बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Wednesday, 9 November 2011

मुक्त

स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा, आधार कसा शोधावा
मन मनास उमगत नाही ...

जेमतेम एवढेच गुणगुणली आणि ओंजळीत चेहरा लपवून ती हमसून हमसून रडायला लागली. आपण बसलो आहोत तिथून १० फुटावरच वाहता रस्ता आहे हे लक्षात येऊन ती अचानकच शांत झाली. डोळे पुसले. आपल्याला रडताना कोणी बघितले तर नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी तिने आजू बाजूला बघितले. पण फारसे कोणी तिला दिसले नाही. साडेतीन चारच वाजत होते त्यामुळे शाळेच्या मुलांची पण गर्दी रस्त्यावर नव्हती आणि फारश्या गाड्या पण नव्हत्या.

तसा त्यांचा बंगला एकटाच होता, जवळच मागे एक कॉलनी होती. पण हाकेच्या अंतरावर फारसे कोणी रहात नव्हते. काहीवार्षांपासून बंगल्या समोरच, पण रस्त्याच्या पलीकडे २ झोपड्या झाल्या होत्या. होते बेरडच पण त्रास काही नव्हता. उलट ते खोपटाच्या बाहेरच झोपत असल्याने रात्रीची सोबतच वाटायची. त्यामुळे घरात कुणालाच तक्रार करावीशी वाटली नव्हती.

ती परत शांतपणे जिन्याला डोके टेकवून रस्त्याकडे बघत बसून राहिली. घरातली माणसे असह्य झाली की ती अशीच रस्त्यावरची माणसे बघत बसायची. बंगल्याचे फाटक सताड उघडे ठेवून, जिन्याला टेकून बसून राहायची. क्वचितच येणाऱ्या जाणाऱ्या कुणाशी दोन शब्द बोलायची. मन थोडे हलके, शांत झाले की परत रोजच्या व्यवहाराला लागायची.

डोळ्याच्या कोपऱ्यातून गळणारे पाणी पुसून खांदा पूर्ण भिजला होता, पुन्हा एकदा तिने मान वळवून आस-पास कोणी नाही याची खात्री करून घेतली. समोरच्या खोपट्या समोर परी फुटाणे फोडत बसलेली दिसली. भट्टी चांगली पेटली होती, खरर्रा, खरर्रा लोखंडी झाऱ्या कढईला घासत होता. तिच्याच शेजारच्या खोपट्या ला लागून कली बसली होती. कोंबडीच्या पिलांना कुठल्याश्या धान्याचे कण खाऊ घालत होती. पिले तिच्या भोवती नाचून उच्छाद मांडत होती. हि आपली शांतपणे ओच्यातून थोडे थोडे धान्य जमिनीवर टाकत होती, मध्येच एखादे पिलू उचलून मांडीत घेत होती, त्याला कुरवाळत होती आणि परत जमिनीवर सोडत होती.

किती दिवस झाले असे शांतपणे मुलींबरोबर बसलोच नाही आपण. तिला एकदम जाणवले. ना त्यांच्याशी खेळलो, ना गप्पा-गोष्टी केल्या. किती नशीबवान आहे हि बाई, किती शांतता आहे हिच्या आयुष्यात, आपल्या मर्जीने चाललेले असते हिचे जगणे. एकटीच राहते. नाही म्हणायला एक माकड आहे, २ शेळ्या, आणि १०-१२ कोंबड्या. सगळ्यांना जीव लावते. म्हातारपण जवळ आल्याच्या खुणा आहेत चेहऱ्यावर, पण काळजी, तगमग नाही आपल्यासारखी. पूर्वी खूप सुंदर दिसायची कलावती, सगळे ट्रकवाले हिला बघून गाडी थांबवायचे म्हणे असे काहीतरी रंगात आली की सांगत असते.

आपण पण तर सुंदरच दिसत होतो आपल्या तरुण पणी. पण असे कोणी आपल्याकडे कधी वळून पाहिल्याचे आठवतच नाही. आठवत नाही पेक्षा आयुष्याला तेवढी उसंतच नव्हती. बाबांचे आजारपण, घरातले दारिद्र्य, आईची होणारी ओढाताण, भाऊ हुशार असून त्याच्या शिक्षणाची होणारी परवड या सगळ्या काळज्यांनी इतके पिचलो होतो आपण की नटणे-मुरडणे अशा तारुण्यसुलभ गोष्टी कधी मनाला शिवल्याच नाहीत. रोजचे काम केल्यासारखी अंघोळ करायची, वेणी घालायची, बाहेर पडायचे. जमेल तेवढा घराला हातभर लावायला हवा, म्हणून शिक्षण सांभाळून मिळेल ती नोकरी पण केली.

