बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Monday 29 December 2014

'स्त्रीवादी' नसलेली संवादी 'स्त्री'

अशीच ओळखीची एकजण आहे. लहानपणापासून गाण शिकलेली. लग्नकरून अमेरीकेस आली. नोकरी करू शकत नव्हती. फार पैशांची गरज नव्हती, नवरा चिक्कार कमवत होता. पण म्हणून दिवसभर नुसते रिकामे घरात बसणे तिला योग्य वाटत नव्हते आणि मानवतही नव्हते. मग नवऱ्याला म्हणाली, 'इथे कुठे क्लास असेल गाण्याचा तर परत गाण चालू करेन म्हणते आहे'

जवळपासचा एक क्लास तिने शोधून काढला. पण तो जवळ म्हणजे, कारने गेले तर दीड तासाच्या अंतरावर होता. आठवड्यातून एकच दिवस होता. पण अंतर तिला खूप जास्त वाटत होते. त्यात अजून गाडी चालवायला पण शिकली नव्हती, त्यामुळे हा क्लास तरी जमेल असे तिला वाटेना.

नवरा म्हणाला, 'आठवड्यातून एकाच दिवस आहे ना, मी थोडा लवकर येईन'. तो तिला घेऊन जायचा, २ तास बाहेर बसायचा. क्लास संपला कि तीला घरी घेऊन यायचा.

थोडी रुळली, मग तिचे तिनेच लहान मुलांसाठी गाण्याचे क्लासेस सुरु केले. मुलांना ५ दिवस शाळा असते त्यामुळे हे क्लास सुट्टीच्या दिवशी, शनिवार-रविवार असतात. साधारण सकाळी १० ते दुपारी २ हिचे क्लासेस चालतात. तिला २ मुली आहेत. हा सगळा वेळ नवरा दोघींना सांभाळतो. धाकटीचे खाणे-नहाणे सगळे करतो. आनंदाने.

हि मजेत आहे. आवडीचे काम करायला मिळते आहे, जोडीला पैसे पण मिळत आहेत. मुली पण छान टवटवीत आहेत. घर सुंदर सजवलेले आहे.

एकदिवस मी गेले तर तिचा क्लास चालू होता. मी तिथेच बसले ऐकत. गाणे संपले. ती मुलांना काही पाठ लिहून देत होती. तिच्या मोठीने शंका विचारली, 'वादी' आणि 'संवादी' म्हणजे नक्की काय ?
हिने थोडे सांगीतिक भाषेत सांगितले आणि म्हणाली, 'आता अगदी सोप्पे सांगते.
वादी म्हणजे सगळ्यात महत्वाचे. जसे आपल्या घरात बाबा. आणि संवादी म्हणजे त्यानंतर महत्वाचे, म्हणजे जशी आई'.

तिने लेकीला सांगताना जे सांगितले ते शब्द मला ऐकू आलेच नाहीत. मला जाणवली ती त्या घरातली आपल्या जोडीदाराचे  'वादी' असणे जपण्यासाठीची  दोघांचीही धडपड.


Wednesday 24 December 2014

' ट्रेक्षणीय - १ ' - राजमाची.

२००५ पासून नंतरच्या ४-५ वर्षांत शंभरच्या आसपास ट्रेक केले. त्यात काही ठराविक किल्ले १ पेक्षा जास्तवेळा पण केले. आणि काही करायचे, करायचे म्हणत अजून बाकीच आहेत. राजगड काय किंवा सिंहगड काय, अनेकवेळा का चढलो ? या प्रश्नाचे जसे काहीच उत्तर असू शकत नाही. तसेच राजमाचीच्या राजवाटेवर दोनवेळा पायपीट करायचे कारण काय ? याचेही उत्तर मला मिळत नव्हते.

असा हा राजमाचीचा दुसरा ट्रेक नंतर अनेक गोष्टींमुळे लक्षात राहिला. त्यातल्या काही, म्हणजे - आलो त्या वाटेने न जाता, उलट्या बाजूने उतरायचे ठरले. म्हणजे परत लोणावळ्याकडे न जाता, कर्जतच्या बाजूला 'कोंडीवडे' गावात उतरायचे [हे ठरले अर्थातच 'एक' मताने ]. त्यामुळे थोडे चाचपडतच उतरलो. बरीच जास्तीची पायपीट झाली. अगदी रस्ता कधी संपतो असे होऊन गेले. आणि असे बरेच काही.

"तीन पाऊस पडून गेले, आता पावसाळी ट्रेक सुरु करूया", असे म्हणून ठरलेला, त्या मौसमातला हा पहिला पावसाळी ट्रेक, थेंबभरही पाउस न पडता सुद्धा आम्हाला शब्दशः चिंब भिजवून गेला. भरपूर आभाळ आलं होत, वातावरणात प्रचंड आर्दता होती. घाम इतका येत होता कि ५ मिनिट चाललो तरी पाणी / ग्लुकॉन-डी प्यावे लागत होते. जवळचे पाणी लवकरच संपले. राहिलेली वाट संपता संपेना. अखेर पायथ्याचे गांव दिसले. गावात कसेबसेच पोहोचलो. जे पहिले लागले त्या दुकानाच्या ओसरीवर सगळ्यांनी बसकणच मारली. पाण्याच्या बाटलीची चौकशी केली असता, "कोका कोला मिळेल" असे उत्तर मिळाले. शीतपेयांमध्ये काळ्यारंगाचे कुठलेच पेय मी कधीच पीत नसूनही, त्यादिवशी एका मागे एक ४ बाटल्या 'कोक' पिऊन आयुष्यातली सगळी कसर भरून काढली.

