बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Wednesday, 13 July 2016

काव्यदिंडीच्या निमित्ताने .....


खरतरं गेली काही वर्ष कवितांच वाचन खूपच कमी झाल आहे. कारण जुनी पुस्तकं जवळ नाहीत आणि नवी घेतली गेली नाहीत. पण या काव्यदिंडीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसात कितीतरी नव्या, विस्मृतीत गेलेल्या, बऱ्याच कविता वाचनात आल्या. पण आता चार निवडायची वेळ आली तेंव्हा मात्र पुन्हा काहीच आठवेना. 

.नवीनच पुण्यात आले होते. 'डीएसके गप्पा' नावाच्या कार्यक्रमात ना.धो.महानोर काव्यवाचन करणार होते. त्या आधी मी महानोरांच्या बऱ्याच कविता वाचल्या होत्या, त्यांनी लिहिलेली गाणी ऐकली होती. पण दोन अडीच तासांच्या त्या कार्यक्रमात महानोरांची कविता एका वेगळ्याच रुपात समोर आली. महानोरांची कविता समजत नाही असे सहसा होत नाही. पण खरी भिडली ती त्यादिवशी. सहज - साधी - ओघवती शैली. कुठलाही अभिनिवेश नाही की 'स्टाईल' चा खटाटोप नाही. कविता, तिची निर्मिती प्रक्रिया, तिच्या जन्माची कहाणी आणि बरेच काही. कवितेतून श्रोत्यांशी साधलेला संवादच होता तो. त्या दिवसापासून महानोरांची कविता वाचतानाची मानसिकताच एकदम बदलली. 

.महानोरांची बरीच गाणी आणि कविता आवडत्या आहेत परंतु ही कविता आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारी आहे, म्हणून तिची निवड.

.पीक करपलं पक्षी दूरदेशी गेलं
गळणार्‍या झाडांसाठी मन ओथंबलं
वेढून नेणारी रित्या नभी वाहाटूळ
आसमंत वेटाळून काळजाची कळ
दु:ख पेलण्या एवढं बळ नाही डोलां
कडू काल्यावण्यांनी भारावला गला
कोवल्या गर्बाला जल्माआधी वनवास
वो मालवला दिसं, मालवला दिसं

- ना.धों. महानोर.

-------------------

मी बरीच वर्ष ठराविक कवींच्याच कविता वाचायचे. त्यामुळे बोरकर,मर्ढेकर,पद्मा गोळे यांच्या कविता मी कधी वाचल्याच नव्हत्या. पुण्यात यशवंतरावला बघितलेल्या सुनीताबाई देशपांडेंच्या 'एक कवितांजली' या कार्यक्रमात पहिल्यांदा माझी या कवींतांशी ओळख झाली. आणि मग सुनीताबाईंनी त्या कार्यक्रमात वाचलेल्या, नुसताच ओझरता उल्लेख केलेल्या आणि इतरही अजुन बऱ्याच कविता शोधून शोधून वाचल्या, वाचत राहिले. या सगळ्याजणींमध्ये लक्षात राहिली ती पद्मा गोळे यांची 'चाफ्याच्या झाडा'.

त्याचं कारणही तसंच आहे. काही कामासाठी मी सुनीताबाईंच्या घरी गेले होते. दोन मिनिटांचे काम होते पण दोन तासाहून अधिकवेळ मी तिथे होते. अर्थातच त्या बोलत होत्या आणि मी ऐकत होते. विषयातून विषय निघत, या कार्यक्रमाचा विषय निघाला आणि त्यांनी मला पद्मा गोळे यांची, त्यांना विशेष आवडणारी म्हणून ही कविता म्हणून दाखवली..
पुलंना जाऊन बरीच वर्ष झाली होती. त्याही बऱ्याच थकलेल्या दिसत होत्या. सगळीकडे एकटेपण भरून राहिलेलं ते घर तर अगदी सूनं सूनं वाटत होत. तिन्हीसांजेची वेळ होती आणि मी कविता ऐकत होते ............

चाफ्याच्या झाडा..
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु: ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा 
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा ….

नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू 
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात 
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर 
बसूनआभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा ….
पानात, मनात खुपतंय ना 
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय …. कळतंय ना ….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना.

– पद्मा गोळे..
---------------------------

सकाळ पेपरमध्ये एक सदर येत होते. नाव अजिबातच आठवत नाहीये. पण त्याअंतर्गत 'नवंकवी' म्हणून कवी सौमित्र यांची थोडक्यात ओळख आणि काही निवडक कविता छापून आल्या होत्या. थोड्या वेगळ्याच वळणाच्या त्या कविता खूपच आवडल्या.