हिला ना जबाबदारी ना आगापिछा. कुणाच तरी जून-पान नेसते, शेळ्या-कोंबड्यांची घाण आवरते, आणि माकडाला डोक्यावर घेऊन फिरते इथे तिथे, चांभार चौकश्या करत. तिची आणि आपली बरोबरी होऊच शकत नाही. हे काय वेड्यासारखे विचार करतो आहे आपण. कोण कुठली ती कली, तिच्याशी स्वतःची बरोबरी ? त्या खोपट्यात राहणाऱ्या, अडाणी अशिक्षित बाई शी ? काय झाले काय आहे आपल्याला आज ? स्वतःच्या हाताने तिने नवऱ्याला घरातून बाहेर हाकलले. काही कमावत नव्हता म्हणे, हिचेच पैसे उडवायचा. रात्री दारू प्यायचा आणि दिवसा काळा कोट घालून, वकिलाच सोंग आणून फिरायचा, बहुरूपी. दिवसाला दोन-पाच रुपये इतकीच त्याची कमाई. पण हे कसलं वागणं कलीच, काहीच भीडभाड नाही. आणि आपण बसलो आहे तिच्याशी स्वतःची तुलना करत.

आपण चांगल्या घरात, चांगल्या संस्कारात मोठे झालो. लग्न पण सुशिक्षित घरी झाले. BA पर्यंत शिकलो. MA पण करायचे होते. बाबा अंथरुणाला खिळले नसते तर ते पण पूर्ण केले असते. त्यांच्या हातात फार दिवस नाहीत, हे त्यांच्या लक्षात आले होते. माझ्या डोळ्यासमोर मुलीचे तरी लग्न होऊदे, असा त्यांनी हट्टच धरला. ओळखी पाळखी च्या कुणीतरी हे स्थळ सुचवलं. श्रीमंत आहेत, सुशिक्षित आहेत, सासू-सासरे उच्च पदावर नोकरीस आहेत, मुलाचा बिझीनेस आहे. असे कितीतरी. शिवाय त्यांची काही अपेक्षा पण नाही. बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा शेवटचे एकच वाक्य महत्वाचे ठरले आणि माणसे-मुलगा न बघताच, माझे लग्न जवळ जवळ पक्के पण झाले. साखरपुडा झाला त्या रात्री आईच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडले. ती अजून रडतेच आहे.

नाही म्हणायला सुरुवातीचे काही दिवस बरे गेले. इकडचे सगळे नातेवाईक, येणारे जाणारे, सगळे आपल्या दिसण्याचे, वागण्याचे भरभरून कौतुक करायचे. "छान सून मिळाली हो, नशीबवान आहात", असे काही ऐकले की दिवस कसा आनंदात जायचा. ते काही दिवस स्वतः:ला आरशात निरखण्याचा छंदच लागला होता. गालावरची खळी खूपच शोभते आपल्याला, आपली स्कीन इतर मुलींपेक्षा नितळ आहे. आपले केस, आपले डोळे, गोल-गोल चेहरा सगळ्याच्या आपण पहिल्यांदाच बघितल्या सारखे प्रेमात पडलो. श्रीकांत ने काही कधी १० वर्षात आपले कौतुक केले नाही. त्याची आठवण आली आणि पुन्हा एकदा तिचे मन उदास-उदास झाले.

