्ट्या यशस्वी कसा ठरेल ? कारण त्यात कोणीतरी पैसे घालावे लागतील. तो चार लोकांपर्यंत न्यावा लागेल. याची यंत्रणा माझ्यापाशी तरी अजून उपलब्ध झालेली नाही. म्हणून मी असे म्हंटले की माझी ती मानसिकता नाही.
पण याला पर्याय म्हणून, माझ्या चौकटी मधे मी अनेक गोष्टी करुन बघितल्या. अनेक प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारीत, मुक्त विद्यापिठांसाठी माहितीपट बनवले. किंवा आत्ता आरोग्यविषयक काम करत असताना वेगवेगळ्याप्रकारचे ८-१० माहितीपट बनवले. आणि ते सगळेच फार मोठ्या प्रमाणावर गाजले. मला जे काही म्हणायचे होते ते लोकांपर्यंत पोहोचले. ते चित्रपट नव्हते माहितीपट होते हे मान्य आहे पण, ते मला खूप आनंद देणारे होते. मला जे हवं होत तेच सादर करणारे होते, तेच चित्रीत करणारे होते.
सिनेमा होईल किंवा नाही, मला माहिती नाही. पण पुढे अशी शक्यता निर्माण झालीच तर त्याचं स्वागत करायला मी कायमच उत्सुक आहे आणि मराठी सिनेमा करण्याची खुप इच्छा आहेच आहे.

७. 'A father of experimental theatre' म्हंटल्या जाणार्‍या तेंडुलकरांवर नुकतीच तुम्ही 'तेंडुलकर आणि हिंसा : आज आणि काल' ही documentary film बनवली. तसेच तुमच्या 'आनंद ओवरी' चे संकलन तेंडुलकरांनी केले होते. तेंडुलकरांबरोबर काम करणे आणि तेंडुलकर या विषयावर काम करणे हे दोन्ही अनुभव ऐकायला आवडतील.
- मराठी रंगभूमी आणि भारतीय वाङमयाच्या संदर्भामधे विजय तेंडुलकर हे वादातीत महत्वाचं व्यक्तीमत्व आहे. आज आम्ही जे बोलू शकतो ते तेंडुलकरांचं योगदान आहे हे आधी मान्यच केल पाहीजे. त्यांची सगळीच साहित्य संपदा फारच महत्वाची आहे. नाटककार म्हणून तर ते अव्दितीय असच व्यक्तिमत्व आहे.
तेंडुलकरांच्या 'घाशीराम कोतवाल' मधे मी काम केल होतं. 'आनंद ओवरी' चे पहिले संकलन त्यांनी केले होते पण त्यांच्या आणि माझ्या चर्चा अशा कधीच झाल्या नाहीत. कारण मुळात ती कादंबरी दि.बा.मोकाशींची होती. त्याच्यात कुठलाही शब्द तेंडुलकरांनी नव्याने लिहीलेला नव्हता. ती कांदबरी कशी बोलली जावी, त्याच्यातले कुठले प्रसंग उलट - पलट केल्यास ते अधिक सुविध होतील, ते अधिक नाट्यमय कसे भासतील या गोष्टीं मधे तेंडुलकरांचा महत्वाचा सहभाग होता. पण माझ्या तेंडुलकरांबरोबर एखाद्या नाटकाच्या बैठका - चर्चा व्हाव्यात असे कधिही झाले नाही.
'तेंडुलकर आणि हिंसा' करत असताना मात्र तेंडुलकरांशी बोलण्याचा योग आला. परंतु film तेंडुलकरांच्या वरच होती त्यामुळे तेंडुलकरांचे त्याच्यात काही point of view नव्हते. point of view माझे आणि माझा लेखक महत्वाचा, मकरंद साठे, यांचे होते. त्यांचा वर माहितीपट बनवायचा असा जेंव्हा मुद्दा आला तेंव्हा काहीतरी वेगळे करावे असे मनात होते. हा माहितीपट इतर माहितीपटांपेक्षा वेगळा आहे, एका अर्थाने बौध्दीक चर्चा आहे. तेंडुलकरांच्या साहित्याचा नव्या पिढीने केलेला अभ्यास आहे. नव्या पिढीचे काही म्हणणे होते, काही प्रश्न होते ते तेंडुलकरांपर्यंत पोहोचवायचे होते, त्यांना विचारायचे होते. असा हा माहितीपट आम्हाला करायचा होता. जो मुलाखतींवर आधारित, गप्पांवर आधारित, चर्चांवर आधारित आहे. पण यावेळेस सुध्दा कुठल्याही प्रकारची माहितीपटाच्या अनुषंगाने चर्चा तेंडुलकरांबरोबर झाली नाही.

