बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Wednesday, 9 April 2014

मधुमालती

आज सकाळी रस्त्याने चालता चालता घरी फोन केला तर बाबा म्हणाले, 'अरे तुझ्या मधुमालतीला खूप फुलं आली आहेत, भलती सुंदर दिसते आहे. पुरा बोगनवेल झाकून टाकला तिने. रस्त्याच्या बाजूने आणि आतून शेकडो फुलं फुलली आहेत' ...... सगळं चित्र जसंच्या तसं माझ्या डोळ्यासमोर उभं राहीलं.

माझे अत्यंत आवडते फुल - अत्यंत आवडती वेल "मधुमालती". आमच्या घराभोवतीच्या बागेत भरपूर फुलझाडे होती. पण मला मधुमालती त्यात हवीच होती. माझ्या आठवणी प्रमाणे रोपवाटिकेतून फुलझाडांची रोपं आणायची पद्धत तेंव्हा नव्हती. एकमेकांच्या बागेतूनच मागून आणली जायची. जवळपास कुणाच्या बागेत मधुमालती दिसते का, याच्या मी शोधातच होते. ज्या एक जणांच्या कमानीवर मला ती पहुडलेली दिसत होती, त्यांच्या कडून तिचे 'बाळ'रोप मिळण्याची शक्यता अगदीच नगण्य होती.

एकदा पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांनी सगळ्याच झाडांची छाटणी केली. मी चक्क त्यांनी रस्त्यावर टाकून दिलेल्या ढिगातून जाडसर आणि लांबलचक अशी एक फांदी उचलून आणली. एक खड्डा खणून, त्या फांदीची चुंबळ बांधून तिचे एक छोटेसे टोक बाहेर ठेऊन बाकी व्यवस्थित खड्ड्यात पुरली. आजूबाजूला ओल राहील असे पाणी घातले. आता कोंब फुटायची वाट बघायची !! योगायोगाने थोड्यावेळाने पाऊस पण पडला. मी नवीन रोपं लावली कि त्यादिवशी पाउस पडतो, आणि जर त्याच दिवशी पाउस पडला तर माझ्या रोपांना मस्त पालवी फुटतेच, अशी माझी एक श्रद्धा होती.

पाउस काय पडला, मला तर मधुमालतीचा वेल झरझर गच्चीपर्यंत गेलेला दिसायलाही लागला. पण तसे काहीच झाले नाही. ते रोप उतरलेच नाही. नंतर बऱ्याच दिवसांनी आई बरोबर लांबच्या ओळखीच्या एक जणांकडे गेले होते. आईच्या त्यांच्याशी गप्पा चालल्या होत्या त्यावेळात मी त्यांच्या बागेत फेरफटका मारत होते तर 'मधुमालती' भेटली. निघताना काकुंना म्हटले 'मला मधुमालतीची एक फांदी हवी आहे'. 'फांदी कशाला, बरीच रोपं उतरली आहेत कि, रोपच घेऊन जा' काकू म्हणाल्या. अजूनच आनंद. पण हे पण रोप नाहीच टिकले.
त्यानंतर अनेक वर्षांनी पुण्याला एका नातेवाइकांकडे गेले होते. त्यांनी नुकताच कुणाचा बंगला रहाण्यासाठी घेतला होता. खूप सुंदर बाग होती त्यांची. संध्याकाळची वेळी होती ती. घरात गेल्याबरोबर मी त्यांना विचारले, 'बाहेर खूप मस्त वास येतो आहे, कशाचा आहे तो ? तुमच्याकडे मधुमालती आहे का ?'. असे बोलत बोलतच मी बाहेर येऊन थोडे इकडे तिकडे बघितले तर मधुमालती दिसलीच. परत एकदा रोपाची मागणी आणि मग त्याचा पुणे-श्रीरामपुर प्रवास. पण यंदा नशीब एकदम जोरदार होते. रोप टिकले, फुटले, फुलले, बहरले आणि मग फोफावले सुद्धा .....