श्रीकांत चे एक काही कळतच नाही, त्याने जबरदस्तीने आपल्याशी लग्न केले म्हणावे तर तसेही नाही. पुन्हा ती तिच्याच विचारांत गुरफटली. कधी प्रेमाने बोलणे नाही की कधी हौसेने काही आणणे नाही. सासूबाई कधीतरी त्यांच्या महिलामंडळात चल म्हणतात ते  एक सोडले तर कुठे जाणे-येणे पण नाही. बर धंद्यात बिझी असतो म्हणावे तर घरात पुरेसे पैसे पण देत नाही. सासू-सासऱ्यांचा आधार आहे म्हणून मुलांची शिक्षणं तरी होत आहेत. माझी नोकरी अशीतशीच. तीही सासुबाईंच्या ओळखीने लागलेली. एकूण काय त्यांचा टेकू घेऊन रडत-खडत चाललेला आमचा संसार. मोबदला दिल्याशिवाय माणसाला आयुष्यात काही मिळत नाही हेही खरेच. अगदी नोकरा सारखे राबवून घेत होत्या त्या मला. कुठल्याच कामाला कुणाचीच मदत नाही. सगळे बसल्याजागी हातात लागे. यांचा गोतावळा मोठा. आम्ही घरची चार माणसे, माझ्या २ मुली. दमछाक होऊन जाते माझी. पण सांगणार कोणाला. प्रेमाने बोलणारे तर घरात कोणी नाही. मुली अजून लहान आहेत. त्यांनापण आजीचाच लळा जास्त. आजी अभ्यास घेते, आजी खाऊ आणते, कधी रागावत नाही. लहानच त्या, इतके पुरे आहे त्यांना आजी-आजी करायला. घरातले जुजबी खर्च भागवता भागवताच पगार संपतो. हौसे,मौजे ला कुठून पैसे आणणार. सगळा पोकळ वासा निघाला. कुठल्याच बाजूने सुख नाही.

श्रीकांत फक्त बारावी पास आहे, टकला आहे, काळा आहे, अबोल आहे या सगळ्यालाच, माणसे चांगली आहेत, श्रीमंत आहेत, सुखात राहशील अशी माझी समजूत घातली गेली होती. माझ्याशी तर कोणीच चांगले वागत नाही. आणि त्यांच्या श्रीमंतीचा मला काही उपयोग नाही. श्रीकांत निर्लज्जपणे आई-वडिलांकडून पैसे मागून चैन करतो. पिणे तर आज काल रोजचेच झाले आहे. सगळ्याचाच नुसता वीट आला आहे. कधी कधी वाटते निघून जावे सगळे सोडून. कुठल्या या गावात येऊन पडलो. सगळ्या मैत्रिणी, भाऊ-वाहिनी सगळे तिकडे लांब राहिले. इथे कुणी जीवाभावाचे नाही. मन रमवेल, फुंकर घालेल असे माणूस जवळपास नाही. मनाची नुसती तडफड तडफड होते. जीव कासावीस होतो. हंबरडा फोडून रडावेसे वाटते. कुशीत शिरून तासंतास रडत बसले तरी मन हलके होणार नाही, पण कुणाच्या ?

"आंबा बाईचा उदो उदो", ऐकून ती भानावर आली. आज शुक्रवार नाही का ? परी चे नाटक सुरू झाले असणार. परी, परीघा नाव तिचे, पण घरचे दारचे सगळेच तिला परीच म्हणायचे. उंच, मजबूत बांध्याची, सावळी, नऊवार नेसलेली परी, मळवट भरून, केस मोकळे सोडून घुमायची तेव्हा खरंच भयंकर दिसायची. पस्तिशीला आली तरी हिला मूल-बाळ काही झाले नाही. म्हणून हिने २० वर्षाची आपलीच धाकटी विधवा बहीण नवऱ्याला करून आणली. ती बिचारी दिवसभर घरच सगळं बघायची. परीला ऐत खाऊ-पिऊ घालायची. नवऱ्याची सेवा करायची. नवरा देशी दारूच्या दुकानाबाहेर खारे दाणे-फुटाणे-अंडी विकायचा. अंडी शेजारच्या कलीकडून विकत घेत असे. दाणे-फुटाणे या दोघी घरीच करायच्या. बरे पैसे मिळायचे. परीची दुपारची डुलकी झाली की लहर आली तर ती फुटाणे हालवत बसायची नाहीतर डोक्यावर पाटी घेऊन मागच्या घरांपाशी "घे गरम दाणे-फुटाणे" अशी एक आरोळी ठोकून यायची. कधी तिथेच एखाद्या घराच्या पायरीवर गप्पा टाकत बसायची, "चा" प्यायची. आली की मिश्री लावून खोपटाच्या दारात बसून राहायची.