८. केवळ आवाज - संवाद एव्हढेच माध्यम वापरुन 'कोसला' हे नभोनाट्य दिग्दर्शित करताना काही मर्यादा जाणवल्या का ?
- भालचंद्र नेमाडेंची 'कोसला' ही एक अशी कादंबरी आहे, ज्या कादंबरीने मराठी वाङमयाच्या दिशाच बदलल्या. मराठी वाचकाला सजग केलं, शहाणं केल. त्यातली भाषा, त्यातले विचार सगळ्यात एक वेगळे पण आहे. ही कादंबरी आपण मैलाचा दगड मानतोच, यात काही शंकाच नाही. जेंव्हा 'पुणे आकाशवाणी' कडून हा प्रस्ताव आला तेंव्हा आकाशवाणीवर उषाताई पागे होत्या. त्यांनी नेमाडेंना विचारले तुम्हाला कोसलाकरीता कोण योग्य वाटते ? त्यात नेमाडेंनी माझे नाव सुचवले, हा मला महत्वाचा बहुमान वाटतो.
कामाला सुरुवात करताना मात्र मनावर अतिशय दडपण होतं. कारण अशा प्रकारच वाङमय जे समाजात गेली ३०,३५ वर्षे महत्वाचं स्थान मिळवून आहे त्याला भिडणं हे माझ्या दृष्टीने एक आव्हान होत. सगळ्यांना परिचीत असलेल्याच गोष्टीला हात घालायला जात असताना त्यात बरेच धोके असतात. मी जेंव्हा नविन नाटक आणतो तेंव्हा अस्पर्श असलेल्या नाटकाला मी स्पर्श करत असतो. इथे मात्र ती कादंबरी तोंडपाठ असावी इतकी जनमानसात रुजलेली. शेवटी हे दडपण घ्यायचं नाही अस मी ठरवलं आणि माझ्या पध्दतीने त्या कादंबरीला भिडलो. या नभोनाटकाला खानदेशी भाषेच एक संपूर्ण रुप यावं म्हणून जळगावचा 'शंभू पाटील' याची निवड केली. 'कोसला' हे एकपात्री निवेदन आहे. ते तसंच ठेवण्याच धैर्य मी दाखवलं. त्याच्यामधलं येणार संगीत, ध्वनी हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं होत. श्राव्य माध्यमामधे वाचनाच्या जवळ जाणार्‍या गोष्टी असतात. तुम्ही तुमचं imagine करु शकता, कल्पनाशक्तीच्या आधारे ते पात्र पाहू शकता. हा श्राव्य मधला एक महत्वाचा ताकदीचा भाग आहे त्यामुळे तो फायदा घेउन मी कोसलाला सरळ भिडलो.
२५ भागांमधे ही मालिका सादर झाली. त्याचे छोटे छोटे भाग पाडण गरजेचं होतं. कारण ती रोज २० - २२ मिनीट ऐकवली जायची. त्यावेळेत एक मुद्दा पूर्ण होईल, एक घटना पूर्ण होईल ही काळजी आम्ही घेतली होती.
आणि 'कोसला' ही प्रचंड यशस्वी झाली आकाशवाणी पुणे केंद्रावर ! पुढे जळगाव तसेच मुंबई आकाशवाणी केंद्रावरही ती सादर करण्यात आली. प्रचंड पत्र आली. मोठ्या प्रमाणावर लोकांनी त्याची दखल घेतली. आणि माझ्यासाठी, श्राव्य माध्यमातुन एक interpretation करता, कस होत याचा अभ्यास करण्यासाठी एक चांगला नमुना तयार झाला.

९. प्रायोगीक रंगभूमीला फक्त मुंबई - पुण्यातच प्रेक्षक लाभतो असे म्हंटले जाते. तुमचा काय अनुभव आहे ?
- हो हे खरं आहे. पुणे - मुंबई ही मोठी मोठी शहरं आहेत त्यामुळे तिथे असणार exposure , तिथे उपलब्ध असणार्‍या संधी ह्या सगळ्याचेच प्रमाण ही मोठे आहे. म्हणजे पुणे हे शहर बघीतलं तर तिथे असणार्‍या मोठ - मोठ्या संस्था, FTI,Archives,EMRC ,बालचित्रवाणी, या सगळ्याच गोष्टी एका बाजूने महत्वाच्या असतात. मुंबई शहर जर बघितलं तर तिथे दुरदर्शन आहे, मोठ्या प्रमाणावर सिनेमा आहे, प्रचंड echonomics असणारं ते शहर आहे. हा झाला एक भाग. दुसरे म्हणजे तिथली जी माणसं असतात, त्या त्या शहरामधली त्यांच्या लोकसंख्येच्या पटीमधे तुम्हाला ती जास्त मिळतात. इथे मला असं वाटतं की त्यांच्या संस्कृती बाहेरच्या जगाचं दर्शन झालेली माणसे एकत्र येतात. आणि एक मानसिकता तयार होते, आपण काहीतरी नविन बघितलं पाहिजे, ऐकलं पाहिजे.
छोट्या - छोट्या गावांमधे जरी प्रेक्षक वर्ग मिळालाच तरी तो दृष्टीकोन असत नाही. नव्या गोष्टींना समजाऊन घेऊन सामोरे जायला तयार असणारे, ज्याला मी दृकश्राव्य साक्षरता म्हणतो ती साक्षरता असत नाही. ती साक्षरता तयार करावी लागते. आजमितीला तरी ते खूप अवघड आहे. पुणे - मुंबईच्या व्यतिरीक्त एक औरंगाबाद असेल, सोलापूर असेल, कणकवली सारख गाव असेल. कणकवली तस छोटसच
गाव आहे. पण त्या गावामधे वर्षानुवर्ष 'वसंतराव आचरेकर' नावाच्या एका संस्थेने महत्वाच काम केलेलं आहे. त्यामुळे तिथला प्रेक्षक वर्ग हा तौलनिक दृष्ट्या खुप सजग़ बघायला मिळतो. अशी परिस्थिती सगळीकडे नसण्याची अनेक कारणं आहेत. अनेक गावांमधे theatres नाहीत, बसायला उठायला एखादी जागा नाही, वाचनालय नाही, तिथे चांगली पुस्तक मिळ्त नाहीत, चांगले चित्रपट बघायला मिळत नाहीत. अशी अवस्था असताना फार मोठा संघर्ष तिथल्या लोकांना आणि नाटककर्मींना तिथे जाउन करावा लागतो.

