बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Friday, 4 November 2011

अंक

दिवाळीची आवारा-आवर संपते न संपते तोच वातावरणात वेगवेगळे वास दरवळायला सुरुवात होते. फराळाच्या पदार्थांचे खमंग, फटाक्यांचे उग्र, नव्यानेच केलेल्या रंगरंगोटीचे झोंबरे. त्यात भर असायची, किल्ल्यासाठी उकरलेल्या मातीच्या सुवासाची, तोरणात गुंफलेल्या झेंडूच्या दरवळाची, नवीन कपड्यांच्या नव्या गंधाची. पण सगळ्यात special असायचा तो दिवाळी अंकाचा कोरा कोरा वास.

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी, तुडुंब जेवल्यावर पलंगावर आडवे पडताना हातात दिवाळी अंक हमखास असायचा. पेपरवाल्याने दिल्याक्षणीच अनुक्रमणिकेवर नजर फिरलेली असायचीच. त्यामुळे कुठल्यापानापासून सुरुवात करायची हे मनात ठरलेलेंच असायचे. कथा अगदी रंगत आलेली असायची आणि आईची हाक यायची, 'चला ग रांगोळी काढून घ्या, प्रेसमधे जायला उशीर होतो'. हो - हो करत अजून चार-दोन ओळी पदरात पाडून घेऊन आम्ही  उठायचो.  तेंव्हा खरच मनाची मोठीच ओढाताण असायची, वाचायला अंक, दूरदर्शनवर बघायला चित्रपट, रांगोळीतही जीव अडकलेला, जेवण जास्त झाल्याने ताणून द्यायची पण इच्छा असायचीच, आणि नवे कपडे घालून बाहेर पण सगळ्यात आधी जायचे असायचे.

त्यावेळी आमच्या घरी एकच दिवाळी अंक यायचा, तो म्हणजे साप्ताहिक सकाळ. सकाळ पेपर बरोबर तो यायचा म्हणून वाचायची सवय लागली आणि मग नकळत वाट बघितली जाऊ लागली. कित्येक वर्ष, म्हणजे १९९४ साली पुण्यात येईपर्यंत मी तो एकच दिवाळी अंक वाचत असे. मग मैत्रिणींकडून ऐकून, काही इथे तिथे वाचून इतरही अंक घेऊ आणि वाचू लागले. त्यातही, मौज, म.टा., अंतर्नाद, कथाश्री असे काही मनापासून आवडू लागले. काही वर्षांनी माझी मोठी बहिण ठाण्याहून बरेच दिवाळी अंक पाठवू लागली. [काही कारणाने त्यांना मोफत मिळत असत] पण ते दिवाळीनंतर. तेवढाही धीर न धरवल्याने, मी आपली दरवर्षी मौज आणि साप्ताहिक सकाळ अप्पा बळवंत चौकातून घेऊन यायचेच, कारण दिवाळी अंका शिवाय दिवाळीची  मजा पूर्ण होतच नसे.

वर्षातून एकदा येणारा एक 'अंक'. पण आयुष्य किती समृद्ध केले त्या वाचनाने. अनिल अवचट, महाजन सर, सुदेष्णा घारे या सारख्या अनोख्या जगण्याशी कायमची नाळ बांधली गेली. कृष्णमेघ कुंटे सारखे आला दिवस सोन्याचा करण्याचे मानाने निश्चित केले. नीना-दिलीप कुलकर्णी सारखे उत्तम सहजीवनाचा धडा मनात गिरवला. या सगळ्या प्रदीर्घ मुलाखती वाचता वाचता उत्तम मुलाखत कशी असावी याचेही पाठ मिळाले. नव कथा, गौरी देशपांडे यांची ओळखही साप्ताहिक सकाळ मुळेच झाली.  काही मोजक्या ऐतिहासिक कादंबऱ्या सोडता मी कधीच हा प्रकार वाचला नव्हता. साप्ताहिक सकाळ मधे अनेक लेखकांच्या उत्तम कथा / दीर्घकथा / लघु कादंबऱ्या / व्यक्तिरेखा वाचायला मिळाल्या. विषयातले / मांडणीतले वैविध्य, जुन्या प्रतिथयश लेखक-कवीं बरोबरच नव्यानाही संधी, दरवर्षी केले जाणारे नवीन प्रयोग या सगळ्यामुळे एकूणच माझ्याही वाचनाच्या कक्षा रुंदावत गेल्या. काय काय वाचले आणि किती वाचले, सगळेच आता आठवत नाही. पण दिवाळीच्या सुट्टीचा आनंद साप्ताहिक सकाळ च्या दिवाळी अंकानी नेहमीच वाढवला होता, हे मात्र नीटच आठवते. गोष्ट खूप छोटीशीच असते. पण नकळत तुमच्यात होणाऱ्या एखाद्या मोठ्या बदलास कारणीभूत होते.