हे सगळे प्रकार दुसऱ्या दिवशीचे. आदल्या दिवशी लोणावळ्याहून निघालो तेंव्हा पण पाउस नव्हताच. पण संध्याकाळची वेळ असल्याने हवेत थोडा गारवा होता. रस्ता लांबचा होता पण फार चढण नव्हती. त्यामुळे आरामात गप्पा मारत-मारत मार्गक्रमण चालले होते.

तुंगर्ली धरण मागे टाकून, ठाकर वस्तीवरून एक वळण चढून पुढे आलो आणि कोणाला आधी दिसले आठवत नाही, पण बरेच म्हणजे आठ-दहा काजवे चमचम करताना दिसले. "आहा" म्हणून इकडे तिकडे बघितले तर अजून बरेच दिसले.

शाळेत असतांना, पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात एखाद्या दिवशी जर अगदी अंधार पडेपर्यंत बाहेर खेळत बसलो तर घरी येताना कॉलनीत कुठेतरी, किंवा घराबाहेर अंगणात एखादा काजवा लख्खन चमकून जायचा. अनेक प्रयत्नांमधला एखादा यशस्वी झाला तर तो आमच्या काडेपेटीत कोंडला जायचा. पण काडेपेटीतल्या अंधारात मात्र कधीच तो चमकला नाही. हिरमुसले होऊन शेवटी त्याला सोडून दिले जायचे. तो उडून जायचा कि खाली पडायचा हे पाहिल्याचे काही आठवत नाही. आम्ही आपले दुसऱ्या काजव्याच्या शोधात. एकावेळी जास्तीत जास्त ४ किंवा ५ एवढेच काजवे असायचे. पण "तो बघ तिकडे एक, इकडे पण एक, तुझ्या डोक्यावर बघ उडतो आहे" असा आमचा जोरदार आरडा ओरडा चालू असायचा. क्वचित आणि अगदी आभास वाटावा इतके पुसट दर्शन देणाऱ्या कुठल्याही गोष्टीचे, सुप्त आणि खास आकर्षण प्रत्येकाच्याच मनात असते.
इथे तर त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त काजवे होते. मात्र उत्सुकता आणि आरडा-ओरडा अगदी तोच होता. 'हे बघा, तिकडे बघा, अरे तिकडे काय बघता इकडे बघा, कॅमेरा कुठे आहे, पटकन फोटो काढा' असे सगळे चालले होते कारण आमच्या समोर एक आख्खे काजव्यांचे झाड होते. कल्पना करा, रात्रीची वेळ, काळोखात भर घालण्यासाठी भरून आलेलं आभाळ. ना वर- ना खाली, कुठेही ना उजेडाची तिरीप ना एखादा ठिपका. अशा अंधाऱ्या पायवाटेवर अचानक तुमच्या समोर चमचमणारा एक भलामोठा वृक्ष येतो !
मिट्ट काळोखात ते दृश्य असे दिसत होते जसे काही ते झाड आभाळाला जाऊन टेकले आहे आणि सगळ्या चांदण्या आभाळातून उतरून झाडाला बिलगल्या आहेत.

काय कारण असावे माहिती नाही, पण ते सगळे काजवे त्या झाडाच्या आकृती प्रमाणेच फेर धरून चमचमत होते. भारावलो, हरखलो, विसावलो आणि पुढे निघालो .... उल्हास नदीचे खोरे डाव्या हाताला ठेवत एक वळण चढून सामोरे गेलो तर ... तर संपूर्ण दरी अक्षरशः लखलखत होती. आता मात्र सोबत होती नि:शब्द पायवाट आणि चंदेरी लखलखाट.

सह्याद्रीतले गड-किल्ले प्रत्येक ऋतुत वेगळ्याच रुपात भेटतात हे नक्की .... आणि त्यासाठीच होता हा दुसरा ट्रेक.

- Arati.

Tuesday 23 December 2014

' उर्सली '