अर्थातच माझी आजची कविता 'माझिया मना' सगळ्यात जास्त आवडली. तेंव्हाच कधीतरी त्यांचा
काव्यसंग्रह 'आणि तरीही मी' येत असल्याचे वाचले. तो मात्र सांगितल्या तारखेच्या खूपच उशिरा आल्याने
मधल्या काळात मी अनेकवेळा अप्पा बळवंत चौकात त्याच्या चौकशी करता चक्कर टाकून येत असे. अखेर तो आला.पण आधीच्या चार कविता वाचून वाढलेल्या अपेक्षा काही त्याने पूर्ण केल्या नाहीत. खूप उस्तुकतेने वाट बघितल्यामुळे असेल, माझी खूपच निराशा झाली आणि नंतर मी या कवीचे फारसे काहीच वाचले नाही. परंतु ही कविता मात्र कायमच आवडत्या कवितांच्या यादीत राहिली.'ऋतू हिरवा' ऐकल्या नंतर तर थोडी अधिकच भावली.
.
माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
माझिया मना, जरा बोल ना
एकटी न मी सोबतीस तू
माझिया मना, जरा ऐक ना
रात्र ही सुनी, तुझे बोलणे
तुझे धावणे अन मला वेदना
ओळखू कसे मी, हे तुझे ऋतू
ओळखू कशा मी तुझ्या भावना
सांजवेळ ही, तुझे चालणे
उषःकाल आहे नवी कल्पना

- सौमित्र (Kishor Kadam)
--------------------------------
NRI मायबोलीकर (www.maayboli.com) आले की त्यांना भेटायला पुण्यातले मायबोलीकर एकत्र जमायचे. अश्याच एका प्रसंगी माझ्यापासून ३ खुर्च्या लांब बसलेल्या वैभवने हात लांबवून त्याचा फोन मला दिला आणि 'हे ऐक' असे सांगितले. तोपर्यंत वैभवने मायबोलीवर टाकलेल्या सर्व कविता वाचत होते आणि त्या आवडतही होत्या. पण त्याची कविता त्याच्याच आवाजात त्यादिवशी मी पहिल्यांदाच ऐकत होते. आणि हा काही वेगळाच अनुभव होता. मला खात्री आहे अनेकवेळा त्याचे कार्यक्रम बघितलेले अनेकजण अगदी एकमताने हेच म्हणतील. :)

"वैभवच्या कविता" याबद्दल मी काही लिहिण्याची खरतरं आवश्यकताच नाही. कारण माझ्या मित्र यादीतल्या सर्व काविताप्रेमिनी त्या अनुभवलेल्या आहेत. इतकंच म्हणेन वैभवच्या कविता नेहमीच अगदी ताज्या आणि टवटवीत असतात.

असंख्य आवडत्या कवितांमधून एक निवडणे अवघडच होते पण ही अनेकवेळा त्याच्याकडून ऐकूनही पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी म्हणून हिची निवड .... 

'नेमस्त'
धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हाच्या ओळी
तो शहारला नेमाने ही कविता सुचतेवेळी
नित्यागत उमलत गेली हळुवार कल्पना त्याची
सवयीचा सुगंध आला होताच फुले शब्दांची
नेमस्त हरखला तोही द्यावया ना उरले काही
नेमस्त चरकला फिरुनी ... "ही शेवटची तर नाही?"
रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते...

- वैभव जोशी.

