बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Monday, 18 July 2016

"कट्यार" च्या निमित्ताने ....

काल झुरिकला 'कट्यार काळजात घुसली' या मराठी चित्रपटाचा शो झाला. आणि त्या निमित्ताने 'कट्यार' स्वित्झर्लंड मधील पहिल्या मोठ्या पडद्यावरच्या मराठी चित्रपटाचा मान मिळवून बसला. अर्थात त्याने काही 'इतिहासात' त्याचे किंवा कुणाचे नाव लिहिले जाणार नाहीये. पण मला सांगायचे आहे ते हे की "इस सबके पीछे मेरा हाथ था" =D

हे काम करताना किंवा आज तुमच्याशी शेअर करताना मला मजा येते आहे कारण मी हे सगळे पहिल्यांदाच करत होते. तसे माझ्यासाठी देश आणि शहर पण नवीन होते आणि हे क्षेत्र पण नवीन. अमेरिकेत शो होत आहेत म्हंटल्यावर 'देसाईना' हक मारली. त्यांनी 'महेश काळे'चे नाव सुचवले. त्याला फेसबुकवर शोधले आणि निरोप ठेवला. 'झुकरबर्ग' काकांचे म्हणणे होते "He typically replies in few hours" आणि खरच त्याचे काही तासात उत्तर आले. तो डिसेंबरमध्ये किती व्यस्त होता हे ज्यांना माहिती आहे त्यांनाच कळेल मला त्याचा reply बघून इतके आश्चर्य का वाटले. त्याने 'स्नेहा'शी (Esselvission) बोलायला सांगितले. तिचे आमचे व्यवहाराचे गणित काही जमेना. मग पूर्वा मदतीला आली. खरंतर तिचे क्षेत्र US-Canada पुरते होते. पण तिने मला आवश्यक ती सगळी मदत केली आणि शेवटच्या दिवसा पर्यंत छोट्या-छोट्या उपयुक्त सूचना देऊन एकूणच माझा उत्साह वाढवला. Producer / Distributor शी संपर्क साधून, प्रताधिकार मिळवून  ते DCP हातात पडेपर्यंतची सगळी प्रोसिजर मला पूर्वाने समजावली. तर पुढचा पार्ट म्हणजे theater booking, key to run, trial run आणि actual screening हे सगळे coordination मी ज्या व्यक्तीकडून शिकले ती तर मला संपूर्णपणे अनोळखी होती. पण न मागता मदत करणारे काही लोक आपल्याला आयुष्यात कधी कधी भेटतात. हा त्यातलाच एक. मी 'मदत करा' असे म्हणायच्या आधीच 'हा' मदत पुढे करून तयार असायचा. 

या सगळ्यांचेच खूप खूप आभार. या सगळ्या प्रकारात एक संपूर्णपणे वेगळाच अनुभव माझ्या गाठीशी बांधला गेला आणि बरेच काही नवीन शिकवून गेला. 

त्याहूनही महत्वाचे पुढेच आहे :)

पूर्वाने अमेरिकेत असंख्य शो केले. आम्हाला तसा उशीरच झाला होता. मी तिच्याशी बोलत होते त्या काळात तर ती तिकडची आवाराआवर पण करायला लागली होती. एकदा असाच काही कारणाने आमचा फोन झाला आणि त्या संभाषणाअंती ती मला म्हणाली "आरती, you are so very organized person. मी इतक्या लोकांशी डील केलं गेल्या काही दिवसात. पण तुझ्याबरोबर काम करायला मजा आली." 

मला पण ऐकायला खूपच मजा आली.



Thursday, 14 July 2016

'सखी'


१९९५ ते २०१५, मोजलं म्हणून लक्षात आल की पूर्ण २० वर्ष झाली आहेत आमची ओळख आणि त्याच्या अगदी पाठोपाठ मैत्री होऊन. मी काम करत असलेल्या विभागात सगळे 'बाप्ये' होते आणि अचानक एक दिवस ही आली. माझ्या त्यावेळच्या स्वभावाला अनुसरून तिच्याकडे बघून मी जरासं हसले आणि माझ्या जागेवर जाऊन बसले. ती मात्र तोंडभरून हसली आणि लगेचच उठून मी बसले होते तिथे आली. त्या सगळ्या बाप्यांमध्ये कंटाळलेल्या मला मैत्रिण मिळाली म्हणून मी कितीही खुश झाले असले तरी असं ताबडतोब जाऊन गप्पा मारण मला जमणारं नव्हत.

सकाळी आल्यावर ती रोजच माझ्याशी २-४ वाक्य बोलायची आणि जेवताना ग्रुपमध्ये थोड्या गप्पा व्हायच्या. मग झालं अस की आमचे दोघींचे साहेब एकच असल्याने अचानकच आम्हाला एकत्रितपणे एका प्रोजेक्टची जबाबदारी देण्यात आली. दोघींचे कामाचे स्वरूप पूर्ण वेगळे होते, पण संपूर्णपणे एकमेकांवर अवलंबून होते. ती मोठ्याने हसायची, मोठ्याने बोलायची. मला हळूच हसा-बोलायची सवय होती. मला वैयक्तिक काहीच बोलायचं नसायचं आणि ती एकदम मोकळ्या गप्पा मारायची. असे आमचे बरेच विरुद्ध स्वभाव असले तरी मला काय म्हणायचंय ते तीला आणि तिला काय म्हणायचंय ते मला, नीटच कळत होत. त्यामुळे अगदी नवख्या असूनही आमच ते प्रोजेक्ट एकदम टकाटक झाल. आणि त्याच दरम्यान कधीतरी आमची घट्ट मैत्री पण झाली.

गप्पा मारायला मिळाव्या म्हणून आम्ही पौडफाट्याहून चालत निघायचो ते थेट कोर्पोरेशन पर्यंत. तिथे ती सांगवीच्या बसमध्ये बसायची आणि मी पौडरोडची बस घेऊन परत उलट यायचे. इतकावेळ गप्पा मारून पुन्हा बसस्टॉपवर थांबून पण गप्पा असायच्याच. कधीतरी निघाल्या निघाल्या 'सुरभी' मध्ये पावभाजी खायचो पण जास्तवेळा थेट गंधर्वला पोहोचून 'वडा-सांबार आणि चहा' घ्यायचा, असे आम्ही जवळ जवळ रोज करायचो. विरुद्ध स्वभावाच्या आमच्या दोघींच्या आवडी-निवडी मात्र बऱ्याच एकसारख्या होत्या त्यामुळे गप्पांना अंत नसायचा.

मग मी ती नोकरी सोडली आणि पुण सोडलं. नंतर तिचं लग्न झालं आणि पुण सुटलं. क्वचित होणाऱ्या भेटीगाठी बंदच पडल्या. त्यावेळी आमच्या आयुष्यात मोबाईल फोन आणि इंटरनेट दोन्ही आलेले नव्हते. त्यामुळे भेटीबरोबर गप्पाही थांबल्या.

नंतर ती आणि मी, दोघीही, परत पुण्यात आलो आणि क्वचित कधीतरी भेटू पण लागलो. पण आयुष्य इतकी बदलली होती आणि व्यस्त झाली होती की बोलायला सुरुवात करेकरेपर्यत निघायची वेळ होत असे. माझ्यापेक्षाही तीचा वेळेचा प्रश्न जास्त होता. लहान मुल, नोकरीत वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि घरच्या जबाबदाऱ्या. आणि मग पुन्हा एकदा मी पुण सोडलं :)

आत्ता आज हे सगळ आठवायचं कारण म्हणजे, ३ आठवड्यांपूर्वी ऑफिसच्या कामाने ती माझ्या 'टाईम झोन' मध्ये आली होती. तीन आठवडे प्रत्येक दिवशी कधी संध्याकाळी कधी रात्री आणि सुट्टीच्या दिवशी दुपारी सुद्धा जेंव्हा जेंव्हा जमेल तेंव्हा तेंव्हा आम्ही एकमेकीना फोन केले आणि चिक्कार गप्पा मारल्या. ती एकटीच होती त्यामुळे ऑफिसमधून आली की तशी मोकळी असायची. मी रोजची जरुरी काम संपवून तयारच असायचे. पहिले २-३ दिवस तर अगदी मेडीटेशनला बसल्या बसल्या जशी विचारांची गर्दी होते तशी विषयांची गर्दी झाली. मग हळू हळू एक एक विषय हातावेगळे होत गेले. बरीच देवाण-घेवाण झाली. तास-दीड तास बोलून मग 'जाउदेना आपल्याला काय करायचंय' असा तो एक 'खास' फोन पण झाला. एकूण मनसोक्त गप्पा झाल्या. खळखळून हसून झालं.

'त' म्हंटल्यावर 'ताकभात' की 'तूपभात' हे अचूक ओळखणारी आणि बोलणाऱ्याच्या बोलण्यामागाची प्रामाणिक भावना जाणणारी व्यक्ती समोर असेल तर गप्पांना जी मजा येते ती काही वेगळीच असते.
'आता आपण आठवड्यातून एकदातरी बोलतच जाऊ' असा तो नेहमीचा निरोप घेऊन ती काल परत पुण्याला गेली. मला पक्की खात्री आहे आता किमान काही महिने तरी आम्ही एकमेकींना फोन नक्कीच करणार नाही पण जेंव्हा करू तेंव्हा अगदी सहजच  दोघी मिळून मागच्या पानावरून पुढच्यावर डोकावू .......

Wednesday, 13 July 2016

काव्यदिंडीच्या निमित्ताने .....


खरतरं गेली काही वर्ष कवितांच वाचन खूपच कमी झाल आहे. कारण जुनी पुस्तकं जवळ नाहीत आणि नवी घेतली गेली नाहीत. पण या काव्यदिंडीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसात कितीतरी नव्या, विस्मृतीत गेलेल्या, बऱ्याच कविता वाचनात आल्या. पण आता चार निवडायची वेळ आली तेंव्हा मात्र पुन्हा काहीच आठवेना. 

.नवीनच पुण्यात आले होते. 'डीएसके गप्पा' नावाच्या कार्यक्रमात ना.धो.महानोर काव्यवाचन करणार होते. त्या आधी मी महानोरांच्या बऱ्याच कविता वाचल्या होत्या, त्यांनी लिहिलेली गाणी ऐकली होती. पण दोन अडीच तासांच्या त्या कार्यक्रमात महानोरांची कविता एका वेगळ्याच रुपात समोर आली. महानोरांची कविता समजत नाही असे सहसा होत नाही. पण खरी भिडली ती त्यादिवशी. सहज - साधी - ओघवती शैली. कुठलाही अभिनिवेश नाही की 'स्टाईल' चा खटाटोप नाही. कविता, तिची निर्मिती प्रक्रिया, तिच्या जन्माची कहाणी आणि बरेच काही. कवितेतून श्रोत्यांशी साधलेला संवादच होता तो. त्या दिवसापासून महानोरांची कविता वाचतानाची मानसिकताच एकदम बदलली. 

.महानोरांची बरीच गाणी आणि कविता आवडत्या आहेत परंतु ही कविता आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारी आहे, म्हणून तिची निवड.

.पीक करपलं पक्षी दूरदेशी गेलं
गळणार्‍या झाडांसाठी मन ओथंबलं
वेढून नेणारी रित्या नभी वाहाटूळ
आसमंत वेटाळून काळजाची कळ
दु:ख पेलण्या एवढं बळ नाही डोलां
कडू काल्यावण्यांनी भारावला गला
कोवल्या गर्बाला जल्माआधी वनवास
वो मालवला दिसं, मालवला दिसं

- ना.धों. महानोर.

-------------------

मी बरीच वर्ष ठराविक कवींच्याच कविता वाचायचे. त्यामुळे बोरकर,मर्ढेकर,पद्मा गोळे यांच्या कविता मी कधी वाचल्याच नव्हत्या. पुण्यात यशवंतरावला बघितलेल्या सुनीताबाई देशपांडेंच्या 'एक कवितांजली' या कार्यक्रमात पहिल्यांदा माझी या कवींतांशी ओळख झाली. आणि मग सुनीताबाईंनी त्या कार्यक्रमात वाचलेल्या, नुसताच ओझरता उल्लेख केलेल्या आणि इतरही अजुन बऱ्याच कविता शोधून शोधून वाचल्या, वाचत राहिले. या सगळ्याजणींमध्ये लक्षात राहिली ती पद्मा गोळे यांची 'चाफ्याच्या झाडा'.

त्याचं कारणही तसंच आहे. काही कामासाठी मी सुनीताबाईंच्या घरी गेले होते. दोन मिनिटांचे काम होते पण दोन तासाहून अधिकवेळ मी तिथे होते. अर्थातच त्या बोलत होत्या आणि मी ऐकत होते. विषयातून विषय निघत, या कार्यक्रमाचा विषय निघाला आणि त्यांनी मला पद्मा गोळे यांची, त्यांना विशेष आवडणारी म्हणून ही कविता म्हणून दाखवली..
पुलंना जाऊन बरीच वर्ष झाली होती. त्याही बऱ्याच थकलेल्या दिसत होत्या. सगळीकडे एकटेपण भरून राहिलेलं ते घर तर अगदी सूनं सूनं वाटत होत. तिन्हीसांजेची वेळ होती आणि मी कविता ऐकत होते ............

