बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Tuesday, 12 June 2012

मदन मोहन - The Uncrowned King of Gazals.

संगीताची विशेष आवड असल्याने माझ्या आजोबांकडे ग्रामोफोन होता आणि उत्तम गाण्यांच्या रेकॉर्ड्सचा बराच मोठा संग्रह पण होता. वयोमानपरत्वे , ग्रामोफोन काढून, त्याला किल्ली देऊन, रेकॉर्ड्सच्या लाकडी पेटीतून रेकॉर्ड शोधून गाणे लावणे, असा सगळा उद्योग करण्यापेक्षा रेडिओ ऐकणे त्यांना सोयीचे वाटू लागले. आणि एका भेटीत तो ग्रामोफोन त्यांनी आमच्या हवाली केला.

लाईट गेले आणि फारसे काही करण्यासारखे नसले की,­ मी आणि माझी मोठी बहिण तो ग्रामोफोन घेऊन एक-एक गाणे ऐकायचो. त्याला किल्ली देणे वगैरे करावे लागायचे, आणि एका रेकॉर्डमधे एकच गाणे ऐकायला मिळायचे. त्यामुळे आमची आवड फारशी टिकली नाही. पण अनेक दुर्मिळ नाट्यगीते आणि जुनी हिंदी चित्रपट गीते आम्ही तेंव्हा ऐकल्याचे आठवते. शाळेतच होतो, फारशी चित्रपट गीतांची ओळख पण नव्हती त्यामुळे बहुतेक सगळीच गाणी आमच्यासाठी नवीन होती.

असेच एकदा रात्री 'न ऐकलेली' एक रेकॉर्ड लावली आणि मदन मोहन या संगीताच्या जादुगाराशी माझी ओळख झाली. गाण होत 'जरासी आहट होती है, तो दिल सोचता है ....' ओळख झाली म्हणणं तसं चुकिचच ठरेल. कारण गाण आवडलं होत तरी संगीतकार कोण, हे काही मी बघितले नव्हते. 'लता मंगेशकर'चा आवाज ओळखू आला होता आणि चाल आवडली होती.

एकदा असेच वडिलांनी २ कॅसेट आणल्या होत्या, 'लता मंगेशकर - सेंटीमेंटल मूड'. रिकामा वेळ मिळाला की त्या लावणे असा माझा एक उद्योगच होता. त्याच का ? तर त्या नवीन आणलेल्या होत्या आणि त्या सोडून घरात असलेल्या इतर कॅसेट अभंगवाणी किंवा गीत रामायणाच्या होत्या. सगळ्या गाण्यांमध्ये 'तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा ...' आणि 'यु हसरतों के दाग मुहोब्बत में धो लिये ....' ही दोन गाणी जास्त आवडली. आणि 'लता मंगेशकरची गाणी मस्त असतात' असे काहीसे मत तयार झाले. पुढे दूरदर्शनवर 'अदालत' बघितला, सगळीच्या सगळी गाणी आवडली. 'वो कौन थी' बघितला, 'मेरा साया' बघितला आणि पुन्हा तेच. कधीतरी रेडिओवर 'लग जा गले, के फिर ये, हँसी रात हो ना हो ...' ऐकले. गाण संपल्यावर निवेदिकेने सांगितले, 'या गाण्याचे संगीतकार होते मदन मोहन'. खऱ्या अर्थाने 'त्या दिवशी' माझ्या मनावर हे नाव कोरले गेले. मग गाण खूप आवडल की त्याचे संगीतकार मदन मोहनच असणार असं मनातल्या मनात म्हणून होत असे.

स्मित

पुढे कधीतरी कॅसेटचा संग्रह करण्याचा छंद लागला. अदालतची कॅसेट पुष्कळ शोधली पण मिळेना. ओळखीच्या एक जणांनी सुचवले, 'लता - मदन मोहन' अशी एक कॅसेट मिळते, ती घे. एक गाणे वगळता बाकी सगळ्या गझल त्यात आहेतच.' कॅसेट आणली तेंव्हा असे लक्षात आले की मदन मोहन यांची उत्तम म्हणता येतील अशी बरीच गाणी लता मंगेशकरनेच गायली आहेत. हळू हळू या संगीतकाराची गाणी, त्याची कारकीर्द असे सगळेच जाणून घ्यायची उस्तुकता वाटायला लागली. त्याकाळी इंटरनेट घरोघरी नव्हते. त्यामुळे जिथे कुठे मिळेल तिथे 'मदन मोहन' नाव दिसले की वाचून काढायचे, असा एक नवाच छंद सुरु झाला.

'मदन मोहन' हे नाव 'लक्ष्मि-प्यारे' किंवा 'शंकर-जयकिशन' यांसारखे ज्याच्या त्याच्या तोंडी नव्हते. 'मदन मोहन' यांचे संगीत ओळखणारा आणि त्यांची गाणी आवडणारा ठराविक वर्गच होता. त्यांची कारकीर्द तशी लहानच होती. पण अविस्मरणीय नक्कीच होती. अवघ ५० वर्षाचं उणपुर आयुष्य लाभलेल्या या अलौकिक संगीतकाराचा मृत्यूचमुळी माझ्या जन्माच्या आसपासचा. पण त्याच्या संगीताने माझ्याही पिढीला भुरळ घातलीच. पुढे अजून किती पिढ्या हे वेड जोपासणार आहेत ते येणारा काळच सांगेल.

मुळचे पंजाबी असलेल्या मदन मोहन यांचा जन्म इराक मधे २५ जून १९२४ ला झाला. जन्म इराकमधला असला तरी मदन मोहन यांचे शालेय शिक्षण आणि एकूण जडण घडण पंजाब आणि मुंबई मधे झाली. अगदी लहान म्हणजे २ वर्षांचे असल्यापासून त्यांना गाणी ऐकण्याची आवड होती. वाचता न येणारा मदन रेकॉर्ड्सच्या गठ्ठ्यातून पाहिजे ती रेकॉर्ड अचूक कशी काढू शकतो याचे, त्यांच्या आई-वडिलांइतकेच त्याला ओळखणाऱ्या सगळ्यांनाच कुतूहल होते. संपूर्ण आयुष्यात मदन मोहन यांनी गाण्याचे शास्त्रोक्त म्हणता येईल असे शिक्षण फारसे कधी घेतले नाही. त्यांची आई आणि आजोबा यांचे गाण्यावर विशेष प्रेम होते. संगीताची आवड त्यांना त्यांच्या आईकडून मिळाली असे ते म्हणतात. "मनापासून इच्छा असेल तर ऐकून ऐकून सुद्धा गाणे शिकता येते, त्यासाठी गुरुगृही जायलाच हवे असे नाही. अत्यंत विद्वान आणि सखोल ज्ञान असलेल्या शास्त्रीय संगीताच्या अभ्यासक / पूजकां बरोबर काम करण्याची मला जी वारंवार संधी मिळाली, तिच्यातूनच माझी गाण्याची समज आणि उमज वाढत गेली", असे ते म्हणत.

पहिले प्रेम संगीत जरी असले तरी, वडिलांच्या आग्रहावरून मदन मोहन आर्मीत गेले. तिथे काही काळ काम केल्यावर त्यांचे संगीत प्रेम उफाळून आले. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस त्यांनी आर्मी सोडली आणि लखनौ रेडिओवर काम करू लागले. तिथे त्यांनी काही उत्तम संगीत रचना तर केल्याच पण त्यांच्या संगीत प्रेमाला उत्तम संस्कारही मिळाले. उस्ताद फय्याज खान, उस्ताद अली अकबर खान, बेगम अख्तर, तलत मेहमूद अशा त्या वेळच्या सर्व उस्ताद मंडळींचा सहवास आणि मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी मदन मोहन यांना भरभरून मिळाल्या. हीच शिदोरी घेऊन त्यांनी लखनौ सोडले आणि मुंबई गाठले. तोपर्यंत त्यांचे वडील बॉम्बे टॉकीज आणि फिल्मीस्तान सारख्या कंपन्यांमध्ये भागिदारी व्यवसायात स्थिर झाले होते. अत्यंत देखणे व्यक्तिमत्व लाभलेल्या मदन मोहन यांना हिंदी चित्रपटसृष्टीत हिरोची भूमिका करण्याची इच्छा होती. तसे ते शोभलेही असतेच, पण तसे होणार नव्हते.

'परदा' नावाचा एक हिंदी चित्रपट त्यांच्याकडे चालून आलाही होता. मदन मोहन यांची हिरोची भूमिका असलेला हा पहिलाच चित्रपट काही कारणाने पूर्ण झालाच नाही. त्या नंतरही शहीद (१९४८), आंसू (१९५३), मुनीमजी (१९५४) असे काही चित्रपट मदन मोहन यांना मिळाले. पण अभिनेता म्हणून फारसे यश किंवा समाधान मिळेल अशा त्या भूमिका नव्हत्या. शेवटी पुन्हा एकदा मदन मोहन यांनी 'संगीत' या आपल्या मूळ आवडीवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. मदन मोहन यांना उत्तम 'गळा' लाभलेला होताच. त्यांच्या आवाजाचा एक वेगळाच बाज होता. चित्रपटात हिरोच्या भूमिका करता करताच त्यांनी काही गाणी पण गायली. जसे 'शहीद' मधले गाणे, 'पिंजडे में बुलबुल बोले, मेरा छोटासा मनवा डोले'. लता मंगेशकर बरोबर गायलेले त्यांचे हे पहिले युगुल गीत. पुढे स्वतःच संगीतबद्ध केलेली अनेक गाणी त्यांनी गायली. संगीतकार एस.डी.बर्मन आणि शाम सुंदर यांच्याकडे काहीकाळ असिस्टंट म्हणून काम केल्यावर त्यांना स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून संधी मिळाली. तिचे तर त्यांनी सोने केलेच पण आपल्या संगीत कारकिर्दीच्या सुवर्णकाळाची मुहूर्तमेढही तेंव्हाच रोवली.

१९५० साली आलेल्या 'आँखे' या चित्रपटापासून सुरु होऊन मदन मोहन यांची कारकीर्द थांबते ती त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी, २००३ साली, आलेल्या 'वीर-झारा' या चित्रपटानंतर. वीर-झारा वगळता, संगीतकार म्हणून त्यांची कारकीर्द आहे २५ वर्षांची. १९५० ते १९७५. या कळत एकूण १०७ चित्रपटांसाठी साधारण ६७६ गाण्यांना त्यांनी संगीत दिले. त्यापैकी २८ गाणी अप्रकाशितच राहिली. या २५ वर्षांत त्यांनी अनेक सुंदर रचना दिल्या आणि एक ताकदीचे संगीतकार म्हणून नावलौकिक मिळवला. मात्र त्याकाळी प्रतिष्ठेचे समजल्या जाणाऱ्या बॅनरचे काम, प्रसिद्ध नट-नट्यांचे चित्रपट आणि प्रतिष्ठेचे पुरस्कार यांनी त्यांना हुलकावणीच दिली. या गोष्टीची खंत मात्र त्यांच्या मनात शेवटपर्यंत राहिली. आणि हीच गोष्ट त्यांच्या अकाली मृत्यूलाही जबाबदार ठरली असे वाचले. रसिकांचे प्रेम मात्र मदन मोहन यांना भरभरून मिळाले. संगीत शौकीनांबरोबरच समकालीन गायकांचेही प्रेम मदन मोहन यांना भरभरून मिळाले. संगीत क्षेत्रात त्यांचे नाव तेंव्हाही आणि आजही आदरानेच घेतले जाते. आज जवळ जवळ चाळीस वर्षानंतरही मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली एक एक गझल अनेक वेळा ऐकणारा श्रोता नक्कीच सापडतो.