उर्सली

"उर्सली" ही एका छोट्या मुलाची एक छोटीशी गोष्ट आहे. मूळ जर्मन कथेच इंग्रजी रुपांतर रेवाकडे आहे. आणि सध्याच्या रोज वाचण्याच्या पुस्तकांपैकी ते एक आहे. कधी आम्ही पुस्तक हातात घेऊन वाचतो तर कधी गोष्ट म्हणून पुस्तक न घेताच तिला ऐकायची असते. अगदी सगळ्या बारकाव्यांसहित.
.
उन्हाळ्यात आपल्या सगळ्या जनावरांसाहित डोंगरावर राहायला जाणाऱ्या आणि हिवाळ्यात डोंगर पायथ्याशी आसऱ्याला येणाऱ्या एका कष्टकरी कुटुंबातला उर्सली हा एकुलता एक आणि समंजस मुलगा. गावातल्या एका उत्सवासाठी लहान मुलामध्ये वाटल्या जाणाऱ्या घंटापैकी सगळ्यात छोटी त्याच्या वाट्याला येते. आणि ती पण मोठ्या मुलांच्या दादागिरीमुळे. अपमानित झालेला उर्सली भर हिवाळ्यात, हिमवर्षाव - निसरडी वाट - थंडी यापैकी कशालाही न जुमानता डोंगरावरच्या घरातून मोठी घंटा आणतो आणि सगळ्यात मोठ्या घंटेचा मान मिळवून त्या उत्सवाच्या मिरवणुकीत पुढचे स्थानही मिळवतो. अशी काहीशी ती गोष्ट आहे.
.
परवा अचानकच इथे झुरिकमध्ये "Schellen-Ursli" नावाचा चित्रपट लागल्याचे वाचण्यात आहे. रेवाने अजून पर्यंत कधीच मोठ्या पडद्यावर चित्रपट बघितला नव्हता. म्हटलं चला तिला घेऊन जाऊ, लाडकी गोष्ट पडद्यावर बघण्याची जरा वेगळी गम्मत. मग शुक्रवारी जाऊन तिच्या वयाला चित्रपटगृहात प्रवेश असल्याची खात्री करून घेऊन तिकीट पण काढून आणले. उद्या सकाळी आपण नक्की काय करणार आहोत याचा तिला काहीच अंदाज नव्हता. 'मुव्ही बघायचा' असे म्हणत होती.
.
आज सकाळी गेलो. आत जाऊन आपापल्या खुर्चीत बसलो आणि जाहिराती सुरु झाल्या. बाईंचा चेहरा कोरा, दोन्ही हातांनी दोन्ही खुर्च्यांना घट्ट पकडलेले आणि एकदम स्तब्धपणे समोरच्या जाहिराती बघत होती. इतकी मोठ्ठी चित्र आणि घुमणारा आवाज दोन्ही अजून मानवत नव्हते. अशीच पाच एक मिनिटं गेल्यावर विचारले 'आई, उर्सली कधी येणार ?'
.
मग चित्रपट सुरु झाला. भरगच्च स्नो असलेल्या छोट्याश्या गावाच्या अनेक गल्ल्या दिसल्या आणि मग एका गल्लीच्या शेवटच्या टोकाला उर्सलीचे घर दिसल्या बरोबर म्हणाली 'आई, बघ उर्सलीच्या घरावर Drawing आहे'. इथून मग सगळे बारकावे तपासण सुरु झालं. आपण जो गोष्टीत ऐकला आहे, पुस्तकात ज्याच फक्त चित्र बघितलं आहे, तो 'उर्सली' असा समोर बघून खुदू खुदू हसू येत होत. तिच्या मनातल्या प्रतिमेशी तो किती मिळता जुळता होता माहिती नाही पण मधेच माझा हात पकडून हसून म्हणाली 'आई, उर्सली'.
गोष्टी इतका चित्रपटात गोडवा नाही. थोडा माल-मसाला आहेच. त्या खटाटोपात कोल्ह्याला उर्सलीचा मित्र दाखवले आहे. "डामरट तो कोल्हा' या तिच्या मनातल्या प्रतिमेला तडा गेल्यामुळे हा बदल तिला अजिबातच आवडला नाही. 'आई कोल्हा त्रास देतो ना सगळ्यांना ?! ' असे विचारण्यात आले. गोष्टीत, एवढा प्रचंड बर्फाच्छादित डोंगर चढून गेल्यामुळे थकलेला उर्सली घरात गाढ झोपलेला असतो. तेंव्हा बाहेर त्याच्या पावलांचे ठसे बघून तिथे जमलेले कोल्हे, हरणांना विचारतात 'हा लहान मुलगा इथे कशासाठी आला आहे ?' मग एक हरीण घरावर चढून तो आत नक्की काय करतो आहे ते बघून येते. हा प्रसंग चित्रपटात नव्हता. त्याची पण तातडीने आठवण करून देण्यात आली.
.
पण एकूण बर्फात खेळणारा उर्सली, बेडूक मुठीत पकडणारा उर्सली, शेळ्यांच्या मागे धावणारा उर्सली, गवतात लोळणारा उर्सली, कोल्हयाला चीज भरवणारा उर्सली, असा सगळ्या रूपातला उर्सली तिला खूपच आवडला. तिचे उस्फूर्त प्रश्न आणि मजेदार टिपण्णया ऐकता ऐकता, तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव निरखता निरखता माझा चित्रपट संपला. तिच्या डोळ्यांसमोर अजूनही चालूच आहे ......

Tuesday, 12 July 2016

आईचे प्रशस्तीपत्रक.

तशी तिला कुणाच्या कुठल्याही शिक्कामोर्तबाची आवश्यकता आणि तीही आत्ता नव्याचे तर अजिबातच नव्हती. पण मलाच असं वाटलं की तिने आयुष्यभर इतकं हरतऱ्हेच विणकाम केल आहे तर गंमत म्हणून तिच्यासाठी एक मागवावंच. 

खरतरं जागतिक विक्रमासाठी हा जो pattern आम्ही सगळ्यांनी विणला हा खूपच सोप्पा आणि अगदीच बेसिक लेव्हलचा होता. यापेक्षा कितीतरी अवघड, सुरेख आणि सुबक नमुने तिने आजपर्यंत केले आहेत. फक्त क्रोशाच नाही तर दोन सुयांचे विणकाम पण तिने चिक्कार केलं आहे. आम्हा भावंडांसाठी केलं, नातेवाईकांसाठी केलं, शेजारी-पाजारी, ओळखीचे-पाळखीचे अश्या असंख्य लोकांना तिने तिच्या हाताने विणून हरतऱ्हेचे प्रकार दिले आहेत. असा एकही प्रकार नाही जो तिने हाताळला नाही. बर फक्त विणून दिले नाही तर बऱ्याच लोकांना अगदी बोटाला धरून शिकवले पण आहे. आणि ती मात्र हे सगळ कुणाच्याही कुठल्याही मदती शिवाय नुसत डोळ्याने नमुना बघून बघून शिकली आहे / शिकते आहे.  

जे विणकामाचे तेच भरतकामाचे आणि शिवणकामाचेही. स्वतःच्या हाताने नक्षी काढुन अत्यंत सुबक पद्धतिने निरनीराळ्या टाक्यांनी ती सजवणे यात तीचा हातखंडा होता. आम्ही बहिणी श्रीरामपूर सोडेपर्यंत तिने शिवलेलेच कपडे घालत असू. कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय तिने शिवलेले सगळे कपडे अगदी व्यावसायिक नमुन्यांच्या तोडीस तोड असायचे. शिवणकाम तर तिने किती लोकांना शिकवले त्याची गणनाच नाही. अनेकजणी तर त्यानंतरही तिच्याकडून कपडा बेतून घ्यायला यायच्या आणि मग घरी जाऊन शिवायच्या. 