चाफ्याच्या झाडा..
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु: ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा 
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा ….

नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू 
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात 
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर 
बसूनआभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा ….
पानात, मनात खुपतंय ना 
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय …. कळतंय ना ….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना.

– पद्मा गोळे..
---------------------------

सकाळ पेपरमध्ये एक सदर येत होते. नाव अजिबातच आठवत नाहीये. पण त्याअंतर्गत 'नवंकवी' म्हणून कवी सौमित्र यांची थोडक्यात ओळख आणि काही निवडक कविता छापून आल्या होत्या. थोड्या वेगळ्याच वळणाच्या त्या कविता खूपच आवडल्या.

अर्थातच माझी आजची कविता 'माझिया मना' सगळ्यात जास्त आवडली. तेंव्हाच कधीतरी त्यांचा
काव्यसंग्रह 'आणि तरीही मी' येत असल्याचे वाचले. तो मात्र सांगितल्या तारखेच्या खूपच उशिरा आल्याने
मधल्या काळात मी अनेकवेळा अप्पा बळवंत चौकात त्याच्या चौकशी करता चक्कर टाकून येत असे. अखेर तो आला.पण आधीच्या चार कविता वाचून वाढलेल्या अपेक्षा काही त्याने पूर्ण केल्या नाहीत. खूप उस्तुकतेने वाट बघितल्यामुळे असेल, माझी खूपच निराशा झाली आणि नंतर मी या कवीचे फारसे काहीच वाचले नाही. परंतु ही कविता मात्र कायमच आवडत्या कवितांच्या यादीत राहिली.'ऋतू हिरवा' ऐकल्या नंतर तर थोडी अधिकच भावली.
.
माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
माझिया मना, जरा बोल ना
एकटी न मी सोबतीस तू
माझिया मना, जरा ऐक ना
रात्र ही सुनी, तुझे बोलणे
तुझे धावणे अन मला वेदना
ओळखू कसे मी, हे तुझे ऋतू
ओळखू कशा मी तुझ्या भावना
सांजवेळ ही, तुझे चालणे
उषःकाल आहे नवी कल्पना

- सौमित्र (Kishor Kadam)
--------------------------------
NRI मायबोलीकर (www.maayboli.com) आले की त्यांना भेटायला पुण्यातले मायबोलीकर एकत्र जमायचे. अश्याच एका प्रसंगी माझ्यापासून ३ खुर्च्या लांब बसलेल्या वैभवने हात लांबवून त्याचा फोन मला दिला आणि 'हे ऐक' असे सांगितले. तोपर्यंत वैभवने मायबोलीवर टाकलेल्या सर्व कविता वाचत होते आणि त्या आवडतही होत्या. पण त्याची कविता त्याच्याच आवाजात त्यादिवशी मी पहिल्यांदाच ऐकत होते. आणि हा काही वेगळाच अनुभव होता. मला खात्री आहे अनेकवेळा त्याचे कार्यक्रम बघितलेले अनेकजण अगदी एकमताने हेच म्हणतील. :)

"वैभवच्या कविता" याबद्दल मी काही लिहिण्याची खरतरं आवश्यकताच नाही. कारण माझ्या मित्र यादीतल्या सर्व काविताप्रेमिनी त्या अनुभवलेल्या आहेत. इतकंच म्हणेन वैभवच्या कविता नेहमीच अगदी ताज्या आणि टवटवीत असतात.

असंख्य आवडत्या कवितांमधून एक निवडणे अवघडच होते पण ही अनेकवेळा त्याच्याकडून ऐकूनही पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी म्हणून हिची निवड .... 

'नेमस्त'
धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हाच्या ओळी
तो शहारला नेमाने ही कविता सुचतेवेळी
नित्यागत उमलत गेली हळुवार कल्पना त्याची
सवयीचा सुगंध आला होताच फुले शब्दांची
नेमस्त हरखला तोही द्यावया ना उरले काही
नेमस्त चरकला फिरुनी ... "ही शेवटची तर नाही?"
रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते...

- वैभव जोशी.

उर्सली

"उर्सली" ही एका छोट्या मुलाची एक छोटीशी गोष्ट आहे. मूळ जर्मन कथेच इंग्रजी रुपांतर रेवाकडे आहे. आणि सध्याच्या रोज वाचण्याच्या पुस्तकांपैकी ते एक आहे. कधी आम्ही पुस्तक हातात घेऊन वाचतो तर कधी गोष्ट म्हणून पुस्तक न घेताच तिला ऐकायची असते. अगदी सगळ्या बारकाव्यांसहित.
.
उन्हाळ्यात आपल्या सगळ्या जनावरांसाहित डोंगरावर राहायला जाणाऱ्या आणि हिवाळ्यात डोंगर पायथ्याशी आसऱ्याला येणाऱ्या एका कष्टकरी कुटुंबातला उर्सली हा एकुलता एक आणि समंजस मुलगा. गावातल्या एका उत्सवासाठी लहान मुलामध्ये वाटल्या जाणाऱ्या घंटापैकी सगळ्यात छोटी त्याच्या वाट्याला येते. आणि ती पण मोठ्या मुलांच्या दादागिरीमुळे. अपमानित झालेला उर्सली भर हिवाळ्यात, हिमवर्षाव - निसरडी वाट - थंडी यापैकी कशालाही न जुमानता डोंगरावरच्या घरातून मोठी घंटा आणतो आणि सगळ्यात मोठ्या घंटेचा मान मिळवून त्या उत्सवाच्या मिरवणुकीत पुढचे स्थानही मिळवतो. अशी काहीशी ती गोष्ट आहे.
.
परवा अचानकच इथे झुरिकमध्ये "Schellen-Ursli" नावाचा चित्रपट लागल्याचे वाचण्यात आहे. रेवाने अजून पर्यंत कधीच मोठ्या पडद्यावर चित्रपट बघितला नव्हता. म्हटलं चला तिला घेऊन जाऊ, लाडकी गोष्ट पडद्यावर बघण्याची जरा वेगळी गम्मत. मग शुक्रवारी जाऊन तिच्या वयाला चित्रपटगृहात प्रवेश असल्याची खात्री करून घेऊन तिकीट पण काढून आणले. उद्या सकाळी आपण नक्की काय करणार आहोत याचा तिला काहीच अंदाज नव्हता. 'मुव्ही बघायचा' असे म्हणत होती.
.
आज सकाळी गेलो. आत जाऊन आपापल्या खुर्चीत बसलो आणि जाहिराती सुरु झाल्या. बाईंचा चेहरा कोरा, दोन्ही हातांनी दोन्ही खुर्च्यांना घट्ट पकडलेले आणि एकदम स्तब्धपणे समोरच्या जाहिराती बघत होती. इतकी मोठ्ठी चित्र आणि घुमणारा आवाज दोन्ही अजून मानवत नव्हते. अशीच पाच एक मिनिटं गेल्यावर विचारले 'आई, उर्सली कधी येणार ?'
.
मग चित्रपट सुरु झाला. भरगच्च स्नो असलेल्या छोट्याश्या गावाच्या अनेक गल्ल्या दिसल्या आणि मग एका गल्लीच्या शेवटच्या टोकाला उर्सलीचे घर दिसल्या बरोबर म्हणाली 'आई, बघ उर्सलीच्या घरावर Drawing आहे'. इथून मग सगळे बारकावे तपासण सुरु झालं. आपण जो गोष्टीत ऐकला आहे, पुस्तकात ज्याच फक्त चित्र बघितलं आहे, तो 'उर्सली' असा समोर बघून खुदू खुदू हसू येत होत. तिच्या मनातल्या प्रतिमेशी तो किती मिळता जुळता होता माहिती नाही पण मधेच माझा हात पकडून हसून म्हणाली 'आई, उर्सली'.
गोष्टी इतका चित्रपटात गोडवा नाही. थोडा माल-मसाला आहेच. त्या खटाटोपात कोल्ह्याला उर्सलीचा मित्र दाखवले आहे. "डामरट तो कोल्हा' या तिच्या मनातल्या प्रतिमेला तडा गेल्यामुळे हा बदल तिला अजिबातच आवडला नाही. 'आई कोल्हा त्रास देतो ना सगळ्यांना ?! ' असे विचारण्यात आले. गोष्टीत, एवढा प्रचंड बर्फाच्छादित डोंगर चढून गेल्यामुळे थकलेला उर्सली घरात गाढ झोपलेला असतो. तेंव्हा बाहेर त्याच्या पावलांचे ठसे बघून तिथे जमलेले कोल्हे, हरणांना विचारतात 'हा लहान मुलगा इथे कशासाठी आला आहे ?' मग एक हरीण घरावर चढून तो आत नक्की काय करतो आहे ते बघून येते. हा प्रसंग चित्रपटात नव्हता. त्याची पण तातडीने आठवण करून देण्यात आली.
.
पण एकूण बर्फात खेळणारा उर्सली, बेडूक मुठीत पकडणारा उर्सली, शेळ्यांच्या मागे धावणारा उर्सली, गवतात लोळणारा उर्सली, कोल्हयाला चीज भरवणारा उर्सली, असा सगळ्या रूपातला उर्सली तिला खूपच आवडला. तिचे उस्फूर्त प्रश्न आणि मजेदार टिपण्णया ऐकता ऐकता, तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव निरखता निरखता माझा चित्रपट संपला. तिच्या डोळ्यांसमोर अजूनही चालूच आहे ......

Tuesday, 12 July 2016

आईचे प्रशस्तीपत्रक.

तशी तिला कुणाच्या कुठल्याही शिक्कामोर्तबाची आवश्यकता आणि तीही आत्ता नव्याचे तर अजिबातच नव्हती. पण मलाच असं वाटलं की तिने आयुष्यभर इतकं हरतऱ्हेच विणकाम केल आहे तर गंमत म्हणून तिच्यासाठी एक मागवावंच. 

खरतरं जागतिक विक्रमासाठी हा जो pattern आम्ही सगळ्यांनी विणला हा खूपच सोप्पा आणि अगदीच बेसिक लेव्हलचा होता. यापेक्षा कितीतरी अवघड, सुरेख आणि सुबक नमुने तिने आजपर्यंत केले आहेत. फक्त क्रोशाच नाही तर दोन सुयांचे विणकाम पण तिने चिक्कार केलं आहे. आम्हा भावंडांसाठी केलं, नातेवाईकांसाठी केलं, शेजारी-पाजारी, ओळखीचे-पाळखीचे अश्या असंख्य लोकांना तिने तिच्या हाताने विणून हरतऱ्हेचे प्रकार दिले आहेत. असा एकही प्रकार नाही जो तिने हाताळला नाही. बर फक्त विणून दिले नाही तर बऱ्याच लोकांना अगदी बोटाला धरून शिकवले पण आहे. आणि ती मात्र हे सगळ कुणाच्याही कुठल्याही मदती शिवाय नुसत डोळ्याने नमुना बघून बघून शिकली आहे / शिकते आहे.  

जे विणकामाचे तेच भरतकामाचे आणि शिवणकामाचेही. स्वतःच्या हाताने नक्षी काढुन अत्यंत सुबक पद्धतिने निरनीराळ्या टाक्यांनी ती सजवणे यात तीचा हातखंडा होता. आम्ही बहिणी श्रीरामपूर सोडेपर्यंत तिने शिवलेलेच कपडे घालत असू. कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय तिने शिवलेले सगळे कपडे अगदी व्यावसायिक नमुन्यांच्या तोडीस तोड असायचे. शिवणकाम तर तिने किती लोकांना शिकवले त्याची गणनाच नाही. अनेकजणी तर त्यानंतरही तिच्याकडून कपडा बेतून घ्यायला यायच्या आणि मग घरी जाऊन शिवायच्या. 

अजूनही या वयातही, घरकाम झाले की लगेच तिचे हात भरतकाम-विणकाम-शिवणकामात गुंतलेले असतात. लाडाच्या नातवंडांसाठी नवेनवे प्रकार अजूनही ती त्याच उत्साहाने करत असते.

बाकी पाककला, चित्रकला, हस्तकला असे ज्या कश्याच्या मागे-पुढे 'कला' हा शब्द येतो त्या सगळ्यातही ती पारंगत आहेच. नव्यानव्या गोष्टी माहिती करून घेणे आणि त्या सगळ्याचे नव्याने प्रयोग करून बघणे हे सगळे ती या वयातही करते आहे.

आमच्या "पंचक्रोशीत" तिला तिच्या गुणांसाठी ओळखणारे अनेक आहेत. तिला ओळखणाऱ्या सगळ्यांनीच नेहमीच भरभरून तिची स्तुती केली आहे. तिच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला तिच्या कलागुणांच भरपूर कौतुक आहे. अगदी "भरून पावावं" इतक्या मोठ्या प्रमाणावर हे असं सगळ कौतुक आजपर्यंत तिच्या वाट्याला बरेचदा आलं आहे. 