त्यांच्या लहानपणीची एक आठवण वाचल्याचे आठवते. २ वर्षांच्या मदनला आई वडिलांनी एक ड्रम वाढदिवसाची भेट म्हणून दिला. योगायोगाने त्याच्या आसपासच इराक पोलिसांचे बँड पथक यांच्या घरासमोरून चालले होते. छोटा मदन आपला ड्रम घेऊन त्या पथकात सामील झाला आणि वाजवत वाजवत पुढे निघून गेला. मुलगा घरात कुठे दिसेना म्हणून शोधाशोध केल्यावर, हे छोटे साहेब पोलीस स्टेशनमधे सापडले. असेच मुंबईला असताना त्यांना वडिलांकडून रेडिओ भेट म्हणून मिळाला. ७-८ वर्षांचा मदन, रेडिओवर ऐकलेली सगळी गाणी, कितीही अवघड रागात बांधलेले असले तरी, जशीच्या तशी म्हणून दाखवत असे. लाहोरमधे असताना सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा धार्मिक कार्यक्रम असो, छोट्या मदनचे गाणे असणारच असणार. आर्मीमध्ये असताना पण मदन मोहन एक से बढकर एक म्युझिकल प्रोग्राम्स तयार करून सादर करत. मुंबईत असताना त्यांच्या घराजवळच 'जद्दन बाई', नर्गीसची आई, यांचे घर होते. अत्यंत प्रसिद्ध अशा या शास्त्रीय गायिकेच्या घरी अनेक मैफिली होत असत. आई-वडिलांचा डोळा चुकवून, रात्र रात्र जागून मदन मोहन या मैफिली ऐकत असत. देशभरातील प्रसिद्ध आणि अवलिया संगीततज्ञांना ऐकणे, हि छोट्या मदनसाठी पर्वणीच होती. एकूण काय तर अगदी बालवयापासूनच संगीत हि त्यांची आवड होती, त्यांचा श्वास होता. केवळ त्यामुळेच आज आपण त्यांना एक वेगळ्या वाटेवरचा वेगळा संगीतकार म्हणून ओळखतो. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर "The creation of film music is not a mere mechanical and business proposition, but has its roots deep down in the past of a man - in his very sensibilities, upbringing, emotions, ambitions, hopes, loves and desires... all of which go into making the man he is "

नसानसात गाणे जरी मुरलेले असले तरी एक संगीतकार म्हणून मदन मोहन यांची वाटचाल काही सहज सोप्पी नव्हती. फिल्म इंडस्ट्रीमधे असूनही या क्षेत्रात काम करण्यासाठी असलेला वडिलांचा प्रखर विरोध. जवळ अजिबात पैसा नसताना, कामाच्या शोधात करावी लागणारी वणवण. एखादे फुटकळ काम मिळाले तरी त्या बदल्यात न मिळणारा मोबदला. सगळीकडे मानहानी, अपमान, उपासमार. रात्र-रात्र एकट्याने भटकत विचारांच्या चक्रात अडकल्याने, मार्ग न सापडणे. असे सगळे अनुभव मदन मोहन यांना पण आलेच. अखेर १९५० साली संगीतकार म्हणून स्वतंत्ररीत्या त्यांना पहिला चित्रपट मिळाला 'आँखे'. इथेपण, त्यांच्या अनेक उत्तम रचनांपैकी सर्वाधिक रचना जिच्या नावावर आहेत त्या 'लता मंगेशकरने' या त्यांच्या पहिल्या चित्रपटात गाण्यास नकार दिला. मदन मोहन जरी या चित्रपटाचे फक्त संगीतकार होते तरी, चित्रपटासाठी पैसा कमी पडू नये, योग्य वितरक मिळावेत, व्यवस्थित जाहिरात व्हावी, अशा सर्वच गोष्टींसाठी मदन मोहन यांनी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. आणि अखेर आँखे हा चित्रपट लोकांसमोर आला. मदन मोहन यांची गाणीपण लोकांना आवडली.

आँखे मधली ऐकली गेलेली गाणी म्हणजे,
१. प्रीत लगाके मैने ये फल पाया, सुदबुध खोई, चैन गवाया : मुकेश [ http://www.youtube.com/watch?v=DzKMEEtO4UI ]
२. हमसे नैन ना मिलाना : शमशाद बेगम. [ http://www.youtube.com/watch?v=HERqJs1Uyfs ]

या गाण्यांची फारशी चर्चा जरी झाली नाही तरी मदन मोहन यांना पुढचे काम मिळाले, १९५१ साली आलेला 'मदहोश'. यातली गाणी मात्र खऱ्या अर्थाने गाजली. मदन मोहन यांच्या ३ आवडत्या गायकांपैकी एक म्हणजे 'तलत मेहमूद'. यांच्या आवाजातले 'मेरी याद में तुम ना आंसू बहाना' हे गाण याच चित्रपटातलं. अवघ्या ५ मिनिटात मदन मोहन यांनी "राजा मेहदी अली खान" यांच्या शब्दांना चालीत बांधले आणि निर्मात्याची शाब्बास मिळवली होती.

गम्मत म्हणजे मदन मोहन यांच्या या दुसऱ्याच चित्रपटाची मात्र ९ पैकी ६ गाणी लता मंगेशकर यांनी गायली होती. पण सगळ्यात जास्त गाजले ते तलत यांच्या आवाजातले 'मेरी याद में ...' [ http://www.youtube.com/watch?v=DVMu5ZzPHJ4 ]

मदहोश नंतर आला 'आशियाना'. या चित्रपटाने त्यांना यशस्वी संगीतकारांच्या यादीत नेऊन बसवले. यातले 'मै पागल मेरा मनवा पागल' हे एकच गाणे करायला मदन मोहन यांना पूर्ण एक महिना लागला. या चित्रपटातली जवळ जवळ सगळीच गाणी गाजली.

१. मेरा करार ले जा, मुझे बेकरार कर जा, दम भर तू प्यार कर जा : लता मंगेशकर. [ http://www.youtube.com/watch?v=FXWAZWs1w3E ]
२. तुम चांद के साथ चले आओ, ये रात सुहानी हो जाये : लता मंगेशकर. [ http://www.youtube.com/watch?v=prntL9q8Oyo ]
३. मेरे पिया से कोई, जाके केहदे, जीवन का सहारा तेरी याद है : लता मंगेशकर. [ http://www.youtube.com/watch?v=QY257Mk3274 ]
४. मै ना जानू, मेरे दिल को ये क्या हो गया : लता मंगेशकर. [ http://www.youtube.com/watch?v=JYcVe3QPTxM ]
५. मै पागल, मेरा मनवा पागल, पागल मेरी प्रीत रे : तलत मेहमूद [ http://www.youtube.com/watch?v=6COwjHks8HM ]

या नंतर त्यांना काम तर मिळू लागले. पण एका मागे एक धडाधड चित्रपट स्विकारणे त्यांच्या स्वभावाला रुचणारे नव्हते. त्यांच्या मते एका चित्रपटाच्या कथेतून बाहेर यायला मधे थोडा वेळ जायला हवा, तरच पुढच्या कथेशी एकरूप होता येते आणि चपखल चाली सुचतात. या त्यांच्या नियमाला अनुसरुन जे काही काम त्यांनी स्वीकारले त्यातली काही गाणी गाजली, काही नाही गाजली. गाजलेल्या काही गाण्यांपैकी,

१. [निर्मोही-१९५२] ये कहे चांदनी रात, सुनादो अपने दिल की बात : लता मंगेशकर.[ http://www.youtube.com/watch?v=BnTZVyYsVEE ]
२. [निर्मोही-१९५२] कहा भी ना जाये पिया, सहा भी ना जाये : लता मंगेशकर [ http://www.youtube.com/watch?v=DiqFeTsZhhw&feature=results_video&playnex... ]
३. [बागी-१९५३] हमारे बाद अब मेहफिल में अफसाने बया होंगे, बहारे हमको धुंदेंगी न जाने हम कहा होंगे : लता मंगेशकर. [ http://www.youtube.com/watch?v=vBaV-KgfVnw ]
४. [धून-१९५३] बडी बरबादिया लेकर हमारी दुनियामे प्यार आया : लता मंगेशकर [ http://www.youtube.com/watch?v=YrdTgcsQ_W8 ]
५. [मस्ताना - १९५४] मत भूल अरे इन्सान : मो. रफी [ http://www.youtube.com/watch?v=FSAfbAAaqNU&feature=related ]
६. [मस्ताना - १९५४] दुनिया के सारे गमोन से बेगाना, मै हु मस्ताना : मो.रफी [ http://www.youtube.com/watch?v=6cDOczwPjm8 ]

त्यांच्या आवडत्या गायकांपैकी अजून एक म्हणजे, मो.रफी. रफी बरोबर केलेला 'मस्ताना' हा पहिला चित्रपट. त्या नतर जेंव्हा जेंव्हा संधी मिळाली, मदन मोहन यांनी मो.रफी यांच्या बरोबर गाणी केली.

७. [रेल्वे प्लॅटफॉर्म-१९५५] चांद मध्धम है, आसमान है, निंद की गोद में जहां चूप है : लता मंगेशकर [ http://www.youtube.com/watch?v=L1f8QIL1AB8 ]
८. [रेल्वे प्लॅटफॉर्म-१९५५] बस्ती बस्ती, पर्बत पर्बत गाता जाये बंजारा, लेकर दिल का एकतारा : मो.रफी [ http://www.youtube.com/watch?v=iZPzaH91d3A&feature=results_video&playnex... ]
९.[रेल्वे प्लॅटफॉर्म-१९५५] देख तेरे भगवान की हालत क्या हो गई इन्सान, कितना बदल गया भगवान : मो.रफी [ http://www.youtube.com/watch?v=ONhVXPh_kvQ ]

या चित्रपटातली पण रफीची २ गाणी जास्त गाजली. आणि त्याबरोबर लताचे एक, ज्या गाण्यात आपल्या संगीताने मदन मोहन यांनी अत्यंत सुंदर वातावरण निर्मिती केली आहे. निरव शांत रात्री एकटेच डोळे मिटून बसून ऐकण्याची काही खास गाणी असतात. हे त्यातलेच एक, 'बेला के फुल' प्रकारात मोडणारे. स्मित

१०. [पॉकेटमार - १९५६ ये नयी नयी प्रीत है, तू हि मेरा मित है : लता + तलत [ http://www.youtube.com/watch?v=6jVdfGM6Kss ]
११. [पॉकेटमार - १९५६ दुनिया के साथ चल प्यारे : गीता दत्त [ http://www.youtube.com/watch?v=tPsq3GzNCvQ ]

पॉकेटमारमधल्या 8 गाण्यांपैकी 7 गाणी एकट्या 'लता मंगेशकर'ने गायली होती. पण या सगळ्या आठही गाण्यांमध्ये वैविध्य दिसून येते. प्रत्येक गाण्याचा एक वेगळा ठेका आहे.

या नंतर आलेला 'भाई-भाई' हा मदन मोहन यांचा पहिला सुपरहिट म्हणता येईल. या चीत्रपटाच्यावेळी त्यांनी पहिल्यांदा किशोर कुमारला एक गाणे दिले. मदन मोहन यांची गाणी रागदारीवर आधारित, आणि गायला थोडी अवघड अशीच असायची, त्यामुळे किशोर कुमार बरोबर त्यांनी फारसे काम केले नाही. खुद्द लता मंगेशकरने पण एके ठिकाणी म्हंटले आहे, 'मदन भैय्यांची कम्पोझिशन गाणे खूप अवघड जात असे'.

१२. [भाई-भाई : १९५६] ए दिल मुझे बता दे, तू किसपे आ गाय है : गीता दत्त [ http://www.youtube.com/watch?v=E5mw13wST8o ]
1३. [भाई-भाई : १९५६] मेरा नाम अब्दुल रेहमान : किशोर कुमार, लता मंगेशकर [ http://www.youtube.com/watch?v=EgMS5O-CBZQ&ob=av3e ]
१४. [भाई-भाई : १९५६] कदर जाने ना, मेरा बालम बेदर्दी : लता मंगेशकर [ http://www.youtube.com/watch?v=zIfljj9Zluw ]
१५. [भाई-भाई : १९५६] मेरा छोटासा देखो ये संसार है : लता मंगेशकर [ http://www.youtube.com/watch?v=4n8An_SXzuI ]
१६. [भाई-भाई : १९५६] दिल तेरी नजर में अटका : लता मंगेशकर, निम्मी [ http://www.youtube.com/watch?v=DRjJjOVJ6v4 ]

भाई-भाई प्रदर्शित झाला, साधारण त्याच सुमारास 'मदन मोहन' आपली स्वतःची अशी एक 'स्टाईल' लोकप्रिय करण्यात यशस्वी होत होते. त्यांच्या गाण्यांची वेगळी एक छाप लोकांच्या मनावर पडत होती. आणि त्यांचा स्वतःचा अस एक चाहत्यांचा वर्ग तयार होऊ लागला होता. कामाचा ओघही वाढला होता. पण मदन मोहन, 'वर्षाला फक्त तीन चित्रपट' या आपल्या नियमावर ठाम होते. शिवाय नवनवीन प्रयोग करण्यातही दंग होते. नवीन कलाकार, नवीन दिग्दर्शक, अगदीच लो बजेट चित्रपट, यातली कुठलीही एक गोष्ट मदन मोहन यांना उत्तम चालींना वाव असलेले चित्रपट स्वीकारण्यापासून थांबवू शकत नसे. याचेच एक उदाहरण म्हणजे, १९५७ साली आलेला 'देख कबीरा रोया'. या चित्रपटातली पण जवळ जवळ सगळी गाणी गाजली. नुसतीच गाजली नाही, तर त्या वर्षीच्या 'सुपरहिट' गाण्यांमध्ये जाऊन बसली. हा चित्रपट म्हणजे मदन मोहन किती 'व्हर्सटाईल ' होते याचे एक उत्तम उदाहरण आहे. मो.रफी, मन्ना डे, तलत मेहमूद, आशा भोसले, गीता दत्त, सुधा मल्होत्रा आणि अर्थातच लता मंगेशकर अशा ७ गायकांकडून त्यांनी या चित्रपटातली एकूण १० गाणी गाऊन घेतली आहेत.