१०. आजचा तरुण प्रेक्षक वर्ग 'आशय गर्भ' प्रायोगिक रंगभूमीकडे आकर्षित होतो आहे का ? तुम्हाला काय वाटते ?
- हो, गेल्या ४ - ५ वर्षात परीस्थीती खूप बरी दिसायला लागली आहे. वेगवेगळ्या भागामधे छोट्या - छोट्या प्रमाणावर प्रायोगिक नाटकं ही तौलनिक दृष्ट्या जास्त यायला लागली आहेत.व्यावसायिक नाटकांपेक्षा प्रायोगिक नाटकांचे लेखक, कलावंत हे जास्त ओढीने काम करत आहेत. गांभिर्याने ते नाटकाकडे बघु इच्छितात, हे चित्र आशादायक नक्कीच आहे. काही चांगल्या प्रशिक्षण देणार्‍या संस्थाही सुरु झाल्या आहेत, त्यांचही महत्वाचं योगदान आहे. ललित कला केंद्र सारखी पुण्यातली संस्था आहे किंवा अविष्कार सारखी संस्था असेल. हे सातत्याने करत रहाणार्‍या काही माणसांमुळे ही आजची छोटीशी का होईना फळं दिसत आहेत. त्यामुळे हे श्रेय त्यांना द्यावं लागेल.

११. 'साठे आणि पेठे' ही नावे बरेचवेळा जोडीने वाचायला मिळतात. त्यांचे लिखाण, त्यांची काम करण्याची पध्दत, याबद्दल थोडेसे !!
- मला असं वाटतं, प्रत्येक कलावंताच - दिग्दर्शकाच काही विशीष्ठ प्रकारच नातं असत. मकरंद साठेला माझं नाटक आवडणं आणि मला मकरंदच आवडणं या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक असतात. आम्ही दोघेही एका काळामधल्या काही गोष्टी समांतरपणे बघायचा प्रयत्न करतो, हा आमच्यातला महत्वाचा दुवा आहे. मकरंदच्या लिखाणाच्या संदर्भात मला असं वाटतं की, तो महत्वाचा लेखक आहे, वेगळा नाटकवाला आहे, तो वेगळा विचार करतो. आजच्या जगाकडे बघण्याचा त्याचा दृष्टीकोन अत्यंत वेगळा आहे. आणि त्या दृष्टीकोनातून जग बघायला मिळणे ही मी एक संधी समजतो.

१२. 'नाटक' या संवेदनशील प्रक्रियेला सामोर जाताना येणार्‍या अडचणी आणि जाणवणार्‍या काही त्रुटी ??
- मराठी नाटक करणं हा एक अत्यंत आव्हानात्मक भाग कायमच रहात आलेला आहे. १५० वर्षांची दणकट परंपरा ही खरोखर काही व्यक्ती आणि त्यांनी चालवलेल्या संस्था यावरच आधारित राहिलेली आहे. माझे पुर्वसूरी हे इतके प्रचंड मोठे आहेत की त्यांचे प्रश्न हे कायम मराठी नाटकाचे अत्यंत तीव्र अशा संघर्षाचे आहेत. आज नाटक करत असताना तर ते प्रश्न अधिक गडद होत आहेत. अधिक व्यामिश्र आणि गुंतागुंतीचे होत चाललेले आहेत. एक म्हणजे इथे इच्छा असुन मोठ्याप्रमाणावर कुठल्याही प्रकारची उपलब्धता आजही नाही, अशी परिस्थिती आहे. सरकारची कुठल्याही प्रकारची 'सबसीडी' मराठी नाटकाला नाही. प्रायोगिक नाटकांकडे तर अत्यंत दुर्लक्षच आहे. ३३ जिल्ह्यांपैकी १० जिल्हे सोडता आम्हाला आवश्यक अशी, पूरक अशी नाट्यगृह तिथे नाहीत. त्यामुळे नाटक करायची ईच्छा आहे पण ते नाटक कुठ करायच ? त्याला जागाच नाही, ते केंद्रच नाही. मला अस वाटत की एका बाजुने शहर वाढत असताना, सुबत्ता वाढत असताना नाटकासारख्या गोष्टींचा मात्र गळा घोटला जाण्याच हे रुपक मानता येईल.
अजुन एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे की, या सगळ्या नाटकांच ज्याप्रकारे दस्ताऐवजीकरण व्हायला पाहीजे, त्याच्या विषयी ज्या चर्चा व्हायला पाहीजे, त्याच्या साठी ज्या कार्यशाळा व्हायला पाहीजे. त्याचा अभ्यास करण्यासठी ज्या शिष्यवृत्या असायला पाहीजे, त्या इथे आज तरी उपलब्ध नाहीत आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. आमचं सगळं काम आत्तापर्यंत आम्ही करु शकलो याच कारण म्हणजे आम्ही नोकर्‍या करत राहीलो. आमच्या बरोबरचा जो गट असेल तो नोकरी करत नाटक करत राहीला. नोकरी करुन ८ - १० तास पिळवटून काढून घेतल्यानंतर आपण एका सर्जनशील प्रक्रियेला सामोर जाणं हा अत्यंत त्रासदायक प्रकार आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहोत. याविषयी तक्रार नक्कीच नाही पण हे नष्टचर्य कधीतरी कुठेतरी संपावं अशी मात्र मनोमन इच्छा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या grants , अशाप्रकारच्या felloships काही प्रमाणात इथे असणं हे फार गरजेच आहे, ज्याच्याकडे आतापर्यंत सगळ्यांनी दुर्लक्ष केलेल आहे.
इथे जवळ जवळ तुम्ही म्हातारे झाल्याशिवाय तुम्हाला पुरस्कार मिळणार नाहीत अशी समाजव्यवस्था आहे. ही तक्रार नाही, वास्तवतेच दर्शन आहे. या सगळ्या पार्शभूमीवर, आपण नाटका कडुन काही मागणी करत असतो. पण जर तो समाज खूजा असेल तर नाटक ही खूज व्हायला लागतं. त्या समाजाला जर नाटक बघणं, सिनेमा बघणं, पुस्तक वाचणं, शिल्पकला - चित्रकला बघणं याची गरजच वाटत
नसेल जीवनात, तर तो समाज हा अधोगतीलाच जातो. नाट्यगृह ही कुठल्याही शहराची / गावाची उर्जास्रोत असतात. तरीही तुमच्या गावामधे AC बियर बर असतात पण नाट्यगृह नसतात.
या सगळ्या पार्श्वभुमीवर आम्ही आमच्या पात्रते नुसार काम करण्याचा प्रयत्ना करत असतो. त्यामुळे सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे हा जरी आनंदाचा भाग असला तरी या आनंदाच्या खाली अत्यंत टोकदार अशी व्यक्तीगत दु : खांची पदचिन्हं मात्र आहेतच.
हे सगळं होत असताना काही छोटे - छोटे हिरवळीचे क्षण ही भेटतात. जे आम्हाला मदत करायला तयार असतात किंवा ज्यांच्या मदतीवर हा डोलारा उभा असतो.
जसे, हे जे दस्ताऐवजीकरण केलं गेलेलं आहे, ते काम California Arts Association , कला, अभय पाटील, डॉ.श्रीराम लागु, निळू फुले, अमोल पालेकर, राजेंद्र बापट यां सारख्या काही संस्था आणि व्यक्ती यांच्या बळावर आणि त्यांनी केलेल्या आर्थिक मदतीवर करता आले. त्याच्या मधे सूर्य पाहिलेला माणूस, तेंडुलकरांवरचा माहितीपट, आणि आत्ता नव्याने ध्वनीचित्रीमुद्रीकरण होणारे 'Wating for godot' हे नाटक, या कलाकृतींचा समावेश आहे.
कुठल्याही अडचणींनी डगमगून न जाता, आपल्या संवेदनशिलतेला आणि मूल्यांना चिकटून राहून सर्जनशिलतेचा नवा शोध घेणारं काम उभं करणे हा निग्रह ही त्यातूनच जपता येतो.