'मधुमालती' हे नावच किती वेगळे आणि सुंदर आहे. या वेलीचे तेलगु नाव तर अजूनच सुंदर आहे 'राधा मनोहरम'. या फुलांना मंद असा एक खास वास असतो. पांढरी, अगदी फिकी गुलाबी आणि थोडी गडद अशी तीन रंगात हि फुलं फुलतात. एकाच वेलीवर एकाच गुच्छात हे तीन रंग असतात. एकदा रोप चांगले लागले कि पुन्हा त्याला काहीही मशागत लागत नाही. विनातक्रार, केवळ पावसाच्या पाण्यावर भरभरून फुलं आणि भारून टाकणारा सुगंध हि वेल देत रहाते. या दिवसांमध्ये, म्हणजे वसंताच्या सुरुवातीला 'मधुमालती' फुलते / बहरते. पुरेश्या मोठ्या झालेल्या वेलीवर अक्षरशः शेकडो फुले फुललेली दिसतात. थोडेसे वेगळेपण म्हणजे रातराणी सारखीच हि फुले संध्याकाळी उमलतात. त्यामुळेच जिथे कुठे मधुमालतीची वेल असते तिथे आजूबाजूला संध्याकाळच्या वेळी एक मंद सुवास दरवळत रहातो. हा वास इतका हलका असतो कि मनभरून घेण्यासाठी आपोआपच खोल / दीर्घ श्वास घेतला जातो. वेगळ्या मेडिटेशनची गरजच काय .....

अक्षरशः जिवापेक्षा जास्त सांभाळून मी ते रोप 'एसटी' बसने पुण्याहून श्रीरामपुरला घेऊन आले. आमच्या घराला समोर एक व्हरांडा आहे. त्याला २ जाळीच्या खिडक्या. एका खिडकी खाली मी ते रोप लावले. वेलाच्या एका टोकाला सुतळी बांधून, ती खिडकीला टांगून ठेवली. जसा जसा वेल मोठा होत गेला, त्याला मी व्हरांड्याच्या छतावर चढवले आणि पलीकडच्या बाजूने खाली आणले. अगदी मला हवे होते तसाच हा वेल वाढत होता. आता संध्याकाळच्या वेळी आमच्या घराच्या पुढच्या अंगणात तर येत असेच पण सगळ्या खोल्यांमध्ये खिडकीजवळ उभे राहिले कि मधुमालतीचा मंद असा सुगंध येत असे. संध्याकाळ झाली कि माझे सुरु होई, 'बघ किती मस्त वास येतो आहे'. मग कोणीतरी म्हणावे, 'हो हो येतो आहे बरं, सगळ्यांनी म्हणा रे मस्त वास येतो आहे' :)  .....

मधुमालतीची नियमित छाटणी करावीच लागते. कारण ती फारच झपाट्याने वाढते, फांद्या लांबच लांब पसरत जातात. मधुमालतीची फळे जमिनीत रुजून नवी नवी रोपं उतरत रहातातच, शिवाय जमिनीत खोल गेलेल्या मुळाना कोंब फुटून, त्यातूनही नवी रोपे जमिनिबाहेर डोकवायला लागतात. तर असा बराच पसारा वाढल्याने, खिडक्यांवर अंधार यायला लागला आणि माझ्या मधुमालतीच्या खोडावर कुऱ्हाडीचा घाव बसला. फक्त त्याआधी योग्य जागी, पुरेसे वाढलेले दुसरे एक रोप हेरून ठेवले होते. आमच्या वडिलांच्या देखरेखीखाली ते वाढले, बहरले, फुलले इ.इ. त्याचा-माझा सहवास असा काहीच नाही. पण आमच्या अंगणात फुललेली प्रत्येक मधुमालती हि अजूनही माझीच आहे :)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.