अजूनही या वयातही, घरकाम झाले की लगेच तिचे हात भरतकाम-विणकाम-शिवणकामात गुंतलेले असतात. लाडाच्या नातवंडांसाठी नवेनवे प्रकार अजूनही ती त्याच उत्साहाने करत असते.

बाकी पाककला, चित्रकला, हस्तकला असे ज्या कश्याच्या मागे-पुढे 'कला' हा शब्द येतो त्या सगळ्यातही ती पारंगत आहेच. नव्यानव्या गोष्टी माहिती करून घेणे आणि त्या सगळ्याचे नव्याने प्रयोग करून बघणे हे सगळे ती या वयातही करते आहे.

आमच्या "पंचक्रोशीत" तिला तिच्या गुणांसाठी ओळखणारे अनेक आहेत. तिला ओळखणाऱ्या सगळ्यांनीच नेहमीच भरभरून तिची स्तुती केली आहे. तिच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला तिच्या कलागुणांच भरपूर कौतुक आहे. अगदी "भरून पावावं" इतक्या मोठ्या प्रमाणावर हे असं सगळ कौतुक आजपर्यंत तिच्या वाट्याला बरेचदा आलं आहे. 

पण तरीही माझी इच्छा म्हणून तिच्या शिरपेचात हा एक छोटासा तुरा माझ्याकडून ............


Sunday, 13 March 2016

'रानबखर'

[ही बखर आहे, इतिहास नाही. पक्षधराने लिहिलेल्या घडल्या गोष्टीचेच हे कवन आहे. स्वत: रानात असताना आणि रानसख्यांवर लिहिली, म्हणून ही रानबखर.]
----------------------------------------------------------------------------------------------------
जानेवारी २०१४ ला हे पुस्तक प्रकाशित झाले. लगेच वाचायचे ठरवूनही विकत घ्यायलाच मे २०१५ उगवला आणि वाचायला मार्च २०१६. तर ही बखर मुख्यतः लक्षात राहते ती आदिवासींवर झालेल्या अन्यायाची कहाणी म्हणून, पण ती त्यापुरतीच मर्यादित नक्कीच नाहीये. समस्या मांडल्या आहेत पण त्यांची उत्तरं पण सुचवली आहेत. मिलिंद थत्ते स्वतः गेली अनेक वर्षे या लोकांबरोबर वास्तव्य करून आहेत त्यामुळे विचारप्रक्रिये मधुन डोकावणारे आणि जाणिवपूर्वक सुचवलेले सगळेच पर्याय पटण्याजोगे आहेत.
.
पुस्तकाच्या सुरुवातीला आदिवासींच्या आयुष्याची अगदी जवळून ओळख करून दिली आहे. त्यांचे जंगलाशी असलेले नाते, त्यांचे परस्परावलंबित्व, पर्यावरण प्रणालीत असलेले त्यांचे मुख्य स्थान, जंगलाभोवती वसलेलं त्याचं जग आणि त्यांची जीवनपद्धती. हे सांगत असतानाच त्यांची अल्पसंतुष्ट वृत्ती, कधी परिस्थितीशी सहज जमवून घेणारे तर कधी परिस्थितीवर लीलया मात करणारे असे त्यांच्या आयुष्यातले बारकावे दाखवणारे अनेक प्रसंग आले आहेत. संदर्भाने एके ठिकाणी त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रसंगी करण्यात येणाऱ्या नाचांच्या प्रकारांच सवीस्तर वर्णन आलं आहे. अहाहा, अगदी लगेच उठून एखाद्या आदिवासी पाड्यावर चक्कर मारून यावी असं वाटायला लावणारं ते सगळ वर्णन आहे. अशी ही सगळी जीवनपद्धति विस्ताराने सांगीतल्याने पुढे मांडलेल्या समस्यांचं गांभीर्य थेट पोहोचलं आहे.
.
नक्षलवादाचा उगम आणि वाटचाल, आदिवासी लोकांची झालेली परवड आणि उध्वस्त झालेली आयुष्य, सरकार आणि संस्थांनी त्यांच्या तोंडाला पुसलेली पानं आणि केलेली फसवणूक, याची अनेक उदाहरणं पुस्तकात दिलेली आहेत. हे पुस्तक वाचण्याआधी "Reserve Forest" आणि "Buffer Zone" या शब्दांच कोण कौतुक होतं मला. पण हे सगळं वाचताना त्याचा नेमका अर्थ, हेतू आणि परिणाम समजले आणि डोळेच उघडले. ज्यांना वनबंदी करण्यात आली किंवा ज्यांची जमीन गेली, त्यांनी नक्की काय भोगलं ते असं लांबून पुस्तक वाचून समजेलच अस नाही पण या पुस्तकात अशी अनेक उदाहरणं आहेत जी अस्वस्थ, खूप अस्वस्थ करून गेली. त्यातलच हे एक, नन्हेरामच .... पूर्ण अबोल झालेल्या नन्हेरामने एकदाच तोंड उघडलं आणि म्हणाला "साहेब, त्या धरणाच्या पाण्यात मी जेंव्हा होडीतून जात असतो तेंव्हा तिथे पाण्याच्या मध्यावर मी थांबतो. मला दिसतं तिथे - तिथेच शेकडो फूट खाली माझ गाव आहे, घर आहे आणि शेतही आहे. आणि ते सगळ कायमचं हरपलं आहे, या जाणीवेने माझा ऊर फाटतो. ती वेदना मला सहन होत नाही."
.
मुंबईपासून सुरुवात करून सह्याद्री,सातपुड्याची सफर घडवत, बऱ्हाणपूरमार्गे मेळघाटातून छत्तीसगढ गाठून थेट झारखंड पर्यंत फिरवून आणताना वाटेत भेटणारी जंगलं-नद्या आणि त्यांच्या आश्रयाने विसावलेल्या विविध आदिवासी जमातींची माहिती इतकी सहज सोप्प्या भाषेत दिली आहे की डोळ्यापुढे नकाशाच उभा राहतो. 
.
पुस्तकातली भाषा ही 'पुस्तकी' अजिबातच नाही. रोखठोक बोली भाषा आहे. आणि त्यामुळेच अगदी समोर बसून एखाद्या हाडाच्या कार्यकर्त्याने त्याची तळमळ / तळतळ आपल्या समोर मांडवी आणि आपण अस्वस्थपणे ऐकावी, असा काहीसा हा अनुभव आहे. 
.
बाकी सरकारी यंत्रणा आणि संबंधित संस्था यांच्या 'कारभाराची' नुसती वर्णन वाचूनच माझे पाय गळाले. तर त्या सगळ्याचा इतक्या जवळून आणि वारंवार अनुभव घेऊनही खंबीरपणे उभं असलेल्या आणि इतरांना उभं रहाण्यास प्रोत्साहन देणाऱ्या 'वयम्' ( Vayam ) टीमला सलाम. 
.
आवर्जून वाचा.
.
रानबखर - मिलिंद थत्ते. 
समकालीन प्रकाशन.
पृष्ठे - ९५.
किंमत - १०० रुपये.