शेवटी आपण बोलू पहातो ते माणसांविषयक आणि जीवनाविषयक !!

Friday 14 October 2011

रसग्रहण : मास्तरांची सावली - कृष्णाबाई नारायण सुर्वे.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिसणार्‍या 'मास्तरांची सावली' आणि 'कृष्णाबाई नारायण सुर्वे' या पाच शब्दांपैकी 'नारायण सुर्वे' हे दोन शब्द वाचून हातात घेतलेले पुस्तक वाचताना कधी मी कृष्णाबाईंच्या आयुष्याच्या चक्रीवादळात अडकत गेले ते लक्षात आलेच नाही.

लेखक / कवी पत्नीने लिहिलेले पुस्तक हे आपल्या नवर्‍याला मोठे करण्यासाठी पत्नीने केलेल्या त्यागाची कथा असा एक ढोबळ अंदाज असतो. आणि इथेच या पुस्तकाचे वेगळेपण दिसते. कृष्णाबाईंनी जसा मास्तरांच्या [नारायण सुर्वे यांचा उल्लेख पुस्तकात 'मास्तर' असा येतो] जडणघडणीत आपल्या योगदानाचा उल्लेख केला आहे तसाच त्यांनी स्वतःच्या आचार-विचारात, व्यक्तिमत्त्वात होत गेलेला बदल हा केवळ मास्तरांच्या सहवासानेच आहे हे पण मान्य केले आहे. अत्यंत साध्या सरळ, जवळ जवळ बोली भाषेतच, लौकिक अर्थाने अशिक्षित असलेल्या स्त्रीने तिच्या मनात साठलेले विचार, केलेली धडपड, उपसलेले कष्ट, भोगलेलं पोरकेपण, आयुष्याच्या एका निवांत वळणावर कागदावर उतरवले आहे. त्यामुळेच वाचताना ते थेट मनाचा ठाव घेते.
एका दु:खाला सामोरे जाऊन मोकळा श्वास नाही घेत तर दुसरे दु:ख, दुसरी अडचण त्यांच्या मार्गात आयुष्यभर येत राहिली. समाजात वावरताना अत्यंत वाईट वागणूक, फसवणूक, अपमान, बदनामी सगळ्याला तोंड द्यावे लागले. पण इतके सगळे सहन करूनही कृष्णाबाईंना असलेली माणसांची ओढ, तिर्‍हाईता बद्दल सुद्धा वाटणारे प्रेम, अनोळखी माणसांच्या मदतीसाठी आसुसलेले त्यांचे मन, ही एक आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे, आणि तीच या पुस्तकाचा आत्मा आहे.

वयाच्या अवघ्या दुसर्‍या वर्षीच आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या कृष्णाबाई आणि जन्मत:च ज्यांना आईने कचराकुंडीजवळ सोडून दिले असे मास्तर, म्हणजे नारायण सुर्वे यांचे सांसारिक आयुष्य, शाळेत शिपाई ते 'शिक्षक' अशी प्रगती, झोपडपट्टीतले वास्तव्य, उपासमार ते स्वतःचे घर आणि आयुष्याची स्वस्थता असा प्रवास, कामगार नेता ते एक प्रसिद्ध कवी अशी ओळख, या सगळ्या घटनांमध्ये कृष्णाबाईं मास्तरांच्या पाठीशी भक्कम उभ्या राहिलेल्या दिसतात, अगदी त्यांच्या सावलीशी एकरूप होऊनच. तुमची सावली होऊन जगू द्या, मी तुम्हाला खंबीरपणे साथ देईन, असा लग्नानंतर कृष्णाबाईंनी मास्तरांना दिलेला शब्द त्यांनी आयुष्यभर पाळला. अनेक लहान सहान गोष्टी शिकवून, प्रसंगी अंकुश ठेवून आपल्या मास्तरांना आपणच घडवलं आहे याचा आनंद आणि अभिमान कृष्णाबाईंना आहे, आणि त्यामुळे मास्तरांबद्दल खात्री, विश्वास पण आहे जो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांच्या मदतीला आलेला दिसतो.