१७. [देख कबीरा रोया : १९५७] हम बुलाते हि रहे, तुम जलाते हि रहे, ओ सनम ये कहाकी मुहोब्बत है : आशा भोसले, मो.रफी [ http://www.youtube.com/watch?v=r-xS3GmwlfM ]
१८. [देख कबीरा रोया : १९५७] तू प्यार करे या ठूकराये, हम तो है तेरे दिवानोमे : लता मंगेशकर [ http://www.youtube.com/watch?v=vuaSiol9Kew ]
१९. [देख कबीरा रोया : १९५७] कौन आय मेरे मन के द्वारे : मन्ना डे [ http://www.youtube.com/watch?v=O_vcV7JGKpY ]
२०. [देख कबीरा रोया : १९५७] मेरी विना तुम बिन रोये, सजना : लता मंगेशकर [ http://www.youtube.com/watch?v=qHL9FxHJPlU ]
२१. [देख कबीरा रोया : १९५७] हमसे आया ना गया, तुमसे बुलाया ना गया : तलत मेहमूद [ http://www.youtube.com/watch?v=0FdShtk9FYA ]
२२. [देख कबीरा रोया : १९५७] बैरन हो गयी रैना : मन्ना डे [ http://www.youtube.com/watch?v=MGTlCMEbP7s ]

मदन मोहन 'फिमेल व्हॉईस'साठी जास्त चाली बांधतात आणि सगळ्या उत्तम चाली 'लता मंगेशकर' कडूनच गाऊन घेतात, अस एक आरोप त्यांच्यावर होत असे. पण त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी केलेली गाणी आणि त्यातले वैविध्य बघितले तर या आरोपात फारसे तथ्य आहे असे वाटत नाही. त्या त्या प्रसंगाला अनुरूप चाल आणि त्या त्या चालीला अनुरूप आवाज हे एकच उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी काम केले असावे असे मला तरी त्यांची गाणी ऐकताना / बघताना नेहमीच जाणवते. अशा भोसले यांनी पण एके ठिकाणी म्हंटले आहे, 'मदन भैयांनी लता दीदीला चांगली गाणी दिलीच पण मला एक लाख मोलाचे गाणे दिले, 'झुमका गिरा रे'. मेरा साया मधील या एकाच गाण्याने देश-परदेशात मला लाखो रुपये कमावून दिले.'

१९५८ साल मदन मोहनसाठी एक नवीन पदवी / किताब घेऊन आले. ज्या चित्रपटामुळे मदन मोहन 'गजल किंग' किंवा 'गजलचा बादशहा' म्हणून ओळखले जाऊ लागले तो 'अदालत' याच वर्षी आला. एकाच चित्रपटात अनेक सुंदर गजल रचना त्या पूर्वी कधीच आल्या नव्हत्या. एक वेगळेच वलय आणि प्रसिद्धी या चित्रपटाने मदन मोहन यांना दिली. नर्गिस, प्रदीप कुमार सारखे कसलेले अभिनेते, लता मंगेशकर यांचा आवाज आणि मदन मोहन यांचे संगीत. सगळीच गाणी अविस्मरणीय न होतील तरच नवल. प्रत्येक गाणे त्या त्या प्रसंगाशी अक्षरशः एकजीव झाले आहे. खरेतर मदन मोहन यांना ओळखणाऱ्या / न ओळखणाऱ्या सगळ्यांच्याच अगदी ओठावर असलेली हि गाणी आहेत, तरीही ....

२३. [अदालत : 1958] जमि से हमे आसमाँ पर, बिठाके गिरा तो न दोगे : आशा भोसले, मो.रफी [ http://www.youtube.com/watch?v=K5tpoJHFC1Q ]
२४. [अदालत : 1958] यु हसरतोंके दाग मुहोब्बत में धो लिये : लता मंगेशकर [ http://www.youtube.com/watch?v=Wrazbln8K9o ]
२५. [अदालत : 1958] उनको ये शिकायत है के हम, कुछ नही केहते : लता मंगेशकर [ http://www.youtube.com/watch?v=sqc91Wm4XHQ ]
२६. [अदालत : 1958] जाना था हमसे दूर, बहाने बना लिये : लता मंगेशकर [ http://www.youtube.com/watch?v=pvwC9c81esY ]
२७. [अदालत : 1958] जा जा रे जा साजना, काहे सापनोमे आये : लता मंगेशकर, आशा भोसले. [ http://www.youtube.com/watch?v=93qA-oICtYI ]

अदालत नंतर मात्र मदन मोहन यांना मिळालेल्या प्रत्येक चित्रपटात एक तरी गजल असावीच असा निर्माता / दिग्दर्शकांचा आग्रहच असे. मदन मोहननी पण निर्माता दिग्दर्शकाबरोबरच आपल्या चाहत्यांच्याही अपेक्षा नेहमीच पूर्ण केल्या. अदालत नंतर काही वर्षांनी बदलत्या काळाशी आणि बदलणाऱ्या आवडी निवडींशी जुळवून घेण्यासाठी मदन मोहन यांनी आपल्या काम करण्याच्या पद्धतीत काही बदल केले, पण ती काम मिळवण्यासाठी केलेली तडजोड नव्हती तर एक नवीनच छटा घेऊन त्यांचे संगीत अजूनच मोहक रुपात रसिकांसमोर आले. या त्यांच्या स्टाईलचा प्रभाव नंतर कित्येक वर्षे फिल्म इंडस्ट्रीवर रेंगाळत होता.

त्यांच्या नावावर असे अजून अनेक चित्रपट आहेत, अदालत सारखीच ज्याची सगळीच्या सगळी गाणी लोकप्रिय झाली. जसे, 'संजोग', 'अनपढ','आप की परछाईयां'', 'हकीकत'','जहाँआरा','पूजा के फुल','सुहागन', 'रिश्ते-नाते','वो कौन थी', 'दुल्हन एक रात की', 'मेरा साया','दस्तक','हिर रांझा', 'लैला मजनू', 'हसते जख्म', 'मौसम' ई.

वास्तविक पाहता, चेतन आनंदचा 'हकीकत' हा भारत-चीन युद्धावर आधारित चित्रपट होता. संपूर्ण चित्रीकरण लदाखमधे आणि त्यात पुन्हा ९०% सीमेच्या आसपास झालेले. गाण्यांसाठी फार काही संधी आहे असे वरकरणी तरी वाटणार नाही असे कथानक आणि पार्श्वभूमी. पण या चित्रपटासाठीही मदन मोहन यांनी तब्बल ५ गाणी केली आणि ती सगळीच त्या त्या ठिकाणी 'फिट्ट' बसली. भरपूर गाजली हे वेगळे सांगायला नकोच.

२८. [हकीकत: १९६४] कर चले हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथीयो : मो.रफी [ http://www.youtube.com/watch?v=nBbmW9JpbUg ]
२९. [हकीकत: १९६४] मै ये सोच कर उसके दर से उठा था, के वो रोक लेगी, मना लेगी मुझको : मो रफी. [ http://www.youtube.com/watch?v=6p6VvdCuxJM ]
३०. [हकीकत: १९६४] जरासी आहट होती है तो दिल सोचता है, कही ये वो तो नही : लता मंगेशकर [ http://www.youtube.com/watch?v=8znmhy45nW4 ]
३१. [हकीकत: १९६४] खेलो ना मेरे दिलसे : लता मंगेशकर [ http://www.youtube.com/watch?v=4f9rcpCmbkI ]
३२. [हकीकत: १९६४] होके मजबूर मुझे उसने बुलाया होगा : मो.रफी, तलत मेहमूद, मन्ना डे, भूपेंद्र [ http://www.youtube.com/watch?v=wq2Elyi2toc ]

यातल्या चौथ्या गाण्याचे विशेष असे की, चित्रपटात सामील केले गेलेले नसूनही हे गाणे भरपूर लोकप्रिय झाले, ऐकले गेले. पाचव्या गाण्याचे विशेष असे की चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच आघाडीचे ४ गायक एकाच गाण्यात एकत्र गात होते. असे अनेक वेगवेगळे प्रयोग मदन मोहन यांच्या नावावर सापडतात. जसे लता मंगेशकरने गायलेल्या 'चंदन' या चित्रपटातील एका गाण्यात त्यांनी, ७० वादक आणि ५० सहगायाकांचा वापर केला होता. चित्रपटसृष्टीच्या ईतीहासात असे पहिल्यांदाच घडत होते. नंतर असे प्रयोग अनेकवेळा झाले. हिर-रांझा मधले 'ये दुनिया, ये मैफील ...' या चार कडव्यांच्या गाण्यात, प्रत्येक कडव्याची चाल तर वेगळी आहेच पण कडवे सुरु होण्याआधी वाजवलेला 'म्युझिक पिस' पण वेगवेगळा आहे. प्रत्येक कडवे एक स्वतंत्र गाणेच वाटावे अशा पद्धतीने बांधलेले, पण तरीही धृवपदावर येउन गाण्याच्या मुळ चालीत सहज सामावले जाणारे. [अर्थात कैफी आजमींचे शब्द आणि रफीचा आवाज या गाण्याला एक वेगळीच उंची द्यायला तितकेच सहाय्यभुत आहेत.] नवीन प्रयोग ही मदन मोहन यांची आवड होती आणि ते यशस्वी करण्याइतकी प्रतिभाही त्यांच्याजवळ होती.

अगदी आपल्या पहिल्या-दुसऱ्या चित्रपटापासून ज्यांची गाणी गाजतच होती. प्रत्येक चित्रपटागणिक एका पेक्षा एक सरस रचना आणि सतत काहीतरी नवे देण्याचा नुसता प्रयत्न नाही तर यशस्वी प्रयत्न ज्यांनी केला. अशा या गुणी संगीतकाराला त्याच्या कामाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी मात्र पूर्ण २० वर्ष वाट बघावी लागली. १९५० साली पहिले गाणे त्यांनी केले होते. आणि १९७० साली 'दस्तक' या चित्रपटासाठी 'सर्वोत्तम' संगीतकारासाठी दिले जाणारे राष्ट्रीय पारितोषिक मदन मोहन यांना देण्यात आले. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना मिळालेले हे एकमेव प्रमाणपत्र. [कदाचित म्हणुनच त्यांछे ज्येष्ठ पुत्र 'संजीव कोहली' यांनी खेदाने / दुखाने आपल्या वडिलांचा उल्लेख 'The Uncrowned King of Gazals' असा केला असावा.]

३३. [दस्तक:१९७०] बय्या ना धरो ओ बलमा, ना करो मोसे रार : लता मंगेशकर [ http://www.youtube.com/watch?v=VSERYQGm6fE ]
३४. [दस्तक:१९७०] तुमसे कहू एक बात, परोंसे हलके हलके : मो.रफी [ http://www.youtube.com/watch?v=5KSXucPZhAk ]
३५. [दस्तक:१९७०] हम है मता-ए-कुचाओ बाजार की तरहा : लता मंगेशकर [ http://www.youtube.com/watch?v=8DJxsY8l1FM ]
३६. [दस्तक:१९७०] माई री, मै का से कहु प्रीत अपने जिया की : मदन मोहन/लता मंगेशकर [ http://www.youtube.com/watch?v=abpFlf-wiYI ]

'माई री ...' हे गाणे लता मंगेशकर आणि मदन मोहन दोघांच्याही आवाजात ऐकायला मिळते. त्या बद्दलचा ऐकलेला किस्सा असा. गाण्याचे रेकॉर्डिंग अजून झालेले नव्हते. लता मंगेशकर काही वेगळ्या कामात व्यस्त होत्या. दिग्दर्शकाला तर चित्रीकरणाची घाई होती. म्हणून मग शेवटी मदन मोहन यांनी स्वतःच्याच आवाजात हे गाणे रेकॉर्ड केले आणि चित्रीकरण पार पाडले. नंतर परत तेच गाणे चित्रपटाच्या आवश्यकतेनुसार लता मंगेशकरच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. लता मंगेशकरच्या व्यस्त असण्याने मदन मोहनच्या चाहत्यांना एक मोठी देणगी कायमचीच मिळाली. मला स्वत:लाही मदन मोहन यांच्या आवाजातच हे गाणे ऐकणे जास्त आवडते.