शुक्रवारी संध्याकाळी मात्र तिच्या अंगात यायचे. धाकटीला घरात आणल्यापासून हे एक नवीन नाटक तिने सुरू केले होते. आजू-बाजूच्या कुणाकुणाला ते खरे पण वाटायचे. मला मात्र का कोण जाणे ते नाटक वाटायचे. एक दोनदा तिला हटकले तर नुसतीच खाली बघून गालातल्या गालात हसली परी. आहे अशिक्षितच पण चलाख आहे. दुसरीला घरात आणून, मोठेपणा मिळवला. २० वर्ष संसार सुख उपभोगले आणि आता सगळीच जबाबदारी तिच्यावर टाकून हि विरक्त झाली. वर आपले आयुष्य मार्गी लागले म्हणून धाकटी हिच्या उपकारात, कायमचीच. हिच सगळं मनापासून करायची. किती सहज परीने तिच्या आयुष्याचा प्रश्न सोडवला होता. मी मात्र अडकले आहे असंख्य प्रश्नांच्या भोवऱ्यात. उत्तर एकाचेही नाही माझ्याजवळ. कुठे जाऊन शोधावे तर उत्साह नाही मनात, बळ नाही पायात, शक्ती नाही शरीरात. हिंमत नाही राहिली निर्णय घेण्याची. डोळ्याला झापडं लावून आला दिवस ढकलणे इतके अंगवळणी पडले आहे की नवे विचार सुद्धा डोक्यात येत नाहीत आज-काल. चार गोष्टी शिकाव्या या दोघींपाशी बसून.

या नक्की काय विचार करतात, असे कोणते आयुष्याचे अनुभव यांनी गाठीशी जोडले आहेत, काय आहे यांच्या आयुष्याच तत्वज्ञान, यातल्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं आत्ता या क्षणी माझ्याजवळ नाहीत. स्त्री मुक्ती, वैचारिक क्रांती या सगळ्या पासूनच कोसभर दूर असलेल्या या दोघींना जाणीवही नाहीये त्यांच्या 'आत' घडलेल्या मानसिक क्रांतीची. खर म्हणजे तीच तर आवश्यक आहे निर्णय घेण्यासाठी, बळ देण्यासाठी. निर्णय घेऊन तो स्वतः:च्या  जबाबदारीवर आयुष्यभर निभावण्याचे या दोघींनी दाखवले ते खरे धाडस, ती खरी क्रांती, तो खरा आशावाद.

"हूं हूं हूं" करत अखेर दमून परी निमचीत बसली. तिची धाकटी आणि कली तिच्या डोक्यावरून, खांद्यावरून हात फिरवत तिथेच, तिच्या डावी-उजवीकडे टेकल्या. त्यांच्याकडे टक लावून बघत बसलेल्या हिच्या मनात आले,  दोन भिन्न जीवनांची तुलना करणे कठीण आहे. मी सुशिक्षित, त्या अशिक्षित, मी बंगल्यात, त्या खोपट्यात, मी नीटनेटकी, त्या अजागळ, यातले काहीच महत्वाचे नाही. जे आहे त्यात सुख मानणं किंवा आपल्याला हव्या त्या सुखाचा शोध घेणं, आयुष्यात हे दोनच 'दृष्टिकोन' अत्यंत महत्वाचे आहेत. स्वतः:चे आयुष्य सुखी करण्यासाठी घ्यावे लागणारे सगळे निर्णय या दोघींनी त्यांच्या आयुष्यात घेतले आहेत. कुठल्याही रूढींमध्ये जखडून न राहता, कुठल्याही दडपणाला बळी न पडता, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे. आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या आनंदासाठी जगणे यालाच स्वातंत्र्य म्हणतात. या दोघी खऱ्या स्वतंत्र आहेत, मुक्त आहेत हे एकच सत्य आता माझ्या गंजलेल्या बुद्धीला जाणवते आहे.

श्रीकांत च्या गाडीचा लाइट डोळ्यावर पडल्यामुळे ती एकदम भानावर आली. खसकन गाडी रोजच्या जागेवर लावून, धाडकन गेट बंद करून तो तिची दाखल ही न घेता घरात निघून पण गेला. आणि भिंतीच्या कुंपणाआड तिचा जीव अजूनच गुदमरला, अजूनच गुदमरला. पुन्हा एकदा अंधारात तोंड लपवून ती ओक्साबोक्शी रडू लागली.


- आरती.

1 comment:

  1. Asa sagla baghitla kee vatat kee lagnachya pathi saglya muli ka dhavtaat. Artht ne na karna ha pan kahi yavar upay nahi pan kartana savdhanata aani vicharipana balgava , apeksha kahich balgu naye aani swata samarth asav hach upaay.

    ReplyDelete

Note: only a member of this blog may post a comment.