आपल्या आजीजवळ (वडिलांची आई) वाढलेल्या कृष्णाबाईंना लहानपणापासूनच घरात राहणे, घरकाम करणे या गोष्टींमध्येच अधिक रस होता. पण जेव्हा संसाराला आधार द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी शाळेत शिपायाची नोकरी पण केली. आवश्यक ते सगळे कामकाज शिकल्या. एखादा सुशिक्षित माणूस काय सोडवेल अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या पुढ्यात आलेल्या अनेक समस्या सोडवल्या. मग ते नोकरी सांभाळून मुलांचे संगोपन असो, की घरात सांडपाण्याच्या मोरीची सोय करणे असो, की फॅमिली प्लॅनिंग असो. त्यांच्या बुद्धीची चुणूक अशा कितीतरी प्रसंगामधून जाणवते. 'घाबरू नकोस कृष्णाबाई, हेही दिवस जातील' अशी स्वतःचीच समजूत काढत प्रपंचाचा गाडा त्या ओढत राहिल्या. मास्तरांना थोरल्या मुलाबरोबर सातवीची परीक्षा देण्याचा आग्रह कृष्णाबाईंनी केला. मास्तर सातवी पास झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी आवश्यक ते सर्वप्रकारचे बळ त्यांनीच मास्तरांना दिले. मास्तरांचे पहिले पुस्तक छापता यावे म्हणून आपला एकुलता एक दागिना 'मंगळसूत्र' पण त्यांनी विकले. ' मंगळसूत्र आणि कुंकू लावण्यापेक्षा, मनातल्या श्रद्धा आणि भावना महत्वाच्या नाहीत का ? ' हा एवढा विचारांचा मोठेपणा बघून आपल्याला कृष्णाबाईंसमोर अगदी लहान झाल्यासारखे वाटते. स्वतःची कुठलीही हौस नाही, कसलाही मोठेपणा नाही, फक्त मास्तरांनी मोठे व्हावे एवढा एकच ध्यास घेऊन त्या बाकी सगळे आयुष्य समोर आले तसे जगल्या. त्या ध्यासापोटी केलेली धडपड त्यांनी अत्यंत साध्या शब्दात आपल्या समोर मांडली आहे. साहित्यमुल्यांच्या तराजूत हे पुस्तक तोलणे म्हणूनच योग्य ठरणार नाही. काही ठिकाणी प्रसंगांची उलट-पालट आहे, काही वेळा घटनांची पुनरावृत्ती पण आहे. पण अगदी त्यांच्या नेहमीच्या वापरातल्या म्हणींसहीत जसेच्या तसे आलेले त्यांचे आयुष्याचे तत्त्वज्ञान, कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची एक वेगळीच शक्ती आपल्याला देऊन जाते.

मी तुमची सावली होऊन राहीन आणि मला तुमच्या सावलीत राहू द्या, असे जरी कृष्णाबाईं मास्तरांना म्हणत होत्या तरी त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या मनावर कुणाची छाया होती तर ती त्यांच्या आजीची. आजीच्या सहवासात असताना त्यांनी रीतभात, आचारविचार यांची एक शिदोरी बांधून घेतली होती. पुढे मास्तरांशी लग्न झाल्यावर त्यात भर पडत गेली आणि कृष्णाबाईंचे आयुष्य समृद्ध झाले. आजीच्या माघारी बदललेल्या नातेवाईकांपुढे आपला निभाव लागणे कठीण आहे हे लक्षात येताच, घरातून निघून जाऊन, जात-पात नसलेल्या नारायणशी लग्न करण्याचे, आणि पुढे आयुष्यभर 'माणूस' या एकाच जातीवर विश्वास ठेवून नाती निर्माण करण्याचे आणि निभावण्याचे बळ त्याच शिदोरीने त्यांना आयुष्यभर दिले. ही आपली आजी एक ना एक दिवस परत येईल असा विश्वास ठेवून त्या स्वतः आजी झाल्यातरी तिची वाट बघतच राहिल्या. भरल्या घरातही वाटणार्‍या एकटेपणामुळे त्यांचे मन सारखे आजीला शोधत असावे. वरवर कितीही कणखरपणाचा आव आणला किंवा परिस्थितीने तो आणावा लागला तरी माणसाचे मन नेहमीच मायेचा आधार शोधत असते. आणि मग अशावेळी आयुष्यात ज्यांच्याकडून प्रेम, आपुलकी मिळाली त्या व्यक्तीच्या सहवासाची अपेक्षा करते.