या मनस्वी संगीतकाराला, संगीत आणि गाण्याव्यतिरिक्त अजूनही बरेच छंद होते. एकूण आयुष्य भरभरून जगण्याची त्यांना हौस होती, असेच त्यांनी जोपासलेल्या आवडी-निवडी वरून लक्षात येते. पोहणे आणि व्यायामाची त्यांना विशेष आवड होती. उत्तम शरीरयष्टी राखण्याबद्दल ते जागरूक असत. बॉल रूम डान्स बरोबरच मैदानी खेळांची पण त्यांना आवड होती. फुटबॉल, बॉक्सिंग, बिलियर्डस या सारख्या खेळांमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले होते. वेळात वेळ काढून क्रिकेट खेळणे पण त्यांना आनंद देत असे. त्यांचे रणजी क्रिकेटच्या संघात सिलेक्शन होता-होता राहिले होते. बुद्धिबळात त्यांना हरवणे क्वचितच कुणाला शक्य होत असे. 'दारा सिंग' च्या स्पर्धा पहिल्या रांगेत बसून बघणे, आणि बसल्या जागेवरून त्याला आपले 'पॅक्स' दाखवून चिडवणे त्यांना आवडायचे. त्या काळातहि त्यांनी एक वैयक्तिक प्रशिक्षक ठेवला होता, ज्याची त्यांना शरीर सौष्ठव टिकवण्यासाठी मदत होत असे. आपल्या कुटुंबियांबरोबर पत्ते खेळणे, बाहेर जेवायला जाणे यासाठी ते आवर्जून वेळ राखून ठेवत असत. रविवारी 'रेस' बघायला जाणे पण त्यांना आवडे. त्यासाठी कुठला खास पोशाख घालायचा तो ते स्वतः खरेदी करत असत.

या सगळ्या बरोबरच उत्तम पाक कौशल्यही त्यांच्याकडे होते. आणि आपल्या कुटुंबासाठी वेगवेगळे पदार्थ करून त्यांना चकित करणे त्यांना आवडत असे. बऱ्याच नवीन पाककृती त्यांनी स्वतः शोधून काढल्या होत्या. हे करताना 'स्टार्ट टू एंड' सगळी तयारी ते स्वतः करत. अगदी बाजारात जाऊन उत्तम दर्जाचे समान विकत आणण्यापासून. इतके व्यस्त आयुष्य जगणाऱ्या या संगीतकाराला घरातली साफ सफाई करणे पण आवडत असे. आणि वेळ काढून ती ते करत असत. स्वतःच्या 'कार' बद्दल तर ते विशेष जागरूक असत, त्यामुळे ती धुण्यापासून तिची सगळीच देखभाल ते स्वतःच करत. ड्रायव्हिंग ही पण त्यांची एक आवड होती. 'मुंबई ते दिल्ली' सगळा प्रवास त्यांनी एकट्याने गाडी चालवून केला होता. एकूणच त्यांना प्रवासाची आवड होती. संपूर्ण भारत तर ते फिरले होतेच पण परदेशातही बराच प्रवास त्यांनी केला होता. अत्यंत वक्तशीर अशी त्यांची ओळख शेवटपर्यंत होती.

बापरे केवढे हे गुण. मला असे वाटते मुळात सकारात्मक दृष्टीने आयुष्याकडे बघणे ज्याला जमते त्याला समोर दिसणाऱ्या प्रत्येकच गोष्टीत 'आनंद' हा सापडतोच. आणि मग तो कुठल्याही गोष्टीचा दर्जा ठरवण्यात वेळ न घालवता, त्यातून आनंद कसा घेता येईल किंवा कसा देता येईल याच नशेत जगतो. मदन मोहन असेच मनसोक्त जगले असावेत असेच वाटते. इतका हुरूप होता, इतकी व्यस्तता होती, मनाच्या काना-कोपऱ्यात संगीत होते, पण तरीही एका छोट्याश्या निराशेने त्यावर मात केली.

मला नेहमीच एक प्रश्न पडत आलेला आहे. आपल्यावर प्रेम करणारे, आपल्या कर्तुत्वावर विश्वास असणारे अनेक लोक आस-पास असताना, चार-दोन छोट्या मनाच्या, अहित चिंतकांच्या म्हणण्याला, इच्छेला महत्व देऊन आपण स्वतःचेच नुकसान करून घेत आहोत हे खरच मदन मोहन सारखेच अनेकांच्या लक्षातच येत नसेल का? परमेश्वराकडून दुर्मिळ अशी देणगी लाभलेली हि व्यक्तिमत्व, आपला प्रवास अर्धाच सोडून अशी अचानक आपल्यातून निघून जातात तेंव्हा समाजाचे जे नुकसान होते, ते खऱ्या अर्थाने कधीही भरून येत नाही.

मदन मोहन यांच्या बाबतीत पण काहीसे असेच झाले. वरती म्हंटल्या प्रमाणे, त्यांना मोठ्या बॅनरचे काम फारसे मिळाले नाही. पुरस्कार पण मिळाले नाहीत. त्यांच्या कामाच्या दर्जात त्याने तसूभरही फरक पडला नाही, तरी त्यांच्या मानसिक अवस्थेत मात्र बराच फरक पडत गेला. अजून एक म्हणजे, पूर्वी रेकॉर्डिंगसाठी खूप कमी संख्येने स्टुडीओ उपलब्ध होते. आपल्याला योग्य दिवशी काम करता यावे यासाठी, त्याचे आगाऊ आरक्षण करावे लागत असे. ज्या संगीतकारांकडे भरपूर काम होते, किंवा भरपूर काम मिळण्याची ज्यांना खात्री होती, थोडक्यात ज्यांची तेंव्हा चालती होती, असे संगीतकार, संपूर्ण महिना-महिना स्टुडीओ आपल्या नावावर आरक्षित करून ठेवत असत. यातून दोन गोष्टी साध्य होत होत्या. एक म्हणजे, आपल्याला हवा तेंव्हा स्टुडीओ उपलब्ध असे आणि दुसरे म्हणजे छोट्या, नव्या किंवा कमी काम असलेल्या एखाद्या संगीतकाराचे काम स्टुडीओ उपलब्ध नाही म्हणून यांना परस्पर मिळवता येत असे. कधी-कधी पुष्कळ विनंत्या करून थोड्यावेळा साठी हे नावाजलेले संगीतकार स्टुडीओ द्यायला तयार होत असत. हि गोष्ट मदन मोहन यांना खूप खटकत असे, आणि त्यांना त्याचा त्रासहि होऊ लागला. या सगळ्या मनस्तापातूनच त्यांच्या सवयी आणि आजार बळावले. अत्यंत रसिकतेने आयुष्याचा आनंद उपभोगलेल्या या महान संगीतकाराला, असे दु:खी बघणे परमेश्वरालाही शक्य झाले नसावे. अल्पावधीतच त्यांचा मृत्यू झाला, १४ जुलै १९७५.

Madan Mohan1.jpg

मला आवडणारी [ज्यांचा उल्लेख राहून गेला अशी], मदन मोहन यांची काही गाणी खाली देते आहे. तुमच्या आवडीची पण नक्कीच त्यात सापडतील.

[दिल की राहे] रस्मे उलफत को निभाये तो निभाये कैसे

[मेरा साया] तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा
[मेरा साया] नयनोमें बदरा छाये, बिजुरी सी चमके हाये
[मेरा साया] आप की पेहलू में आकर रो दिये, दास्तान ए गम सुनाकर रो दिये
[मेरा साया] झुमका गिरा रे, बरेली के बाजार में
[मेरा साया] नयनों वाली ने हाय मेरा दिल लुटा

[अनपढ] आप की नजरोने समझा, प्यार के कबिल मुझे
[अनपढ] है इसी में प्यार की आबरू, वो जफा करे, मै वफा करू
[अनपढ] जिया ले गयो जी मोरा सावरिया, लागी मन में लगन हुवी बावरिया

[वो कौन थी] नैना बरसे, रिमझिम रिमझिम, पिया तोरे आवन की आस
[वो कौन थी] लग जा गले, के फिर ये हसीं रात हो न हो
[वो कौन थी] जो हमने दास्तां अपनी सुनायी, आप क्यू रोये
[वो कौन थी] शौख नजर की बिजलीया, दिलपे मेरे गिराये जा
[वो कौन थी] छोडकर तेरे प्यार का दामन, ये बता दे के हम किधर जाये

[मौसम] दिल धुंडता, है फिर वोही, फुरसत के, रात दिन
[मौसम] रुके रुके से कदम, रुक के बार बार चले
[मौसम] छडी रे छडी, कैसी गले में पडी

[जहा आरा] फिर वोही शाम, वोही गम, वोही तनहाई है
[जहा आरा] ए सनम आज ये कसम खा ले, फासले प्यार में मीटा डाले
[जहा आरा] जब जब तुम्हे भुलाया, तुम और याद आये
[जहा आरा] वो चूप रहे तो मेरे दिल के दाग जलते है
[जहा आरा] तेरी आख के आसू पी जाऊ, ऐसी मेरी तकदीर कहा

[हिरा-रांझा] ये दुनिया, ये मेहफिल, तेरे काम की नही, तेरे काम की नाही
[हिरा-रांझा] दो दिल टुटे, दो दिल हारे
[हिरा-रांझा] मिलो ना तुम तो हम घबराये, मिलो तो आँख चुराये, हमे क्या हो गया है

[लैला-मजनू] इस रेशमी पाजेब की झनकार के सदके
[लैला-मजनू] हुस्न हाजीर है, मुहोब्बत की सजा पाने को, कोई पथ्थरसे ना मारे, मेरे दिवानेको

[नौनिहाल] मेरी आवाज सुनो
[नौनिहाल] तुम्हारी जुल्फके साये में, शाम कर दुंगा

[गजल] रंग और नूर की बारात किसे पेश करू
[गजल] मेरी मेहबूब कही और मिला कर मुझसे
[गजल] इश्क की गर्मी ए जजबात
[गजल] नग्मा ओ शेर की सौगात

[हस्ते जख्म] आज सोचा तो आंसू भर आये
[हस्ते जख्म] बेताब दिल की तमन्ना यही है
[हस्ते जख्म] हा ये माना मेरी जान
[हस्ते जख्म] तुम जो मिल गये हो

[रिश्ते नाते] मुझे याद करने वाले, तेरे साथ साथ हु मैं

[दुल्हन एक रात की] मैने रंग ली आज चुनरिया, सजना तोरे रंग में
[दुल्हन एक रात की] कभी ए हकीकत ए मुन्तझर
[दुल्हन एक रात की] एक हसीन शाम को दिल मेरा खो गया

[आप की परछाईयां] अगर मुझसे मोहोब्बत है, मुझे सब अपने गम दे दो
[आप की परछाईयां] मैं निगाहे तेरे चेहरेसे हताऊ कैसे
[आप की परछाईयां] यही है तमन्ना, तेरे दरके सामने मेरी जान जाये, मेरी जान जाये

[पूजा के फुल] मेरी आखोंसे कोई निंद लिये जाता है, दूर से प्यार का पैगाम दिये जाता है

[चिराग] चराग दिल का जालाओ बहोत अंधेरा है
[चिराग] तेरी आखों के सिवा दुनियामे रख्खा क्या है
[चिराग] छायी बरखा बहार, कारे अंगना फुहार, सैंया आके गले लग जा, लग जा

[संजोग] वो भुली दास्तां, लो फिर याद आ गयी
[संजोग] भुली हुवी यादों, मुझे इतना ना सतावो
[संजोग] बदली से निकाला है चांद, परदेसी सैंया लौट के फिर घर आजा
[संजोग] एक मंजिल राही दो, फिर प्यार कैसे ना हो
[संजोग] केहते है चांद जिसको, तुमसे नाही वो प्यारा

[बहाना] जा रे बदरा बैरी जा, जा रे

[जाब याद किसी की आती है] तेरे बिन सावन कैसे बिता, तू क्या जाने बालमा
[जाब याद किसी की आती है] जब याद किसी की आती है
[जाब याद किसी की आती है] धुंडे तुझको नैन दिवाने, आजा आजा रे, इन नैनो की प्यास बुझाने
[जाब याद किसी की आती है] अरी ओ शोख कालियो, मुस्कुरा दे ना वो जब आये

[एक कली मुसकाई] ना तुम बेवफा हो, ना हम बेवफा है
[एक कली मुसकाई] जुल्फ बिखराती चाली आयी हो, ए जी सोचो तो जरा, बदली का क्या होगा

[जेलर] हम प्यार में जलने वालोंको, चैन कहाँ, आराम कहाँ

[मनमौजी] मैं तो तुम संग, नैन मिलाके, हार गयी सजना
[मनमौजी] जरुरत है, जरुरत है, एक शिरीमती की, कलावती की

[बावर्ची] भोर आयी, गया अंधियारा

[नींद हमारी, ख्वाब तुम्हारे] कभी तेरा दामन ना छोडेंगे हम, चाहे जमाना करे लाखो सितम
[नींद हमारी, ख्वाब तुम्हारे] हुस्न जब जब इश्क़ से टकरा गया, सारी दुनिया पर नशा सा छा गया

उरलेली परत कधीतरी ..... स्मित

[वरील लेखातील तपशील एखाद्या नावाजलेल्या संगीतकाराबद्दल जिथून कुठून माहिती मिळू शकते अशा सर्व माध्यमाकडून साभार ]

- आरती.