पण तरीही माझी इच्छा म्हणून तिच्या शिरपेचात हा एक छोटासा तुरा माझ्याकडून ............


Sunday, 13 March 2016

'रानबखर'

[ही बखर आहे, इतिहास नाही. पक्षधराने लिहिलेल्या घडल्या गोष्टीचेच हे कवन आहे. स्वत: रानात असताना आणि रानसख्यांवर लिहिली, म्हणून ही रानबखर.]
----------------------------------------------------------------------------------------------------
जानेवारी २०१४ ला हे पुस्तक प्रकाशित झाले. लगेच वाचायचे ठरवूनही विकत घ्यायलाच मे २०१५ उगवला आणि वाचायला मार्च २०१६. तर ही बखर मुख्यतः लक्षात राहते ती आदिवासींवर झालेल्या अन्यायाची कहाणी म्हणून, पण ती त्यापुरतीच मर्यादित नक्कीच नाहीये. समस्या मांडल्या आहेत पण त्यांची उत्तरं पण सुचवली आहेत. मिलिंद थत्ते स्वतः गेली अनेक वर्षे या लोकांबरोबर वास्तव्य करून आहेत त्यामुळे विचारप्रक्रिये मधुन डोकावणारे आणि जाणिवपूर्वक सुचवलेले सगळेच पर्याय पटण्याजोगे आहेत.
.
पुस्तकाच्या सुरुवातीला आदिवासींच्या आयुष्याची अगदी जवळून ओळख करून दिली आहे. त्यांचे जंगलाशी असलेले नाते, त्यांचे परस्परावलंबित्व, पर्यावरण प्रणालीत असलेले त्यांचे मुख्य स्थान, जंगलाभोवती वसलेलं त्याचं जग आणि त्यांची जीवनपद्धती. हे सांगत असतानाच त्यांची अल्पसंतुष्ट वृत्ती, कधी परिस्थितीशी सहज जमवून घेणारे तर कधी परिस्थितीवर लीलया मात करणारे असे त्यांच्या आयुष्यातले बारकावे दाखवणारे अनेक प्रसंग आले आहेत. संदर्भाने एके ठिकाणी त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रसंगी करण्यात येणाऱ्या नाचांच्या प्रकारांच सवीस्तर वर्णन आलं आहे. अहाहा, अगदी लगेच उठून एखाद्या आदिवासी पाड्यावर चक्कर मारून यावी असं वाटायला लावणारं ते सगळ वर्णन आहे. अशी ही सगळी जीवनपद्धति विस्ताराने सांगीतल्याने पुढे मांडलेल्या समस्यांचं गांभीर्य थेट पोहोचलं आहे.
.
नक्षलवादाचा उगम आणि वाटचाल, आदिवासी लोकांची झालेली परवड आणि उध्वस्त झालेली आयुष्य, सरकार आणि संस्थांनी त्यांच्या तोंडाला पुसलेली पानं आणि केलेली फसवणूक, याची अनेक उदाहरणं पुस्तकात दिलेली आहेत. हे पुस्तक वाचण्याआधी "Reserve Forest" आणि "Buffer Zone" या शब्दांच कोण कौतुक होतं मला. पण हे सगळं वाचताना त्याचा नेमका अर्थ, हेतू आणि परिणाम समजले आणि डोळेच उघडले. ज्यांना वनबंदी करण्यात आली किंवा ज्यांची जमीन गेली, त्यांनी नक्की काय भोगलं ते असं लांबून पुस्तक वाचून समजेलच अस नाही पण या पुस्तकात अशी अनेक उदाहरणं आहेत जी अस्वस्थ, खूप अस्वस्थ करून गेली. त्यातलच हे एक, नन्हेरामच .... पूर्ण अबोल झालेल्या नन्हेरामने एकदाच तोंड उघडलं आणि म्हणाला "साहेब, त्या धरणाच्या पाण्यात मी जेंव्हा होडीतून जात असतो तेंव्हा तिथे पाण्याच्या मध्यावर मी थांबतो. मला दिसतं तिथे - तिथेच शेकडो फूट खाली माझ गाव आहे, घर आहे आणि शेतही आहे. आणि ते सगळ कायमचं हरपलं आहे, या जाणीवेने माझा ऊर फाटतो. ती वेदना मला सहन होत नाही."
.
मुंबईपासून सुरुवात करून सह्याद्री,सातपुड्याची सफर घडवत, बऱ्हाणपूरमार्गे मेळघाटातून छत्तीसगढ गाठून थेट झारखंड पर्यंत फिरवून आणताना वाटेत भेटणारी जंगलं-नद्या आणि त्यांच्या आश्रयाने विसावलेल्या विविध आदिवासी जमातींची माहिती इतकी सहज सोप्प्या भाषेत दिली आहे की डोळ्यापुढे नकाशाच उभा राहतो. 
.
पुस्तकातली भाषा ही 'पुस्तकी' अजिबातच नाही. रोखठोक बोली भाषा आहे. आणि त्यामुळेच अगदी समोर बसून एखाद्या हाडाच्या कार्यकर्त्याने त्याची तळमळ / तळतळ आपल्या समोर मांडवी आणि आपण अस्वस्थपणे ऐकावी, असा काहीसा हा अनुभव आहे. 
.
बाकी सरकारी यंत्रणा आणि संबंधित संस्था यांच्या 'कारभाराची' नुसती वर्णन वाचूनच माझे पाय गळाले. तर त्या सगळ्याचा इतक्या जवळून आणि वारंवार अनुभव घेऊनही खंबीरपणे उभं असलेल्या आणि इतरांना उभं रहाण्यास प्रोत्साहन देणाऱ्या 'वयम्' ( Vayam ) टीमला सलाम. 
.
आवर्जून वाचा.
.
रानबखर - मिलिंद थत्ते. 
समकालीन प्रकाशन.
पृष्ठे - ९५.
किंमत - १०० रुपये.


--------------------------
'वयम्' ही मिलिंद थत्ते यांनी स्थापन केलेली सामाजीक संस्था आहे. त्यांचे सगळे काम या संस्थेमार्फतच चालते. वयम् चे वैशीष्ठ्य म्हणजे त्यंच्याबरोबर काम करणारे बहुसंख्य कर्यकर्ते हे चळवळीतुन तयार केलेले / झालेले 'स्थानिक' कार्यकर्ते आहेत. 
वयमच्या फेसबुक पानाची लिंक :
https://www.facebook.com/VayamIndia/
---------------------------
पुस्तक बुकगंगावर उपलब्ध आहे.
http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=%E0%A4%B0%E0%...


Wednesday, 5 August 2015

ब्लाउसी लेक.

एका गावात एक निळ्या डोळ्यांची सुंदर मुलगी रहात होती. तिचा प्रियकरही त्याच गावात रहात असे. गावाजवळच्या एका छोट्या तळ्यावर ती त्याला भेटायला जायची. सूर्यास्तापासून ते अगदी चंद्राचे प्रतिबिंब त्या नितळ पाण्यात उमटे पर्यंत ती दोघे तिथेच असायची. असेच मजेत दिवस चालले होते. पण एके दिवशी काही वेगळेच घडले. पाय घसरून तो पडला. पडला तोच एका टोकदार दगडावर. डोक्याला मार लागला आणि सगळाच खेळ संपला.

ती अगदी सैरभैर झाली. जे घडल आहे त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. त्याच्या आठवणीनी व्याकूळ झालेली ती अजूनही रोज संध्याकाळी तळ्यावर जात होती. तळ्याच्या मध्यात बोट घेऊन जायची आणि तिथेच बसून ती आक्रोश करत रहायची. अशा कितीतरी रात्री गेल्या पण ती आपले दुख:त्या तळ्याला रोज सांगत राहिली. आणि एक दिवस नाका-तोंडात पाणी जाऊन गुदमरून मृत झालेले तिचे शरीर पाण्याच्या तळाशी सापडले. शेजारीच खचून रुतलेली ती बोटही.

तिच्या निळ्या डोळ्यांच्या स्पर्शाने तळ्याचे पाणी त्यादिवशी निळे झाले ते कायमचेच...........

तेच हे ब्लाउसी लेक. ब्लाऊ म्हणजे Blue म्हणजेच निळे. गर्द झाडीत वसलेले हे अगदी छोटेसे तळे आहे. आम्ही गेलो होतो तेंव्हा तिथल्या नावाड्याने आम्हाला वरील कथा सांगितली. खर सांगायचं तर त्याची सत्यासत्यता पडताळून पहावी असे वाटलेच नाही.

तर, स्वित्झर्लंडच्या सहलीत ईंटरलाकेनला भेट देणार असाल तर आवर्जून याचाही समावेश करावा असं हे ठिकाण आहे. आल्प्स पर्वतरांगाच्या आसपास आढळणाऱ्या जलाशयांमध्ये हे सगळ्यात देखणे आहे असे ऐकले. 'कांडेरगृंड' नावाच्या गावाजवळ 'कांडेर' नदीच्या खोऱ्यात एका विस्तीर्ण उद्यानाच्या साधारण मध्यावर हे तळे आहे. तळ्याच्या एका बाजूला प्रचंड उंचीचा एक कातळ आहे. निळे आणि संपूर्ण पारदर्शक असे पाणी, नितांत सुंदर परिसर, खच्चून भरलेले निसर्ग सौंदर्य, डोळ्यांसाठी पर्वणी ठरावी असे सगळे दृश्य आहे. वल्ह्याच्या एका छोट्याश्या बोट राईडची सोय आहे. बोटीच्या तळाला काच लावलेली आहे जेणेकरून तळ्याच्या मध्यभागी सुद्धा, जिथे खोली साधारण ४० फुट आहे, पाण्याच्या पारदर्षषकतेचा अनुभव घेता येतो आणि जलाशयाचा तळ अगदी स्पष्ट दिसतो. पलीकडेच लहान मुलांना खेळण्यासाठी 'प्ले एरीया' पण आहे. बसायला लाकडी बाक आहेत. ग्रीलची पण सोय आहे. तसे तळे निरखून बोट राईड ईत्यादीसाठी तास-दीडतास खूप झाला. पण एक पूर्ण दिवस तिथे घालवायला आवडावा असे हे ठिकाण नक्कीच आहे.

१५००० वर्षांपूर्वी तळ्याच्या मागच्या डोंगरावरून दरड कोसळल्याने खळगा तयार होऊन या तळ्याची निर्मिती झाली. जलाशयाच्या तळाशी जिवंत झरे आहेत त्यामुळे पाणी स्वच्छा आणि पिण्यास योग्य आहे. आश्चर्य म्हणजे भर हिवाळ्यातही तापमान जेंव्हा शून्याच्या कितीतरी खाली गेलेले असते तेंव्हाही या तळ्याचे पाणी गोठत नाही. या पाण्याचे तापमान वर्षभर ८ ते ९ डिगरी सेल्सिअस असे स्थिर रहाते. त्यामुळे यात रंगीबेरंगी मासे आणि बदकं वर्षभर वास्तव्याला असतात. (पर्यटकांना हे गोड्या पाण्यातले ताजे मासे मिळण्याची सोय शेजारच्या हॉटेल चालकाने केलेली आहे). तळ्यातले सगळे पाणी दर ८ दिवसांनी पूर्णपणे नव्याने येते, जुने वाहून जाते अशी अजून एक माहिती त्या नावाड्याने दिली.

एवढेसे ते तळे पण त्यातही देखणे छोटेखानी लाकडी पूल बांधलेले आहेत. तळ्याच्या संपूर्ण बाजूबाजूने 'वॉक वे' केलेला आहे. त्यावरून फेरफटका मारताना अजून काही बारकावे लक्षात येतात. पाण्यात तळाशी काही ओंडके, झाडांची खोडं पडलेली दिसतात. चौकशी केल्यावर समजले की ती तशीच २०० वर्षांहून अधिक काळ तिथेच पडून आहेत, अजिबात न कुजता, खराब न होता. हा त्या पाण्याचा अजून एक गुणधर्म. तळ्या भोवतीच्या या फेरफटक्यातच आपल्याला एक देखणे शिल्प दिसते. कुण्या शिल्पकाराने त्या 'निळ्या डोळ्यांच्या' मुलीची आठवण म्हणून तिचे दगडी शिल्प पाण्याच्या तळाशी बनवले आहे.

जुलै-ऑगस्ट या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये इथे बरीच गर्दी असते. पण आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गेलो होतो तेंव्हा हवा तर मस्त होतीच पण गर्दी अजिबातच नव्हती. अजून एखादाच ग्रुप तिथे आलेला होता. त्यामुळे थोडे सिझनच्या आधी गेले तर निवांतपणे तिथल्या सृष्टी सौदर्याची, शांततेची मजा घेता येऊ शकते. तळ्याच्या मागच्या बाजूने 'ट्रेक / ट्रेल' साठी पण मार्ग तयार केलेला आहे. आवड आणि सवड असल्यास तिकडेही एक फेरफटका मारता येतो.