मास्तरांना मिळालेल्या यशाने सुखावून जाऊन त्यांचे जसे त्या कौतुक करतात तसेच, बाहेरच्या जबाबदार्‍यांमुळे मास्तरांचे आपल्याकडे दुर्लक्ष झाल्याची खंत ही त्या सांगतात. नातवंडांची जबाबदारी आपल्यावर टाकून मुले त्यांच्या विश्वात दंग, मास्तर बाहेरच्या जगात व्यस्त, या सगळ्या एकटेपणात विचार करून करून त्यांना मानसिक त्रासही खूप झाला. प्रत्येक चुकीच्या घडलेल्या गोष्टीची जबाबदारी स्वतःकडे घेण्याची सवय त्यांना घातक ठरली. प्रपंच सावरला, पण आपण मुलांना वाढवायला चुकलो, त्यांचे आपापसात प्रेमाचे संबंध निर्माण झाले नाहीत, याला आपणच जबाबदार असल्याची बोच त्यांना सतत राहिली. घराबाहेर अत्यंत खंबीरपणे प्रत्येक गोष्टीचा सामना करणार्‍या कृष्णाबाईं, नवरा-मुलांच्या बाबतीत मात्र मनाने खूपच हळव्या असल्याचे जाणवते आणि कृष्णाबाईंचे सतत नकारार्थी विचार करून अस्वस्थ राहणे आपल्यालाही अस्वस्थ करून टाकते.

'ढळला रे दिन ढळला सखया, संध्या-छाया भिवविती हृदया', अशा मनाच्या अवस्थेतच त्यांनी मुंबई सोडून नेरळला जाण्याचा निर्णय घेतला तो मास्तरांचा सहवास मिळावा आणि मास्तर अधिक लिहिते व्हावे या हेतूने. त्याचा अजून एक परिणाम म्हणजे या पुस्तकाचा जन्म.

शीर्षकाला शोभेल असेच मुखपृष्ठ या पुस्तकाला लाभले आहे, मास्तरांच्या फोटोत सामावलेला कृष्णाबाईंचा फोटो. 'दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने', 'मनोगत', आणि 'योगायोग' असे तीन दरवाजे पार केल्यावरच आपण मुख्य दरवाजासमोर येतो, आणि आपल्या समोर उघडतो एका अनुभवसम्रुद्ध आयुष्याचा महाल ज्यात हरवून जाणे न जाणे मग आपल्या हातात राहतंच नाही.

+++++++++++++++++++++++++++++++
मास्तरांची सावली - कृष्णाबाईं नारायण सुर्वे.
प्रथमावृत्ती - १५ ऑगस्ट २००९
व्दितीयावृत्ती - १६ जानेवारी २०१०
प्रकाशक - डिंपल पब्लिकेशन
मूल्य - १९० रुपये
पृष्ठ संख्या - १८३.
++++++++++++

Thursday 13 October 2011

साठवण - सुनिता देशपांडे


[२००३ च्या हितगुज दिवाळी अंकातुन]

बरेच दिवसांपुर्वी वर्तमानपत्रात सुनिताबाईंचा काव्यवाचनाचा मुंबईत एक कार्यक्रम झाल्याचे वाचले होते. त्यादिवशी पेपरची घडी घालता घालता 'किती चांगले कार्यक्रम निसटुन जातात' असा विचार मनात आल्यशिवाय राहिला नाही. आणि आश्चर्य म्हणजे आज परत तसेच घडत होते. त्याच कार्यक्रमाचे रेकॉर्डींग पु.ल. देशपांडेंच्या पुण्यतिथी निमीत्ताने यशवंतराव चव्हाण सभाग्रुहात दाखवण्यात येणार होते. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळची होती, तिकीटे उपलब्ध होती, कार्यक्रम पुण्यात होता आणि मी पण पुण्यातच होते. पण तरीही एक मोठ्ठेच प्रश्नचिन्ह होते, जावे की नाही ? कारण असे की सोमवारी माझी परिक्षा होती, फक्त दोनच दिवस माझ्या हातात होते. वर्षभर पुस्तके जणू सोवळ्यात आहेत अशी परिस्थिती होती. हे सगळे एका बाजुला आणि दुसरीकडे कार्यक्रमाचा मोह, तो काही सुटत नव्हता. या संभ्रमातच ऑफीसचा रस्ता संपला आणि जागेवर पोहोचल्या क्षणी मैत्रिणीला फोन करुन 'कार्यक्रमाला जात आहोत' असे सांगितले. कसा ते समजले नाही पण निर्णय झाला हे मात्र खरे.

साधारणपणे तीन तासांचा कार्यक्रम. अगदी सुरवातीपासून ते थेट शेवटापर्यंत क्षण अन क्षण डोळ्यात, कानात, मनात कुठे कूठे म्हणून साठवू असे काहीसे होवून गेले होते. उत्कृष्ठ काव्यवाचन आणि तितकीच सुरेख संवाद साधण्याची पद्धत. काही जुन्या आठवणी, अनुषंगाने आलेले एक दोन विनोदी किस्से, प्रत्येक कविचे एखादे खस असे वैशिष्ट्य. असे कार्यक्रमाचे स्वरुप, अगदी परिपूर्ण.

राम गणेश गडकरींपासून सुनिताबाईंनी कार्यक्रमाला सुरुवात केली, ज्येष्ठ साहित्यिक म्हणुन गडकरींचा मान पहिला आहेच परंतु पु.ल. आणि सुनिताबाईंनी त्यांची काव्यवाचनाच्या कार्यक्रमांची सुरुवातही गडकरींच्या कवितांपासून केली होती. गडकरींच्या नाटकं व इतर गद्य लिखाणाचा वाचक वर्ग मोठा होता. परंतु त्यांच्या कविता तितक्याश्या लोकांपर्यंत पोहोचल्या नव्हत्या. त्यांच्या या तिसर्‍या रुपाचे दर्शन रसिकांना घडावे या हेतुने पु.ल. व सुनिताबाईंनी त्यांच्या कवितावाचनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली.
'गडकरींच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी माझा जन्म झाला, चार चौघात जरी भाई हे गमतीने म्हणत असे तरी आत कुठेतरी त्याला या गोष्टीचा अभिमान होता' अशी गमतिशीर आठवण सांगून सुनिताबाईंनी गडकरींची 'मंगल देशा, पवित्र देशा' ही कविता सादर केली. .... मनात विचार आला खरच गडकरींचेच हे चौथे रुप नसेल कशावरुन ? पु.लं. चे लेखन क्षेत्र गडकरींपेक्षा संपूर्णपणे भिन्न होते. त्यांनी न हाताळलेला लेखन प्रकार पु.लं च्या रुपात पुर्ण झाला. म्हणुनच वाटते गडाकरी पु.लं.च्या रुपात आपल्यात नक्कीच आले असतील. एव्हढा मोठा आनंदाचा ठेवा घेउन, एक असामान्य कर्तुत्व, निर्लेप दातॄत्व घेउन. असेच पु.ल ही नक्कीच परत आले असतील. कारण ज्यांना माणसांची ओढ असते ते माणसांमधेच तर परत येणार. आपण फक्त 'पु.लं. च्या मृत्युनंतर नऊ महिन्यांनी माझा जन्म झाला' असे अभिमानाने सांगणार्‍याची वाट बघायची.