Sunday, 6 May 2012

' वाटते '

19/04/2008

एकटे असावे वाटते 
बसावे शांत वाटते 
वाटते ऐकू न यावे 
सूर माझे मला वाटते 

एक मैफिल संपलेली 
रातराणी बहरलेली 
चांदण्या रात्रीस या 
बिलगून जावे वाटते 

राग तू, अनुराग तू,
मोह कि वैराग्य तू 
गूढ मनाच्या  डोही या 
बुडावे खोल, खोल वाटते 

हले पाचोळा, फुले पिसारा 
का अवेळी मुद्गंध आला 
साचलेल्या जलाने या 
कोसळावे वाटते ........... *

- आरती.

Monday, 30 April 2012

' जीवनगाणे '

२६/०१/२००३

जीवनगाणे, मस्त तराणे
नित्य नव्या रंगात रंगणे

कोकीळ कंठी वसंत गाणे
लयीत भ्रमराचे गुणगुणणे

फांदीचे वाऱ्यावर झुलणे
कळीचे हळुवार फुलणे

श्रावणाचे अलगद भूरभूरणे
निर्झराचे अवखळ झुळझुळणे

सूर्याचे आकाशी तळपणे
चंद्राचे लपंडाव खेळणे

काजव्याचे क्षणभंगुर चमकणे
रात्रीच्या गर्भात चांदणे

क्षितिजावरती चित्र रेखणे
आसमंती सप्तरंग उधळणे

चिमणीचे पिल्लास भरवणे
गरुडाचे नभी झेपावणे

सगळेच कसे लोभसवाणे,
जीवनगाणे मस्त तराणे.

**

मैफिलीत रात्र जागवणे
चांदण्यात पायवाट तुडवणे

पावसात नखशिखांत भिजणे
शेकोटीच्या उबेत शहारणे

मनामनांचे नकळत गुंतणे
लटके रुसणे, खळखळून हसणे

हळूच स्वप्नांच्या कुशीत शिरणे
वास्तवतेची धग अनुभवणे

आधी अडखळणे, मग सावरणे
पुढचे पाऊल, पुढेच पडणे

कधी साथीने, कधी एकाकी लढणे
गौण मानुनी जिंकणे हरणे

पडणे-झाडणे, आपणच घडणे
आपणच आपुला मार्ग आखणे

सगळेच कसे लोभसवाणे,
जीवनगाणे, मस्त तराणे.

- आरती.








Friday, 30 March 2012

' काळचक्र '

०८/०४/२००५
 
येणे कुणाचे, जाणे कुणाचे
का असे बंधहीन असावे  ?
उत्तर शोधत या प्रश्नाचे
जीवन प्रवाही वाहत जावे

माणसे जितकी, तितकी नाती
वेगवेगळी सारीच भासती
भासो जन्माचे, असो क्षणांचे
तुटता हुरहूर तीच लाविती

तुटले जरी, टिकले जरी
खोली नात्यांची बदलत राहते
असली जरी, नसली तरी
गती आयुष्याची तीच राहते

दुःखाचे कढ, मनाची ओढ
पाऊले जरी झाली जड
सुटले जे सोड, नवे ते जोड
चक्र काळाचे हेच सांगते.

- आरती. 
  
      
   

Monday, 13 February 2012

' कुत्रे काका '

 ०८/०८/२००५

पुणे विद्यापीठाच्या खडकी गेटने ऑफिसला जाताना, मिल्ट्रीच्या घरांजवळ रोजच एक ना एक कुत्रे मांजरीच्या मागे लागलेले दिसे. आणि त्यांच्या पळापळीत मला गाडीला ब्रेक लावावाच लागे. कारण एरवी रहदारीचा नसलेला तो रस्ता त्यांचे हक्काचे मैदानाच होता, मारामाऱ्या करायला. :)

जरा ऐका कुत्रे काका
पाठलाग माउचा करू नका
त्यात बराच आहे धोका
कुत्रे काका जरा ऐका

माउवर बोक्याचा भलता जीव
मारतो तिच्यासाठी उंदीर नऊ
साय असो कि लोणी मऊ
वाटून खातात सगळाच खाऊ

तुम्ही असे मधेच याल
माऊला कुठे लांब पळवाल
असे कसे  बोक्यास चालेल
नक्कीच याच सूड उगवेल

प्रसंग मोठा आहे बाका
पळत ठेऊन आहे बोका
अवचित साधेल बघा मोका
कशाला जीव संकटात टाका

मांजराची मुळात लबाड जात
पळेल देऊन तुरी हातात
'चंपी' रेंगाळलीये मागल्या दारात
गुपचूप शेपूट घाला पायात

तुमचा तिथेच भिडेल टाका
जरा ऐका कुत्रे काका. .......         
 
 
  - आरती.


Tuesday, 24 January 2012

' अंतर '

०२ एप्रिल २००३

जीवघेण्या कामाच्या ओझ्यातही
कुठल्याही अर्धाविरामाच्या क्षणी 
शब्द हळूच डोकावतात
पाठोपाठ सूरही येतात
मन गाण्याने भरून येते 
प्रेमाने साद घालते

नाकारायचच  म्हंटल जर सगळ
तर कोण अडवू शकत ?
मग काहीच नसत

रिकाम्या एकटेपणातही
रेंगाळलेल्या निवांत क्षणीही 
शब्द हरवतात, सूर अडखळतात
गाणे मनातच विरून जाते
अंतर वाढतच राहते .......

- आरती.


  


    

Sunday, 27 November 2011

गंगासागर एक बार.


Staten Island कडे जाणारी ती नारंगी रंगाची फेरी, आपल्या पोटात १५०० पेक्षा अधिक जीवांचे ओझे वागवून, काहीश्या अवघडलेल्या अवस्थेत पलीकडच्या किनाऱ्याकडे सरकताना, हडसनचा शहराच्या पसाऱ्यात घुसमटलेला प्रवाह, जणू या दिव्यातून पार पडण्याची शक्ती मिळावी म्हणून तिला गोंजारताना, जेंव्हा जेंव्हा मला माझ्या खिडकीतून दिसतो तेंव्हा तेंव्हा मला आठवण येते हुगळीच्या विस्तीर्ण पात्रात स्वताला झोकून देणाऱ्या 'त्या' फेरीची, जी विश्वासाने आणि निर्धास्त मानाने जणू आपल्या मातेच्या कुशीत झेपावत असते.

"ती फेरी" आठवण्याचे कारण, त्या अनुभवा नंतर काही दिवसातच घेतलेला हा अनुभव हे असले, तरी, दुसरे अजून एक साम्य नजरेआड करून चालणारच नाही. Staten Island कडे जाणारी फेरी, 'हडसनच्या' त्या वळणावर दिसते जे तिने खास अटलांटिककडे जाण्यासाठी घेतले आहे. आणि Sagar Island कडे जाणारी ती फेरी पण 'हुगळीच्या' त्या प्रवाहाला कापत जाते जो बंगालच्या उपसागरात मिसळून जाण्यासाठी शब्दशः घोड्याच्या नालेच्या आकारात वळून (संपूर्ण यु टर्न) आता प्रवासाच्या अंतिम टप्यात आहे. [टिप : घाबरुनये, भारत -अमेरिका अशी मुक्तपिठीय तुलना लिहिण्याचा मानस अजिबातच नाही स्मित ]

Sagar Island, गंगा जिथे बंगालच्या उपसागराला मिळते ते संगमाचे ठिकाण, जे गंगासागर नावाने एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. आणि हुगळी, म्हणजेच गंगा नदी. गंगेच्या मुर्शिदाबादपासून निघालेल्या प्रवाहाला पश्चिम बंगाल मधे हुगळी या नावाने संबोधले जाते. पश्चिम बंगालच्या दक्षिणेस हे पवित्र संगमाचे ठिकाण आहे, जिथे लाखो भाविक आणि पर्यटक दरवर्षी मोठ्या श्रद्धेने आणि कुतूहलाने जातात.

कोलकात्याला जायचे ठरले तेंव्हा आवर्जून भेट देण्याची ठिकाणे या यादीत, सगळ्यात वरती होते सुंदरबन - Tiger of Bengal, सिक्कीम, दार्जीलिंग, गुवाहाटी मार्गे काझीरंगा, शांतीनिकेतन. आणि शहराच्या जवळपासचे पण अत्यंत महत्वाचे असे वेरुलमठ, दखीनेश्वर, सुभाष बाबू, विवेकानंदांचे निवास स्थान, ईडन गार्डन. बाकी गेल्यावर बघू / ठरवू मधे भूतान, बांगलादेश-ढाका हे पण होते. लहानपणच्या भूगोलाच्या पुस्तकापर्यंत मागे घेऊन जाणारी, बंगालचा उपसागर, त्यात होणारी वादळे, यातले काय काय अनुभवायला मिळते आहे, याची उत्सुकता पण होतीच. पण गंगासागर हे नाव, पहिल्या-शेवटच्या, कुठल्याच क्रमांकावर माझ्या यादीत नव्हते.

असेच एकदा अचानक माझ्या एका पूर्वाश्रमीच्या बॉसचा (आता मैत्रीण) फोन आला. बोलता बोलता ती म्हणाली, "तू कोलकात्याला असे पर्यंत मी एकदा नक्की येऊन जाईन, आईला बरेच दिवसांपासून गंगासागरला जायचे आहे, तिची ती इच्छा तरी पूर्ण होईल". गंगासागर इतके जवळ आहे ? मला प्रश्न पडला. मुळातच समुद्र कोलकाता शहरापासून बराच म्हणजे "जवळपास" १५० किलोमीटर इतका लांब आहे, असे ऐकले होते. लगेच गुगलचा सहारा घेतला, अंतर तपासले. संक्रांतीचा मुहूर्त साधून आपणही जानेवारीत चक्कर मारावी असे ठरवून टाकले. गंगा-सागर संगमावरचा "कुंभमेळा" अनुभवण्याची कल्पना मला अगदी मजेदार वाटत होती.

गंगेचा प्रवाह जिथे बंगालच्या उपसागरास मिळतो त्या ठिकाणाला धार्मिक महत्व आहे. गंगा सागराचा हा संगम "पवित्र संगम" म्हणून प्रसिद्ध पावला आहे. बंगाली पौष महिन्यातला हा शेवटचा दिवस, म्हणजेच मकर संक्रांत, या दिवशी सूर्य मकरवृत्तातून भ्रमण करतो म्हणून त्या दिवसाला विशेष महत्व आहे. त्या दिवशी देशभरातून, शेजारी देशातून साधू-संत, तपस्वी, धार्मिक गुरु, श्रद्धाळू लोक आणि पर्यटक असे सगळेच इथे गर्दी करतात. संगमाच्या ठिकाणाला अगदी मेळ्याचे स्वरूप प्राप्त होते. हा मेळा एकच दिवसाचा असतो. त्या दिवशी माणसांनी फुलून गेलेला सागर किनारा दुसऱ्या दिवशी मात्र पूर्ण रिकामा असतो. राज्य सरकार आणि स्थानीक प्रशासनातर्फे देशभरातून येणाऱ्या पर्यटक / भाविकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, जेवण याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जातो. उन / वारा आणि बंगालचा बेभरवशी पाऊस हे सगळे लक्षात घेता, थोडीफार आसर्‍याची पण सोय केली जाते. परंतु येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड असल्याने व्यवस्थेवर ताण येऊन बरेचदा ती कोलमडतेच असे ऐकले. पण भारत देशाचे '" एकात्मता गीत ", मिले सूर मेरा तुम्हारा "याची देही याची डोळा" प्रत्यक्ष अनुभवायचे असल्यास हे स्थान, हा दिवस चुकवू नये, हे मात्र खरे.