"उर्सली" ही एका छोट्या मुलाची एक छोटीशी गोष्ट आहे. मूळ जर्मन कथेच इंग्रजी रुपांतर रेवाकडे आहे. आणि सध्याच्या रोज वाचण्याच्या पुस्तकांपैकी ते एक आहे. कधी आम्ही पुस्तक हातात घेऊन वाचतो तर कधी गोष्ट म्हणून पुस्तक न घेताच तिला ऐकायची असते. अगदी सगळ्या बारकाव्यांसहित.
.
उन्हाळ्यात आपल्या सगळ्या जनावरांसाहित डोंगरावर राहायला जाणाऱ्या आणि हिवाळ्यात डोंगर पायथ्याशी आसऱ्याला येणाऱ्या एका कष्टकरी कुटुंबातला उर्सली हा एकुलता एक आणि समंजस मुलगा. गावातल्या एका उत्सवासाठी लहान मुलामध्ये वाटल्या जाणाऱ्या घंटापैकी सगळ्यात छोटी त्याच्या वाट्याला येते. आणि ती पण मोठ्या मुलांच्या दादागिरीमुळे. अपमानित झालेला उर्सली भर हिवाळ्यात, हिमवर्षाव - निसरडी वाट - थंडी यापैकी कशालाही न जुमानता डोंगरावरच्या घरातून मोठी घंटा आणतो आणि सगळ्यात मोठ्या घंटेचा मान मिळवून त्या उत्सवाच्या मिरवणुकीत पुढचे स्थानही मिळवतो. अशी काहीशी ती गोष्ट आहे.
.
परवा अचानकच इथे झुरिकमध्ये "Schellen-Ursli" नावाचा चित्रपट लागल्याचे वाचण्यात आहे. रेवाने अजून पर्यंत कधीच मोठ्या पडद्यावर चित्रपट बघितला नव्हता. म्हटलं चला तिला घेऊन जाऊ, लाडकी गोष्ट पडद्यावर बघण्याची जरा वेगळी गम्मत. मग शुक्रवारी जाऊन तिच्या वयाला चित्रपटगृहात प्रवेश असल्याची खात्री करून घेऊन तिकीट पण काढून आणले. उद्या सकाळी आपण नक्की काय करणार आहोत याचा तिला काहीच अंदाज नव्हता. 'मुव्ही बघायचा' असे म्हणत होती.
.
आज सकाळी गेलो. आत जाऊन आपापल्या खुर्चीत बसलो आणि जाहिराती सुरु झाल्या. बाईंचा चेहरा कोरा, दोन्ही हातांनी दोन्ही खुर्च्यांना घट्ट पकडलेले आणि एकदम स्तब्धपणे समोरच्या जाहिराती बघत होती. इतकी मोठ्ठी चित्र आणि घुमणारा आवाज दोन्ही अजून मानवत नव्हते. अशीच पाच एक मिनिटं गेल्यावर विचारले 'आई, उर्सली कधी येणार ?'
.
मग चित्रपट सुरु झाला. भरगच्च स्नो असलेल्या छोट्याश्या गावाच्या अनेक गल्ल्या दिसल्या आणि मग एका गल्लीच्या शेवटच्या टोकाला उर्सलीचे घर दिसल्या बरोबर म्हणाली 'आई, बघ उर्सलीच्या घरावर Drawing आहे'. इथून मग सगळे बारकावे तपासण सुरु झालं. आपण जो गोष्टीत ऐकला आहे, पुस्तकात ज्याच फक्त चित्र बघितलं आहे, तो 'उर्सली' असा समोर बघून खुदू खुदू हसू येत होत. तिच्या मनातल्या प्रतिमेशी तो किती मिळता जुळता होता माहिती नाही पण मधेच माझा हात पकडून हसून म्हणाली 'आई, उर्सली'.
गोष्टी इतका चित्रपटात गोडवा नाही. थोडा माल-मसाला आहेच. त्या खटाटोपात कोल्ह्याला उर्सलीचा मित्र दाखवले आहे. "डामरट तो कोल्हा' या तिच्या मनातल्या प्रतिमेला तडा गेल्यामुळे हा बदल तिला अजिबातच आवडला नाही. 'आई कोल्हा त्रास देतो ना सगळ्यांना ?! ' असे विचारण्यात आले. गोष्टीत, एवढा प्रचंड बर्फाच्छादित डोंगर चढून गेल्यामुळे थकलेला उर्सली घरात गाढ झोपलेला असतो. तेंव्हा बाहेर त्याच्या पावलांचे ठसे बघून तिथे जमलेले कोल्हे, हरणांना विचारतात 'हा लहान मुलगा इथे कशासाठी आला आहे ?' मग एक हरीण घरावर चढून तो आत नक्की काय करतो आहे ते बघून येते. हा प्रसंग चित्रपटात नव्हता. त्याची पण तातडीने आठवण करून देण्यात आली.
.
पण एकूण बर्फात खेळणारा उर्सली, बेडूक मुठीत पकडणारा उर्सली, शेळ्यांच्या मागे धावणारा उर्सली, गवतात लोळणारा उर्सली, कोल्हयाला चीज भरवणारा उर्सली, असा सगळ्या रूपातला उर्सली तिला खूपच आवडला. तिचे उस्फूर्त प्रश्न आणि मजेदार टिपण्णया ऐकता ऐकता, तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव निरखता निरखता माझा चित्रपट संपला. तिच्या डोळ्यांसमोर अजूनही चालूच आहे ......

रेवाचा ठेवा .... :)

१४ जुलै २०१६ 

बाबा: "रेवा, आजपासून थोडा अभ्यास करायचा बरंका. संध्याकाळी मी तुला ABCD शिकवेन"
.
रेवा: "A, B मला आधीच येते बाबा. C आणि D मी दुपारी करून टाकते."


आई : "रेवा, भात खाऊन घे चल"
रेवा : "I dont eat Bhat, I am princess"
***
(रेवा माझ्या पाठीवर बसून घोडाघोडा खेळत होती)
रेवा : ओ तुमचं नाव काय ?
मी : घोडा. तुमचं काय नावं ?
 

-----------------------
०७ जुलै २०१६ 

"आई, मी मोठी झाले ना की बॅले टीचर होणार आहे" - रेवा.
.
सगळं कस अगदी सुरळीत चाललंय नाही !! 
सुरुवात आपल्या लाडक्या शिक्षिकेपासूनच झाली. :)
--------------
17 June 2016

मी रेवाला कावळा-चिमणीची गोष्ट सांगते तेंव्हा चिमणी-कावळ्याचा उल्लेख 'चिऊताई' आणि 'कावळा' असा करते.
पण रेवाने आज सकाळी ही चिमणी-कावळ्याची गोष्ट मला सांगितली ती खालीलप्रमाणे ..... 
**
कावळा म्हणतो "चिमणीबाई,चिमणीबाई दार उघड"
चिमणीबाई म्हणते "थांब माझ्या बाळाला आंघोळ घालूदे"
.
.
.
.
मग शेवटी चिमणीबाई दार उघडते. कावळेबुवा घरात येतात.
चिमणीबाई त्यांना खाऊ देते, ब्लँकेट देते. मग दोघ चित्रपट बघतात.
दि अँड.
**
---------------
19 Nov 2015

