बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.
Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Wednesday, 13 July 2016

काव्यदिंडीच्या निमित्ताने .....


खरतरं गेली काही वर्ष कवितांच वाचन खूपच कमी झाल आहे. कारण जुनी पुस्तकं जवळ नाहीत आणि नवी घेतली गेली नाहीत. पण या काव्यदिंडीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसात कितीतरी नव्या, विस्मृतीत गेलेल्या, बऱ्याच कविता वाचनात आल्या. पण आता चार निवडायची वेळ आली तेंव्हा मात्र पुन्हा काहीच आठवेना. 

.नवीनच पुण्यात आले होते. 'डीएसके गप्पा' नावाच्या कार्यक्रमात ना.धो.महानोर काव्यवाचन करणार होते. त्या आधी मी महानोरांच्या बऱ्याच कविता वाचल्या होत्या, त्यांनी लिहिलेली गाणी ऐकली होती. पण दोन अडीच तासांच्या त्या कार्यक्रमात महानोरांची कविता एका वेगळ्याच रुपात समोर आली. महानोरांची कविता समजत नाही असे सहसा होत नाही. पण खरी भिडली ती त्यादिवशी. सहज - साधी - ओघवती शैली. कुठलाही अभिनिवेश नाही की 'स्टाईल' चा खटाटोप नाही. कविता, तिची निर्मिती प्रक्रिया, तिच्या जन्माची कहाणी आणि बरेच काही. कवितेतून श्रोत्यांशी साधलेला संवादच होता तो. त्या दिवसापासून महानोरांची कविता वाचतानाची मानसिकताच एकदम बदलली. 

.महानोरांची बरीच गाणी आणि कविता आवडत्या आहेत परंतु ही कविता आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारी आहे, म्हणून तिची निवड.

.पीक करपलं पक्षी दूरदेशी गेलं
गळणार्‍या झाडांसाठी मन ओथंबलं
वेढून नेणारी रित्या नभी वाहाटूळ
आसमंत वेटाळून काळजाची कळ
दु:ख पेलण्या एवढं बळ नाही डोलां
कडू काल्यावण्यांनी भारावला गला
कोवल्या गर्बाला जल्माआधी वनवास
वो मालवला दिसं, मालवला दिसं

- ना.धों. महानोर.

-------------------

मी बरीच वर्ष ठराविक कवींच्याच कविता वाचायचे. त्यामुळे बोरकर,मर्ढेकर,पद्मा गोळे यांच्या कविता मी कधी वाचल्याच नव्हत्या. पुण्यात यशवंतरावला बघितलेल्या सुनीताबाई देशपांडेंच्या 'एक कवितांजली' या कार्यक्रमात पहिल्यांदा माझी या कवींतांशी ओळख झाली. आणि मग सुनीताबाईंनी त्या कार्यक्रमात वाचलेल्या, नुसताच ओझरता उल्लेख केलेल्या आणि इतरही अजुन बऱ्याच कविता शोधून शोधून वाचल्या, वाचत राहिले. या सगळ्याजणींमध्ये लक्षात राहिली ती पद्मा गोळे यांची 'चाफ्याच्या झाडा'.

त्याचं कारणही तसंच आहे. काही कामासाठी मी सुनीताबाईंच्या घरी गेले होते. दोन मिनिटांचे काम होते पण दोन तासाहून अधिकवेळ मी तिथे होते. अर्थातच त्या बोलत होत्या आणि मी ऐकत होते. विषयातून विषय निघत, या कार्यक्रमाचा विषय निघाला आणि त्यांनी मला पद्मा गोळे यांची, त्यांना विशेष आवडणारी म्हणून ही कविता म्हणून दाखवली..
पुलंना जाऊन बरीच वर्ष झाली होती. त्याही बऱ्याच थकलेल्या दिसत होत्या. सगळीकडे एकटेपण भरून राहिलेलं ते घर तर अगदी सूनं सूनं वाटत होत. तिन्हीसांजेची वेळ होती आणि मी कविता ऐकत होते ............