--------------------------
'वयम्' ही मिलिंद थत्ते यांनी स्थापन केलेली सामाजीक संस्था आहे. त्यांचे सगळे काम या संस्थेमार्फतच चालते. वयम् चे वैशीष्ठ्य म्हणजे त्यंच्याबरोबर काम करणारे बहुसंख्य कर्यकर्ते हे चळवळीतुन तयार केलेले / झालेले 'स्थानिक' कार्यकर्ते आहेत. 
वयमच्या फेसबुक पानाची लिंक :
https://www.facebook.com/VayamIndia/
---------------------------
पुस्तक बुकगंगावर उपलब्ध आहे.
http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=%E0%A4%B0%E0%...


Wednesday, 5 August 2015

ब्लाउसी लेक.

एका गावात एक निळ्या डोळ्यांची सुंदर मुलगी रहात होती. तिचा प्रियकरही त्याच गावात रहात असे. गावाजवळच्या एका छोट्या तळ्यावर ती त्याला भेटायला जायची. सूर्यास्तापासून ते अगदी चंद्राचे प्रतिबिंब त्या नितळ पाण्यात उमटे पर्यंत ती दोघे तिथेच असायची. असेच मजेत दिवस चालले होते. पण एके दिवशी काही वेगळेच घडले. पाय घसरून तो पडला. पडला तोच एका टोकदार दगडावर. डोक्याला मार लागला आणि सगळाच खेळ संपला.

ती अगदी सैरभैर झाली. जे घडल आहे त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. त्याच्या आठवणीनी व्याकूळ झालेली ती अजूनही रोज संध्याकाळी तळ्यावर जात होती. तळ्याच्या मध्यात बोट घेऊन जायची आणि तिथेच बसून ती आक्रोश करत रहायची. अशा कितीतरी रात्री गेल्या पण ती आपले दुख:त्या तळ्याला रोज सांगत राहिली. आणि एक दिवस नाका-तोंडात पाणी जाऊन गुदमरून मृत झालेले तिचे शरीर पाण्याच्या तळाशी सापडले. शेजारीच खचून रुतलेली ती बोटही.

तिच्या निळ्या डोळ्यांच्या स्पर्शाने तळ्याचे पाणी त्यादिवशी निळे झाले ते कायमचेच...........

तेच हे ब्लाउसी लेक. ब्लाऊ म्हणजे Blue म्हणजेच निळे. गर्द झाडीत वसलेले हे अगदी छोटेसे तळे आहे. आम्ही गेलो होतो तेंव्हा तिथल्या नावाड्याने आम्हाला वरील कथा सांगितली. खर सांगायचं तर त्याची सत्यासत्यता पडताळून पहावी असे वाटलेच नाही.