दिसणं बिसण ठीक आहे पण एखाद्याने किती वडिलांवर असावं याला काही मर्यादा ??!!
.
"रेवा, आज भाजी कुठली करू गं ?"
"आई, फ्लॉवरची कर, माझी सगळ्यात आवडती भाजी !!"
.
"आय हेट फ्लॉवर"

-------------
21 Oct 2015

संदर्भ : 
१. गणपतीचे १० दिवस घरी आम्ही आरती झाल्यावर "हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे" असं म्हणायचो. 
२. आमच्या पितळी देवघरावर छोटा नागाचा एक आकार आहे. 
३. भोंडल्यासाठी काढलेला हत्ती (गजलक्ष्मी) तिथेच देवघराशेजारी ठेवलेला आहे.
.
आता किस्सा:
.
आई: "अगं रेवा, आज बाप्पाला दिवाच नाही लावला आपण"
रेवा: "आई, मी करू का बाप्पाची आरती"
आई: "नको उद्योग करूस गं"
रेवा: "उद्योग नाही करत, मी आरती करते"
:
:
:
रेवा:"हरे कालिया हरे कालिया हरे कालिया हरे हरे, हरे हत्ती हरे हत्ती हरे हत्ती हरे हरे"

-------------
01 Oct 2015

(कार्टून नेटवर्क मधून मिळणाऱ्या सामान्य ज्ञानावर आधारित)
"आई, चल आपण डायनासोरला भेटायला जाऊ"
"नको ग रेवा, मला भीती वाटते"
"घाबरू नकोस आई, मी आहे ना, मी त्याच्या डोक्यावर डान्स करेन"
मग आम्ही चालत चालत त्या काल्पनिक डायनासोर जवळ जावून पोहोचलो. आणि परवाच बघितलेल्या 'शर्वरीताई जमेनीस' यांच्या कार्यक्रमातील आठवेल तश्या पदन्यासाची डायनासोरच्या डोक्यावर तालीम करण्यात आली.
इथून पुढे डायनासोरांच्या डोक्यावर बालिकेची पदचिन्हे दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये. ..........

-------------
05 Sep 2015

रेवा: 'बाबा, तु मला चित्र काढुन देतोस ?'
बाबा: 'हो देतो की, काय काढु ?'
रेवा: 'रेवाचे चित्र काढ.'
.
.
.
बाबा: 'हे बघ रेवा, झाले काढुन चित्र'
रेवा: 'अरे बाबा तु चुकुन हॉर्सचे चित्र काढलेस'
.
बाबा: 👿😖😡
--------------
04 Sep 2015

मराठी गाणी चालु होती. 'लबाड लांडगं ढोंग करतय ... ' लागलं आणि रेवा एकदम म्हणाली,
"My favorite song, hurray"
"Awwww" 😳
---------------
17 Aug 2015

'बडक' नंतर आता रेवा घेऊन आली आहे 'कुकुंम्डी' .....
आई, मला कुकुंम्डी दे ना प्लीज़ .....
Cucumber + काकडी.
---------------
17 March 2015

"रेवा, दुकानात गेल्यावर आईला त्रास द्यायचा नाही. हट्ट करायचा नाही. "
"ओके आई"
"हट्ट केलास तर मी तुला दुकानातच ठेऊन येईन."
"मग मी एकटीच शॉपिंग करू का ?"


१४ फेब २०१५
-------------

रेवा: आई, मला कावळा देतेस का खायला मीठ लाऊन.
आई: काआआय .....

*
एकदम जाऊन बघितले तर ठकुबाई कपाटातून एक-एक वस्तू काढून जमिनीवर ठेवत होत्या,
आई: ए ए ए काय चाललंय ? चला सगळं परत जागेवर ठेवा.

रेवा: असुदे आई, असुदे ....
*
रेवा: आई, मला भूक लागली आहे. पोळी देतेस का ?
आई: हो देते हं.
रेवा: आणि एखादी भाजी पण देतेस का ?
आई: हा हा हा ....

         मला हसू आले ते तिच्या बोलण्याच्या पद्धतीचे आणि त्याचबरोबर चतुरपणाचे. काहीवेळापूर्वी मी तिला  म्हणाले होते, तू आज पोटभर जेवलीस तर मी तुला TV लाऊन देईन.

रेवा: का हसली तू आई, मी सोस आहे का ?
[संदर्भ : मी बरेचदा तिला म्हणत असते, सगळ्याचा भारी सोस आहे बाई हिला.]
*
जेमतेम २-३ घास पोटात गेले असतील आणि म्हणाली,
रेवा: आई मला TV लाऊन देतेस का ?
आई: TV आत्ता नाही बघायचा बाळा, आत्ता आई, बाबा, रेवा सगळ्यांनी गप्पा मारायच्या.
रेवा: हं, ओके. आज ऑफिसमध्ये काय केलेस बाबा.
बाबा shocked, रेवा rocked ..... 
२९ डिसेंबर २०१४
----------------

आई, माझ्या डकीच नाव माहिते, बडक .........