चाफ्याच्या झाडा..
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु: ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा 
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा ….

नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू 
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात 
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर 
बसूनआभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा ….
पानात, मनात खुपतंय ना 
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय …. कळतंय ना ….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना.

– पद्मा गोळे..
---------------------------

सकाळ पेपरमध्ये एक सदर येत होते. नाव अजिबातच आठवत नाहीये. पण त्याअंतर्गत 'नवंकवी' म्हणून कवी सौमित्र यांची थोडक्यात ओळख आणि काही निवडक कविता छापून आल्या होत्या. थोड्या वेगळ्याच वळणाच्या त्या कविता खूपच आवडल्या.

अर्थातच माझी आजची कविता 'माझिया मना' सगळ्यात जास्त आवडली. तेंव्हाच कधीतरी त्यांचा
काव्यसंग्रह 'आणि तरीही मी' येत असल्याचे वाचले. तो मात्र सांगितल्या तारखेच्या खूपच उशिरा आल्याने
मधल्या काळात मी अनेकवेळा अप्पा बळवंत चौकात त्याच्या चौकशी करता चक्कर टाकून येत असे. अखेर तो आला.पण आधीच्या चार कविता वाचून वाढलेल्या अपेक्षा काही त्याने पूर्ण केल्या नाहीत. खूप उस्तुकतेने वाट बघितल्यामुळे असेल, माझी खूपच निराशा झाली आणि नंतर मी या कवीचे फारसे काहीच वाचले नाही. परंतु ही कविता मात्र कायमच आवडत्या कवितांच्या यादीत राहिली.'ऋतू हिरवा' ऐकल्या नंतर तर थोडी अधिकच भावली.
.
माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
माझिया मना, जरा बोल ना
एकटी न मी सोबतीस तू
माझिया मना, जरा ऐक ना
रात्र ही सुनी, तुझे बोलणे
तुझे धावणे अन मला वेदना
ओळखू कसे मी, हे तुझे ऋतू
ओळखू कशा मी तुझ्या भावना
सांजवेळ ही, तुझे चालणे
उषःकाल आहे नवी कल्पना

- सौमित्र (Kishor Kadam)
--------------------------------
NRI मायबोलीकर (www.maayboli.com) आले की त्यांना भेटायला पुण्यातले मायबोलीकर एकत्र जमायचे. अश्याच एका प्रसंगी माझ्यापासून ३ खुर्च्या लांब बसलेल्या वैभवने हात लांबवून त्याचा फोन मला दिला आणि 'हे ऐक' असे सांगितले. तोपर्यंत वैभवने मायबोलीवर टाकलेल्या सर्व कविता वाचत होते आणि त्या आवडतही होत्या. पण त्याची कविता त्याच्याच आवाजात त्यादिवशी मी पहिल्यांदाच ऐकत होते. आणि हा काही वेगळाच अनुभव होता. मला खात्री आहे अनेकवेळा त्याचे कार्यक्रम बघितलेले अनेकजण अगदी एकमताने हेच म्हणतील. :)

"वैभवच्या कविता" याबद्दल मी काही लिहिण्याची खरतरं आवश्यकताच नाही. कारण माझ्या मित्र यादीतल्या सर्व काविताप्रेमिनी त्या अनुभवलेल्या आहेत. इतकंच म्हणेन वैभवच्या कविता नेहमीच अगदी ताज्या आणि टवटवीत असतात.

असंख्य आवडत्या कवितांमधून एक निवडणे अवघडच होते पण ही अनेकवेळा त्याच्याकडून ऐकूनही पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी म्हणून हिची निवड .... 