उघडण्याच्या वेळा :
उन्हाळ्यात - सकाळी ९ ते संध्याकाळी ५,
हिवाळ्यात - सकाळी १० ते संध्याकाळी ५

१. झुरीकहून जायचे असल्यास,
स्वत:ची गाडी असल्यास साधारण २.३० तासांचा प्रवास आहे. अंतर १५० किमी.
ट्रेनने जायचे असल्यास ३ तासाचा प्रवास आहे. झुरिक मुख्य स्थानकावरून ट्रेन मिळेल Zurich - Spiez - Frutigen (इथे ट्रेन बदलावी लागते) - Kandergrund.
(झुरिकहून झरमॅटकडे जाणाऱ्यांनाही 'ब्लाउसी लेक' बघून पुढे जाता येऊ शकते.)

२. 'इंटरलाकेन' या लोकप्रिय पर्यटन स्थळापासूनही बस किंवा ट्रेनने ब्लाउसीला जाणे सहज शक्य आहे.
स्वतःची गाडी असल्यास ४५ मिनिटांचा प्रवास आहे. अंतर ४० किमी.
ट्रेनने जायचे असल्यास १.३० तासांचा प्रवास आहे. Interlaken Ost east - Spiez - Frutigen (इथे ट्रेन बदलावी लागते) - Kandergrund.

**********
काही फोटो ....
.
1_0.JPG
.
2_0.JPG
.
3_0.JPG
.
4_0.JPG
.
5_0.JPG
.
6_0.JPG
.
7_0.JPG
.
8_0.JPG
.
9_0.JPG
.
10_0.JPG
.
11_0.JPG
.
12_0.JPG
.
13.jpg

Tuesday, 7 July 2015

'स्विस आजी आणि भारतीय पदार्थ'

'मटकीची उसळ' मी कधी कुणाला शिकवेल अशी मी कधीच कल्पनाही केली नव्हती. पण आत्ताच वरच्या आजींना शिकवून आले.

आदल्या दिवशी त्या मला सांगून गेल्या होत्या की उद्या २ वाजता करूया. मी त्यांना रात्री मटकी भिजत घालायला आणि सकाळी एकदा पाणी बदलायला सांगितले. त्यांच्याकडे नसणारच असा विचार करून मी जाताना तिखट-मिठाचा डबा आणि एका छोट्या डबित गुळाचा खडा घेऊन गेले. पण आश्चर्य म्हणजे मी त्यांच्या घरात गेले तेंव्हा ओट्यावर सगळी जय्यत तयारी मांडलेली होती. त्यात मिठ, धणेपूड, जिरे, कडीलींब, गरम मसाला, तेल, हळद आणि खडा हिंग या सगळ्या वस्तू होत्या.

स्वयंपाकाची म्हणा किंवा खाण्यापिण्याची, मनापासून आवड असेल तर ती अशी यानात्या प्रकारे दिसतेच.

झाले असे की एक दिवस आजोबा रेवाला घेऊन गेले. जाताना म्हणाले तिला मी जेवायला घालतो एमिलिया बरोबर. आम्ही आज भाताचा एक प्रकार केला आहे. मग १० मिनिटांनी परत आले आणि म्हणाले तुम्ही सगळेच या जेवायला आज आजींनी सगळा शाकाहारी स्वयंपाक केला आहे.

मी मटकीची उसळ केली होती आणि गाजराचा हलवा. ते घेऊन आम्ही जेवायला गेलो. मटकीला त्यांनी 'स्मॉल बिन्स' म्हंटले आणि खूप आवडीने खाल्ले. कसे केले ते पण विचारले. मग त्यांनी केलेला तांदळाचा डोसा कसा मस्त कुरकुरीत झाला पण चवीला थोडा वेगळाच झाला, आजोबांनी केलेले फुलके कसे निट जमलेच नाहीत असे सगळे विषय झाले. त्यांच्याकडे असलेले भारतीय पाककृतींचे पुस्तक त्यांनी मला दाखवले वगैरे वगैरे.

भारतीय पदार्थ आणि त्यात वापरण्यात येणारे घटकपदार्थ याची त्यांना असलेली प्रचंड माहिती बघून मी आश्चर्यचकितच  झाले. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, एकदा झुरिकमध्ये 'धर्मगुरूंची' कमतरता होती म्हणून भारतातून एकजणांना बोलावण्यात आले. झुरिकला येण्यासाठी त्यांची एक अट होती, 'भारतीय पदार्थ बनवून देणारा स्वयापाकी उपलब्ध करून देण्यात यावा.'  त्यावेळी स्वयंपाकाची आवड असलेल्या या आजींनी ती जबाबदारी स्वीकारली होती. आणि काही पाककृतींच्या पुस्तकांच्या मदतीने त्यांनी 'धर्मगुरूंची' मागणी पुर्ण केली होती. त्यावेळी त्यांना भारतीय अन्नपदार्थांची भरपूर माहिती तर मिळालीच पण त्यांना स्वतालाही ती पदार्थांची चव आवडली ती कायमचीच.

'दोस्यात छोटे आणि मोठे तांदूळ वापरलेले असतात' असे काही घोळ त्यांचे होतात पण शोधून वाचून विचारून दोघेही आवडीने भारतीय पदार्थ करून मज्जेत खातात याचे मला खूपच आश्चर्य आणि कौतुक वाटते. :)


Monday, 2 March 2015

मर्यादा (?)

आम्ही लहान असताना श्रीरामपुरला दरवर्षी सर्कस यायची. कॉलनीतल्या एक कोणीतरी काकू सगळ्यांच्या पोरांना नेऊन सर्कस दाखवून आणायच्या. दिवसा उजेडी चालू होईल आणि उजेड असेपर्यंतच संपेल असा एखादा खेळ निवडलेला असायचा.

आवारात पोहोचल्या बरोबर तंबूच्या डाव्या बाजूला ठेवलेले प्राणी जास्तीत जास्त जवळ जाऊन बघायची खूप घाई असायची तेंव्हा. वाघ-सिंह पिंजऱ्यात आणि हत्ती-घोडे साखळीने-दोरखंडाने बांधलेले.

वाघ-सिंह पिंजऱ्यातून बाहेर आले तर !!?? तो एवढा मोठ्ठा हत्ती सुटला तर !!?? अशी आमची चर्चा चाले. पण, एवढा मोठा ताकदवान हत्ती इतक्या छोट्याश्या साखळीला बांधला आहे, जी तोडणे त्याच्यासाठी अगदीच सहज शक्य आहे, आणि तरीही ती न तोडता तो शांत उभा आहे. हे काही तेंव्हा लक्षात आले नाही.

पुढे कधीतरी कोणाकडून तरी एक गोष्ट ऐकली. हत्तीच्या पिल्लाला म्हणे लहानपणापासूनच, त्याची ताकद अगदीच कमी असल्यापासून साखळीला बांधून ठेवतात. सुरुवातीला तो ती तोडायचा प्रयत्न करतो पण त्याला ते शक्य होत नाही. त्याच्या मनावर हे पक्के ठसले जाते कि हि साखळी तोडून टाकणे आपल्याला शक्य नाही. त्यामुळे कितीही मोठा झाला तरी एकदा साखळी बांधली कि हत्ती अगदी शांतपणे बांधलेल्या अवस्थेत तसाच उभा रहातो.

पर्वा असेच एका मैत्रिणीशी बोलताना हि गोष्ट पुन्हा आठवली.

नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येऊन मला २ वर्ष होऊन गेली होती. बऱ्याच ओळखी झाल्या होत्या. एक छोटा ग्रुप मिळाला होता. आम्ही काही मित्र-मैत्रिणी एकत्र कार्यक्रम वगैरे बघायला जायचो. एकदा एका मैत्रिणीने विचारले,
'असा-असा कार्यक्रम आहे येतेस का ?'
'कधी, कुठे ?' - मी.
'रात्री ९ चा आहे, टिळक स्मारकला .'- ती.
'मी नाही जात अग इतक्या उशिरा बाहेर' - मी.

माझे हे उत्तर तिने ऐकले आणि मग माझे छोटेसे बौद्धिकच घेतले.

'जात नाहीस हे कळाले, पण का जात नाहीस ?' - ती.
'आग आमच्या घरी लहानपणापासून अशीच पद्धत आहे', - मी.

'बर ठीक आहे, चांगली पद्धत आहे हि. पण तुमचे गाव लहान होते, तुम्ही मुली-मुलीच होत्या, वगैरे वगैरे वगैरे. म्हणून कदाचित तुमच्या घरी तशी पद्धत असेल. पण इथे पुण्यात उशिरा बाहेर जाणे सुरक्षित आहे, शिवाय आम्ही तुला घरापर्यंत सोडायला तयार आहोत मग काय हरकत आहे यायला ?.

बदलत्या परिस्थिती प्रमाणे सवयी बदलाव्या अग. निदान तेंव्हा ते तसे का होते, याची कारणं शोधून, आत्ता या परीस्थीतीत ती खरच तशीच्या तशी लागू होतात का, हे बघायला काय हरकत आहे ?

नुसतेच 'नाही' म्हंटल्याने होणार काय आहे तर, तुझा एक चांगला कार्यक्रम बघायचा राहून जाणार आहे. कधी कधी आपली आपणच स्वत:ला इतकी बंधन घालतो, आणि आयुष्य त्यातच अडकून पडते.' - ती.

'हम्म्म्म .... ' - मी.

मनातल्या मनात मात्र हत्तीची गोष्ट आठवत होती.

त्यादिवशी मी नाही गेले. पण नंतर काही दिवसांनी, माझ्या घराजवळच पाताळेश्वराच्या मंदिरात त्रिपुरी पोर्णिमे निमित्त 'पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा' कार्यक्रम होता. मी जाणार होते. संध्याकाळी अचानक तीच मैत्रीण दारात.

'काय करते आहेस ?'-ती.
'काही नाही, कार्यक्रमाला निघाले होते'-मी.
'बाहेर सगळेजण आले आहेत, आम्ही पण येतो तुझ्याबरोबर' -ती.
'अरे व्वा ... !!'-मी.

मी तिच्या बरोबर बाहेर आले. सगळा ग्रुप मंदिराकडे निघाला. तिथेच बाहेर सगळ्यांनी गाड्या लावल्या होत्या. तिथे पोहोचल्या बरोबर सगळे आपापल्या गाड्या काढायला लागले. मी म्हंटले, 'काय रे कार्यक्रम नाही बघायचा का ?'

सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिले 'नाही, आपण Jackie Chan चा चित्रपट बघायला चाललो आहोत, अलकाला'.

गुपचूप गेले त्यांच्या बरोबर. बाहेरच कुठेतरी खाल्ले-पिल्ले, चित्रपट बघितला आणि रात्री १२ ला वगैरे घरी आले.

नंतर बरेच दिवस सगळे मलाच चिडवत होते, 'काय हे, बाळासाहेबांचा कार्यक्रम सोडून Jackie Chan' :) :)

मग चिक्कार फिरले, पुणे आणि आसपास. भरपूर कार्यक्रम/नाटकं/चित्रपट बघितले. रात्रीचे ट्रेक केले. मजेत गेले ते सगळे दिवस. पण हा प्रसंग आठवला कि अजूनही माझी मलाच मजा वाटते.

असा मित्र-मैत्रिणींचा उपयोग होतो फारफार
अबकी बार मोदीसरकार ..... :)

(हे लिहिले तेंव्हा मोदी सरकार येण्याच्या मार्गावर होते)






Saturday, 28 February 2015

रुक्मिणीच्या निमित्ताने

२०१३ च्या मौजेच्या दिवाळी अंकातला अरुणा ढेरेंचा 'रुक्मिणी' बद्दलचा ललित लेख काल वाचला. लेखात त्यांनी तिचे, तिच्या आयुष्याचे - आयुष्यात घडलेल्या मुख्य घटनांचे विश्लेषण, अवलोकन केले आहे. अर्थात खूप सुरेख ओघवते लिखाण आहे. हे लिखाण त्यांनी वाचलेल्या पुस्तकांचे संदर्भ देते त्याचबरोबर त्यांच्या भटकंती दरम्यान त्यांनी ऐकलेल्या कथा/दंतकथांचे पण संदर्भ देते. काही ठिकाणी त्यांनी जाणून बुजून 'रुक्मिणी' विषयी इतर बायांशी साधलेल्या संवादातून पुढे आलेली माहितीपण येते. असे हे रुक्मिणीच्या आयुष्याचे मोजमाप आहे ती सोडून इतर अनेकांच्या तराजूने तोललेले. अर्थात इथे लेखाचा मुख्य विषय रुक्मिणी असल्याने  तिचे म्हणणे काय आहे हे जाणून घेणे शक्य नव्हतेच.

