बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Tuesday, 30 August 2011

गणपती बाप्पा ...

आमच्या आईच्या अंगात अनेक कला असल्याने थोडे अनुवंशिक, थोडे सहवासाने आम्हा बहिणींना पण सुट्टीत काही ना काही कलाकुसरीचे करण्याची सवय होती. किती वर्ष गेली मधे, तासंतास निवांत बसून काही तयार केले असे झालेच नाही. आणि एकदा सवय मोडली कि थोडी सवड असूनही लक्षात येत नाही, तसे काहीसे झाले आहे. धाकट्या बहिणीच्या मुलाला स्वेटर करेन म्हंटले, तिने लोकर पण आणून दिली, आता मुलगा ४ वर्षांचा झाला, लोकर अजून तशीच आहे. तेच मोठ्या बहिणीला मुलगा झाला तेंव्हा त्याच्या बारश्याच्या आत, स्वेटर, शाल तयार होते.

कुणाला काही द्यायचे म्हंटले कि पटकन काहीतरी वस्तू विकत आणली, दिली, संपले. असेच होते आजकाल. पूर्वी, म्हणजे १०-१२ वर्षांपूर्वी, मैत्रिणीचे लग्न ठरले कि आहेरा सोबत  मी स्वत: केलेली एक तरी वस्तू तिच्या रुखवतासाठी देत असे. त्यात मग, चोकोबार स्टिक चे घड्याळ, सिरॅमीक चे पॉट, मोठ्या-मोठ्या हंड्या, डिझाइन पेंट केलेली टाइल, काचेच्या गेलेल्या बल्बला कापूस लावून केलेला ससा, लोकरीचे विणलेले गोल-गोल रुमाल, पांढऱ्या दोऱ्याने विणलेले स्टूल कव्हर, चित्र विणलेला रुमाल / वॉलपिस , लाकूड आणि सिरॅमीक  वापरुन केलेली बैलगाडी, साबणाची परडी, सप्तपदी - होम - जिलेटीन चा कागद वापरून केलेल्या ज्वाळा, सुपारीचा भटजी, हे आणि असे बरेच काही असायचे.

भेट कार्डांचे पण तसेच. मला आठवते आम्ही कॉलेजमधे असे पर्यंत स्वत: हाताने तयार केलेली भेटकार्ड देत / पाठवत असू मैत्रिणीना. त्यात हि कधी कार्टुन्स ची चित्रे [ मला चित्रकलेतले तेव्हडेच येत असल्याने ] काढून, कधी नुसतीच छोटेसे डिझाइन काढून खाली नुकतेच वाचनात आलेले, आवडलेले वाक्य लिहून, एका कार्डावर मी हिंदी चित्रपटातले गाणे लिहिल्याचे पण मला आठवते.  कधी बागेतली फुले पाने चिकटवून, कधी जुन्या मासिकातली चित्रे चिकटवून पण कितीतरी कार्डं केली होती.

माझी एक मैत्रीण छंद म्हणून लहान मुलांचे उन्हाळी शिबिर भरवत असे, काही वर्ष मी पण तिच्याकडे एखादा दिवस जात होते, मुलांना एक वस्तू शिकवायला. लहान मुलांमध्ये मजा तर येतेच पण असाच आपला हि लहानपणचा छंद जोपासला जातो त्या निमित्ताने. मग तेही मागे पडले.

असे बरेच काही मागे पडले आयुष्यात पुढे पुढे जाताना.

पहिली नोकरी सोडली आहे आणि दुसरी मिळायची आहे, असा लग्न झाल्यानंतरचा हा एक महिना मला मिळाला, मनात येईल ते, तसे आणि तेंव्हा करण्यासाठी.  सुरुवात तर केली आहे 'गजानना' पासूनच, बघुया अजून काय काय करणे होते आहे.

संधिचा फायदा घेउन बरेच दिवस मनात असलेला गणपती आज करून बघितला. अनेक वर्षांपूर्वी एका अमेरिकन माणसाने ब्रेडपासून गणपती केल्याचे वाचले होते. कारण अगदी पटणारे होते, विसर्जन केल्यावर मासे तो पूर्ण खाऊन टाकतील आणि विसर्जना नंतर पाण्यात कचरा वगैरे होणार नाही.

तसाच गणपती करायचा प्रयत्न तर केला.  केशरी रंग यावा म्हणून ब्रेड केशराच्या पाण्यात भिजवला, मस्त आकार दिले. पण तो ब्राऊन ब्रेड असल्याने रंग आलाच नाही आणि पूर्ण झाल्यावर गणपती थोडा खाली बसला :(
पण 'मारुती' झाला नाही हेहि नसे थोडके. अजून एक प्रयत्न नक्की करणार :)

चित्र असे आहे 
आणि हा मी केलेला पहिला प्रयत्नNo comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.