'नेमस्त'
धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हाच्या ओळी
तो शहारला नेमाने ही कविता सुचतेवेळी
नित्यागत उमलत गेली हळुवार कल्पना त्याची
सवयीचा सुगंध आला होताच फुले शब्दांची
नेमस्त हरखला तोही द्यावया ना उरले काही
नेमस्त चरकला फिरुनी ... "ही शेवटची तर नाही?"
रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते...

- वैभव जोशी.

Monday, 23 July 2012

' पाउस '

03 Aug 03

होडी बरोबर वाहत जाणारा
छत्री बरोबर उडत जाणारा

पैसा पाहून धावत येणारा
मेंढकाच्या सुरात गाणे गाणारा

जिकडे तिकडे चिकचिक करणारा
शाळेची सुट्टी निश्चित करणारा

पाऊस वाटतो हवा हवा
जुनाच असून भासतो नवा

* * *

कधी कोसळणे, कधी कडाडणे
कधी रिमझिम, कधी झिमझिम
कधी टिपटीप, कधी भुरभूर
वेढून येतो आगळीच हुरहुर

हलका हलका मृद्गंध
धरे संगती मोरही धुंद
भिजवतो मन चिंब चिंब
झिरपतो मग थेंब अन थेंब

बहार नवा, निर्झर नवा
इंद्रधनुचा साज नवा
जीव नवे, जिवन नवे
घेऊन येतो संजीवन नवे

नव्या रुपात नव्याने कोसळतो
आठवणीच का मग जुन्या उगाळतो ....

- आरती.



Sunday, 6 May 2012

' वाटते '

19/04/2008

एकटे असावे वाटते 
बसावे शांत वाटते 
वाटते ऐकू न यावे 
सूर माझे मला वाटते 

एक मैफिल संपलेली 
रातराणी बहरलेली 
चांदण्या रात्रीस या 
बिलगून जावे वाटते 

राग तू, अनुराग तू,
मोह कि वैराग्य तू 
गूढ मनाच्या  डोही या 
बुडावे खोल, खोल वाटते 

हले पाचोळा, फुले पिसारा 
का अवेळी मुद्गंध आला 
साचलेल्या जलाने या 
कोसळावे वाटते ........... *

- आरती.

Monday, 30 April 2012

' जीवनगाणे '

२६/०१/२००३

जीवनगाणे, मस्त तराणे
नित्य नव्या रंगात रंगणे

कोकीळ कंठी वसंत गाणे
लयीत भ्रमराचे गुणगुणणे

फांदीचे वाऱ्यावर झुलणे
कळीचे हळुवार फुलणे

श्रावणाचे अलगद भूरभूरणे
निर्झराचे अवखळ झुळझुळणे

सूर्याचे आकाशी तळपणे
चंद्राचे लपंडाव खेळणे

काजव्याचे क्षणभंगुर चमकणे
रात्रीच्या गर्भात चांदणे

क्षितिजावरती चित्र रेखणे
आसमंती सप्तरंग उधळणे

चिमणीचे पिल्लास भरवणे
गरुडाचे नभी झेपावणे

सगळेच कसे लोभसवाणे,
जीवनगाणे मस्त तराणे.

**

मैफिलीत रात्र जागवणे
चांदण्यात पायवाट तुडवणे

पावसात नखशिखांत भिजणे
शेकोटीच्या उबेत शहारणे

मनामनांचे नकळत गुंतणे
लटके रुसणे, खळखळून हसणे

हळूच स्वप्नांच्या कुशीत शिरणे
वास्तवतेची धग अनुभवणे

आधी अडखळणे, मग सावरणे
पुढचे पाऊल, पुढेच पडणे

कधी साथीने, कधी एकाकी लढणे
गौण मानुनी जिंकणे हरणे

पडणे-झाडणे, आपणच घडणे
आपणच आपुला मार्ग आखणे

सगळेच कसे लोभसवाणे,
जीवनगाणे, मस्त तराणे.

- आरती.