२४ डिसेंबर २०१४
-----------------
न्यूजर्सीला असतांना ती जे बोलते ते समजणारे अनेक जण आजूबाजूला होते. पण इथे आल्यावर भेटणाऱ्या सगळ्याच शेजार-पाजाऱ्याना आपण बोललेले इंग्रजी शब्दच फक्त समजत आहेत हे त्या २ वर्षे आणि काही महिन्यांच्या जीवाला लक्षात आले (असावे) आणि मग प्रत्येक मराठी शब्दाला इंग्रजी शब्द माहिती करून घेण्याचा एक नवीनच छंद तीला लागला.
त्यात मग 'Spider ला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ?" असे प्रश्न पण येतात. किंवा मग पुढीलप्रमाणे संवाद घडतात .....
रेवा: (खिडकीतून बाहेर बघत) बाबा स्नो, बाबा स्नो.
बाबा: त्याला frost म्हणायचे रेवा.
रेवा: पण इंग्लिशमध्ये स्नो म्हणतात बाबा.


**


रोज दुपारी आणि रात्री झोपतांना गोष्ट सांगायची. बरं एक गोष्ट सांगून संपत नाही. मी आज कंटाळून म्हंटले, "संपल्या सगळ्या गोष्टी. मला नाही येत गोष्ट"
"अग ती सांग. बाबा वाघोबा कडे गेला, रेवा आणि आई हत्ती कडे, ती सांग"
मग मी काहीतरी जुळवून सांगितली.
"आता ती सांग, रेवा एकटीच वाघोबाकडे गेली आणि आई-बाबा हत्तीच्या पिल्लू कडे"
उगीचच मला GS ची अनेक कथाबीजं असलेली 'ती' diary आठवली.


२५ नोव्हेंबर २०१४
 -----------------
आज सकाळी लेकीने दोन तासाच्या आत ४ वेळा कपडे बदलायला लावल्याने चौथ्यावेळी माझ्याही नकळत मी म्हणाले, 'परमेश्वरा या मुलीला लवकर मोठी कर'
'आई, तू कोणाशी बोलली ?'
' बाप्पाशी '
'तू बाप्पाला काय म्हणाली ?'
'मी म्हणाले, रेवाला लवकर मोठे कर'
'भ्याआआअ मला मोठे करू नको'
'अग तुला आईसारखे मोठे व्हायचे आहे ना ?'
'हो'
'म्हणून आई म्हणाली बाप्पाला'
'भ्याआआअ बाप्पा मोठे करत नाही'
'अग करतो रेवा, हळूहळू करतो. रडू नकोस'
*
दुपारी स्वयंपाकघरात खिडकीसमोरच्या खुर्चित बसली होती. तिथून तिला आकाशात उडणारे पक्षी दिसले.
'आई मला उडता येत नाही, मला कावळा बरोबर उडायचे'
'अग कावळ्याकडे पंख आहेत ना म्हणून त्याला उडता येते'
'मला पण पंख आणून दे दुकानातून'
'पंख दुकानात नाही मिळत बाळा'
'कावळाला कोणी दिले पंख, हं ?'
'कावळ्याला बाप्पाने दिले पंख'
'बाप्पा मला पंख दे पीज' आणि मग माझ्याकडे वळून 'आई देतो आहे बाप्पा हळूहळू'


०२ नोहेंबर २०१४
----------------
आई, माझे तोंड 'खबार' झाले आहे, म्हणून मी ज्यूस पिली.
[अर्थ : मी ज्यूस प्यायले म्हणून माझे तोंड खराब (चिकट) झाले आहे]


२९ ऑगस्ट २०१४
-----------------
आई: रेवा, बाबाच नाव काय आहे ?
रेवा: गोईंता ....


०६ ऑगस्ट २०१४
-----------------
मी - (स्वयंपाकघरातुन बाहेर जाता जाता)
रेवा चल आता बाहेर, आईच काम झालं.
रेवा - आई तु जा.
मी - अग चल, इथे काय बसतेस ?
रेवा - रेवा येत नाही, तु जा आई.
मी - तु एकटी काय करणार आहेस इथे बसुन ?
रेवा - उद्याेग.
feeling amused.
२४ जुलै २०१४ 
--------------
रेवा : आई, चामण्णा हलवल.
मी: काsssय ?
रेवा: चामण्णा हलवल.
मी: काय हरवल ?
रेवा: [आकाशाकडे बोट दाखवुन] बघ तेथे आलाच नाही चामण्णा.
 ०१ मे २०१४
------------
एक मित्र आला होता घरी. त्याने त्याचा ipad तिथेच सोफ्यावर ठेवला होता. थोड्यावेळाने बाबाच्या शेजारी बसायचे म्हणून रेवा तिथे जाऊन बसली.
बाबा मित्राला म्हणाला 'तिचे अजून लक्ष गेलेले दिसत नाही'
त्याच्या ipad चे कव्हर आमच्या ipad पेक्षा वेगळे होते, त्यामुळे मित्र बाबाला म्हणाला 'अरे नाही, तिला ते काय आहे हेच कळाले नाहीये'
रेवाने मित्राकडे वळून बघितले आणि म्हणाली 'आयप्या'
feeling proud.
१८ एप्रिल २०१४ 
---------------