गडकरींनंतर आले मर्ढेकर. 'मर्ढेकर हा एकमेव सुटाबुटातला कवी' अशी सुनिताबईंनी मर्ढेकरांची ओळख करुन दिली. साधारणपणे साहित्यिक म्हंटले की अतिशय साधी रहाणी असे चित्र पूर्वी लोकांच्या डोळ्यासमोर होते. अभियांत्रीकी पार्श्वभूमी असलेल्या मर्ढेकरांनी नोकरीत मोठ मोठी पदे भुषविली होती. कविता त्यांची आवड होती, चरितार्थ नव्हता. कदाचित म्हणुनही हा फरक असेल. कुठल्याश्या कार्यक्रमाचे मर्ढेकर अध्यक्ष असताना, पु. ल. व सुनिताबाई त्यांना भेटण्यासठी म्हणुन व्यासपीठावर गेले होते. 'ही माझी बायको', अशी पु.लं नी सुनिताबाईंची ओळख करुन दिली, आणि सुनिताबाईंनी त्यांच्या स्वभावगुणाला अनुसरुन मर्ढेकरांना घरी जेवायला येण्याचे आमंत्रण दिले. मर्ढेकरांनी पण लगेच येण्याचे कबुल केले, पण एका अटीवर, अट कोणती ? तर बेत पिठल भाकरीचा असावा आणि खाली पाटावर जेवायला वाढावे. प्रतिभावंतांमधे अभावानेच आढळणारा साधेपणाचा एक अनोखा रंग. सुनिताबाईंनी निवडलेल्या मर्ढेकरांच्या कविताही अशाच विवीध रंगी. 'या दु:खाच्या कढईचीगा, अशीच देवा घडण असु दे', या कवितेतून जितका मनाचा कणखरपणा प्रतीत होतो, तितकाच नाजुकपणा निथळतो 'दवात आलीस भल्या पहाटे, शुक्राच्या तोर्‍यात एकदा', या ओळींमधून. 'पोरसवदा होतीस काल परवा पावेतो' मधील अवखळपणा, 'असे काहीतरी व्हावे अशी होती दाट इच्छा, असे काहीतरी झाले पुरविते तेच पिच्छा' मधील अगतिकता, सुनिताबाईपण तेव्हढयाच सामर्थ्याने व्यक्त करतात. 'फलाटदादा, फलाटदादा' या कवितेतील 'बोल ना फलाटदादा' म्हणत सुनिताबाईंनी केलेले आर्जव ऐकुन खरंच आता फलाटदादा तरी बोलेल नाहीतर सुनिताबाईंच्या डोळ्यांमधुन अश्रुधारा वाहतील असेच वाटुन गेले. पण शेवटची ओळ संपताच त्या अगदी पूर्ववत होऊन जात. त्यांच असं प्रत्येक कवितेत आत-बाहेर येण-जाण ही तर फक्त अनुभवण्याचीच गोष्ट आहे, लिहिण्या वाचण्याची नाहीच.

सगळ्यात जास्त रंगला तो खानोलकरांचा किस्सा. कवि चिं.त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभु मूळ कोकणातले. त्यांच्य वडिलांची कोकणात खानावळ होती. वडिलांना मदत म्हणून खानोलकर गल्ल्यावर बसत असत. तिथे बसल्या बसल्या रिकाम्या वेळात कविता लिहीणे हा त्यांचा छंद होता. खानावळीत नियमीत येणार्‍यांपैकी दोघांची नजर गल्ल्यावर बसलेल्या ह्या तरुणावर असे. हा कागद पेन घेउन इतके पानेच्या पाने रोजच काय लिहीतो असा मोठाच प्रश्न त्या दोघांना पडला होता. मुलगा तरुण आहे आणि अगदी हरवून जाऊन लिहितो आहे म्हणजे नक्कीच प्रेमपत्र असणार, असा निष्कर्ष तर त्यांनी काढलाच पण खात्री करुन घेण्यासाठी त्यांनी एके दिवशी त्यातले काही कागद पळवून आपल्या खोलीवर नेले. 'ऊभी लिहितात ती कविता आणि आडवे ते गद्य' एवढीच मराठी साहित्याची ओळख असलेल्या त्या दोघांना आपण पळवून आणल्या त्या, त्या मुलाने लिहिलेली प्रेमपत्रे नसून कविता आहेत असा अर्थबोध झाला. पुढे त्यातल्याच काही कविता त्यांनी मुंबईस मौज प्रकाशनात छापण्यासाठी पाठवल्या. अगदी खानोलकरांच्या नाव-पत्त्यासहित. परंतु तिन-चार महिने वाट पाहुनही जेंव्हा त्या छापून आल्या नाहीत तेंव्हा कविचे चिं.त्र्यं.खानोलकर हे विचित्र नावच त्याला कारणीभूत असावे असे समजून या महाशयांनी मग कविचे नाव बदलून पुन्हा नव्याने कविता छापण्यासाठी पाठवून दिल्या. आणि यावेळेस पत्ता जरी तोच होता तरी नाव होते 'आरती प्रभू'. आश्चर्य म्हणजे यावेळेस कविता छापुनही आल्या आणि स्वतःच्याच प्रतिभेपासून अनभिज्ञ असलेला एक थोर कवि महाराष्ट्राला मिळाला. अचानक मिळालेल्या या अफाट प्रसिद्धीमुळे खानोलकर थोडे विचीत्र मनस्थितीत सापडले. 'आपण कोणीतरी अद्वितीय आहोत' असा अहंकार आपल्यात निर्माण तर होणार नाही ना अशी भिती त्यांना वाटू लागली. आणि कविता जन्मली, 'येरे घना येरे घना, न्हाउ घाल माझ्या मना'. 'एका रिमझिम गावी, भासत आहे हृद्यस्थ तान, पण ...' , 'गेले द्यायचे ते राहून, तुझे नक्षंत्रांचे देणे ...' या सगळ्याच कवितांमधला नेमका भाव सुनिताबाई प्रेक्षकांपर्यंत अगदी थेट पोहोचवतात.