Friday, 30 March 2012

' काळचक्र '

०८/०४/२००५
 
येणे कुणाचे, जाणे कुणाचे
का असे बंधहीन असावे  ?
उत्तर शोधत या प्रश्नाचे
जीवन प्रवाही वाहत जावे

माणसे जितकी, तितकी नाती
वेगवेगळी सारीच भासती
भासो जन्माचे, असो क्षणांचे
तुटता हुरहूर तीच लाविती

तुटले जरी, टिकले जरी
खोली नात्यांची बदलत राहते
असली जरी, नसली तरी
गती आयुष्याची तीच राहते

दुःखाचे कढ, मनाची ओढ
पाऊले जरी झाली जड
सुटले जे सोड, नवे ते जोड
चक्र काळाचे हेच सांगते.

- आरती. 
  
      
   

Monday, 13 February 2012

' कुत्रे काका '

 ०८/०८/२००५

पुणे विद्यापीठाच्या खडकी गेटने ऑफिसला जाताना, मिल्ट्रीच्या घरांजवळ रोजच एक ना एक कुत्रे मांजरीच्या मागे लागलेले दिसे. आणि त्यांच्या पळापळीत मला गाडीला ब्रेक लावावाच लागे. कारण एरवी रहदारीचा नसलेला तो रस्ता त्यांचे हक्काचे मैदानाच होता, मारामाऱ्या करायला. :)

जरा ऐका कुत्रे काका
पाठलाग माउचा करू नका
त्यात बराच आहे धोका
कुत्रे काका जरा ऐका

माउवर बोक्याचा भलता जीव
मारतो तिच्यासाठी उंदीर नऊ
साय असो कि लोणी मऊ
वाटून खातात सगळाच खाऊ

तुम्ही असे मधेच याल
माऊला कुठे लांब पळवाल
असे कसे  बोक्यास चालेल
नक्कीच याच सूड उगवेल

प्रसंग मोठा आहे बाका
पळत ठेऊन आहे बोका
अवचित साधेल बघा मोका
कशाला जीव संकटात टाका

मांजराची मुळात लबाड जात
पळेल देऊन तुरी हातात
'चंपी' रेंगाळलीये मागल्या दारात
गुपचूप शेपूट घाला पायात

तुमचा तिथेच भिडेल टाका
जरा ऐका कुत्रे काका. .......         
 
 
  - आरती.


Tuesday, 24 January 2012

' अंतर '

०२ एप्रिल २००३

जीवघेण्या कामाच्या ओझ्यातही
कुठल्याही अर्धाविरामाच्या क्षणी 
शब्द हळूच डोकावतात
पाठोपाठ सूरही येतात
मन गाण्याने भरून येते 
प्रेमाने साद घालते

नाकारायचच  म्हंटल जर सगळ
तर कोण अडवू शकत ?
मग काहीच नसत

रिकाम्या एकटेपणातही
रेंगाळलेल्या निवांत क्षणीही 
शब्द हरवतात, सूर अडखळतात
गाणे मनातच विरून जाते
अंतर वाढतच राहते .......

- आरती.


  


    

Tuesday, 18 October 2011

' पान '

ऑफिस च्या खिडकी बाहेर पिंपळाचे मोठ्ठे झाड होते. रोज दुपारी जेवण झाल्यावर खिडकीतून बाहेर बघत बसले कि, पिंपळाची पानं पडताना दिसायची. पिंपळाचे पानं कधीच झाडावरून 'टपकन' खाली पडत नाही. ते फांदीपासून विलग झाले कि हवेत किमान २-३ गिरक्या घेउन मगच जमिनीवर टेकते. मला तो छंदच जडला होता, सुटलेले पानं कुठे जाऊन पडते ते बघण्याच्या. असेच कधीतरी बघता बघता हि कविता सुचली.