१८ महिन्यांची रेवा आणि परवा परवाच २० महिन्यांची झालेली रेवा, किती वेगळी आहे !! सवयी, वागणं, बोलणं, दोन महिन्यांत इतका फरक पडला आहे की आम्ही आपलं दिवसभर आश्चर्यचकित होत रहातो.
या अगदी आजच्याच काही गमती-जमती.
सकाळपासून आम्ही दोघीच घरी होतो. तिला खाऊ घातले आणि मी माझी ताटली आणायला आत गेले. बाहेर आले, तर ही खिडकीकडे तोंड करून जोरजोरात 'रेवा', 'रेवा' अश्या हाकां मारत होती.
मी तिला विचारले, 'काय झाले छकुली ?', तर म्हणाली 'आई, डकी रेवा रेवा'
खाली बदकं ओरडण्याचा आवाज येत होता. माझी हसून हसून पुरेवाट .......
मागे कधीतरी अशीच बदकं खाली ओरडत होती आणि ही काहीतरी हट्ट करत होती. तेंव्हा तिची समजूत घालताना मी म्हणाले होते, 'बघ खाली ते बदक तुला 'रेवा, रेवा' हाक मारते आहे. चल आपण जाऊ त्याच्याशी खेळायला.'
म्हणून आज ती मला सांगत होती 'डकी रेवा, रेवा अशी हाक मारतो आहे'. कारण तिला सकाळी उठल्यापासूनच 'भुरी' जायचे होते
*
चांगले उन पडले होते म्हणून आम्ही दोघी खाली फिरायला गेलो. चालता चालता रेवा एकदम म्हणाली, 'आई, फुन,फुन'. मी खिशातून काढून फोन तिच्या हातात दिला, तर पळत पळत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली, २ पायांवर खाली बसली. पाठमोरी असल्याने नक्की काय केले ते मला दिसले नाही. थोड्यावेळाने उठली, २-३ पावलं चालली आणि परत बसली. आता मी थोडे जवळ जाऊन बघितले तर ती फोन हातात पकडून, ग्रीडच्या पलीकडे जी नुकतीच उमललेली फुलं होती त्याचे फोटो काढत होती. झूम केल्यासारख करून, डावी-उजवीकडे फोन हलवून अँगल-बिंगल बघून फोटोग्राफी चालू होती.
*
दुपारी तिचे जेवण झाले. थोडे अन्न खाली सांडले होते, ते मी खाली बसून पुसत होते. हिला सगळ्या वस्तू ताबडतोब जागेवर ठेवायच्या असतात. म्हणून ती घाइघाइने तिची खुर्ची ढकलत घेऊन जात होती तर खुर्चीचा पाय माझ्या हाताला थोडासा घासला गेला. त्याक्षणी ती म्हणाली 'ओह, शोली' ..... आणि खुर्ची थोडी बाजूला घेऊन ढकलत निघून गेली.
इतकं गोड वाटलं ते 'ओह, सॉरी '


०४ एप्रिल २०१३
---------------
रेवा उभी राहिली, मिच एकटिने पाहिली .....

Thursday 6 November 2014

बाल निसर्ग.

तिला घरात बसायचेच नव्हते म्हणून खरतरं आम्ही दोघी बाहेर पडलो. घरापासून ८-१० पावलांवर असलेला रस्ता ओलांडून पलीकडे गेलो. हा तसा बऱ्यापैकी हमरस्ता म्हणावा असा रस्ता, पण वाहनांची ये-जा अगदीच तुरळक असते. त्यामुळे ठकूबाई अगदी रमत-गमत चालल्या होत्या. पुढे थोडा उतार लागला. त्यावर नेटके दिसतील असे छोटे-छोटे दगड रचून पादचाऱ्यांची चांगली काळजी घेतली होती. एका-एका दगडावर एक-एक पाय ठेवत चालायला तिलाच काय मलाही मजा येत होती.

थोडे अजून पुढे जाऊन, रेल्वेलाईन खालून जाणार बोगदा पार केल्यावर मस्त दाट झाडी दिसायला लागली. त्यादिशेने अजून थोडं पुढे गेलो तर लहान मुलांचे आवाज येत होते म्हणून तसेच चालत राहिलो. जवळच शाळकरी मुलांना खेळता येईल असे पटांगण लागले आणि पलीकडे शांतपणे पसरलेले स्वच्छ-सुंदर-नितळ पाणीच पाणी.

डाव्या बाजूला मैदानी खेळ खेळण्यासाठी बरीच मोठी हिरवळ. त्याच्या दोन्ही टोकांना विस्तीर्ण वृक्ष. उजव्या बाजूला बसण्यापुरती थोडीशी हिरवळ, बॉल खेळण्यासाठी बांधलेली जाळी, लहान मुलांसाठी झोके,घसरगुंडी असे प्रकार, डबे खाण्यासाठी वेलींच्या मांडवाखाली लावलेले लाकडी टेबलं आणि लाकडीच बाक, पिण्याच्या पाण्याचा नळ असा सगळा थाट होता. २ वेगवेगळ्या शाळांचे २ वर्ग तिथे खेळायला आलेले दिसत होते. त्यामुळे परिसर अगदी गजबजला होता.