नंतर अचानकच माझी अमेरिका वारी ठरली, त्यात ती ठरल्यापेक्षा लांबली आणि परत कोलकात्याला पोहोचायलाच फेब्रुवारी उजाडला. कुंभमेळा तर संपला. आणि कामाचा ढीग उपसता-उपसता फेब्रुवारी पण संपला. मार्च मधे माझी आई आणि आत्या माझ्याकडे कोलकात्याला आल्या होत्या. त्यांच्या यादीमध्ये मात्र गंगासागर एक नंबरवर होते. मी जेंव्हा ऑफिसमधे आमच्या जाण्याबद्दल सांगितले तेंव्हा आलेल्या प्रतिक्रिया साधारण अशा होत्या,
१. उधर क्या है देखनेको, मत जाओ.
२. मेला तो खतम हो गया, अब गंगा नहाके कुछ फायदा नही.
३. आर यु क्रेझी, व्हाय उ वॉन्ट टु गो देअर.
४. मॅम आप अकेले लेडीज मत जाओ. मी म्हंटले, "माझी आई आहे ना बरोबर, अकेले कुठे". हा मॉजी भी तो लेडीज हि है. (बर-बर)

कोलकाता शहरापासून गंगासागर साधारणपणे १३० किलोमीटर अंतरावर आहे. कोलकाता - काकद्वीप / नामखाना - हरवूड - काचुबेरीया (बेटावरचे छोटे गाव) - मेला (मेळ्याचे ठिकाण) - सागर किनारा, असा हा एकूण सगळा प्रवास. कोलकाता शहरातून स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस नामखान्यापर्यंत जातात, तसेच सिआल्दा स्टेशनवरून थेट काकद्वीप बंदरापर्यंत जाणाऱ्या ट्रेन पण आहेत. बाकी तिथे पोहोचल्यावर थोडे इकडे तिकडे जाण्या-येण्यासाठी सायकल रिक्षा असतातच. खाजगी वाहन घेऊन पण तुम्ही जाऊ शकता. तुमची खाजगी गाडी असेल तर ती पलीकडच्या किनाऱ्याला नेण्याची सोय आहे, पण ती फेरी दिवसातून एकदाच असते असे ऐकले. ऑफिस मधल्या लोकांनी मात्र पब्लिक ट्रान्सपोर्टने जाण्यास ठाम विरोध केला आणि सूर्यास्ताच्या आत कोलकाता शहरात परत पोहोचलेच पाहिजे अशी सूचना पण केली. एकतर तिथे राहण्याची फारशी काही सोय नाही, असे ऐकले. पश्चिम बंगाल टुरिझमचे एक गेस्ट हाउस आहे म्हणे. पण त्याची पण कीर्ती फार चांगली नाही. एकदा जानेवारीतला कुंभमेळा संपला की तिथे फारशी वर्दळपण नसते आणि बाकी पश्चिम बंगालच्या परंपरेला साजेसे इतर धोकेपण आहेतच. एकजणाने स्वतः ओळखीची गाडी, खात्रीचा ड्रायव्हर शोधून आमची जाण्याची सगळी व्यवस्था केली आणि आम्ही ठरल्यावेळी, म्हणजे भल्या पहाटे निघालो. कारण दिवसा उजेडी सहीसलामत परत यायचे होते.

रस्त्याने जेवणासाठी एकही चांगले हॉटेल नाही, कोलकाता शहर सोडल्यावर पिण्याचे चांगले पाणी पण मिळणार नाही, अशा अनेक बारीक-सारीक सूचना आधीच मिळाल्या होत्या, त्यामुळे आम्ही जय्यत तयारीत होतो. आणि मिळालेली सगळीच माहिती तंतोतंत जुळणारी आहे याची प्रचीतीपण आम्हाला येत होती. "कोलकाता ते गंगासागर" हा एकूणच प्रवास अनोखा आहे, रम्य आहे. रस्त्याने लागणारी छोटी-छोटी गावं बघत, नकळत त्या नारळी-पोफळींची, घरांची आपल्या कोकणाशी तुलना करत, सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेत घेत रस्ता कसा संपला कळालेच नाही. संगमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी चार वेळा चार वाहने बदलावी लागतात. आम्ही एक इंडिका घेऊन निघालो होतो. आधी सगळी माहिती घेतलेलीच होती. त्याप्रमाणे, चालत्या गाडीतच नाश्ता उरकून, बरोबर ९.३० वाजता नामखाना गाठले. ड्रायव्हर गाडी पार्क करेपर्यंत बंदर कुठे आहे याचा शोध घ्यावा म्हणून मी चार पावले पुढे गेले तर फळ विकणाऱ्या एका माणसाने बंगालीत मला बरेच काही सांगितले. मी त्याला, "बंगाली नही समझते, हिंदीमें बोलिये" असे सांगायचा प्रयत्न केला, पण इतके दिवसांच्या अनुभवा प्रमाणेच या माणसानेपण हातवारे करून पुन्हा एकदा बंगालीतच लांबलचक काहीतरी सांगितले. इतक्यात आमचा ड्रायव्हर आला. आणि इथून फेरी जात नाही कारण पाणी लांब गेलेले आहे, भारतीच्या वेळा बघून परत या किंवा काकद्वीपला जा, असा त्या संभाषणाचा उलगडा झाला. काकद्वीप ला जायचे म्हणजे ३० किमी मागे आणि परत मुख्य रस्त्यापासून हरवूड बंदरापर्यंतचे अंतर वेगळेच. म्हणजे वेळेचे गणित बिघडणार. त्या काळजीपोटी समोर दिसणारा नामखान्याचा हिरवागच्च बाजार आम्ही महतप्रयासाने टाळला. कोलकात्याला असे भरगच्च बाजार बरेच ठिकाणी दिसतात. भरपूर ताजा भाजीपाला, फळफळावळ सगळे अगदी ओसंडून वाहत असते. एक सुस्कारा टाकून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.

काकद्विपला आणि पुढे हरवूड ला पोहोचलो तर पार्किंग ठेकेदाराने "लवकर पळा फेरीची वेळ झाली आहे" असे जवळ जवळ दरडावलेच. आम्ही तिघी लगबगीने, त्याने ज्या दिशेला हात केला होता त्या दिशेला निघालो. इथून पुढचा प्रवास 'अकेले लेडीज'चा आहे हे लक्षात आल्यावाचून रहिले नाही. स्मित बरेच गल्ली बोळ पार करत, खुणेनेच 'फेरी' 'फेरी' असे विचारात तिकीट खिडकीशी पोहोचलो. तिथे उसळलेली गर्दी बघून मात्र आमचा अकेलेपणा कुठच्या कुठे पळून गेला. अचानक इतकी माणसे कुठून उगवली कळेचना. माझे असे खूपवेळा झाले कोलकात्याच्या वास्तव्यात. लोकांनी खूप घाबरवून टाकायचे, मी पण थोडी धाकधूक मनात ठेऊन निघायचे आणि मग आनंदाने हुश्श म्हणायचे.

तिकीट खिडकीच्या शेजारी अजून एक खिडकी होती. तिथे माश्यांसाठी खाद्य विक्री चालू होती. ती बाई मला मोठ्यामोठ्याने सांगू लागली, रंगीत मासे येतात, सोनेरी मासे येतात, मोठे मोठे मासे येतात, खाण घ्याच. बंगाली लोक थोडं मोठ्याने बोलतात (माझा अनुभव), त्यामुळे एकदम दडपून जायला होते. १० रुपयाचे मुठभर मुरमुरे आणि चार चणे घेऊन सोनेरी मासे बघायला निघालो. फेरी यायला अजून थोडा अवकाश होता. वेस्ट बेंगॉल सरफेस ट्रान्सपोर्ट कोर्पोरेशन तर्फे हि फेरी चालवली जाते. [ती पलीकडची माश्याची खिडकी कोणते कोर्पोरेशन चालवते ते काही कळाले नाही]. २५ ते ३० मिनिटांच्या या प्रवासाचे ६ ते १० रुपये असे सिझनप्रमाणे तिकीट असते.

(फेरी आणि गंगेचे पात्र)
bot gangeche patra.jpg

समोर गंगेचे प्रचंड पात्र पसरलेले होते. पलीकडचा किनारा टाचा उंच करून बघावा लागत होता. पण तिकडून इकडे येणारी फेरी मात्र नजरेस पडली. ज्या पद्धतीने माणसे आत कोंबली होती, ती बघता आईसाठी जागा मिळवायला झगडावे लागणार हे स्पष्ट होते. प्रखर उन, घामाचे आणि टोपलीतल्या माश्यांचे वास असे सगळेच सहन करत पुढे पुढे घुसायचा आम्ही प्रयत्न करत होतो. अलीकडच्या किनाऱ्यावरचा भरगच्च चिखल आणि त्यात खेळणारी लहान लहान मुले बघून मात्र मजा वाटली. चिखल कसला, दलदलच होती ती. अंगात एकही कपडा नसलेली ती मुले, डोक्यापासून पायापर्यंत चिखलाने माखलेली होती, संपूर्ण शरीरावर लेप लावल्यासारखे. अजून काय शिल्लक होते म्हणून एकमेकांना चिखल फेकून मारत होती, खाली पाडत होती, उठत होती, परत पडत होती. एकदम मजेत होती काट्टी. "इतक्या घाणीत खेळतात, यांना कसे काहीच होत नाही, नाहीतर आपली मुले, इतके जपतो तरी आहेच हे इन्फेक्शन, ते इन्फेक्शन" एकच विचार माझ्या आणि आईच्या मनात आल्यावाचून राहिला नाही.स्मित

फेरीच्या रांगेत उभे असतानाच आईच्या, एका काकुंशी गप्पा झाल्या. तुम्ही कुठून आले, आम्ही कुठून आलो, कोलकात्याला कोण असत, इ.इ.इ. पुढे पूर्ण प्रवास काकूंच्या साथीनेच झाला, हे ओघानेच आले. फेरी आली, फेरीत चढलो, आई पुरती एक जागा मिळवली, तर एका बुरखेवालीने नवऱ्याला खुण केली, तो आला आणि दादागिरी करून मी पकडलेल्या जागेवर बसला सुद्धा. मी "भाईसाब" वगैरे म्हणायचा प्रयत्न केला पण तो इतके जोरात बोलला की आई म्हणाली "जाऊदे सोड". एका गुजराती कुटुंबाने त्यांच्या तरुण मुलाला उठायला सांगून आईला जागा दिली. मी आणि आत्या हातात मुरमुरे घेऊन सोनेरी माश्यांकडे डोळे लावून फेरीच्या कठड्याला अगदी रेलून उभ्या राहिलो. सोनेरी सोडाच, कुठल्याही रंगाचा एकही मासा आम्हाला संपूर्ण प्रवासात दिसला नाही. मुरमुरे मात्र मी गंगेच्या पात्रात सोडून दिले, आलेच कधी 'कोर्पोरेशन' चे मासे तर खातील, या आशेने.

(गंगेचे प्रचंड पात्र)
Gangeche Patra.JPG

फेरी गंगेच्या पात्राच्या मधोमध आल्यावर अनेक लोकांनी भक्ती भावाने गंगेची, फुला-नारळाने पूजा केली. "गंगामैय्या" चा जयघोष झाला. गंगेचे ते रूप, ती भव्यता आम्ही डोळे भरून बघत होतो. शेकडो लोकं, माश्यांच्या टोपल्या, फळांच्या-भाजीच्या परड्या, बाजारात विकण्यासाठी गृहपयोगी सामानांच्या गोण्या, एखाद दुसरी मोटार सायकल आणि अजून बरेच काही लादलेली ती फेरी अनेक दिवसात तेल-पाणी नमिळाल्याने जशी दिसेल / जशी चालेल अगदी तशीच वागत होती.

फेरीचा प्रवास संपतो तेंव्हा, ३४ किमी लांब आणि १४ किमी रुंद अशा बेटावर तुम्ही उतरता. खूप पूर्वी हे संपूर्ण बेटं सुंदरबनचाच एक भाग होते. इंग्रजांनी तिथली झाडे / जंगल कापून तिथे वस्ती वसवली. त्यामुळे अजून जरी कागदोपत्री तो सुंदरबनचा भाग दिसतो तरी तिथे वाघ अजिबातच फिरकत नाहीत. बेटावर जी काही छोटी छोटी गाव आहेत ती सगळी, मुख्य रस्त्याला लागुनच आहेत. वस्ती अतिशय तुरळक आहे. पण प्रवास मोठा सुंदर आहे. एकूणच पश्चिम बंगालला सृष्टीसौंदर्याचे (नव्हे सौंदर्याचेच) वरदान लाभलेले आहे. भरपूर झाडी, फळ-फुलांचे ताटवे, सतत वाहणारा वारा प्रवास अजूनच सुखकर करतो.