तर, स्वित्झर्लंडच्या सहलीत ईंटरलाकेनला भेट देणार असाल तर आवर्जून याचाही समावेश करावा असं हे ठिकाण आहे. आल्प्स पर्वतरांगाच्या आसपास आढळणाऱ्या जलाशयांमध्ये हे सगळ्यात देखणे आहे असे ऐकले. 'कांडेरगृंड' नावाच्या गावाजवळ 'कांडेर' नदीच्या खोऱ्यात एका विस्तीर्ण उद्यानाच्या साधारण मध्यावर हे तळे आहे. तळ्याच्या एका बाजूला प्रचंड उंचीचा एक कातळ आहे. निळे आणि संपूर्ण पारदर्शक असे पाणी, नितांत सुंदर परिसर, खच्चून भरलेले निसर्ग सौंदर्य, डोळ्यांसाठी पर्वणी ठरावी असे सगळे दृश्य आहे. वल्ह्याच्या एका छोट्याश्या बोट राईडची सोय आहे. बोटीच्या तळाला काच लावलेली आहे जेणेकरून तळ्याच्या मध्यभागी सुद्धा, जिथे खोली साधारण ४० फुट आहे, पाण्याच्या पारदर्षषकतेचा अनुभव घेता येतो आणि जलाशयाचा तळ अगदी स्पष्ट दिसतो. पलीकडेच लहान मुलांना खेळण्यासाठी 'प्ले एरीया' पण आहे. बसायला लाकडी बाक आहेत. ग्रीलची पण सोय आहे. तसे तळे निरखून बोट राईड ईत्यादीसाठी तास-दीडतास खूप झाला. पण एक पूर्ण दिवस तिथे घालवायला आवडावा असे हे ठिकाण नक्कीच आहे.

१५००० वर्षांपूर्वी तळ्याच्या मागच्या डोंगरावरून दरड कोसळल्याने खळगा तयार होऊन या तळ्याची निर्मिती झाली. जलाशयाच्या तळाशी जिवंत झरे आहेत त्यामुळे पाणी स्वच्छा आणि पिण्यास योग्य आहे. आश्चर्य म्हणजे भर हिवाळ्यातही तापमान जेंव्हा शून्याच्या कितीतरी खाली गेलेले असते तेंव्हाही या तळ्याचे पाणी गोठत नाही. या पाण्याचे तापमान वर्षभर ८ ते ९ डिगरी सेल्सिअस असे स्थिर रहाते. त्यामुळे यात रंगीबेरंगी मासे आणि बदकं वर्षभर वास्तव्याला असतात. (पर्यटकांना हे गोड्या पाण्यातले ताजे मासे मिळण्याची सोय शेजारच्या हॉटेल चालकाने केलेली आहे). तळ्यातले सगळे पाणी दर ८ दिवसांनी पूर्णपणे नव्याने येते, जुने वाहून जाते अशी अजून एक माहिती त्या नावाड्याने दिली.

एवढेसे ते तळे पण त्यातही देखणे छोटेखानी लाकडी पूल बांधलेले आहेत. तळ्याच्या संपूर्ण बाजूबाजूने 'वॉक वे' केलेला आहे. त्यावरून फेरफटका मारताना अजून काही बारकावे लक्षात येतात. पाण्यात तळाशी काही ओंडके, झाडांची खोडं पडलेली दिसतात. चौकशी केल्यावर समजले की ती तशीच २०० वर्षांहून अधिक काळ तिथेच पडून आहेत, अजिबात न कुजता, खराब न होता. हा त्या पाण्याचा अजून एक गुणधर्म. तळ्या भोवतीच्या या फेरफटक्यातच आपल्याला एक देखणे शिल्प दिसते. कुण्या शिल्पकाराने त्या 'निळ्या डोळ्यांच्या' मुलीची आठवण म्हणून तिचे दगडी शिल्प पाण्याच्या तळाशी बनवले आहे.

जुलै-ऑगस्ट या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये इथे बरीच गर्दी असते. पण आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गेलो होतो तेंव्हा हवा तर मस्त होतीच पण गर्दी अजिबातच नव्हती. अजून एखादाच ग्रुप तिथे आलेला होता. त्यामुळे थोडे सिझनच्या आधी गेले तर निवांतपणे तिथल्या सृष्टी सौदर्याची, शांततेची मजा घेता येऊ शकते. तळ्याच्या मागच्या बाजूने 'ट्रेक / ट्रेल' साठी पण मार्ग तयार केलेला आहे. आवड आणि सवड असल्यास तिकडेही एक फेरफटका मारता येतो.

उघडण्याच्या वेळा :
उन्हाळ्यात - सकाळी ९ ते संध्याकाळी ५,
हिवाळ्यात - सकाळी १० ते संध्याकाळी ५

१. झुरीकहून जायचे असल्यास,
स्वत:ची गाडी असल्यास साधारण २.३० तासांचा प्रवास आहे. अंतर १५० किमी.
ट्रेनने जायचे असल्यास ३ तासाचा प्रवास आहे. झुरिक मुख्य स्थानकावरून ट्रेन मिळेल Zurich - Spiez - Frutigen (इथे ट्रेन बदलावी लागते) - Kandergrund.
(झुरिकहून झरमॅटकडे जाणाऱ्यांनाही 'ब्लाउसी लेक' बघून पुढे जाता येऊ शकते.)

२. 'इंटरलाकेन' या लोकप्रिय पर्यटन स्थळापासूनही बस किंवा ट्रेनने ब्लाउसीला जाणे सहज शक्य आहे.
स्वतःची गाडी असल्यास ४५ मिनिटांचा प्रवास आहे. अंतर ४० किमी.
ट्रेनने जायचे असल्यास १.३० तासांचा प्रवास आहे. Interlaken Ost east - Spiez - Frutigen (इथे ट्रेन बदलावी लागते) - Kandergrund.