इतकी मुलं बघुनच ती हरखुन गेली होती. थोडावेळ झोका खेळली मग घसरगुंडी खेळायचा प्रयत्न केला, चढणे काही तिला जमेना कारण इथे वर चढायला नेहमीची शिडी नव्हती तर, सर्कशीत असते तशी लाकूड आणि दोरखंडाची शिडी होती. जी एका लाकडी मचाणावर घेऊन जात होती आणि त्याला घसरगुंडी जोडलेली.
पानगळीचे दिवस असल्याने झाडांच्या बुंध्याशी वाळलेल्या पानांचा खच पडला होता. हे दृश्य तिला नवीनच होते. त्यांची 'कुरकुर' तिला जाम आवडली. जोरजोरात पाय आपटत झाडाभोवती "गोल-गोल राणी" करून झाले. तळ्याकाठी जाऊन बदकं,हंस आणि इतर पक्षांचे निरीक्षण करून झाले. मुले बदकांना खायाला देत होती. प्रत्येक तुकडा आपल्याच चोचीत जावा यासाठी चाललेली बदकांची लगबग बघून एकदम खुश झाली. पायातले बूट भिरकावून हिरवळीवर उगीचच इकडून तिकडे आणि तिकडून इकडे धावून झाले. एकीकडे छोटी-छोटी रान फुल गोळाकरून आईच्या ओंजळीत साठवणे चालू होते. मुलांच्या खेळण्याच्या जागेत चिखल होऊनये म्हणून वाळू आणि पायवाटेवर बारीक खडी अंथरली होती. शाळेतली मुले त्यातले मोठे मोठे खडे तळ्याच्या पाण्यात टाकत होती. तिला पण मोह झाला, परवानगी साठी पटकन माझ्याकडे वळून बघितले. याआधी तिने फक्त 'नाहीच' ऐकले होते त्यामुळे पहिला खडा पाण्यात पडल्यावर आलेला 'डुबुक' आवाज ऐकून ती टाळ्या वाजवून हसायला लागली आणि मला म्हणाली 'आई, तू पण टाक'  :)

तिथेच पुढे बोटीचा धक्का होता, आणि त्याच्या पलीकडे थोडे आत शिरु पाहणाऱ्या पाण्यावर बांधलेला लाडकी पूल. त्यांची वेळ संपली म्हणून मुले परत जायला निघाली. पुलावरून जाता जाता अचानक चार-दोन मुले लाकडी पुलाच्या कठड्यावर चढून खाली पाण्यात उतरली आणि पाणी खेळू लागली. पाणी खूप खोल नव्हते आणि तळाशी बरेच दगड-गोटे पण होते. मुलांनी खेळले तरी चालेल असे स्वच्छ तर होतेच. त्यामुळे आमच्या ठकूबाई पण लगोलग सोयीचा मार्ग बघून पाण्यात उतरल्याच .....

आता मात्र खूप थकली. चिखल, माती, वाळू, पाणी, पाला-पाचोळा, पक्षी, झाड, फुलं सगळ अगदी अंगभर माखून घेऊन माझ्या बाजूला येऊन शांत बसली, दगडी कठड्यावर. बरोबर आणलेला खाऊ खाल्ला, नळाच पाणी प्यायली आणि अगदी तृप्त मनाने म्हणाली 'चल, घरी जाऊ'.

माझ्या बालवयातला एखादा सुट्टीचा दिवस घेऊन जर त्याचे वर्णन लिहिले तर इतकाच भरभरून, अगदी याच्याशी मिळता जुळताच निसर्ग त्यातही नक्कीच भेटेल. पण आमच्या दोघीत जवळ-जवळ चार पिढ्यांचे अंतर असताना तिच्या बालपणी तिला पण तो तसाच मनसोक्त उपभोगायला मिळेल अशी आशाच नव्हती

...... पुढील आयुष्यात 'तुमच्या पुढे काय वाढून ठेवले आहे' हे सांगता येत नाही असे सगळेच सांगतात. इथे येताना खरच कल्पनाही केली नव्हती असा देखण्या संपन्न निसर्गाचा पसाराच पसारा तिच्या बालपणाच्या अंगणात वाढून ठेवला असेल. :)

- Arati Awati.

Wednesday 9 April 2014

मधुमालती

आज सकाळी रस्त्याने चालता चालता घरी फोन केला तर बाबा म्हणाले, 'अरे तुझ्या मधुमालतीला खूप फुलं आली आहेत, भलती सुंदर दिसते आहे. पुरा बोगनवेल झाकून टाकला तिने. रस्त्याच्या बाजूने आणि आतून शेकडो फुलं फुलली आहेत' ...... सगळं चित्र जसंच्या तसं माझ्या डोळ्यासमोर उभं राहीलं.

माझे अत्यंत आवडते फुल - अत्यंत आवडती वेल "मधुमालती". आमच्या घराभोवतीच्या बागेत भरपूर फुलझाडे होती. पण मला मधुमालती त्यात हवीच होती. माझ्या आठवणी प्रमाणे रोपवाटिकेतून फुलझाडांची रोपं आणायची पद्धत तेंव्हा नव्हती. एकमेकांच्या बागेतूनच मागून आणली जायची. जवळपास कुणाच्या बागेत मधुमालती दिसते का, याच्या मी शोधातच होते. ज्या एक जणांच्या कमानीवर मला ती पहुडलेली दिसत होती, त्यांच्या कडून तिचे 'बाळ'रोप मिळण्याची शक्यता अगदीच नगण्य होती.

एकदा पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांनी सगळ्याच झाडांची छाटणी केली. मी चक्क त्यांनी रस्त्यावर टाकून दिलेल्या ढिगातून जाडसर आणि लांबलचक अशी एक फांदी उचलून आणली. एक खड्डा खणून, त्या फांदीची चुंबळ बांधून तिचे एक छोटेसे टोक बाहेर ठेऊन बाकी व्यवस्थित खड्ड्यात पुरली. आजूबाजूला ओल राहील असे पाणी घातले. आता कोंब फुटायची वाट बघायची !! योगायोगाने थोड्यावेळाने पाऊस पण पडला. मी नवीन रोपं लावली कि त्यादिवशी पाउस पडतो, आणि जर त्याच दिवशी पाउस पडला तर माझ्या रोपांना मस्त पालवी फुटतेच, अशी माझी एक श्रद्धा होती.