पण हे असे कितीतरीवेळा आपल्या अनुभवासही येते. तुमच्या आयुष्यातली एखादी घटना, महत्वाची किंवा अगदी छोट्यात छोटी, कुठून कुणाच्या ऐकण्यात येते. ती व्यक्ती तिच्या आकलन क्षमतेनुसार, तिच्या स्वतःच्या वैचारिक बंधनांच्या तराजूत तोलून त्यावर स्वताचे एक मत तयार करते आणि अर्थात पुढे तुम्हाला माहितीहि नसलेला एक नवाच पैलू (?) तुमच्या व्यक्तिमत्वाला जोडला जातो. त्याला पुन्हा त्या व्यक्तीची त्या-त्या वेळेची मानसिक गरज, तुमच्या बद्दल मनात असलेल्या भाव-भावना यांचे एक आवरण पण चढवलेले असतेच. कधीकधी मग हे काल्पनिक जोड तुमच्या नकळत कायमस्वरूपीच बिलगून बसतात.

कधी या सगळयाची मजा वाटते, कधी राग येतो तर कधी खूप उदास व्हायला होते. मग कधीतरी असे काही वाचण्यात आले कि नुसतेच गालातल्या गालात हसू येते आणि आपलेच आपल्याला काहीतरी उमजून उगीचच हलके वाटते ..... :)

Thursday, 19 February 2015

अस्वस्थ आठवणी १ - 'ऑफिस बॉय'.

काही व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप थोड्या काळासाठी येतात. पण जेंव्हा जेंव्हा आठवतात तेंव्हा तेंव्हा जीव अगदी कासावीस करून जातात. त्यातलाच हा एक.

शिक्षण संपल्यावरच्या माझ्या पहिल्याच नोकरीच्या ठीकाणी तो 'ऑफिस बॉय' म्हणून कामाला होता. सगळ्या ऑफिसभर फटाफटा स्लीपर वाजवत चालायचा, धपाधपा पाय आपटत जिने उतरायचा आणि मान तिरकी वर करून इकडून तिकडे यायचा जायचा. पहिल्यांदाच बघणाऱ्याला उद्धट वाटेल असेच त्याचे वावरणे असायचे.

पण तसा होता सज्जन. अर्थात हे आणि असे त्याचे गुण समजायला त्याच्याशी चांगली ओळख मात्र व्हावी लागायची. कामसू होता, काहीतरी नवीन शिकायचे असायचे, इकडच्या-तिकडच्या कार्यालयीन बातम्यांमधे त्याला कधीही रस नसायचा आणि तितकाच निरस तो अभ्यासाच्या बाबतीतही होता. १० वी नापास होऊन त्याने शिक्षण सोडलेलं होत. घरच्या परिस्थितीने त्याला नोकरी करण्याशिवाय दुसरा काही मार्गही ठेवला नव्हता.

एका खोलीचे घर आणि त्यात त्याचा जुळा मंदबुद्धी भाऊ, म्हातारी आई, एक अपंग बहिण आणि तो असे सगळे रहात होते. हलाखीची म्हणावी अशीच ती परिस्थिती. पण हा कधीही पैशांसाठी हपापलेला दिसला नाही कि कधी कुणापुढे हात पसरलेला आठवत नाही. इतकेच काय आपले रडगाणेही तो कधी कुणासमोर गात बसलेला मी बघितले नाही. इतर कुणाकुणाकडून ऐकून त्याची परिस्थिती समजली होती.

त्याची रोजची कामं ठरलेली होती आणि त्याव्यतिरिक्त त्याने 'सांग'कामं करणे अपेक्षित होते. पण ठरलेली कामं झाल्याशिवाय तो कुणाचेही कुठलेही काम करतच नसे. एका वरिष्ठ मैत्रिणीने अनेक वेळा त्याला समजावूनही त्याच्या डोक्यात काही ते क्रमाची अदलाबदल करण्याचे कधी शिरलेच नाही. रविवारी तर 'आज आपला मूड बरोबर नाही, आपल्याला जास्त काही काम सांगायचे नाही' असे तो आल्याआल्याच जाहीर करत असे. आणि एरवी रिकामा वेळ मिळाल्यावर जसं तो खिडकीतून एकटक रस्त्याकडे बघत बसायचा तसाच थोडावेळ बसून रहात असे. [इथे कार्यालयीन सुट्टीचा वार गुरुवार होता]

रोज न चुकता 'सामना' वाचणे हा त्याचा छंद आणि  'बाळासाहेब' हा त्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी लिहिलेला आणि त्यांच्याबद्दल लिहून आलेला शब्द न शब्द याला पाठ असे. एकदा असेच सकाळी सकाळी 'मुड' नसल्याची दवंडी ऐकू आली. आम्ही सगळयांनी नेहमीप्रमाणेच हसण्यावारी नेले. थोड्यावेळाने तो माझ्या त्या वरिष्ठ मैत्रिणीकडे गेला आणि अगदी रडवेल्या आवाजात विचारले,  'बायपास' म्हणजे काय हो ? तिने आपले चेष्टेच्याच मूड मध्ये सांगितले, 'अरे माणसाचे हृदय काढून सशाचे हृदय लावतात त्याला बायपास म्हणतात'

याच्या डोळ्यात एकदम पाणीच आले. 'अरे झाले काय ते तरी सांग' असे म्हंटल्यावर याने सांगितले 'अहो बाळासाहेबांची बायपास करणार आहेत. आता तुम्हीच सांगा वाघासारख्या माणसाला सशाच हृदय लावलं तर तो जिवंत कसा रहाणार' बाळासाहेबांची बायपास करणार असल्याची बातमी याने सामना मध्ये वाचली होती आणि त्यामुळे याच चित्त थाऱ्यावर नव्हतं.

मी नोकरी सोडल्यावर पुन्हा कधीच त्याची भेट झाली नाही. एखाद्या मैत्रिणीकडून त्याचे लग्न झाले, मुलगा झाला अशी खुशाली मात्र कळायची. पुढे त्याने पण ती नोकरी सोडली. मग काहीच कळेनासे झाले. तोपर्यंत खरं म्हणजे मलाही विसर पडला होता. आणि मग एकदम बातमी आली. कर्वेरोडवर त्याच्या सायकलला अपघात होऊन तो जागेवरच खलास झाला. 

क्षणात माझ्याडोळ्यासमोर दिसली ती त्याची कधीही न बघितलेली वयस्कर आई, अपंग बहिण, मंदबुद्धी भाऊ, एक अजाण लेकरू आणि ती दुर्दैवी बायको. कुठून बळ आणणार होती हे संकट, ही जबाबदारी पेलण्याच कुणास ठाऊक.

- आरती.


Friday, 9 January 2015

स्वप्न.

बरेच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अचानक एका मैत्रिणीचा फोन आला, 'घरी आहेस का ? येऊ का गप्पा मारायला ?'

'जेवायलाच ये, पोळ्याच करते आहे. भाजी तयार आहे' - मी.

१० मिनिटात ती आलीच. बरोबर तिचा २ वर्षाचा मुलगा पण होता.  लहान मुलांच्या 'खास' सवयीप्रमाणे, माझ्या घरात आल्या आल्या त्याला भूक लागली आणि तो काहीतरी खायला मागू लागला.  त्यावेळी माझ्याघरी कोणी लहान मुल नसल्याने, 'खाऊ' असा काही नव्हता. मला प्रश्नच पडला, याला द्यावे तरी काय ?

'भात लाऊ का पटकन ?' मी मैत्रिणीला विचारले.
 

ती म्हणाली, 'भाजी-पोळी' तयार आहे ना, मग दे भाजी-पोळीच'.
 

मी थोडी घुटमळले पण मग पोळीचे छोटे-छोटे तुकडे आणि बरोबर गवारीच रस्सा असे एका छोट्या ताटलीत घेऊन, ताटली त्याच्या समोर ठेवली.
 

भिंतीला टेकून, मांडी घालून बसून त्या एवढ्याश्या जीवाने भाजी-पोळीचा चट्टामट्टा केला.

त्यावेळी मी आई नव्हते पण मुलांच्या खाण्यापिण्याच्या तक्रारी असणाऱ्या चिक्कार आया अवती-भवती होत्या. त्यामुळे मला खूपच कौतुक वाटले. सहजच मनात विचार आला 'माझे मुल पण असेच असले पाहिजे, जे आईने दिले ते मनापासून खाणारे'. पण हे तेवढयापुरतेच.

मधे एकदा चवळीच्या शेंगांची रस्साभाजी केली होती. १६ महिने, १५ दिवसांच्या माझ्या छकुलीने मांडी घालून बसून, ताटलीत दिलेल्या पोळी-भाजीचा स्वहस्ते चट्टामट्टा केला.

नजरेआड गेलेली स्वप्नपण अशी कधीतरी अचानक पूर्ण होतात. नजरेसमोर बांधून ठेवलेली तर होणारच .......
[त्याबद्दल पुन्हा कधीतरी]

Monday, 29 December 2014

'स्त्रीवादी' नसलेली संवादी 'स्त्री'

अशीच ओळखीची एकजण आहे. लहानपणापासून गाण शिकलेली. लग्नकरून अमेरीकेस आली. नोकरी करू शकत नव्हती. फार पैशांची गरज नव्हती, नवरा चिक्कार कमवत होता. पण म्हणून दिवसभर नुसते रिकामे घरात बसणे तिला योग्य वाटत नव्हते आणि मानवतही नव्हते. मग नवऱ्याला म्हणाली, 'इथे कुठे क्लास असेल गाण्याचा तर परत गाण चालू करेन म्हणते आहे'

जवळपासचा एक क्लास तिने शोधून काढला. पण तो जवळ म्हणजे, कारने गेले तर दीड तासाच्या अंतरावर होता. आठवड्यातून एकच दिवस होता. पण अंतर तिला खूप जास्त वाटत होते. त्यात अजून गाडी चालवायला पण शिकली नव्हती, त्यामुळे हा क्लास तरी जमेल असे तिला वाटेना.

नवरा म्हणाला, 'आठवड्यातून एकाच दिवस आहे ना, मी थोडा लवकर येईन'. तो तिला घेऊन जायचा, २ तास बाहेर बसायचा. क्लास संपला कि तीला घरी घेऊन यायचा.

थोडी रुळली, मग तिचे तिनेच लहान मुलांसाठी गाण्याचे क्लासेस सुरु केले. मुलांना ५ दिवस शाळा असते त्यामुळे हे क्लास सुट्टीच्या दिवशी, शनिवार-रविवार असतात. साधारण सकाळी १० ते दुपारी २ हिचे क्लासेस चालतात. तिला २ मुली आहेत. हा सगळा वेळ नवरा दोघींना सांभाळतो. धाकटीचे खाणे-नहाणे सगळे करतो. आनंदाने.

हि मजेत आहे. आवडीचे काम करायला मिळते आहे, जोडीला पैसे पण मिळत आहेत. मुली पण छान टवटवीत आहेत. घर सुंदर सजवलेले आहे.

एकदिवस मी गेले तर तिचा क्लास चालू होता. मी तिथेच बसले ऐकत. गाणे संपले. ती मुलांना काही पाठ लिहून देत होती. तिच्या मोठीने शंका विचारली, 'वादी' आणि 'संवादी' म्हणजे नक्की काय ?
हिने थोडे सांगीतिक भाषेत सांगितले आणि म्हणाली, 'आता अगदी सोप्पे सांगते.
वादी म्हणजे सगळ्यात महत्वाचे. जसे आपल्या घरात बाबा. आणि संवादी म्हणजे त्यानंतर महत्वाचे, म्हणजे जशी आई'.

तिने लेकीला सांगताना जे सांगितले ते शब्द मला ऐकू आलेच नाहीत. मला जाणवली ती त्या घरातली आपल्या जोडीदाराचे  'वादी' असणे जपण्यासाठीची  दोघांचीही धडपड.


Wednesday, 24 December 2014

' ट्रेक्षणीय - १ ' - राजमाची.

२००५ पासून नंतरच्या ४-५ वर्षांत शंभरच्या आसपास ट्रेक केले. त्यात काही ठराविक किल्ले १ पेक्षा जास्तवेळा पण केले. आणि काही करायचे, करायचे म्हणत अजून बाकीच आहेत. राजगड काय किंवा सिंहगड काय, अनेकवेळा का चढलो ? या प्रश्नाचे जसे काहीच उत्तर असू शकत नाही. तसेच राजमाचीच्या राजवाटेवर दोनवेळा पायपीट करायचे कारण काय ? याचेही उत्तर मला मिळत नव्हते.

असा हा राजमाचीचा दुसरा ट्रेक नंतर अनेक गोष्टींमुळे लक्षात राहिला. त्यातल्या काही, म्हणजे - आलो त्या वाटेने न जाता, उलट्या बाजूने उतरायचे ठरले. म्हणजे परत लोणावळ्याकडे न जाता, कर्जतच्या बाजूला 'कोंडीवडे' गावात उतरायचे [हे ठरले अर्थातच 'एक' मताने ]. त्यामुळे थोडे चाचपडतच उतरलो. बरीच जास्तीची पायपीट झाली. अगदी रस्ता कधी संपतो असे होऊन गेले. आणि असे बरेच काही.