**********
काही फोटो ....
.
1_0.JPG
.
2_0.JPG
.
3_0.JPG
.
4_0.JPG
.
5_0.JPG
.
6_0.JPG
.
7_0.JPG
.
8_0.JPG
.
9_0.JPG
.
10_0.JPG
.
11_0.JPG
.
12_0.JPG
.
13.jpg

Tuesday, 7 July 2015

'स्विस आजी आणि भारतीय पदार्थ'

'मटकीची उसळ' मी कधी कुणाला शिकवेल अशी मी कधीच कल्पनाही केली नव्हती. पण आत्ताच वरच्या आजींना शिकवून आले.

आदल्या दिवशी त्या मला सांगून गेल्या होत्या की उद्या २ वाजता करूया. मी त्यांना रात्री मटकी भिजत घालायला आणि सकाळी एकदा पाणी बदलायला सांगितले. त्यांच्याकडे नसणारच असा विचार करून मी जाताना तिखट-मिठाचा डबा आणि एका छोट्या डबित गुळाचा खडा घेऊन गेले. पण आश्चर्य म्हणजे मी त्यांच्या घरात गेले तेंव्हा ओट्यावर सगळी जय्यत तयारी मांडलेली होती. त्यात मिठ, धणेपूड, जिरे, कडीलींब, गरम मसाला, तेल, हळद आणि खडा हिंग या सगळ्या वस्तू होत्या.

स्वयंपाकाची म्हणा किंवा खाण्यापिण्याची, मनापासून आवड असेल तर ती अशी यानात्या प्रकारे दिसतेच.

झाले असे की एक दिवस आजोबा रेवाला घेऊन गेले. जाताना म्हणाले तिला मी जेवायला घालतो एमिलिया बरोबर. आम्ही आज भाताचा एक प्रकार केला आहे. मग १० मिनिटांनी परत आले आणि म्हणाले तुम्ही सगळेच या जेवायला आज आजींनी सगळा शाकाहारी स्वयंपाक केला आहे.

मी मटकीची उसळ केली होती आणि गाजराचा हलवा. ते घेऊन आम्ही जेवायला गेलो. मटकीला त्यांनी 'स्मॉल बिन्स' म्हंटले आणि खूप आवडीने खाल्ले. कसे केले ते पण विचारले. मग त्यांनी केलेला तांदळाचा डोसा कसा मस्त कुरकुरीत झाला पण चवीला थोडा वेगळाच झाला, आजोबांनी केलेले फुलके कसे निट जमलेच नाहीत असे सगळे विषय झाले. त्यांच्याकडे असलेले भारतीय पाककृतींचे पुस्तक त्यांनी मला दाखवले वगैरे वगैरे.

भारतीय पदार्थ आणि त्यात वापरण्यात येणारे घटकपदार्थ याची त्यांना असलेली प्रचंड माहिती बघून मी आश्चर्यचकितच  झाले. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, एकदा झुरिकमध्ये 'धर्मगुरूंची' कमतरता होती म्हणून भारतातून एकजणांना बोलावण्यात आले. झुरिकला येण्यासाठी त्यांची एक अट होती, 'भारतीय पदार्थ बनवून देणारा स्वयापाकी उपलब्ध करून देण्यात यावा.'  त्यावेळी स्वयंपाकाची आवड असलेल्या या आजींनी ती जबाबदारी स्वीकारली होती. आणि काही पाककृतींच्या पुस्तकांच्या मदतीने त्यांनी 'धर्मगुरूंची' मागणी पुर्ण केली होती. त्यावेळी त्यांना भारतीय अन्नपदार्थांची भरपूर माहिती तर मिळालीच पण त्यांना स्वतालाही ती पदार्थांची चव आवडली ती कायमचीच.

'दोस्यात छोटे आणि मोठे तांदूळ वापरलेले असतात' असे काही घोळ त्यांचे होतात पण शोधून वाचून विचारून दोघेही आवडीने भारतीय पदार्थ करून मज्जेत खातात याचे मला खूपच आश्चर्य आणि कौतुक वाटते. :)


Monday, 2 March 2015

मर्यादा (?)

आम्ही लहान असताना श्रीरामपुरला दरवर्षी सर्कस यायची. कॉलनीतल्या एक कोणीतरी काकू सगळ्यांच्या पोरांना नेऊन सर्कस दाखवून आणायच्या. दिवसा उजेडी चालू होईल आणि उजेड असेपर्यंतच संपेल असा एखादा खेळ निवडलेला असायचा.

आवारात पोहोचल्या बरोबर तंबूच्या डाव्या बाजूला ठेवलेले प्राणी जास्तीत जास्त जवळ जाऊन बघायची खूप घाई असायची तेंव्हा. वाघ-सिंह पिंजऱ्यात आणि हत्ती-घोडे साखळीने-दोरखंडाने बांधलेले.

वाघ-सिंह पिंजऱ्यातून बाहेर आले तर !!?? तो एवढा मोठ्ठा हत्ती सुटला तर !!?? अशी आमची चर्चा चाले. पण, एवढा मोठा ताकदवान हत्ती इतक्या छोट्याश्या साखळीला बांधला आहे, जी तोडणे त्याच्यासाठी अगदीच सहज शक्य आहे, आणि तरीही ती न तोडता तो शांत उभा आहे. हे काही तेंव्हा लक्षात आले नाही.