पाउस काय पडला, मला तर मधुमालतीचा वेल झरझर गच्चीपर्यंत गेलेला दिसायलाही लागला. पण तसे काहीच झाले नाही. ते रोप उतरलेच नाही. नंतर बऱ्याच दिवसांनी आई बरोबर लांबच्या ओळखीच्या एक जणांकडे गेले होते. आईच्या त्यांच्याशी गप्पा चालल्या होत्या त्यावेळात मी त्यांच्या बागेत फेरफटका मारत होते तर 'मधुमालती' भेटली. निघताना काकुंना म्हटले 'मला मधुमालतीची एक फांदी हवी आहे'. 'फांदी कशाला, बरीच रोपं उतरली आहेत कि, रोपच घेऊन जा' काकू म्हणाल्या. अजूनच आनंद. पण हे पण रोप नाहीच टिकले.
त्यानंतर अनेक वर्षांनी पुण्याला एका नातेवाइकांकडे गेले होते. त्यांनी नुकताच कुणाचा बंगला रहाण्यासाठी घेतला होता. खूप सुंदर बाग होती त्यांची. संध्याकाळची वेळी होती ती. घरात गेल्याबरोबर मी त्यांना विचारले, 'बाहेर खूप मस्त वास येतो आहे, कशाचा आहे तो ? तुमच्याकडे मधुमालती आहे का ?'. असे बोलत बोलतच मी बाहेर येऊन थोडे इकडे तिकडे बघितले तर मधुमालती दिसलीच. परत एकदा रोपाची मागणी आणि मग त्याचा पुणे-श्रीरामपुर प्रवास. पण यंदा नशीब एकदम जोरदार होते. रोप टिकले, फुटले, फुलले, बहरले आणि मग फोफावले सुद्धा .....

'मधुमालती' हे नावच किती वेगळे आणि सुंदर आहे. या वेलीचे तेलगु नाव तर अजूनच सुंदर आहे 'राधा मनोहरम'. या फुलांना मंद असा एक खास वास असतो. पांढरी, अगदी फिकी गुलाबी आणि थोडी गडद अशी तीन रंगात हि फुलं फुलतात. एकाच वेलीवर एकाच गुच्छात हे तीन रंग असतात. एकदा रोप चांगले लागले कि पुन्हा त्याला काहीही मशागत लागत नाही. विनातक्रार, केवळ पावसाच्या पाण्यावर भरभरून फुलं आणि भारून टाकणारा सुगंध हि वेल देत रहाते. या दिवसांमध्ये, म्हणजे वसंताच्या सुरुवातीला 'मधुमालती' फुलते / बहरते. पुरेश्या मोठ्या झालेल्या वेलीवर अक्षरशः शेकडो फुले फुललेली दिसतात. थोडेसे वेगळेपण म्हणजे रातराणी सारखीच हि फुले संध्याकाळी उमलतात. त्यामुळेच जिथे कुठे मधुमालतीची वेल असते तिथे आजूबाजूला संध्याकाळच्या वेळी एक मंद सुवास दरवळत रहातो. हा वास इतका हलका असतो कि मनभरून घेण्यासाठी आपोआपच खोल / दीर्घ श्वास घेतला जातो. वेगळ्या मेडिटेशनची गरजच काय .....

अक्षरशः जिवापेक्षा जास्त सांभाळून मी ते रोप 'एसटी' बसने पुण्याहून श्रीरामपुरला घेऊन आले. आमच्या घराला समोर एक व्हरांडा आहे. त्याला २ जाळीच्या खिडक्या. एका खिडकी खाली मी ते रोप लावले. वेलाच्या एका टोकाला सुतळी बांधून, ती खिडकीला टांगून ठेवली. जसा जसा वेल मोठा होत गेला, त्याला मी व्हरांड्याच्या छतावर चढवले आणि पलीकडच्या बाजूने खाली आणले. अगदी मला हवे होते तसाच हा वेल वाढत होता. आता संध्याकाळच्या वेळी आमच्या घराच्या पुढच्या अंगणात तर येत असेच पण सगळ्या खोल्यांमध्ये खिडकीजवळ उभे राहिले कि मधुमालतीचा मंद असा सुगंध येत असे. संध्याकाळ झाली कि माझे सुरु होई, 'बघ किती मस्त वास येतो आहे'. मग कोणीतरी म्हणावे, 'हो हो येतो आहे बरं, सगळ्यांनी म्हणा रे मस्त वास येतो आहे' :)  .....

मधुमालतीची नियमित छाटणी करावीच लागते. कारण ती फारच झपाट्याने वाढते, फांद्या लांबच लांब पसरत जातात. मधुमालतीची फळे जमिनीत रुजून नवी नवी रोपं उतरत रहातातच, शिवाय जमिनीत खोल गेलेल्या मुळाना कोंब फुटून, त्यातूनही नवी रोपे जमिनिबाहेर डोकवायला लागतात. तर असा बराच पसारा वाढल्याने, खिडक्यांवर अंधार यायला लागला आणि माझ्या मधुमालतीच्या खोडावर कुऱ्हाडीचा घाव बसला. फक्त त्याआधी योग्य जागी, पुरेसे वाढलेले दुसरे एक रोप हेरून ठेवले होते. आमच्या वडिलांच्या देखरेखीखाली ते वाढले, बहरले, फुलले इ.इ. त्याचा-माझा सहवास असा काहीच नाही. पण आमच्या अंगणात फुललेली प्रत्येक मधुमालती हि अजूनही माझीच आहे :)