तर काचुबेरीयाहून मेळ्याच्या ठिकाणी जायला तुम्हाला सार्वजनिक वाहन मिळते. जे १० रुपये प्रत्येकी घेऊन तुम्हाला मेळ्याच्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर सोडते. जी गाडी पूर्ण भरली आहे असे आमच्या डोळ्याला दिसत असताना, "या गाडीत जागा आहे तुम्ही बसा", असे गाडीचा चालक आम्हा ८ जणांकडे बघून म्हणाला तेंव्हाच स्वतंत्र गाडीने जावे असे आम्ही ठरवले. आम्ही तिघी आणि फेरीत भेटलेल्या काकुंचे ५ जणांचे कुटुंब असे ८ जण मिळून एक सुमो ठरवली. ३० किमीच्या या प्रवासासाठी, सुमो सारख्या गाड्या इथे ७०० ते ८०० रुपये भाड्याने मिळतात. मेल्यापर्यंत जाऊन, पूजापाठ करून, बंदरावर परत आणून सोडणे, असे तो व्यवहार असतो. आमच्या बरोबरचे कुटुंब खास राजस्थानहून आले होते. त्या पाचपैकी एक पुरुष आणि बाकी ४ बायका होत्या. १ आजी (सासू), २ एकमेकिंच्या सौतन (काकांच्या बायका), १ त्यांची जाऊ. गाडी सुरु झाल्या बरोबर त्या चौघींनी मस्त मारवाडी / हिंदी अशी मजेदार गाणी म्हणायला सुरुवात केली. कोरसमधे आम्हाला पण सामिल करून घेतले. मेळ्याच्या ठिकाणाला पोहोचेपर्यंत त्यांच्याशी आमची गट्टीच झाली. गाडीतून उतरलो तर परत एकदा गाडीवाले भोवती घोंगावू लागले. पण आता हि गाडी म्हणजे, सायकलला मागे जोडलेले हातगाडीचे फळकुट. त्यावर आपण बसायचे आणि समुद्र किनाऱ्याला जायचे. काकांनी पुन्हा एकदा बाह्या सरसावल्या आणि १०० रुपयात २ गाड्या वरून, ३० रुपयात २ गाड्या जाऊन-येऊन असे ठरले. आम्ही ८ जण २ गाड्यांवर मावलो खरे, पण एक माणूस चार माणसांचे ओझे घेऊन सायकल ओढणार या विचारानेच खाली उतरावेसे वाटले.

(सायकल गाडी, किनार्‍याकडे जाणारा रस्ता)
Kinaryakade.jpg

समुद्र किनार्‍याला लागुनच कपिलमुनींचे मंदिर आहे. सागराची आणि गंगेची प्रतीकात्मक मूर्ती बनवून त्यांचे पण मंदिर बांधलेले आहे. दरवर्षी मकरसंक्रांतीच्या दिवशी लाखो भाविक इथे येतात ते, या दिवशी गंगा-सागराच्या संगमावर आंघोळ केली तर सगळी पापं धुतली जातात, या श्रद्धेपोटी. पहाटे ४.३० ते संध्याकाळी ४.३० या वेळातच स्नान करणे आवश्यक आहे, म्हणजेच सूर्यदेवांच्या साक्षीने. थोडक्यात दिवसा उजेडी. पापं तर धुवून निघतातच शिवाय गंगा स्नानाचे पुण्यही लाभते ते वेगळेच. [ "१००% मोक्ष मिळतोच आणि स्वर्गाचे दर नक्की उघडते" असे तिथे भेटलेले अभिषेकाचे कंत्राटदार सांगत होते.] गंगा स्नानाइतकेच कपिल मुनींच्या मंदिरात जाऊन पूजा करण्यालाहि महत्व आहे.

(कपिलमुनींचे मंदिर)
kapil muninche mandir.JPG

पुराणकथेनुसार, कपिलमुनी हा विष्णूचाच एक अवतार आहे. कर्दममुनींच्या इच्छेनुसार विष्णूने त्यांच्या पोटी जन्म घेतला. असे सांगितले जाते की विष्णूने कर्दम मुनिना सांसारिक आयुष्याचा मार्ग अवलंबण्यास सांगितले, त्यावेळी त्यांनी विष्णूला हि अट घातली, जी विष्णूने मान्य केली. अधिरथाने गंगा धरतीवर आणली ती इथेच गंगासागर संगमाच्या ठिकाणी. त्याची पण एक अख्यायिका सांगितली जाते. सत्य युगात 'सागर' नावाचा राजा होता. अयोध्येच्या या राजाने अश्वमेध यज्ञाचा घाट घातला होता. त्याचा यज्ञाचा अश्व, देवाधिदेव इंद्राने, कपिल मुनींच्या आश्रमा जवळच पाताळात लपवून ठेवला होता. राजाचे ६०,००० पुत्र अश्वाच्या शोधात आश्रमापर्यंत येऊन पोहोचले, त्यांना घोडा सापडला. घोडा कपिलमुनींनी लपवला या धारणेने त्यांनी तिथे उच्छाद मांडला, ज्यामुळे कपिलमुनींच्या तपश्चर्येत / ध्यान साधनेत व्यत्यय आला. क्रोधीत झालेल्या मुनींनी ध्यानातून बाहेर येत राजपुत्रांवर आपली नजर टाकताच, सर्व ६०,००० राजपुत्रांची जागेवरच राख झाली आणि कपिलमुनींच्या शापवाणीनुसार त्यांना नरकात स्थान मिळाले. सागर राजाला जेंव्हा हि हकीकत समजली तेंव्हा त्याने कपिलमुनिंचे मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला. शेवटी राजाच्या तिसऱ्या पिढीला यात यश आले. राजाचा नातू, भगीरथाने, कपिलमुनींच्या आज्ञेनुसार विष्णूपत्नीस 'गंगेच्या' रुपात धरतीवर आणले आणि तिच्या पावन स्पर्शाने राजपुत्र शापमुक्त झाले. तो दिवस होता मकर संक्रांत. तर असे हे संक्रांतीचे महात्म्य. भगीरथाने शंकराच्या मदतीने गंगा धरतीवर आणली, असे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहे.

ऐकण्यात आले की लोकांमध्ये अशी पण एक श्रद्धा आहे, कुमारिकांनी जर मकर संक्रातीच्या दिवशी संगमावर गंगेत डुबकी मारली तर त्यांना 'देखणा' नवरा मिळतो आणि कुमारांना देखणी बायको. [ आजकाल असेही ऐकू येते की, मार्चमधे गंगासागाराचे दर्शन घेतले तर 'मायबोलीकर' नवरा मिळतो. स्मित ]

सूर्याचे मकार्वृत्तात भ्रमण, सूर्याचे सुरु होणारे उत्तरायण, (पूर्वी ) पवित्र असेलेले गंगाजळ, संगमाच्या ठिकाणी निर्माण होणारे प्रवाह, या आणि अशा काही गोष्टी मिळून काहीतरी वैज्ञानिक महत्व नक्कीच असणार आहे, जे आता काळाच्या पडद्याआड गेले आहे.

हि प्रथा नक्की कोणी सुरु केली, मंदिर कोणी बांधले या सगळ्या गोष्टी अजूनही गूढ वाटाव्या इतक्या अंधारातच आहेत. गंगासागर स्नानाचा उल्लेख महाभारतात पण सापडतो असे ऐकले. कोणी संत महात्म्याने भीष्माला संगमाचे आणि त्या ठिकाणाचे पावित्र्य आणि महत्व समजावून सांगितल्याचा संदर्भ सापडतो.

१८३७ मधे प्रकाशित झालेल्या एका वर्तमानपत्रात या मंदिराचा उल्लेख आहे. त्यावेळी असे म्हंटले आहे की हे मंदिर १४०० वर्षे जुने आहे. गुरु रामानंद नावाच्या कुणा तपस्व्याने ई.पु. १४३७ मधे तिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आता तिथे दिसते ते रंगीबेरंगी मंदिर १९७० साली बांधले गेले, पूर्वीचे कच्चे काम पाडून त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. पूर्वीचे मंदिर आणि कपिलमुनींचा आश्रम समुद्राने आपल्या पोटात घेऊन टाकला, असे पण लोकं सांगतात. एकूणच गंगासागरबद्दल अनेक कथा / प्रथा / आख्यायिका ऐकायला मिळतात.

पूर्वी गंगासागरला जाणे हे एक मोठेच दिव्य होते. रस्त्यात अनेक संकटांचा सामना करत बोटीने अनेक दिवस प्रवास करावालागे. सुंदरबनचे अरण्य आणि जंगली श्वापादांबरोबरच प्रचंड संख्येने असणारा जलचरांचा वावर, पाण्याचा धोकादायक प्रवाह, लहरी निसर्ग, घनदाट झाडी असे सगळेच प्रतिकूल घटक प्रवासाच्या मार्गात होते. शहरीकरणाने "पुण्याचा" मार्ग सुलभ केला असे म्हणायला हवे.

(चंदेरी वाळु, शांत-निवांत किनारा)
kinara walu.jpg

किनाऱ्यावर पोहोचलो. चंदेरी म्हणावी अशी वाळू आहे. अगदी मखमलच. ओंजळभर हातात घेऊन उगीचच खाली सोडली. पाण्यात गुडघे बुडतील इतके आत पर्यंत गेले. नजर मात्र समोरच्या दृश्यावरून हलत नव्हती. कुठे गंगा संपते-कुठे सागर झेपावतो, डोळे शोधत होते. मधे एक पुसटशी रेघ दिसली खरी. पाण्याचा रंगहि वेगळा आहे. अलीकडचा हिरवट आहे, पलीकडचा काळपट आहे. अलीकडचे पाणी शांत वाटते, पलीकडचे पाणी खळखळते आहे. किनारा शांत - स्वच्छ - निवांत आहे. गंगेचे पाणी डोळ्याला लावले, कपाळाला लावले. तिच्या भव्यतेपुढे नतमस्तक न झालो तरच नवल. गंगेची पूजा करण्यासाठी फुले-नारळ घेतले होतेच. दोन्ही पाण्यात सोडले.

(गंगासागर)
Gangasagar.JPG

हिमालयाच्या कुशीत, गंगोत्रीला जन्म घेतलेली गंगा, मोठ-मोठ्या पर्वत रंगांचे अडथळे पार करत, ऋषिकेश-हरिद्वार मार्गे, काशी - प्रयाग असा प्रवास करून आवश्यक ती वळणे घेत, वाटेत भेटलेल्या कडू-गोड सगळ्यांनाच आपल्या पोटात सामावून, थेट पश्चिम बंगालच्या दक्षिण टोकास बंगालच्या उपसागरापर्यंत येते तेंव्हाही खळखळता आनंद भरभरून देते. तिची भव्यता डोळे दिपवून टाकते. "याच वृत्ती आयुष्याच्या प्रवासात मलाही साथ करुदेत" अशी प्रार्थना करून माघारी वळले.

(जय काली कलकत्तेवाली, मंदिरातील महादेव)
dev.jpg

राजस्थानी कुटुंबाने स्नान, अभिषेक सगळे अगदी यथासांग केले. आम्ही स्नान करणार नसल्याने डोक्यावर-अंगावर गंगाजल शिंपडावे असे त्यांनी सुचवले. घटकाभर सगळेच भटजींनी दिलेली चटई अंथरून शांतपणे लाटांचे आवाज ऐकत बसलो. तहान लागली म्हणून सगळ्यांसाठी शहाळी घेतली तर अचानकच तिथली सगळी कुत्री माझ्या मागे लागली. पाणी पिऊन झाल्यावर खाली जी मलई उरते ती त्यांना द्यावी असा त्या भुंकण्याचा अर्थ. कुत्र्याला नारळाची मलई आवडते हे नव्यानेच कळाले. बाकी धार्मिक स्थळावर भेटतात तशी, गंगेतला नारळ पळवून परत तोच विकणारी, सुटे पैसे जाताना देतो असे म्हणून दुकानातूनच गायब होणारी मंडळी इथे पण भेटलीच. कपिल मुनींच्या मंदिरात गेलो. दर्शन घेतले. निराळ्याच मूर्ती आहेत त्या. तसेही राज्य बदलले की मूर्तींच्या रंगरुपात फरक पडतोच. या तर अतिप्राचीन पण आहेत.

(दुर्गामाता, गंगामाई)
Ganga - durga_0.jpg

दुपारचा दीडच वाजत होता. परतीचा प्रवास सुरु केला. परत एकदा सायकलगाडी-सुमो-बोट-ईंडीका. राजस्थानी कुटुंबाचा कोलकात्याचा फोन नंबर घेऊन त्यांचा निरोप घेतला. रस्त्यात एक मोठ्ठे झाड बघून सावलीत गाडी थांबवली. ड्रायव्हरने आणि आम्ही जेवण केले. येताना ज्याची फक्त झलक बघून वेडावल्यासारखे झाले होते ते डायमंड हार्बर जाताना बघायचा विचार होताच.