पुढे कधीतरी कोणाकडून तरी एक गोष्ट ऐकली. हत्तीच्या पिल्लाला म्हणे लहानपणापासूनच, त्याची ताकद अगदीच कमी असल्यापासून साखळीला बांधून ठेवतात. सुरुवातीला तो ती तोडायचा प्रयत्न करतो पण त्याला ते शक्य होत नाही. त्याच्या मनावर हे पक्के ठसले जाते कि हि साखळी तोडून टाकणे आपल्याला शक्य नाही. त्यामुळे कितीही मोठा झाला तरी एकदा साखळी बांधली कि हत्ती अगदी शांतपणे बांधलेल्या अवस्थेत तसाच उभा रहातो.

पर्वा असेच एका मैत्रिणीशी बोलताना हि गोष्ट पुन्हा आठवली.

नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येऊन मला २ वर्ष होऊन गेली होती. बऱ्याच ओळखी झाल्या होत्या. एक छोटा ग्रुप मिळाला होता. आम्ही काही मित्र-मैत्रिणी एकत्र कार्यक्रम वगैरे बघायला जायचो. एकदा एका मैत्रिणीने विचारले,
'असा-असा कार्यक्रम आहे येतेस का ?'
'कधी, कुठे ?' - मी.
'रात्री ९ चा आहे, टिळक स्मारकला .'- ती.
'मी नाही जात अग इतक्या उशिरा बाहेर' - मी.

माझे हे उत्तर तिने ऐकले आणि मग माझे छोटेसे बौद्धिकच घेतले.

'जात नाहीस हे कळाले, पण का जात नाहीस ?' - ती.
'आग आमच्या घरी लहानपणापासून अशीच पद्धत आहे', - मी.

'बर ठीक आहे, चांगली पद्धत आहे हि. पण तुमचे गाव लहान होते, तुम्ही मुली-मुलीच होत्या, वगैरे वगैरे वगैरे. म्हणून कदाचित तुमच्या घरी तशी पद्धत असेल. पण इथे पुण्यात उशिरा बाहेर जाणे सुरक्षित आहे, शिवाय आम्ही तुला घरापर्यंत सोडायला तयार आहोत मग काय हरकत आहे यायला ?.

बदलत्या परिस्थिती प्रमाणे सवयी बदलाव्या अग. निदान तेंव्हा ते तसे का होते, याची कारणं शोधून, आत्ता या परीस्थीतीत ती खरच तशीच्या तशी लागू होतात का, हे बघायला काय हरकत आहे ?

नुसतेच 'नाही' म्हंटल्याने होणार काय आहे तर, तुझा एक चांगला कार्यक्रम बघायचा राहून जाणार आहे. कधी कधी आपली आपणच स्वत:ला इतकी बंधन घालतो, आणि आयुष्य त्यातच अडकून पडते.' - ती.

'हम्म्म्म .... ' - मी.

मनातल्या मनात मात्र हत्तीची गोष्ट आठवत होती.

त्यादिवशी मी नाही गेले. पण नंतर काही दिवसांनी, माझ्या घराजवळच पाताळेश्वराच्या मंदिरात त्रिपुरी पोर्णिमे निमित्त 'पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा' कार्यक्रम होता. मी जाणार होते. संध्याकाळी अचानक तीच मैत्रीण दारात.

'काय करते आहेस ?'-ती.
'काही नाही, कार्यक्रमाला निघाले होते'-मी.
'बाहेर सगळेजण आले आहेत, आम्ही पण येतो तुझ्याबरोबर' -ती.
'अरे व्वा ... !!'-मी.

मी तिच्या बरोबर बाहेर आले. सगळा ग्रुप मंदिराकडे निघाला. तिथेच बाहेर सगळ्यांनी गाड्या लावल्या होत्या. तिथे पोहोचल्या बरोबर सगळे आपापल्या गाड्या काढायला लागले. मी म्हंटले, 'काय रे कार्यक्रम नाही बघायचा का ?'

सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिले 'नाही, आपण Jackie Chan चा चित्रपट बघायला चाललो आहोत, अलकाला'.

गुपचूप गेले त्यांच्या बरोबर. बाहेरच कुठेतरी खाल्ले-पिल्ले, चित्रपट बघितला आणि रात्री १२ ला वगैरे घरी आले.

नंतर बरेच दिवस सगळे मलाच चिडवत होते, 'काय हे, बाळासाहेबांचा कार्यक्रम सोडून Jackie Chan' :) :)

मग चिक्कार फिरले, पुणे आणि आसपास. भरपूर कार्यक्रम/नाटकं/चित्रपट बघितले. रात्रीचे ट्रेक केले. मजेत गेले ते सगळे दिवस. पण हा प्रसंग आठवला कि अजूनही माझी मलाच मजा वाटते.

असा मित्र-मैत्रिणींचा उपयोग होतो फारफार
अबकी बार मोदीसरकार ..... :)

(हे लिहिले तेंव्हा मोदी सरकार येण्याच्या मार्गावर होते)