मला आठवते, मी लिहिलेला, काव्य वाचनाच्या एका कार्यक्रमाचा वृत्तांत जेंव्हा पहिल्यांदा ऑनलाईन दिवाळी अंकात समाविष्ट केला तेंव्हा मी अगदी स्वतःवरच खुष झाले होते. कारण आमच्या लहानपणी दिवाळी अंकात तुमचे लिखाण छापून येणे ही एक महत्वाची गोष्ट असायची. कितीतरी गाजलेल्या कादंबऱ्या दिवाळी अंकातूनच पहील्यांदा प्रसिद्ध झाल्या. कित्येक कथाकार, कवी लोकांपर्यंत पोहोचले ते दिवाळी अंकाच्या माध्यमातूनच. पण आता तो दर्जा, ती विविधता, वाचकांना नवे काही देण्याच्या त्या उर्मी कमी-कमी होत चालल्या आहेत असे जाणवते. माझ्या लहानपणी, किंवा तरुणपणी म्हणूया हवेतर, जर ५ अंक निघत होते तर आता ५०, इतकी दिवाळी अंकांची संख्या वाढली आहे हे नक्की. हा घेऊ की तो वाचू असा प्रश्न पडावा, इतकी दिवाळी अंकांची रेलचेल वाढत चालली आहे. आज काल अंतरजालावर पण बरेच दिवाळी अंक प्रकाशित होतात. प्रामुख्याने नवीन लेखक-कवींना त्यातून लिखाणाची संधी मिळते हा जसा त्याचा एक फायदा तसेच तुम्ही जगाच्या कुठल्याही काना-कोपऱ्यात असाल तरी दिवाळी अंकाची मजा घेऊ शकता हा दुसरा.

पण तरीही छापील अंकाची मजा काही वेगळीच. मागच्या वर्षी कोलकत्त्याला असताना सुद्धा दिवाळी-पिकनिक साठी येणाऱ्या मित्र-मैत्रीणीना आठवणीने माझ्यासाठी दिवाळी अंक आणण्याची विनंती करायला मी विसरले नाही. यावर्षी मात्र माझ्या आयुष्याच्या दुसऱ्या अंकाची पहिली दिवाळी मी अंकाशिवाय साजरी केली. ती अंकवाचनाची ओढ कमी झाली म्हणून नाही तर इतर व्यस्ततेमुळे.

कधी थोडे 'कमी', कधी थोडे 'अधिक' असा छपाई आणि लेखनाचा दर्जा थोडा-थोडा उजवी-डावीकडे झुलत तर राहणारच. आणि एखाद्या मुरलेल्या साहित्यिकांच काहीतरी नवीन वाचायला मिळेल किंवा एखाद्या नवीन अफलातून लेखकाची भेट घडेल या आशेने आपण ही नव-नवे दिवाळी अंक चाळत राहणारच.

मराठी माणुस त्याच मराठमोळ वेड आयुष्यभर जपणारच !

2 comments:

Note: only a member of this blog may post a comment.