"तीन पाऊस पडून गेले, आता पावसाळी ट्रेक सुरु करूया", असे म्हणून ठरलेला, त्या मौसमातला हा पहिला पावसाळी ट्रेक, थेंबभरही पाउस न पडता सुद्धा आम्हाला शब्दशः चिंब भिजवून गेला. भरपूर आभाळ आलं होत, वातावरणात प्रचंड आर्दता होती. घाम इतका येत होता कि ५ मिनिट चाललो तरी पाणी / ग्लुकॉन-डी प्यावे लागत होते. जवळचे पाणी लवकरच संपले. राहिलेली वाट संपता संपेना. अखेर पायथ्याचे गांव दिसले. गावात कसेबसेच पोहोचलो. जे पहिले लागले त्या दुकानाच्या ओसरीवर सगळ्यांनी बसकणच मारली. पाण्याच्या बाटलीची चौकशी केली असता, "कोका कोला मिळेल" असे उत्तर मिळाले. शीतपेयांमध्ये काळ्यारंगाचे कुठलेच पेय मी कधीच पीत नसूनही, त्यादिवशी एका मागे एक ४ बाटल्या 'कोक' पिऊन आयुष्यातली सगळी कसर भरून काढली.

हे सगळे प्रकार दुसऱ्या दिवशीचे. आदल्या दिवशी लोणावळ्याहून निघालो तेंव्हा पण पाउस नव्हताच. पण संध्याकाळची वेळ असल्याने हवेत थोडा गारवा होता. रस्ता लांबचा होता पण फार चढण नव्हती. त्यामुळे आरामात गप्पा मारत-मारत मार्गक्रमण चालले होते.

तुंगर्ली धरण मागे टाकून, ठाकर वस्तीवरून एक वळण चढून पुढे आलो आणि कोणाला आधी दिसले आठवत नाही, पण बरेच म्हणजे आठ-दहा काजवे चमचम करताना दिसले. "आहा" म्हणून इकडे तिकडे बघितले तर अजून बरेच दिसले.

शाळेत असतांना, पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात एखाद्या दिवशी जर अगदी अंधार पडेपर्यंत बाहेर खेळत बसलो तर घरी येताना कॉलनीत कुठेतरी, किंवा घराबाहेर अंगणात एखादा काजवा लख्खन चमकून जायचा. अनेक प्रयत्नांमधला एखादा यशस्वी झाला तर तो आमच्या काडेपेटीत कोंडला जायचा. पण काडेपेटीतल्या अंधारात मात्र कधीच तो चमकला नाही. हिरमुसले होऊन शेवटी त्याला सोडून दिले जायचे. तो उडून जायचा कि खाली पडायचा हे पाहिल्याचे काही आठवत नाही. आम्ही आपले दुसऱ्या काजव्याच्या शोधात. एकावेळी जास्तीत जास्त ४ किंवा ५ एवढेच काजवे असायचे. पण "तो बघ तिकडे एक, इकडे पण एक, तुझ्या डोक्यावर बघ उडतो आहे" असा आमचा जोरदार आरडा ओरडा चालू असायचा. क्वचित आणि अगदी आभास वाटावा इतके पुसट दर्शन देणाऱ्या कुठल्याही गोष्टीचे, सुप्त आणि खास आकर्षण प्रत्येकाच्याच मनात असते.
इथे तर त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त काजवे होते. मात्र उत्सुकता आणि आरडा-ओरडा अगदी तोच होता. 'हे बघा, तिकडे बघा, अरे तिकडे काय बघता इकडे बघा, कॅमेरा कुठे आहे, पटकन फोटो काढा' असे सगळे चालले होते कारण आमच्या समोर एक आख्खे काजव्यांचे झाड होते. कल्पना करा, रात्रीची वेळ, काळोखात भर घालण्यासाठी भरून आलेलं आभाळ. ना वर- ना खाली, कुठेही ना उजेडाची तिरीप ना एखादा ठिपका. अशा अंधाऱ्या पायवाटेवर अचानक तुमच्या समोर चमचमणारा एक भलामोठा वृक्ष येतो !
मिट्ट काळोखात ते दृश्य असे दिसत होते जसे काही ते झाड आभाळाला जाऊन टेकले आहे आणि सगळ्या चांदण्या आभाळातून उतरून झाडाला बिलगल्या आहेत.

काय कारण असावे माहिती नाही, पण ते सगळे काजवे त्या झाडाच्या आकृती प्रमाणेच फेर धरून चमचमत होते. भारावलो, हरखलो, विसावलो आणि पुढे निघालो .... उल्हास नदीचे खोरे डाव्या हाताला ठेवत एक वळण चढून सामोरे गेलो तर ... तर संपूर्ण दरी अक्षरशः लखलखत होती. आता मात्र सोबत होती नि:शब्द पायवाट आणि चंदेरी लखलखाट.

सह्याद्रीतले गड-किल्ले प्रत्येक ऋतुत वेगळ्याच रुपात भेटतात हे नक्की .... आणि त्यासाठीच होता हा दुसरा ट्रेक.

- Arati.

Tuesday, 23 December 2014

' उर्सली '

"उर्सली" ही एका छोट्या मुलाची एक छोटीशी गोष्ट आहे. मूळ जर्मन कथेच इंग्रजी रुपांतर रेवाकडे आहे. आणि सध्याच्या रोज वाचण्याच्या पुस्तकांपैकी ते एक आहे. कधी आम्ही पुस्तक हातात घेऊन वाचतो तर कधी गोष्ट म्हणून पुस्तक न घेताच तिला ऐकायची असते. अगदी सगळ्या बारकाव्यांसहित.
.
उन्हाळ्यात आपल्या सगळ्या जनावरांसाहित डोंगरावर राहायला जाणाऱ्या आणि हिवाळ्यात डोंगर पायथ्याशी आसऱ्याला येणाऱ्या एका कष्टकरी कुटुंबातला उर्सली हा एकुलता एक आणि समंजस मुलगा. गावातल्या एका उत्सवासाठी लहान मुलामध्ये वाटल्या जाणाऱ्या घंटापैकी सगळ्यात छोटी त्याच्या वाट्याला येते. आणि ती पण मोठ्या मुलांच्या दादागिरीमुळे. अपमानित झालेला उर्सली भर हिवाळ्यात, हिमवर्षाव - निसरडी वाट - थंडी यापैकी कशालाही न जुमानता डोंगरावरच्या घरातून मोठी घंटा आणतो आणि सगळ्यात मोठ्या घंटेचा मान मिळवून त्या उत्सवाच्या मिरवणुकीत पुढचे स्थानही मिळवतो. अशी काहीशी ती गोष्ट आहे.
.
परवा अचानकच इथे झुरिकमध्ये "Schellen-Ursli" नावाचा चित्रपट लागल्याचे वाचण्यात आहे. रेवाने अजून पर्यंत कधीच मोठ्या पडद्यावर चित्रपट बघितला नव्हता. म्हटलं चला तिला घेऊन जाऊ, लाडकी गोष्ट पडद्यावर बघण्याची जरा वेगळी गम्मत. मग शुक्रवारी जाऊन तिच्या वयाला चित्रपटगृहात प्रवेश असल्याची खात्री करून घेऊन तिकीट पण काढून आणले. उद्या सकाळी आपण नक्की काय करणार आहोत याचा तिला काहीच अंदाज नव्हता. 'मुव्ही बघायचा' असे म्हणत होती.
.
आज सकाळी गेलो. आत जाऊन आपापल्या खुर्चीत बसलो आणि जाहिराती सुरु झाल्या. बाईंचा चेहरा कोरा, दोन्ही हातांनी दोन्ही खुर्च्यांना घट्ट पकडलेले आणि एकदम स्तब्धपणे समोरच्या जाहिराती बघत होती. इतकी मोठ्ठी चित्र आणि घुमणारा आवाज दोन्ही अजून मानवत नव्हते. अशीच पाच एक मिनिटं गेल्यावर विचारले 'आई, उर्सली कधी येणार ?'
.
मग चित्रपट सुरु झाला. भरगच्च स्नो असलेल्या छोट्याश्या गावाच्या अनेक गल्ल्या दिसल्या आणि मग एका गल्लीच्या शेवटच्या टोकाला उर्सलीचे घर दिसल्या बरोबर म्हणाली 'आई, बघ उर्सलीच्या घरावर Drawing आहे'. इथून मग सगळे बारकावे तपासण सुरु झालं. आपण जो गोष्टीत ऐकला आहे, पुस्तकात ज्याच फक्त चित्र बघितलं आहे, तो 'उर्सली' असा समोर बघून खुदू खुदू हसू येत होत. तिच्या मनातल्या प्रतिमेशी तो किती मिळता जुळता होता माहिती नाही पण मधेच माझा हात पकडून हसून म्हणाली 'आई, उर्सली'.
गोष्टी इतका चित्रपटात गोडवा नाही. थोडा माल-मसाला आहेच. त्या खटाटोपात कोल्ह्याला उर्सलीचा मित्र दाखवले आहे. "डामरट तो कोल्हा' या तिच्या मनातल्या प्रतिमेला तडा गेल्यामुळे हा बदल तिला अजिबातच आवडला नाही. 'आई कोल्हा त्रास देतो ना सगळ्यांना ?! ' असे विचारण्यात आले. गोष्टीत, एवढा प्रचंड बर्फाच्छादित डोंगर चढून गेल्यामुळे थकलेला उर्सली घरात गाढ झोपलेला असतो. तेंव्हा बाहेर त्याच्या पावलांचे ठसे बघून तिथे जमलेले कोल्हे, हरणांना विचारतात 'हा लहान मुलगा इथे कशासाठी आला आहे ?' मग एक हरीण घरावर चढून तो आत नक्की काय करतो आहे ते बघून येते. हा प्रसंग चित्रपटात नव्हता. त्याची पण तातडीने आठवण करून देण्यात आली.
.
पण एकूण बर्फात खेळणारा उर्सली, बेडूक मुठीत पकडणारा उर्सली, शेळ्यांच्या मागे धावणारा उर्सली, गवतात लोळणारा उर्सली, कोल्हयाला चीज भरवणारा उर्सली, असा सगळ्या रूपातला उर्सली तिला खूपच आवडला. तिचे उस्फूर्त प्रश्न आणि मजेदार टिपण्णया ऐकता ऐकता, तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव निरखता निरखता माझा चित्रपट संपला. तिच्या डोळ्यांसमोर अजूनही चालूच आहे ......

रेवाचा ठेवा .... :)

१४ जुलै २०१६ 

बाबा: "रेवा, आजपासून थोडा अभ्यास करायचा बरंका. संध्याकाळी मी तुला ABCD शिकवेन"
.
रेवा: "A, B मला आधीच येते बाबा. C आणि D मी दुपारी करून टाकते."


आई : "रेवा, भात खाऊन घे चल"
रेवा : "I dont eat Bhat, I am princess"
***
(रेवा माझ्या पाठीवर बसून घोडाघोडा खेळत होती)
रेवा : ओ तुमचं नाव काय ?
मी : घोडा. तुमचं काय नावं ?
 

-----------------------
०७ जुलै २०१६ 

"आई, मी मोठी झाले ना की बॅले टीचर होणार आहे" - रेवा.
.
सगळं कस अगदी सुरळीत चाललंय नाही !! 
सुरुवात आपल्या लाडक्या शिक्षिकेपासूनच झाली. :)
--------------
17 June 2016

मी रेवाला कावळा-चिमणीची गोष्ट सांगते तेंव्हा चिमणी-कावळ्याचा उल्लेख 'चिऊताई' आणि 'कावळा' असा करते.
पण रेवाने आज सकाळी ही चिमणी-कावळ्याची गोष्ट मला सांगितली ती खालीलप्रमाणे ..... 
**
कावळा म्हणतो "चिमणीबाई,चिमणीबाई दार उघड"
चिमणीबाई म्हणते "थांब माझ्या बाळाला आंघोळ घालूदे"
.
.
.
.
मग शेवटी चिमणीबाई दार उघडते. कावळेबुवा घरात येतात.
चिमणीबाई त्यांना खाऊ देते, ब्लँकेट देते. मग दोघ चित्रपट बघतात.
दि अँड.
**
---------------
19 Nov 2015

दिसणं बिसण ठीक आहे पण एखाद्याने किती वडिलांवर असावं याला काही मर्यादा ??!!
.
"रेवा, आज भाजी कुठली करू गं ?"
"आई, फ्लॉवरची कर, माझी सगळ्यात आवडती भाजी !!"
.
"आय हेट फ्लॉवर"

-------------
21 Oct 2015

संदर्भ : 
१. गणपतीचे १० दिवस घरी आम्ही आरती झाल्यावर "हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे" असं म्हणायचो. 
२. आमच्या पितळी देवघरावर छोटा नागाचा एक आकार आहे. 
३. भोंडल्यासाठी काढलेला हत्ती (गजलक्ष्मी) तिथेच देवघराशेजारी ठेवलेला आहे.
.
आता किस्सा:
.
आई: "अगं रेवा, आज बाप्पाला दिवाच नाही लावला आपण"
रेवा: "आई, मी करू का बाप्पाची आरती"
आई: "नको उद्योग करूस गं"
रेवा: "उद्योग नाही करत, मी आरती करते"
:
:
:
रेवा:"हरे कालिया हरे कालिया हरे कालिया हरे हरे, हरे हत्ती हरे हत्ती हरे हत्ती हरे हरे"

-------------
01 Oct 2015

(कार्टून नेटवर्क मधून मिळणाऱ्या सामान्य ज्ञानावर आधारित)
"आई, चल आपण डायनासोरला भेटायला जाऊ"
"नको ग रेवा, मला भीती वाटते"
"घाबरू नकोस आई, मी आहे ना, मी त्याच्या डोक्यावर डान्स करेन"
मग आम्ही चालत चालत त्या काल्पनिक डायनासोर जवळ जावून पोहोचलो. आणि परवाच बघितलेल्या 'शर्वरीताई जमेनीस' यांच्या कार्यक्रमातील आठवेल तश्या पदन्यासाची डायनासोरच्या डोक्यावर तालीम करण्यात आली.
इथून पुढे डायनासोरांच्या डोक्यावर बालिकेची पदचिन्हे दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये. ..........