रोजच बघतो पक्षी नवे
उंच उडणारे थवेच थवे
मनात असते नभी झेपावे
घेउन भरारी, मजेत गावे

त्याच फांद्या, तीच पाने
तेच तेच ते नकोच जिणे
तोडून सारे पाश जावे 
रोज नव्या वल्लरी विसावे

आज अचानक काय हे घडले
वाऱ्याने मज अलगद खुडले
मधेच आली झुळूक हलकी
मीही घेतली खुशीत गिरकी

श्वास रोखला, मिटले डोळे
क्षणात भेटणार आभाळ निळे
अलगद शय्येवर विसावलो
मायेच्या स्पर्शाने सुखावलो

नव्हते अंबर, निळाई हि नव्हती
माझेच पूर्वज अवति-भवती 
न सांगताच सत्य उमजले
शेवट हा तर आयुष्य संपले.

-  आरती.

Monday, 17 October 2011

'दुरावा'

[ २००५ साली लिहिलेली एक कविता. ]

काय झाले तुज मना, काही तरी बोलना
शब्द पांगले सारे कि कोमेजल्या भावना ||१||

पापण्या या कोरड्या, ओलावा कुठे दिसेना
मना रिते झाले कि शुष्क साऱ्या संवेदना ||२||

अंतरी दाटे क्षोभ, आसवांनी मालवेना
रुतले बाण असे कि भळभळल्या वेदना  ||३||

गुंतलो एकमेकात, आज काही आठवेना
स्नेह, ओलावा, माया कि फसव्या होत्या वल्गना ||४||

एकटी मी या जगी, सल आता मला छळेना
रमवले मीच मजला कि दुरावा नात्यात जाणवेना ||५||

- आरती.

Thursday, 1 September 2011

'असे जगावे'

रंग नवे जीवनाचे पहावे
चालता पुढे क्षण मागे रमावे

शुभ्र पहाटे अलवार झुलावे
सोनसकाळी उमलून यावे

तप्त धरेच्या कुशीत शिरावे
नारंगी संध्येस बिलगावे

रात्र रुपेरी मन फुलवावे
सुन्न काळोखी दीप उजळावे

निळ्या हासऱ्या नभाने झरावे
झाकोळल्या ढगांनी बरसावे

लेउन सारे रंग सजावे
इंद्रधनुषी जीवन जगावे.

- आरती.

Tuesday, 30 August 2011

' गणपतीची आरती '


देव गजानन
शिव-गौरी नंदन
गजमुख साजिरे
मनी वसते  ...

चांदीचा पाट
सोन्याचे ताट
मोत्याची माळ
गळा शोभते ...

दुर्वांची रास
पुष्प आरास
मोदक नैवेद्या
भक्त देतसे ...

चंदनी मखर
जरी पितांबर
माणिक मुकुट
शोभा वाढवी ...

सजली स्वारी
संतोष भारी
गणांच्या मनी
दाटुनी येई ...

मनीची आस
सांगे गणेशास
सद्बुद्धी दान
नित्य मिळूदे ...

!! जय गजानन !!

- आरती.

' सखा '

[ सप्टेंबर २००५ - फ्रेंडशीप डे निमित्ताने लिहिलेली एक कविता ]

जनि-मानसी तुज मी मिरवी
एकांती मग तू मज रमवी
तुज संगे करावे गोड गुज
तुझ्याच भोवती फिरे हितगुज

प्रिय जरी मज सखे सोबती
कुणास ना तुज परी मी सोपवी
हुरहूर दाटे वेड्या मनी
येशील ना रे सख्या परतुनी

अजून आठवे क्षण तो एक
लक्ष वेधलेस तुच अचूक
नवेपणाचा नवा सुगंध
नवी धाटणी नवाच बंध

किती ते रंग आणिक ढंग
तुझ्या संगती मन होई दंग
तुज भावती अज्ञ अन पंडित
सर्वांस देसी सुख तू अगणित

आणखी काय तुज मी तोलू
शब्द तोकडे कसे मी बोलू
रसिक हृदयी तुमचे राज
वंदन तुम्हास ग्रंथ महाराज !!

- आरती.