बा.भ.बोरकर, पु.ल व सुनिताबाईंवर त्यांचा विशेष लोभ होता. त्यामुळे बोरकरांच्या कविता त्यांनी अधिकच समरसुन वाचल्या. त्यांच्या आपल्यावर असलेल्या 'विशेष' प्रेमाची जाणीव कशी झाली याची आठवण सांगताना सुनिताबाईंनी सांगितलेला प्रसंग अगदी मन हेलावून टाकतो. बोरकर अगदी अंथरुणाला खिळून होते. या आजारातून आता ते उठत नाहीत, हे सगळे समजून चुकले होते. सुनिताबाई त्यांना भेटण्यासाठी म्हणून गेल्या होत्या. बोरकरआंना तर उठून बसणे पण शक्य नव्हते. वाचन तर लांबची गोष्ट. म्हणुन त्यांनी सुनिताबाईंना आपली 'समुद्राची' कविता म्हणुन दाखवण्याची विनंती केली. ती बोरकरांची अगदी सुरुवातीच्या काळातली कविता असल्यामुळे सुनिताबाईंना पाठ नव्हती. शेवटी बोरकरांच्या मुलीच्या मदतीने घरातच शोधाशोध करुन, पुस्तक मिळवून सुनिताबाईंनी बोरकरांना कविता वाचुन दाखवली. कविता संपता संपताच ते कोमात गेले आणि दोनच दिवसांनी ही दुनिया सुद्धा सोडून गेले. मृत्यूशय्येवरही 'समुद्र बिलोरी एना, सृष्टीला पाचवा महिना' सारखी अवखळ कविता एकण्याची इच्छा करणारा कवि किती तरुण मनाचा असेल याची कल्पना येते. यानंतर बोरकरांच्या एक से बढकर एक कवितांची उधळणच होती. 'सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग', 'हवा पावसाळी, जरा रात्र काळी', 'मी विझल्यावर त्या राखेवर', 'कळत जाते तसे, कसे जवळचेही होतात दूर', सगळ्याच कविता सुनिताबाईंनी अप्रतिम सादर केल्या.

कार्यक्रम कितीही रंगला तरी शेवट हा अपरिहार्यच असतो. या कार्यक्रमाचा शेवट सुनिताबाईंनी त्यांची प्रिय सखी 'पद्मा गोळे' यांच्या दोन कवितांनी केला. 'आता मी नसतेच इथे' ही कविता अगदी मनाला चटका लाउन गेली. सुनिताबाई त्यांच्या मनातले भाव तर बोलत नाहीत ना, असे काहीसे क्षणभर वाटून गेले. आज-काल त्यांचे एकटे-एकटे रहाणे आणि कवितेचा आशय यात कुठेतरी साधर्म्य जाणवले. कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू म्हणजे 'चाफ्याच्या झाडा' या कवितेचे सादरीकरण, कविता अर्थातच पद्माबाईंची. पण ही माझीच कविता आहे असे सुनिताबाईंनी म्हंटल्यामुळे कोड्यात पडलेल्या प्रेक्षकांसमोर, त्या मागचे गुपीत उलगडत सुनिताबाईंनी ती कविता जेंव्हा सादर केली तेंव्हा अंगावरचे रोमांच टाळ्यांचे रुप घेउन प्रेक्षागृहात दुमदुमले.
'चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा,
का बरे आलास आज स्वप्नात ?
तेंव्हाच तर आपलं नव्हत का ठरल,
दु:ख नाही उरल आता मनात'.

[* माझी हिंमत अशी की, काही कामाने गेले असता, मी हे लिखाण सुनिताबाईंना वाचायला दिले. हे सगळे मी माझ्या स्मरणशक्तीच्या भरवश्यावर लिहिले होते. वरील लिखाणात मी कवियत्री पद्मा गोळे यांचा उल्लेख 'सुनिताबाईंची प्रिय सखी' असा केला आहे.
"तुमच्या लिखाणात एक चुकीचा संदर्भ आहे, त्या माझी सखी आहेत असे मी कधीच म्हंटलेले नाही. त्यांचा आणि भाईचा स्नेह होता" असा शेरा मला सुनिताबाईंकडून मिळाला. स्मित *]

- आरती.

या कार्यक्रमाची सीडी मिळते, नाव नक्की आठवत नाही, 'कवितांजली' असावे.