-------------
05 Sep 2015

रेवा: 'बाबा, तु मला चित्र काढुन देतोस ?'
बाबा: 'हो देतो की, काय काढु ?'
रेवा: 'रेवाचे चित्र काढ.'
.
.
.
बाबा: 'हे बघ रेवा, झाले काढुन चित्र'
रेवा: 'अरे बाबा तु चुकुन हॉर्सचे चित्र काढलेस'
.
बाबा: 👿😖😡
--------------
04 Sep 2015

मराठी गाणी चालु होती. 'लबाड लांडगं ढोंग करतय ... ' लागलं आणि रेवा एकदम म्हणाली,
"My favorite song, hurray"
"Awwww" 😳
---------------
17 Aug 2015

'बडक' नंतर आता रेवा घेऊन आली आहे 'कुकुंम्डी' .....
आई, मला कुकुंम्डी दे ना प्लीज़ .....
Cucumber + काकडी.
---------------
17 March 2015

"रेवा, दुकानात गेल्यावर आईला त्रास द्यायचा नाही. हट्ट करायचा नाही. "
"ओके आई"
"हट्ट केलास तर मी तुला दुकानातच ठेऊन येईन."
"मग मी एकटीच शॉपिंग करू का ?"


१४ फेब २०१५
-------------

रेवा: आई, मला कावळा देतेस का खायला मीठ लाऊन.
आई: काआआय .....

*
एकदम जाऊन बघितले तर ठकुबाई कपाटातून एक-एक वस्तू काढून जमिनीवर ठेवत होत्या,
आई: ए ए ए काय चाललंय ? चला सगळं परत जागेवर ठेवा.

रेवा: असुदे आई, असुदे ....
*
रेवा: आई, मला भूक लागली आहे. पोळी देतेस का ?
आई: हो देते हं.
रेवा: आणि एखादी भाजी पण देतेस का ?
आई: हा हा हा ....

         मला हसू आले ते तिच्या बोलण्याच्या पद्धतीचे आणि त्याचबरोबर चतुरपणाचे. काहीवेळापूर्वी मी तिला  म्हणाले होते, तू आज पोटभर जेवलीस तर मी तुला TV लाऊन देईन.

रेवा: का हसली तू आई, मी सोस आहे का ?
[संदर्भ : मी बरेचदा तिला म्हणत असते, सगळ्याचा भारी सोस आहे बाई हिला.]
*
जेमतेम २-३ घास पोटात गेले असतील आणि म्हणाली,
रेवा: आई मला TV लाऊन देतेस का ?
आई: TV आत्ता नाही बघायचा बाळा, आत्ता आई, बाबा, रेवा सगळ्यांनी गप्पा मारायच्या.
रेवा: हं, ओके. आज ऑफिसमध्ये काय केलेस बाबा.
बाबा shocked, रेवा rocked ..... 
२९ डिसेंबर २०१४
----------------

आई, माझ्या डकीच नाव माहिते, बडक .........

२४ डिसेंबर २०१४
-----------------
न्यूजर्सीला असतांना ती जे बोलते ते समजणारे अनेक जण आजूबाजूला होते. पण इथे आल्यावर भेटणाऱ्या सगळ्याच शेजार-पाजाऱ्याना आपण बोललेले इंग्रजी शब्दच फक्त समजत आहेत हे त्या २ वर्षे आणि काही महिन्यांच्या जीवाला लक्षात आले (असावे) आणि मग प्रत्येक मराठी शब्दाला इंग्रजी शब्द माहिती करून घेण्याचा एक नवीनच छंद तीला लागला.
त्यात मग 'Spider ला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ?" असे प्रश्न पण येतात. किंवा मग पुढीलप्रमाणे संवाद घडतात .....
रेवा: (खिडकीतून बाहेर बघत) बाबा स्नो, बाबा स्नो.
बाबा: त्याला frost म्हणायचे रेवा.
रेवा: पण इंग्लिशमध्ये स्नो म्हणतात बाबा.


**


रोज दुपारी आणि रात्री झोपतांना गोष्ट सांगायची. बरं एक गोष्ट सांगून संपत नाही. मी आज कंटाळून म्हंटले, "संपल्या सगळ्या गोष्टी. मला नाही येत गोष्ट"
"अग ती सांग. बाबा वाघोबा कडे गेला, रेवा आणि आई हत्ती कडे, ती सांग"
मग मी काहीतरी जुळवून सांगितली.
"आता ती सांग, रेवा एकटीच वाघोबाकडे गेली आणि आई-बाबा हत्तीच्या पिल्लू कडे"
उगीचच मला GS ची अनेक कथाबीजं असलेली 'ती' diary आठवली.


२५ नोव्हेंबर २०१४
 -----------------
आज सकाळी लेकीने दोन तासाच्या आत ४ वेळा कपडे बदलायला लावल्याने चौथ्यावेळी माझ्याही नकळत मी म्हणाले, 'परमेश्वरा या मुलीला लवकर मोठी कर'
'आई, तू कोणाशी बोलली ?'
' बाप्पाशी '
'तू बाप्पाला काय म्हणाली ?'
'मी म्हणाले, रेवाला लवकर मोठे कर'
'भ्याआआअ मला मोठे करू नको'
'अग तुला आईसारखे मोठे व्हायचे आहे ना ?'
'हो'
'म्हणून आई म्हणाली बाप्पाला'
'भ्याआआअ बाप्पा मोठे करत नाही'
'अग करतो रेवा, हळूहळू करतो. रडू नकोस'
*
दुपारी स्वयंपाकघरात खिडकीसमोरच्या खुर्चित बसली होती. तिथून तिला आकाशात उडणारे पक्षी दिसले.
'आई मला उडता येत नाही, मला कावळा बरोबर उडायचे'
'अग कावळ्याकडे पंख आहेत ना म्हणून त्याला उडता येते'
'मला पण पंख आणून दे दुकानातून'
'पंख दुकानात नाही मिळत बाळा'
'कावळाला कोणी दिले पंख, हं ?'
'कावळ्याला बाप्पाने दिले पंख'
'बाप्पा मला पंख दे पीज' आणि मग माझ्याकडे वळून 'आई देतो आहे बाप्पा हळूहळू'


०२ नोहेंबर २०१४
----------------
आई, माझे तोंड 'खबार' झाले आहे, म्हणून मी ज्यूस पिली.
[अर्थ : मी ज्यूस प्यायले म्हणून माझे तोंड खराब (चिकट) झाले आहे]


२९ ऑगस्ट २०१४
-----------------
आई: रेवा, बाबाच नाव काय आहे ?
रेवा: गोईंता ....


०६ ऑगस्ट २०१४
-----------------
मी - (स्वयंपाकघरातुन बाहेर जाता जाता)
रेवा चल आता बाहेर, आईच काम झालं.
रेवा - आई तु जा.
मी - अग चल, इथे काय बसतेस ?
रेवा - रेवा येत नाही, तु जा आई.
मी - तु एकटी काय करणार आहेस इथे बसुन ?
रेवा - उद्याेग.
feeling amused.
२४ जुलै २०१४ 
--------------
रेवा : आई, चामण्णा हलवल.
मी: काsssय ?
रेवा: चामण्णा हलवल.
मी: काय हरवल ?
रेवा: [आकाशाकडे बोट दाखवुन] बघ तेथे आलाच नाही चामण्णा.
 ०१ मे २०१४
------------
एक मित्र आला होता घरी. त्याने त्याचा ipad तिथेच सोफ्यावर ठेवला होता. थोड्यावेळाने बाबाच्या शेजारी बसायचे म्हणून रेवा तिथे जाऊन बसली.
बाबा मित्राला म्हणाला 'तिचे अजून लक्ष गेलेले दिसत नाही'
त्याच्या ipad चे कव्हर आमच्या ipad पेक्षा वेगळे होते, त्यामुळे मित्र बाबाला म्हणाला 'अरे नाही, तिला ते काय आहे हेच कळाले नाहीये'
रेवाने मित्राकडे वळून बघितले आणि म्हणाली 'आयप्या'
feeling proud.
१८ एप्रिल २०१४ 
---------------

१८ महिन्यांची रेवा आणि परवा परवाच २० महिन्यांची झालेली रेवा, किती वेगळी आहे !! सवयी, वागणं, बोलणं, दोन महिन्यांत इतका फरक पडला आहे की आम्ही आपलं दिवसभर आश्चर्यचकित होत रहातो.
या अगदी आजच्याच काही गमती-जमती.
सकाळपासून आम्ही दोघीच घरी होतो. तिला खाऊ घातले आणि मी माझी ताटली आणायला आत गेले. बाहेर आले, तर ही खिडकीकडे तोंड करून जोरजोरात 'रेवा', 'रेवा' अश्या हाकां मारत होती.
मी तिला विचारले, 'काय झाले छकुली ?', तर म्हणाली 'आई, डकी रेवा रेवा'
खाली बदकं ओरडण्याचा आवाज येत होता. माझी हसून हसून पुरेवाट .......
मागे कधीतरी अशीच बदकं खाली ओरडत होती आणि ही काहीतरी हट्ट करत होती. तेंव्हा तिची समजूत घालताना मी म्हणाले होते, 'बघ खाली ते बदक तुला 'रेवा, रेवा' हाक मारते आहे. चल आपण जाऊ त्याच्याशी खेळायला.'
म्हणून आज ती मला सांगत होती 'डकी रेवा, रेवा अशी हाक मारतो आहे'. कारण तिला सकाळी उठल्यापासूनच 'भुरी' जायचे होते
*
चांगले उन पडले होते म्हणून आम्ही दोघी खाली फिरायला गेलो. चालता चालता रेवा एकदम म्हणाली, 'आई, फुन,फुन'. मी खिशातून काढून फोन तिच्या हातात दिला, तर पळत पळत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली, २ पायांवर खाली बसली. पाठमोरी असल्याने नक्की काय केले ते मला दिसले नाही. थोड्यावेळाने उठली, २-३ पावलं चालली आणि परत बसली. आता मी थोडे जवळ जाऊन बघितले तर ती फोन हातात पकडून, ग्रीडच्या पलीकडे जी नुकतीच उमललेली फुलं होती त्याचे फोटो काढत होती. झूम केल्यासारख करून, डावी-उजवीकडे फोन हलवून अँगल-बिंगल बघून फोटोग्राफी चालू होती.
*
दुपारी तिचे जेवण झाले. थोडे अन्न खाली सांडले होते, ते मी खाली बसून पुसत होते. हिला सगळ्या वस्तू ताबडतोब जागेवर ठेवायच्या असतात. म्हणून ती घाइघाइने तिची खुर्ची ढकलत घेऊन जात होती तर खुर्चीचा पाय माझ्या हाताला थोडासा घासला गेला. त्याक्षणी ती म्हणाली 'ओह, शोली' ..... आणि खुर्ची थोडी बाजूला घेऊन ढकलत निघून गेली.
इतकं गोड वाटलं ते 'ओह, सॉरी '


०४ एप्रिल २०१३
---------------
रेवा उभी राहिली, मिच एकटिने पाहिली .....

Thursday, 6 November 2014

बाल निसर्ग.

तिला घरात बसायचेच नव्हते म्हणून खरतरं आम्ही दोघी बाहेर पडलो. घरापासून ८-१० पावलांवर असलेला रस्ता ओलांडून पलीकडे गेलो. हा तसा बऱ्यापैकी हमरस्ता म्हणावा असा रस्ता, पण वाहनांची ये-जा अगदीच तुरळक असते. त्यामुळे ठकूबाई अगदी रमत-गमत चालल्या होत्या. पुढे थोडा उतार लागला. त्यावर नेटके दिसतील असे छोटे-छोटे दगड रचून पादचाऱ्यांची चांगली काळजी घेतली होती. एका-एका दगडावर एक-एक पाय ठेवत चालायला तिलाच काय मलाही मजा येत होती.