कोलकात्य पासून ५० किमी अंतरावर डायमंड हार्बर नावाचे बंदर आहे. रुपनारायणी आणि हळदी अशा दोन नद्या अगदी शेवटच्या टप्प्यात गंगेला येऊन मिळतात. रुपनारायणी मिळाल्यानंतर आणि हळदी मिळायच्या आधी, मधे हे बंदराचे ठिकाण आहे. रुपनारायणीचे पाणी मिळाल्यामुळे गंगेचे पात्र अधिकच रुंद होते, आणि तेंव्हाच गंगा दक्षिणेकडे वळते. त्यामुळे एक वेगळेच दृश्य तिथे बघायला मिळते. अगदी समुद्र वाटावा इतके रुंद आणि प्रचंड पाणी घेऊन जाणारे गंगेचे पात्र आपल्या अवाढव्य आकारासाहित संपूर्ण यु टर्न घेते ते दृश्य बघताना नक्की कसे वाटते हे शब्दात मांडणे माझ्या कुवती बाहेर आहे. 'यु' आकाराचा बेस तेव्हडा रस्त्याला लागून आहे. आणि तेव्हडेच दर्शन गंगामाई आपल्याला गंगासागरकडे जाताना देते. 'हाजीपुर' नावाच्या गावी, समुद्रमार्गे व्यापार या हेतूने पोर्तुगीजांनी हे बंदर बांधले असे सांगितले जाते. याचे 'डायमंड हार्बर' हे नामकरण मात्र इंग्रजांनी केले. त्याचे व्यापारातले महत्व आणि त्या जागेचे सौंदर्य असे दोन्हीला शोभणारे म्हणून 'डायमंड'. पण इस्ट इंडिया कंपनीने कोलकात्यामध्ये आपला जम बसवण्या आधी, भारतातला व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने हे बंदर बांधले असे पण वाचले. पाण्याची खोली, गंगेच्या पत्राची रुंदी आणि समुद्रापासून तसे जवळ पण तरीही सुरक्षित अंतरावर, अश्या सगळ्याच गोष्टी जहाजांना ये-जा करण्यास अगदी पुरक आहेत म्हणुन ही जागा निवडली गेली असावी. पश्चिमबंगाल टुरिझमने आता हे ठिकाण पिकनिक स्पॉट म्हणून डेव्हलप केले आहे. तिथेच चिंगरीखाली नावाचा एक किल्ला पण आहे. आता फक्त अवशेषच आहेत. हे सगळे बघावे, जमल्यास सनसेट हि तिथेच बघावा आणि पुढे जावे. असा मनातल्या मनात प्लॅन तयार केला. आपण अगदी वेळेत आहोत, त्यामुळे डायमंड हार्बर आरामात होईल असे ड्रायव्हर कडून आश्वासन घेऊन पुढे निघालो. आणि पश्चिमबंगालचा खास असा तो थरार, ते नाट्य रस्त्यात आमची वाट बघत थांबले होते.

(हेच ते ठिकाण)

Prawasatale photo.jpg

अगदी मसालेदार चित्रपटात शोभावा असा तो प्रसंग. पण प्रत्यक्ष अनुभवण्याची वेळ कधी आपल्यावर येईल असे स्वप्नात पण वाटले नव्हते. गाडीत आम्ही तिघीजणी, ड्रायव्हर तसा पोरगेलाच, त्यातही शेजारी राज्यातला. त्याने आम्हाला धीर द्यायचा तर आम्हीच त्याला धीर देत होतो. त्याचेही बरोबर होते, त्याने अशा घटना असंख्यवेळा अनुभवल्या असतील आणि त्याचा गंभीरपणा समजावा इतका आमचा अनुभव नव्हता. पण जसे जसे बाहेरचे वातावरण बदलत चालले तसे तसे गाडीतले टेंशन पण वाढत चालले. माझी आई एकदम धीराची आहे आणि तशीच मीपण स्मित. आत्या मात्र खूपच घाबरली होती आणि तिच्या जोडीला ड्रायव्हर.

मी, आई, आत्या, आम्ही तिघी खिडकीतून बाहेर बघत-बघत गप्पा मारत होतो, रस्त्याने भरपूर झाडी, फुललेली शेतं, मधे गाव लागले तर शाळेची मुले, विचित्रच दिसणारी वाहनं, पाण्याला निघालेल्या बायका, असे बरेच काही. प्रदेश वेगळा असल्याने सगळेच बघण्यासारखे वाटत होते. सूर्य पण परतीच्या मार्गावर होता, त्यामुळे माना टाकलेली एका शेतातली सूर्यफुले त्या नारंगी छटेत खूप सुंदर दिसत होती. मी काच खाली घेऊन एक फोटो घ्यावा या विचारातच होते, तर समोरून एक बस अचानकच थांबून वळायचा प्रयत्न करते आहे असे दिसले. ड्रायव्हरने बस कशीबशी रस्त्याच्या थोडी बाहेर काढून वळवली आणि उलट दिशेने जायला लागला. मागोमाग जोरजोरात आरडा-ओरडा ऐकू येऊ लागला आणि बराच मोठा माणसांचा जमाव, हातात, काठ्या, चाकू, सुरे, कोयते असे काय काय घेऊन आमच्या दिशेने पळत येताना दिसला. आमच्या ड्रायव्हरने ताबडतोप काच बंद करण्याचा आदेश दिला, जी मी फोटो काढण्यासाठी उघडली होती, आणि तिकडे बघू पण नका अशी सूचना केली. माणसांचा जमाव आरडा-ओरडा करत आमची गाडी पार करून पुढे गेला, मागून ४-५ मोटार सायकली प्रचंड वेगाने गेल्या आणि थोडे पुढे गेलेल्या बसला आडव्या थांबल्या. बस ड्रायव्हर, बस थांबवून उतरला आणि धूम पळत सुटला. काही लोकं ड्रायव्हरच्या मागे धावले, उरलेल्यांनी लाठ्या-काठ्या-दांडकी-दगड जे सापडेल त्याने बसच्या काचा फोडायला सुरुवात केली. जोरजोरात बसचा पत्रा ठोकायला लागले. आतली सगळी लोकं घाबरून खाली उतरली, आणि आली त्या दिशेने चालत-चालत निमूट परत निघाली. तर त्यांना तसे करू न देता जिथून बस वळवली होती तिथे जाऊन थांबायला सांगितले गेले. इतर अनेक गाड्यांप्रमाणे आमची कार पण समोरचा रस्ता बंद असल्याने जागेवरच थांबली आहे, हे एव्हाना माझ्या लक्षात आले. काय झाले म्हणून ड्रायव्हरला विचारले तर "हे नेहमीचेच आहे, रास्ता रोक दिया है", असे उत्तर मिळाले. शेजार राष्ट्रातून घुसखोरी करून भारतात आलेल्या, एका ठराविक समाजाची ती वस्ती म्हणजे एक छोटे गावच आहे. जे मुख्य रस्त्याला लागून असल्याने, येणाऱ्या जाणार्‍यांना हा त्रास नेहमीचाच आहे, अशी माहिती मिळाली. औरंगजेबाने हिंदू तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी 'जिझिया' कर लावला होता, त्यात गंगासागर पण होते. प्रश्न पडला, हे तरी दुसरे काय आहे.

पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ड्रायव्हरला पकडून आणले होते. लाथा-बुक्क्यांनी तुडवत तुडवत त्याला लोकं घेऊन गेले, ते सगळे दिसेनासे झाले. मग मी गाडीतून खाली उतरले. ड्रायव्हरपण उतरून मागच्या पुढच्या गाडीवाल्यांशी बोलू लागला. गाड्यांची रांग इतकी मोठी होती की, रस्ता कुठे अडवला आहे ते ठिकाण दिसतच नव्हते. जमावातले काही लोकं दहशत दाखवण्यासाठी इकडून तिकडे, तिकडून इकडे चकरा मारत होते. मी, अर्थातच परत काचबंद गाडीत. आमच्या शेजारच्या गाडीत लहान मुल होते. मुलाच्या वडिलांनी, "माझ मुल आजारी आहे, दवाखान्यात घेऊन चाललो आहे, आम्हाला कृपाकरून जाऊ द्या" अशी विनंती केली. "चूप बैठ - चूप बैठ" असे काहीतरी उत्तरादाखल ओरडण्यात आले. ओरडणाऱ्याचे वय जास्तीत जास्त १८ असावे. १० वर्षांपासून ४०-५० पर्यंत विविध वयोगटातील लोकं त्या जमावात होती. भीती बाजूलाच, इतकी कोवळी ती मुलं, त्यांचा उद्दामपणा, भलत्या मार्गाने होणारा त्यांचा प्रवास हे सगळे बघूनच अंगावर सर्रकन काटा आला.
थोड्या वेळाने अजून एक गट आला, त्यातला एक वयस्कर इसम गाड्यांकडे बघतबघत चालला होता. मुलाच्या वडिलांनी पुन्हा काच खाली करून तोच प्रश्न विचारला. उत्तर आले "कोई कही नही जायेगा".

बर्‍याच वेळाने आमचा ड्रायव्हर आला. तर घडले असे होते. कुठल्याश्या गुन्ह्याखाली या गावातल्या एका मुलाला अटक झाली होती. बातमी कळताच यांनी रास्तारोको केले. जाणाऱ्या येणाऱ्यांपैकी कोणीतरी पोलिसांना कळवले. जवळच्या चौकीवरून पोलीस आले. "रस्ता मोकळा करा" सांगायला लागले तर गावकऱ्यांनी पोलिसांना बेदम मारले. दुसऱ्यादिवशी कमांडो पाठवून गावातील 'त्या' लोकांना अटक केली गेली. त्यांच्यापैकी ज्यांनी ज्यांनी पोलिसांवर हात उगारला, त्यांना कस्टडी आणि मग पोलिसी खाक्या मिळाला. हि बातमी यांना गावात कळाली. म्हणून यांनी आज पुन्हा रास्ता रोको केले होते. पोलीस येऊन 'रस्ता सोडा, मोठा जाम झाला आहे, तुमची माणसं लगेच सोडतो' असे म्हणाले. त्यावर, "माणसे सोडा, लगेच रस्ता सोडते" असे सांगितले गेले. माणसे घेऊन जीप आली. पुन्हा विनवणी केली गेली. पण "ज्या पोलिसाने आमच्या माणसाच्या अंगाला हात लावला, त्याला आमच्या ताब्यात द्या तरच आम्ही सगळ्यांना सुखरूप सोडतो" अशी नवी मागणी करण्यात आली. हे सगळ नाटक सकाळी ११ वाजल्यापासून चालले होते म्हणे. आम्ही पहाटेच गेल्यामुळे जाताना तरी सुटलो होतो. ड्रायव्हरला मारण्याचे कारण, त्याने यांचा आदेश झुगारुन वेगळ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न केला.

जमावातला तो वयस्कर इसम त्याची फेरी पूर्ण करून परत जाताना शेजारच्या गाडीशी थांबला आणि "बच्चा कहा है दिखाव" असे म्हणाला. यांनी मुल दाखवले. तो म्हणाला "पुछ के आता हु". थोडे बरे वाटले. येताना त्याच्या निम्म्यावयाच्या एका मुलाला घेऊन आला, त्याच्या हातात मोठा चाकू/सुरा होता. तो ओरडतच आला, किसका बच्चा बिमार है, गाडीपाशी येऊन म्हणाला, डॉक्टर का कागज दिखाओ. तो तर नव्हताच. त्यामुळे 'नही जा सकते' असे म्हणून तो निघून गेला.

पश्चिम बंगाल हे पूर्वेकडचे राज्य असल्याने सूर्यास्त तसा लवकर होतो. एव्हाना पूर्ण अंधार पडला होता. त्यामुळे वातावरण अजूनच 'भयाण' वाटत होते. वेळ जाता जात नव्हता. शेवटी दीड-दोन तासाने कमांडोज च्या गाड्या आल्या आणि आमची (सगळ्यांचीच) सुटका झाली. 'डायमंड हार्बर' राहिले ते राहिलेच.

दुसऱ्या दिवशी ऑफिस मधे झाला प्रकार सांगितला तेंव्हा "बस इतनाही, आप इतनेमेही डर गयी" अशी प्रतिक्रिया ऐकून मात्र त्यांच्या सहनशक्तीला आणि कम्युनिस्ट राजवटीला मी सलाम केला.

भरगच्च आणि तितकाच सुंदर निसर्ग, वेगळ्या वाटेवरचा वेगळाच प्रवास, महानदीचे समुद्रात विलीनीकरण याची डोळा बघावे, यासाठीच होता सारा अट्टाहास. तो मात्र सुफळ संपुर्ण झाला स्मित

"सब तीरथ बार बार, गंगासागर एक बार"

[माझा पुराणकथांचा फारसा अभ्यास नाही, एखादा संदर्भ चुकीचा आढळल्यास जाणकारांनी निदर्शनास आणून द्यावे हि विनंती]