थोडे अजून पुढे जाऊन, रेल्वेलाईन खालून जाणार बोगदा पार केल्यावर मस्त दाट झाडी दिसायला लागली. त्यादिशेने अजून थोडं पुढे गेलो तर लहान मुलांचे आवाज येत होते म्हणून तसेच चालत राहिलो. जवळच शाळकरी मुलांना खेळता येईल असे पटांगण लागले आणि पलीकडे शांतपणे पसरलेले स्वच्छ-सुंदर-नितळ पाणीच पाणी.

डाव्या बाजूला मैदानी खेळ खेळण्यासाठी बरीच मोठी हिरवळ. त्याच्या दोन्ही टोकांना विस्तीर्ण वृक्ष. उजव्या बाजूला बसण्यापुरती थोडीशी हिरवळ, बॉल खेळण्यासाठी बांधलेली जाळी, लहान मुलांसाठी झोके,घसरगुंडी असे प्रकार, डबे खाण्यासाठी वेलींच्या मांडवाखाली लावलेले लाकडी टेबलं आणि लाकडीच बाक, पिण्याच्या पाण्याचा नळ असा सगळा थाट होता. २ वेगवेगळ्या शाळांचे २ वर्ग तिथे खेळायला आलेले दिसत होते. त्यामुळे परिसर अगदी गजबजला होता.

इतकी मुलं बघुनच ती हरखुन गेली होती. थोडावेळ झोका खेळली मग घसरगुंडी खेळायचा प्रयत्न केला, चढणे काही तिला जमेना कारण इथे वर चढायला नेहमीची शिडी नव्हती तर, सर्कशीत असते तशी लाकूड आणि दोरखंडाची शिडी होती. जी एका लाकडी मचाणावर घेऊन जात होती आणि त्याला घसरगुंडी जोडलेली.
पानगळीचे दिवस असल्याने झाडांच्या बुंध्याशी वाळलेल्या पानांचा खच पडला होता. हे दृश्य तिला नवीनच होते. त्यांची 'कुरकुर' तिला जाम आवडली. जोरजोरात पाय आपटत झाडाभोवती "गोल-गोल राणी" करून झाले. तळ्याकाठी जाऊन बदकं,हंस आणि इतर पक्षांचे निरीक्षण करून झाले. मुले बदकांना खायाला देत होती. प्रत्येक तुकडा आपल्याच चोचीत जावा यासाठी चाललेली बदकांची लगबग बघून एकदम खुश झाली. पायातले बूट भिरकावून हिरवळीवर उगीचच इकडून तिकडे आणि तिकडून इकडे धावून झाले. एकीकडे छोटी-छोटी रान फुल गोळाकरून आईच्या ओंजळीत साठवणे चालू होते. मुलांच्या खेळण्याच्या जागेत चिखल होऊनये म्हणून वाळू आणि पायवाटेवर बारीक खडी अंथरली होती. शाळेतली मुले त्यातले मोठे मोठे खडे तळ्याच्या पाण्यात टाकत होती. तिला पण मोह झाला, परवानगी साठी पटकन माझ्याकडे वळून बघितले. याआधी तिने फक्त 'नाहीच' ऐकले होते त्यामुळे पहिला खडा पाण्यात पडल्यावर आलेला 'डुबुक' आवाज ऐकून ती टाळ्या वाजवून हसायला लागली आणि मला म्हणाली 'आई, तू पण टाक'  :)

तिथेच पुढे बोटीचा धक्का होता, आणि त्याच्या पलीकडे थोडे आत शिरु पाहणाऱ्या पाण्यावर बांधलेला लाडकी पूल. त्यांची वेळ संपली म्हणून मुले परत जायला निघाली. पुलावरून जाता जाता अचानक चार-दोन मुले लाकडी पुलाच्या कठड्यावर चढून खाली पाण्यात उतरली आणि पाणी खेळू लागली. पाणी खूप खोल नव्हते आणि तळाशी बरेच दगड-गोटे पण होते. मुलांनी खेळले तरी चालेल असे स्वच्छ तर होतेच. त्यामुळे आमच्या ठकूबाई पण लगोलग सोयीचा मार्ग बघून पाण्यात उतरल्याच .....

आता मात्र खूप थकली. चिखल, माती, वाळू, पाणी, पाला-पाचोळा, पक्षी, झाड, फुलं सगळ अगदी अंगभर माखून घेऊन माझ्या बाजूला येऊन शांत बसली, दगडी कठड्यावर. बरोबर आणलेला खाऊ खाल्ला, नळाच पाणी प्यायली आणि अगदी तृप्त मनाने म्हणाली 'चल, घरी जाऊ'.

माझ्या बालवयातला एखादा सुट्टीचा दिवस घेऊन जर त्याचे वर्णन लिहिले तर इतकाच भरभरून, अगदी याच्याशी मिळता जुळताच निसर्ग त्यातही नक्कीच भेटेल. पण आमच्या दोघीत जवळ-जवळ चार पिढ्यांचे अंतर असताना तिच्या बालपणी तिला पण तो तसाच मनसोक्त उपभोगायला मिळेल अशी आशाच नव्हती

...... पुढील आयुष्यात 'तुमच्या पुढे काय वाढून ठेवले आहे' हे सांगता येत नाही असे सगळेच सांगतात. इथे येताना खरच कल्पनाही केली नव्हती असा देखण्या संपन्न निसर्गाचा पसाराच पसारा तिच्या बालपणाच्या अंगणात वाढून ठेवला असेल. :)

- Arati Awati.

Wednesday, 9 April 2014

मधुमालती

आज सकाळी रस्त्याने चालता चालता घरी फोन केला तर बाबा म्हणाले, 'अरे तुझ्या मधुमालतीला खूप फुलं आली आहेत, भलती सुंदर दिसते आहे. पुरा बोगनवेल झाकून टाकला तिने. रस्त्याच्या बाजूने आणि आतून शेकडो फुलं फुलली आहेत' ...... सगळं चित्र जसंच्या तसं माझ्या डोळ्यासमोर उभं राहीलं.

माझे अत्यंत आवडते फुल - अत्यंत आवडती वेल "मधुमालती". आमच्या घराभोवतीच्या बागेत भरपूर फुलझाडे होती. पण मला मधुमालती त्यात हवीच होती. माझ्या आठवणी प्रमाणे रोपवाटिकेतून फुलझाडांची रोपं आणायची पद्धत तेंव्हा नव्हती. एकमेकांच्या बागेतूनच मागून आणली जायची. जवळपास कुणाच्या बागेत मधुमालती दिसते का, याच्या मी शोधातच होते. ज्या एक जणांच्या कमानीवर मला ती पहुडलेली दिसत होती, त्यांच्या कडून तिचे 'बाळ'रोप मिळण्याची शक्यता अगदीच नगण्य होती.

एकदा पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांनी सगळ्याच झाडांची छाटणी केली. मी चक्क त्यांनी रस्त्यावर टाकून दिलेल्या ढिगातून जाडसर आणि लांबलचक अशी एक फांदी उचलून आणली. एक खड्डा खणून, त्या फांदीची चुंबळ बांधून तिचे एक छोटेसे टोक बाहेर ठेऊन बाकी व्यवस्थित खड्ड्यात पुरली. आजूबाजूला ओल राहील असे पाणी घातले. आता कोंब फुटायची वाट बघायची !! योगायोगाने थोड्यावेळाने पाऊस पण पडला. मी नवीन रोपं लावली कि त्यादिवशी पाउस पडतो, आणि जर त्याच दिवशी पाउस पडला तर माझ्या रोपांना मस्त पालवी फुटतेच, अशी माझी एक श्रद्धा होती.

पाउस काय पडला, मला तर मधुमालतीचा वेल झरझर गच्चीपर्यंत गेलेला दिसायलाही लागला. पण तसे काहीच झाले नाही. ते रोप उतरलेच नाही. नंतर बऱ्याच दिवसांनी आई बरोबर लांबच्या ओळखीच्या एक जणांकडे गेले होते. आईच्या त्यांच्याशी गप्पा चालल्या होत्या त्यावेळात मी त्यांच्या बागेत फेरफटका मारत होते तर 'मधुमालती' भेटली. निघताना काकुंना म्हटले 'मला मधुमालतीची एक फांदी हवी आहे'. 'फांदी कशाला, बरीच रोपं उतरली आहेत कि, रोपच घेऊन जा' काकू म्हणाल्या. अजूनच आनंद. पण हे पण रोप नाहीच टिकले.
त्यानंतर अनेक वर्षांनी पुण्याला एका नातेवाइकांकडे गेले होते. त्यांनी नुकताच कुणाचा बंगला रहाण्यासाठी घेतला होता. खूप सुंदर बाग होती त्यांची. संध्याकाळची वेळी होती ती. घरात गेल्याबरोबर मी त्यांना विचारले, 'बाहेर खूप मस्त वास येतो आहे, कशाचा आहे तो ? तुमच्याकडे मधुमालती आहे का ?'. असे बोलत बोलतच मी बाहेर येऊन थोडे इकडे तिकडे बघितले तर मधुमालती दिसलीच. परत एकदा रोपाची मागणी आणि मग त्याचा पुणे-श्रीरामपुर प्रवास. पण यंदा नशीब एकदम जोरदार होते. रोप टिकले, फुटले, फुलले, बहरले आणि मग फोफावले सुद्धा .....

'मधुमालती' हे नावच किती वेगळे आणि सुंदर आहे. या वेलीचे तेलगु नाव तर अजूनच सुंदर आहे 'राधा मनोहरम'. या फुलांना मंद असा एक खास वास असतो. पांढरी, अगदी फिकी गुलाबी आणि थोडी गडद अशी तीन रंगात हि फुलं फुलतात. एकाच वेलीवर एकाच गुच्छात हे तीन रंग असतात. एकदा रोप चांगले लागले कि पुन्हा त्याला काहीही मशागत लागत नाही. विनातक्रार, केवळ पावसाच्या पाण्यावर भरभरून फुलं आणि भारून टाकणारा सुगंध हि वेल देत रहाते. या दिवसांमध्ये, म्हणजे वसंताच्या सुरुवातीला 'मधुमालती' फुलते / बहरते. पुरेश्या मोठ्या झालेल्या वेलीवर अक्षरशः शेकडो फुले फुललेली दिसतात. थोडेसे वेगळेपण म्हणजे रातराणी सारखीच हि फुले संध्याकाळी उमलतात. त्यामुळेच जिथे कुठे मधुमालतीची वेल असते तिथे आजूबाजूला संध्याकाळच्या वेळी एक मंद सुवास दरवळत रहातो. हा वास इतका हलका असतो कि मनभरून घेण्यासाठी आपोआपच खोल / दीर्घ श्वास घेतला जातो. वेगळ्या मेडिटेशनची गरजच काय .....

अक्षरशः जिवापेक्षा जास्त सांभाळून मी ते रोप 'एसटी' बसने पुण्याहून श्रीरामपुरला घेऊन आले. आमच्या घराला समोर एक व्हरांडा आहे. त्याला २ जाळीच्या खिडक्या. एका खिडकी खाली मी ते रोप लावले. वेलाच्या एका टोकाला सुतळी बांधून, ती खिडकीला टांगून ठेवली. जसा जसा वेल मोठा होत गेला, त्याला मी व्हरांड्याच्या छतावर चढवले आणि पलीकडच्या बाजूने खाली आणले. अगदी मला हवे होते तसाच हा वेल वाढत होता. आता संध्याकाळच्या वेळी आमच्या घराच्या पुढच्या अंगणात तर येत असेच पण सगळ्या खोल्यांमध्ये खिडकीजवळ उभे राहिले कि मधुमालतीचा मंद असा सुगंध येत असे. संध्याकाळ झाली कि माझे सुरु होई, 'बघ किती मस्त वास येतो आहे'. मग कोणीतरी म्हणावे, 'हो हो येतो आहे बरं, सगळ्यांनी म्हणा रे मस्त वास येतो आहे' :)  .....

मधुमालतीची नियमित छाटणी करावीच लागते. कारण ती फारच झपाट्याने वाढते, फांद्या लांबच लांब पसरत जातात. मधुमालतीची फळे जमिनीत रुजून नवी नवी रोपं उतरत रहातातच, शिवाय जमिनीत खोल गेलेल्या मुळाना कोंब फुटून, त्यातूनही नवी रोपे जमिनिबाहेर डोकवायला लागतात. तर असा बराच पसारा वाढल्याने, खिडक्यांवर अंधार यायला लागला आणि माझ्या मधुमालतीच्या खोडावर कुऱ्हाडीचा घाव बसला. फक्त त्याआधी योग्य जागी, पुरेसे वाढलेले दुसरे एक रोप हेरून ठेवले होते. आमच्या वडिलांच्या देखरेखीखाली ते वाढले, बहरले, फुलले इ.इ. त्याचा-माझा सहवास असा काहीच नाही. पण आमच्या अंगणात फुललेली प्रत्येक मधुमालती हि अजूनही माझीच आहे :)